॥॥९॥
गुरुकुलं आणि विद्यापीठं
ब्राह्मणी-अब्राह्मणी हा भारतवर्षातील संस्कृतीसंघर्ष वेदकालाइतका प्राचीन आहे. वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण-श्रमण ही त्याचीच अन्य संबोधने. या संस्कृती संघर्षाला अनेक पैलू आहेत. गुरुकुलं आणि विद्यापीठं हा त्यापैकी एक पैलू आहे.
भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या छुप्या अजेंड्यानुसार ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाला तोंड फुटणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यांच्या असहिष्णुतेच्या झळा ज्यांना पोहचत आहेत, त्यापैकी एक म्हणजे विद्यापीठं. विद्यापीठांवरील त्यांचा रागही सनातन आहे. कारण प्राचीनकाळी ‘गुरुकुलं’ ही ब्राह्मणी शिक्षणाची केंद्र, तर ‘विद्यापीठं’ म्हणजे महाविहारं ही अब्राह्मणी शिक्षणाची केंद्र होती.
गुरुकुलाची द्वारं फक्त, ब्राह्मण आणि क्षत्रिय, या दोन वर्णियांनाच खुली होती. तिथे ब्राह्मण विद्यार्थ्यांना नि:शुल्क तर क्षत्रिय विद्यार्थ्यांना सशुल्क शिक्षण दिले जाई. तत्कालीन ऋषिमुनींचे आश्रम म्हणजे गुरुकुलं. वसिष्ठ, विश्वामित्र, याज्ञवल्क्य, कण्व, सांदिपनी इत्यादी ऋषिंचे आश्रम शालेय जीवनापासून सर्वांना ज्ञात आहेत.
याउलट विद्यापीठाची महाद्वारं मात्र सर्व वर्णियांसाठी उघडी होती.
१) तक्षशिला : गांधार
२) नालंदा : मगध
३) विक्रमशिला : मगध
४) वल्लभी : सौराष्ट्र
५) उदन्तपुरी : मगध
६) जगद्दल : बंगाल
७) सोमपुरा : बांग्लादेश
८) नागार्जुन कोंडा : आंध्रप्रदेश
९) श्री शैल्यम् : आंध्रप्रदेश
ही भारतीय विद्यापीठं जगातील शिक्षणाची सर्वात प्राचीन केंद्र होती. भाषा, व्याकरण, दर्शन, गणित, कला, विज्ञान, खगोल इत्यादी विषय तेथे शिकविले जात. देशविदेशातील शिक्षक तेथे अध्यापन करीत, तर देशविदेशातील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत. परिणामी प्राचीन भारताच्या सर्वांगीण प्रगतीत या विद्यापीठांच योगदान अनन्य असं होतं.
गुरुकुलात गुरुप्रमाण असल्यामुळे वादविवाद निषिद्ध होते. पण महाविहारात बुद्धीप्रमाण असल्यामुळे तिथे विविध विषयांवर वाद झडत. परिणामी सांख्य, जैन, लोकायत, बौद्ध, शाक्त, तंत्र अशा विविध दर्शनपरंपराचा तेथे विकास झाला. या विद्यापीठातून ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना राजदरबारात आदरपूर्वक मानाचे स्थान प्रदान केले जाई.
चार्वाक, महावीर, बुद्ध, सारिपुत्र, चाणक्य, विष्णु शर्मा, पाणिनी, वराहमिहिर, नागसेन, अश्वघोष, नागार्जुन, असंग, वसुबंधु, दिग्नाग, धर्मकीर्ति, कमलशील, शांतरक्षित इत्यादी महान दार्शनिक व जीवक, चरक, सुश्रुत आदि महान आयुर्वेदाचार्य या महाविहारांचीच बहुमोल देणगी होय!
गुरुकुलांचं स्वरुप एक शिक्षकी शाळेसारखे असल्यामुळे तेथील ज्ञानालाही मर्यादा होत्या. याउलट महाविहार ही उच्च शिक्षणाची केंद्र होती. सिद्धांत (थिअरी) व प्रयोग (प्रॅक्टीकल) या दोन्ही पद्धतीने तिथे अध्यापन केले जाई. अनेक गुरुकुलाच्या आचार्यांनीदेखील या विद्यापीठातूनच शिक्षण घेतलेले असे.
गुरुची विद्या गुरुलाच फळण्याच्या भयास्तव, गुरुकुलात गुरु एखादी विद्या हातची राखून ठेवित असे. अशाप्रकारे शिष्याने गुरुवर कुरघोडी करु नये, यावर त्यांचा विशेष कटाक्ष असे आणि एवढी खबरदारी घेऊनही, शिष्याने गडबड केलीच, तर आणीबाणीच्या प्रसंगी विद्येच्या विस्मरणाच्या शापवाणीने त्याचं मनोबल खच्ची केलं जाई.
महाविहारात मात्र असं हातचं काहीही राखून ठेवलं जात नसे. कारण सर्वज्ञता व हातचं राखून ठेवण्याला भगवान बुद्धांचा विरोध होता. म्हणूनच निर्वाणसमयी ते भिक्खु आनंदना म्हणतात, “ज्ञान असीम आहे. इथे सर्वज्ञ कोणीही नाही. परिणामी ‘अत्त दीप भव’ म्हणजे आपणच आपले गुरु व्हावे!” आणि शेवटी ते म्हणतात, “आनंद मी माझं सर्व ज्ञानसंचित भिक्षुसंघाला देऊन टाकलं आहे. देण्यासारखं असं काहीही मी शिल्लक ठेवलेले नाही.”
उच्च शिक्षण देणारी बहुतांशी प्राचीन विद्यापीठं ही बौद्ध धर्मीय होती. सर्व वर्णियांना ज्ञानाचे दरवाजे खुले करण्याची त्यांची समतावादी परंपरा, ज्ञानाची मालकी फक्त उच्चवर्णीयांकडे असावी या विषमतावादी ब्राह्मणी गुरुकुल परंपरेविरुद्ध होती. परिणामी महाविहार हे ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या मार्गातला मोठा अडथळा होती.
या विद्यापीठांमुळेच बौद्ध धर्म भारतभर व विदेशात पोहचला होता. तर वैदिक धर्म नामशेष होण्याच्या पंथाला लागला. परिणामी ज्ञानाची मक्तेदारी आपल्याकडे असल्याखेरीज, आपल्याला समाजाचं धुरिणत्व करता येणार नाही. हे मर्म लक्षात घेऊन प्रथम मनुस्मृतिद्वारे शूद्रांना सक्तीची ज्ञानबंदी करण्यात आली व तद़्नंतर शंकराचार्यांच्या प्रतिक्रांती काळात महाविहारांना लक्ष्य करण्यात येऊन, विद्यापीठीय बौद्ध आचार्यांच्या शिरकाणाला सुरुवात झाली.
त्याची परिणती बौद्ध धर्म भारतात नामशेष होण्यात व ही जागतिक किर्तीची विद्यापीठं बंद पडण्यात झाली. अशाप्रकारे एकेकाळी जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारा भारत अज्ञान, अंधश्रद्धा, कुप्रथा, शोषण याची पराकाष्ठा असलेल्या तमोयुगात लोटला गेला.
१९ व्या शतकात इंग्रजांनी ज्ञानाचं सार्वत्रिकरण करुन प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतची सोय केली. त्याची परिणती क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या अथक प्रयत्न-परिश्रमाने, पुण्याच्या भिडे वाड्यात ज्ञानगंगा अवतरण्यात झाली. तेव्हाच हे हजारो वर्षाचं अंधाराचं जाळं फिटलं आणि बहुजनांच्या आकाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याचा उदय झाला. जोतीसाऊची ज्ञानगंगा पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांनी घरोघरी पोहचून बहुजनांची ज्ञानक्षुदा शमवली.
प्राचीन विद्यापीठं भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रभावित होती. तर स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक विद्यापीठं मार्क्सवादी विचारांनी प्रभावित झाली. बुद्धाप्रमाणेच मार्क्सही बुद्वीप्रामाण्यवादी व चिकित्साग्रही होता. वेदप्रमाण मानणाऱ्या मनुवाद्यांचं बुद्धीशी भांडण तर चिकित्सेशी छत्तीसचा आकडा असल्यामुळे मार्क्सच्या विचारांचा पगडा असलेली ही विद्यापीठं त्यांना आपल्या मार्गातला सर्वात मोठा अडसर वाटणे स्वाभाविक होते.
त्यामुळे त्यांनी अलिगड, हैद्राबाद, जेएनयू आदि विद्यापीठांविरुद्ध मोहिम उघडून त्यांच्या अनुदानावर गदा आणली व त्याला राष्ट्रवादाचा मुलामा देत, जनतेचा महसूल विद्यापीठांवर कशासाठी खर्च करायचा असा हास्यास्पद युक्तीवाद सुरु केला. परंतु त्याची काही मात्रा चालली नाही. तेव्हा चारित्र्यावर चिखलफेकीचा सनातन उद्योग त्यांनी सुरु केला. लोकांना आता त्यांचा हा उद्योगही परिचयाचा झाल्यामुळे, तोही निष्प्रभ ठरला. शेवटी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लादण्यात आला. परंतु मनुवाद्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील शून्य योगदानामुळे जनतेला तो रुचला नाही आणि न्यायालयाला पटला नाही.
समतेचे पुरस्कर्ते असलेले बुद्ध आणि मार्क्स हे विषमतावादी ब्राह्मणी परंपरेचे प्रबळ प्रतिस्पर्धी असल्यामुळे, सत्ता प्राप्त होताच निद्रिस्त ‘मनुवादी ज्वालामुखी’ खदखदू लागून, विषमतेचा लाव्हा ओकू लागणं हे क्रमप्राप्तच होतं.
बुधवार : – सुभाषचंद्र सोनार,
दि. ७.९.२०१६ : राजगुरुनगर.
*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत