झुंडीच्या गुंडांचे राज्य –
समाज माध्यमातून साभार
सध्या देशात धर्मोन्माद आणि राष्ट्रवादाची अफूची गोळी देऊन जनतेला गुंगवण्याचं काम जोशात सुरू आहे. ‘हम करे सो कायदा’ या नीतीने आपल्या विरोधात मतप्रदर्शन करेल तो देशद्रोही अशी नवीच व्याख्या जन्माला घातली गेली आहे. गोबेल्स तंत्राने लोकांना ‘एक है तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा भूलथापा देऊन फितवलं जात आहे. कुणी काय खावं, काय प्यावं, कुणावर प्रेम करावं याबद्दलचे फतवे काढले जात आहेत. गोहत्येच्या संशयावरून कसलीही शहानिशा न करता झुंडीने एखाद्याचा बळी घेण्याच्या घटना घडत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांना विद्यापीठात घुसून बेदम मारहाण करण्यापर्यंत मोकाट गुंडांची मजल गेली आहे. खुनी आणि बलात्कारी मंत्री होत आहेत. हे सारं होऊनही जनतेच्या मन की बात समजून न घेता आपलीच मन की बात जनतेवर थोपवणं चालू आहे. धर्म व राष्ट्रवादासारख्या माणसाच्या जगण्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या बाबींवरून लोकांच्या भावना भडकावून त्यांचं लक्ष खऱ्या प्रश्नांवरून उडविण्याचा डाव सत्तेतले नेते खेळत आहेत. ढासळती अर्थव्यवस्था, नोटबंदीसारखा देशाला खाईत लोटणारा अविवेकी निर्णय, शेतकऱ्यांच्या नाडणुकीतून होणाऱ्या आत्महत्या, ठप्प झालेली रोजगारनिर्मिती आणि त्यातून निर्माण झालेली बेकारांची फौज, अल्पसंख्यांचे झुंडबळी यांसारख्या घटनांकडे जनतेने काणाडोळा करावा अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठीच लोकांच्या भावना भडकवणाऱ्या गोष्टी हेतुत: केल्या जात आहे.
दुसरीकडे सुदृढ लोकशाहीचं नाटक मात्र मुखवटे वापरून लीलया खेळलं जात आहे. धर्मोन्मादाची गोळी चढवलेल्या लोकांना व भक्तांना कायम नशेत ठेवण्याचं कारस्थान सतत रचलं जात आहे. आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना समाजमाध्यमांतील भाडोत्री गुंड टोळ्यांकरवी लक्ष्य करून नामोहरम करण्याचं षडयंत्र राबवलं जात आहे. अशा लोकांवर एफ आय आर दाखल करून पोलीस यंत्रणांना कामाला लावून त्यांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न जारी आहेत. प्रसार माध्यमांवर दबाव आणून, तर कधी त्यांना वश करून त्यांचा आवाज क्षीण केला जात आहे. न्याय व्यवस्थेलासुद्धा खिळखिळे करण्यास सत्ताधाऱ्यांना यश मिळाले आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी न्यायाधीशांना आपल्या पंखाखाली घेतले आहे. एकुणात सर्वत्र कानठळ्या बसवणारी शांतता राहील याचा चोख बंदोबस्त करण्यात येत आहे.
अर्थात अशा अस्वस्थ वातावरणातही विरोधाचे काही आवाज उठत आहेत. गुंगीतल्या समाजाला गदागदा हलवून जागे करण्याचे यत्नही होत आहेत. अशांना बळ मिळण्याची नितांत गरज आहे. विवेकी विचारीजन आणि सर्जनशील कलावंतांवर ही जबाबदारी येऊन पडली आहे. परंतु यातल्या काहींनी स्वार्थ वा भीतीपायी तोंडात गुळणी घेतली आहे, तर स्वल्पांनी याविरोधात रणशिंगही फुंकलेले दिसतेय. दिवस आणि रात्रही वैराचे आहेत; पण विचारवंत साहित्यिकांची अजून झोप पुरी झाली नाहीय. म्हणून ते मूग गिळून गप्प बसलेले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत संविधान आणि लोकशाहीच्या बचावासाठी जे जिद्दीने लढत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत