लाँगमार्च परभणी ते मुंबई

-५८० किमी अंतर,
-हजारोंच्या संख्येने
आबालवृद्ध, तरुण-तरुणी, स्त्रिया सहभागी.
-वाटेतील खेड्यापाड्यातील आंबेडकरी जनतेकडून जेवणाची व्यवस्था
काळ आपल्या गतीने पुढे जात आहे. परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानानंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजयराव वाकोडे शहीद झाले. या घटनेला आता एक महिना उलटून गेलाय. मात्र सरकार कासवापेक्षाही संथगतीने हे प्रकरण हाताळत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या परभणीतील आंबेडकरी जनतेचा संयम संपलाय. १७ जानेवारी रोजी दुपारी हजारोंच्या संख्येने परभणीहून पायी निघालेले भीमसैनिक राज्याची राजधानी मुंबईच्या दिशेने झेपावले आहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी परभणी-जालना-औरंगाबाद-नाशिक असे मार्गक्रमण करीत हा लाँगमार्च मुंबईत मंत्रालयावर धडकणार आहे.
कडाक्याच्या थंडीतही जीवाची पर्वा न करता वेगवेगळ्या वयोगटातील आबालवृद्ध, तरुण-तरुणी, स्त्रिया बाबासाहेबांच्या विचारांची ऊर्जा घेऊन ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. सुमारे ५८० किलोमीटर अंतराचा हा पल्ला खडतर असेल, वाटेत अनेक आव्हानेही येतील. मात्र आंबेडकर अनुयायी त्याला पुरून उरतील, ही खात्री आहे.
हा लाँगमार्च जसाजसा पुढे सरकत राहील, तसतसे याला विराट रूप प्राप्त होत जाईल. सरकारवर दबाव वाढण्याची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडणार नाही, याची काळजी प्रशासनाबरोबर आंदोलकांनाही घ्यावी लागेल.
हा लाँगमार्च, लोकभावनांचा, जनसंघर्षाचा, स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा व्हावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लाँगमार्चने निर्णायक यश खेचूनच माघारी फिरावे, परभणीकर या नात्याने ही मनोमन इच्छा आहे…!
अरविंद भराडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत