भूमिका आणि राजकारण !

🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक आणि समीक्षक आहेत
पुढेपुढे राजकारणात भूमिका हा शब्द असेल काय ? प्रश्न आहे. कारण वेगाने हा शब्द राजकारणातून लुप्त होतोय. इतक्यात लुप्ततेने वेग घेतलाय.
महाराष्ट्रात लागण वाढलीय. आधी व्यक्तिगत पातळीवर सुरू झाले. आता पक्ष पातळीवर वाढलेय. आताच काही महिन्याआधी ‘एकतर तू राहशील किंवा मी’ असा जाहीर दम देणारे खास स्मित करीत त्यांनाच पुष्पगुच्छ देतांना दिसतात. या महिन्यात त्यांचे चिरंजीव फडणवीसांना तिनदा भेटायला जातात. त्यांच्या हुकूमातील दैनिकात फडणवीसांचे स्तुतीगान होते. काय समजायचं ? दम दिला. फडतूस , टरबुज्या म्हटलं ते सारं ‘झुट’ होतं.
नुकतेच नागपुरातील एका मुलाखतीत फडणवीसांनी , उध्दव ठाकरे हे आपले शत्रू नाहीत असे सांगितले. अर्थात अधिक स्पष्ट झाले.
हतबल झालेले विरोधक असे आरती गाऊ लागले आहेत. ईव्हीएम ला शत्रू नंबर एक सांगणारे शरद पवार आता विजयाचे श्रेय संघाला देतात. सुप्रिया सुळे यांना फडणवीस यांच्या क्षमतेचे कौतुक करावेसे वाटते. हा बदल की फेरबदल ? शरद पवार यांच्या वक्तव्यात अभ्यास की स्वार्थ ? आधीच दुबळा झालेला विरोधी पक्ष या ओवाळणीने सरकारला काय जाब विचारेल ? आधी 'सत्तेसाठी काहीही' हे कानावर यायचं. आता 'स्वार्थासाठी काहीही' हे येतंय.
फडणवीस सरकारला हे चांगलेच आहे. पुढ्यात जाब विचारणारेच नसणे , यापेक्षा ‘अच्छे दिन’ कोणते ?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे चाललंय त्याचे संघपूरक माध्यमात स्वागत होत आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पुन्हा सभ्यतेच्या आणि सुसंस्कृततेच्या वळणावर येत आहे. राज्याच्या दृष्टीने हे हितावह असल्याचे कौतुक होत आहे.
म्हणजे संघपूरक भूमिकेला विरोध केला की असभ्यतेच्या वळणावर आणि सोबत केली की सभ्य अशी ही प्रचारिकता आहे.
महाराष्ट्रातील हा स्वार्थनाद देशातही दिसतो. अर्थात आधीपासून आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भूमिका 'नसण्याचे' सर्व उच्चांक मोडल्याचे दिसते ! 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आपण 'संघनिष्ठ' असण्याचा आटापिटा करतायत. त्यांचा बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार भगतसिंग यांच्या छायाचित्राचा घोष , काय होते ? राजकारणाची सरळसरळ घसरण म्हणावी लागेल.
यातून नवे प्रश्न निर्माण होत आहेत. विरोधी पक्ष नावाची मानसिकताच लुळी व्हायची. आर्थिक आणि सामाजिक भूमिका हीच राजकीय भूमिका आहे असे ठामपणे न सांगणे यातून हे उदभवले आहे. हिंदुत्व हीच केवळ राजकीय भूमिका असणे याचे हे तोटे आहेत. हिंदुत्व या भूमिकेत आर्थिक आणि सामाजिक उन्नयन काय हे कळायला मार्ग नाही. तरीही , आम्ही 'हिंदुत्व' ही भूमिका कुठे सोडली ? ती आहेच. राज्याचे हित पाहतांना असा संवाद ठेवावा लागतो अशी ठेवणीतील स्पष्टता पूढे केली जाईल.
भाजपच्या विजयात संघाचे योगदान ही काही नवीन बाब नाही. ते आहेच. पण, खुले , श्रीमंत आणि लाभार्थी अशी ३० टक्क्यांपर्यंत व्होट बँक भाजपने पक्की केलीच होती. 'सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन' ने ती घट्ट केली. आता १० टक्क्याची वाढ हवी होती. ती जातीचे , पोटजातीचे , द्वेषाचे गणीत मांडून विजयात नेली. 'हिंदू दलित' ही नवी संज्ञा विकसित केली. दिलेल्या १३ राखीव उमेदवारांत एकच बौध्द दिला. कुणबी समाजाला ६० टक्के पर्यंत उमेदवारी दिली हे खूप प्रचारित केले.
या सर्व बाबींचा विजयात परिणाम नव्हताच असे म्हणता येत नाही.
हिंदुत्व हा सत्तामार्ग आहे , हे खरंय. पण तो कल्याणमार्ग नाही , हेही खरंय. व्यवस्थेने ज्यांना खूप मागे ढकलले त्यांचेसाठी तर नक्कीच नाही. हिंदुत्वाची सत्ता कुणाच्या हाती जाते हेही लपून नाही. मग फसगत का करुन घ्यावी ? सरकार म्हणजे सरकारची धोरणे होतात. ती धोरणे म्हणजेच भूमिका. एकीकडे प्रश्नांचा ढीग लागला असतांना हिंदुत्व की धोरणे ? राजकीय पक्षांवर आर्थिक आणि सामाजिक धोरणे पक्की करायची बाध्यता का आणू नये ?
आता प्रश्न घेऊन एक झालेल्यांचे मेळावे फारसे दिसत नाहीत. जात , पोटजात मेळावे खूप दिसतात. जातीची तिक्ष्णता वाढत चाललीय. कुठूनही येवो , आपल्या जातीचा पोटजातीचा निवडून येवो ही प्रवृत्ती वाढलीय. किंबहुना वाढविल्या गेली. यात केवळ मुठभरांचे भले राहील. बहुसंख्यांकावर ती अदृश्य गुलामगिरी असेल.
राजकारणातून अशापध्दतीने भूमिका बाद होणे हे नवे मरण ठरणार आहे.
.. ‘तुझसे नाराज नही जिंदगी ,
हैराण हूं मैं .. !’
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत