दिन विशेषदेश-विदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
स्त्री शिक्षणाची योद्धाक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले–लेखक : चंद्रकांत बच्छाव

इच्छितं पत्थितं तुव्हं खिप्पमेव समिज्झतु
सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दो पन्नरसो यथा |
मो. ९८२०३६३८५०
ज्या काळात शुद्रातीशुद्र व स्त्रियांना विद्या शिकणे हे पाप समजले जाई. त्या काळात अनेकांचा प्रखर विरोध झुगारून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या सावित्रीमाई फुले. त्यांच्या कार्याला वंदन करतांना अनेक स्त्रियांना खचितच अभिमान व आनंद वाटत असेल. अनेक स्त्रिया आज विद्याविभूषित होऊन उच्चपदस्थ ठिकाणी मानाच्या व मोक्याच्या जागेवर विराजमान झाल्या आहेत. त्यामागे सावित्रीमाई यांचे अथक प्रयत्न, प्रचंड योगदान व जीवन कारणीभूत आहे, हे त्यांनी विसरू नये.
सातारा या जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव येथील खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी दि. ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीमाईंचा जन्म झाला. सावित्री, सदू, सखाराम व श्रीपती अशी ही चार भावंडे होती. सावित्रीमाई ही सर्वात मोठी मुलगी होती. सावित्रीमाई लहानपणापासूनच हुशार व चुणचुणीत होती. लाडात वाढलेली व आईचे रूप लाभलेली सुंदर कन्या होती. दणकट शरीर लाभल्याने व धाडसी असल्याने झाडांवर चढून चिंचा व जांभळे पाडणे हा त्यांचा उद्योग होता. लहानपणापासून घरकाम व शेती कामात हुशार होत्या. लहान मोठ्यांची भांडणे सोडविणे, शुद्रातीशुद्रांना मदत करणे, त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे व त्यांच्यात स्नेहभाव निर्माण करणे याचे जणू बालपणीच बाळकडू पाजलेले असावे.
सावित्रीमाई ९ वर्षांच्या असतांनाच त्यांच्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. धनकडीच्या पाटलांची मुलगी व जोतिबांची मावस बहीण सगुणाबाई क्षिरसागर यांनी जोतिबासाठी सावित्रीचे स्थळ सुचविले. दोन्ही घरांचा परिचय असल्याने १९४० साली सावित्रीमाई व जोतिबांचा विवाह संपन्न झाला. त्यावेळी जोतिबा १४ वर्षांचे होते. संसार सुरू झाला. सासर एखाद्या विद्यापीठासारखे होते. जोतिबांची ओढ समाज सुधारण्याकडे होती. त्यांच्या सुखदुःखात ते लगेच समरस होत होते. त्यामुळे संसारात कुटुंबाकडे पाठ व असंख्य पीडित कुटुंबांकडे तोंड होते. एका झपाटलेल्या क्रांतीकारक माणसाबरोबर संसार सुरू झाला होता. सावित्रीमाईकडेही हे गुण उपजतच असल्याने त्या जोतिबांशी केव्हाच एकरूप होऊन गेल्या. लहानपणी एका गोऱ्या साहेबांनी त्यांना एक पुस्तक भेट दिले. परंतु आपल्याला वाचता येत नाही, याचे त्यांना खूप वाईट वाटले. आपल्याला वाचता आलेच पाहिजे, ही मनाशी खूप गाठ बांधली. मी शिकणार हा मनाचा निश्चय त्याचवेळी त्यांनी केला. जोतिबांची शिक्षणाकडील ओढ बघून त्या मनोमन भारावून गेल्या. आपले स्वप्न आता पूर्ण होईल या आशेने त्यांची पावले आपोआपच शिक्षणाकडे वळू लागली.
जोतिबा अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी शिक्षणात फारच प्रगती करावयास सुरुवात केली. परंतु, ही गोष्ट गोविंदरावांच्या दुकानात काम करणाऱ्या ब्राम्हणास आवडली नाही. त्यांनी गोविंदरावांना कळविले की, हा मुलगा शिकला तर तो शेती करण्यास नालायक ठरेल. तो बंडखोर होईल व अनैतिक कार्य केल्यामुळे नरकात जाईल. त्या काळातल्या सनातन्यांनी या गोष्टींवर भर देवून गोविंदरावांना फितविले, शेवटी नाईलाजास्तव गोविंदरावांनी जोतिबांना शाळेतून काढून टाकले.
या घटनेचा सावित्रीमाईवर खोलवर परिणाम झाला. परंतु, गफार मुन्शी बेग व लिजिट साहेब या दोन मोठ्या लोकांनी गोविंदरावांना खूप समजून सांगितले व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे जोतिबांची स्कॉटिश मिशनच्या शाळेत १८४१ मध्ये पुन्हा शाळा सुरू झाली. सावित्रीमाई मुळातच हुशार असल्याने व शिक्षणाची आवड असल्याने त्याही शिकू लागल्या. जोतिबांनी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांचा अभ्यास करून घेतला. शिकता शिकता जमेल तसे इतरांना त्या शिकवू लागल्या. सावित्रीमाईंची शिक्षणाची चिकाटी बघून जोतिबांना खूप आनंद वाटला. "तू खूप शिक, मोठी हो!" असे जोतिबा तिला सांगू लागले. ते सतत तिला प्रोत्साहित करीत होते. सावित्रीमाईंना मुळात शिक्षणाची आवड असल्याने त्या लिहू-वाचू लागल्या. शिरवळच्या बाजारात गोऱ्या साहेबांनी दिलेले पुस्तक त्यांनी प्रथम वाचून काढले. हे पुस्तक म्हणजे सावित्रीमाईंच्या पुढील आयुष्याच्या प्रगतीची नांदीच होय. त्या पुस्तकाने त्यांची जीवन जगण्याची दिशाच बदलून टाकली. ते पुस्तक जणू त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पहाट ठरली. मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
जोतिबा व सावित्रीमाई या उभयतांनी शिक्षण संस्था काढून इतरांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून त्यांनी दोन शिक्षण संस्था स्थापन केल्या. पहिली शाळा दि. १५ मे १९४३ रोजी सुरू केली. त्यानंतर १८५१ व १८५२ साली मुलींच्या तीन शाळा अनुक्रमे पहिली शाळा *आण्णासाहेब चिपळूणकर वाडा*, दुसरी *रास्ता पेठेत* व तिसरी शाळा *वेताळ पेठेत* काढल्या. त्या काळात मुलींच्या शाळेत आणि महार मांगांच्या शाळेत शिक्षक मिळणे फार दुरापास्त होते. किंबहुना कोणी तयारच होत नव्हते. अशा परिस्थितीत सावित्रीमाई पुढे आल्या व त्या शाळेत शिकवू लागल्या. त्या वेळी सावित्री या २० वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे त्या शिकत असतांना शिकवित होत्या. त्या काळी केशव शिवराम जोशी म्हणजेच भवाळकर, सखाराम यशवंत परांजपे तसेच नगरची फेरार बाई व पुण्याच्या मिचेल बाई यांनी सावित्रीमाईंच्या प्रशिक्षणाची विशेष जबाबदारी घेतली. सुरुवातीला त्यांच्या शाळेत अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनु पवार व जानी कर्डिले अशा सहा मुली होत्या. पुढे या तीन शाळेत अनुक्रमे पहिल्या शाळेत ४८, दुसऱ्या शाळेत ५१ व तिसऱ्या शाळेत ३३ मुली होत्या. पहिल्या शाळेत स्वतः सावित्रीमाई मुख्याध्यापक होत्या, तर दुसऱ्या शाळेत मोरेश्वर व तिसऱ्या शाळेत विठ्ठल भास्कर हे सहाय्यक होते.
त्या काळी शुद्रातीशुद्रांच्या मुलामुलींनी शिकू नये यासाठी प्रतिगाम्यांनी नाना प्रकार केले. शिक्षण घेणे हे उच्चवर्णियांचे काम आहे. शूद्रांचे नाही. शिकणाऱ्या मुलींचे नवरे मरतात, त्या विधवा होतील, त्या अहंकारी होतील, नवऱ्याच्या आज्ञेत राहणार नाहीत, त्यांचा संसार नीट होणार नाही. मुली शिकल्या तर भ्रष्टाचार होईल. त्या आपला जुना स्त्रीधर्म विसरतील असा कांगावा करून सनातन्यांनी शिक्षणाला प्रखर विरोध करावयाला सुरुवात केली. विद्या शूद्रांच्या घरी गेली तर मोठा अनर्थ होईल व सर्वनाश होईल, असा भयंकर प्रचार सनातनी व प्रतिगाम्यांनी सुरू केला.
परंतु सावित्रीमाई मोठ्या धीराच्या होत्या. त्या विचार करीत की, असे कुठे होते का? ज्ञान कुठे जाती पाडते का? शिक्षण कधी स्त्री - पुरुष भेद करते का? सनातन्यांचा हा कुटील डाव आहे. हे सावित्रीमाईंनी मनोमन ओळखले होते. म्हणून त्या डगमगल्या नाहीत. त्यांना जोतिबांची जबरदस्त साथ होती. त्यांनी निर्धार केला की, काहीही होऊ दे. परंतु, हे कार्य आपण करायचेच. माणुसकीची लढाई लढणे हा गुन्हा असेल, तर तो आपण आनंदात करूया! शिक्षणाने समाजात परिवर्तन होणारच, असा पक्का विश्वास त्या उभयतांमध्ये होता. परंतु ही वाट सोपी नव्हती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणे अतिशय अवघड होते. हजारो वर्षे चालत आलेल्या महाभयंकर रूढी सनातन्यांच्या बाजूने होत्या. त्यामुळे सावित्रीमाईंना एकाकी लढावे लागत होते. सावित्रीमाईंनी आपली जिद्द सोडली नाही. त्या मागे न हटता त्यांनी शाळेत शिकवायला सुरुवात केली. हे पाहून धर्ममार्तंड सनातनी ब्राह्मणांचे पित्त खवळले. त्यांनी सावित्रीमाईंचा छळ करायला सुरुवात केली. त्यांना शिव्या शाप देणे, टिंगल टवाळी करणे, निंदा कुचेष्टा करणे, अंगावर थुंकणे, शेण फेकणे, महारीन म्हणणे, धर्म बुडवायला निघालेली टवळी आहे, असे एक ना अनेक प्रकार करू लागले. एकदा तर एकाने दगड मारून सावित्रीमाईंचे डोकेच फोडले. त्या रक्तबंबाळ झाल्या. एकदा छळवाद चालू असतांनाही त्या डगमगल्या नाहीत. स्त्री शिक्षणाचे कार्य अशाही परिस्थितीत त्यांनी अविरतपणे चालूच ठेवले. एकदा तर कमालच झाली. एक इसम सरळ त्यांच्या अंगावरच धावून आला. सावित्रीमाईंनी मात्र न घाबरता सर्व ताकद एकवटून जोरदार त्याच्या थोबाडीत मारली. तो आवाज म्हणजे मुक्ती युगाचा आरंभच होता. समता, स्वातंत्र्याचा तो आवाज होता. अंधारात चाचपडत असणाऱ्या समाजाचा तो आवाज होता. दीनदुबळ्यांना ताकद देणारा तो आवाज होता. आपण सहन करतो म्हणून दुबळे ठरतो, याची प्रचिती सावित्रीमाईंना पुरेपूर आली. आपण प्रतिकार करत नाही म्हणून इतर शिरजोर होतात. त्यांची प्रवृत्ती अधिक बळावते. त्या मवाल्याला वेळीच अद्दल घडविल्यामुळे तो तर पसार झालाच, परंतु तिथे गम्मत पहाणारे ब्राह्मणही हळूहळू पसार झाले. ही घटना क्रांतीकारक तर होतीच, परंतु पुढच्या काळातील सुवर्णपहाट होती, जिवंत असूनही मेलेल्या प्रत्येक स्त्रीला ताखद मिळेल व तिच्यात विश्वास निर्माण होईल अशीच ही घटना होती. किंबहुना स्त्री शिक्षणाची नांदीच होती. झालेला सगळा प्रकार सावित्रीमाईंनी जोतिबांना सांगितला. त्यांना सावित्रीमाईंचा फार अभिमान वाटला. "तू पराक्रमी आहेस, अशीच पुढे जा!" कौतुकाने जोतिबांनी त्यांना सांगितले. यामुळे सावित्रीमाईंना एक नवीनच ऊर्जा मिळाली. त्यांचा विश्वास वाढला. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
सावित्रीमाईंनी शाळेमध्ये मेहनती व प्रामाणिक शिक्षक घेतले. त्यात गणू शिवजी मांग वधूराजी आप्पाजी चांभार हे ध्येयवादी शिक्षक होते. सर्व शिक्षक पोटतिडकीने शिकवत. ते विद्यार्थ्यांना हक्काची, सामाजिक न्यायाची व समाज परिवर्तनाची भाषा शिकवित होते.
१८५३ मध्ये शाळेचे अधीक्षक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मुलींची वार्षिक परीक्षा घेतली. त्या परीक्षेला २३७ मुली बसल्या होत्या व सदर परीक्षा बघायला हजारो लोक जमले होते. परीक्षेचा हिशोबही चोख असे. सार्वजनिक पैशांचा हिशोब ऑडिट करून जाहीर करणे हे ब्रीद उभयतांनी आयुष्यभर जपले. शिक्षणाचा पसारा वाढू लागला. ठिकठिकाणी शाळा सुरू व्हायला लागल्या.
याच काळात ओतूर, उपसर, सासवड, नायगाव शिरवळ, तळेगाव शिरूर, अंजीरवाडी, भिंगार, मुंडये, चिपळूणकर पाडा, नाना पेठ, रास्ता पेठ, वेताळ पेठ, महारवाडा, भिडेवाडा अशा जवळपास १८ शाळा सुरू करण्यात आल्या व या सर्व शाळेच्या मुख्याध्यापक सावित्रीमाई फुले होत्या. सावित्रीमाई यांची शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हते, तर ते जीवन शिक्षण होते. सावित्रीमाई जीव तोडून शिकवायच्या. चांगला माणूस कसा घडविता येईल असा त्यांचा प्रयत्न असायचा. शिकलेली मुले आपल्या आयुष्यात आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आली पाहिजेत. त्यांनी कोणताही अन्याय सहन करता कामा नये. याचे जणू बाळकडूच त्या पाजत होत्या. मुलांवर त्या मायेने व आपुलकीच्या भावनेने प्रेम करायच्या. त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्न पेरत होत्या. त्यांच्यात विश्वास निर्माण करून परिवर्तन घडवून आणत होत्या.
त्यांच्या शाळेत मातंग समाजाची *मुक्ता* नावाची चुणचुणीत ११ वर्षांची मुलगी शिकत होती. सामाजिक परिस्थितीचे भान असणारी व महार मांगांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात याची सळ व झळ तिला होती. सामाजिक विषमतेचे चटके तिलाही जाणवत होते. एकदा तिने सावित्रीमाईंकडे निबंध लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. सावित्रीमाईंना खूप आनंद वाटला. 'तू जरूर लिही, तुम्ही वर्मावर बोट ठेवूनच लिहिले पाहिजे.' शेवटी १८५५ मध्ये *मुक्ता* ने निबंध लिहिला. *ती आपल्या निबंधात लिहिते,* *"ब्राह्मण लोक तर म्हणतात की, वेद ही आमचीच मत्ता आहे. ब्राह्मणेतरांना वेदांचा अधिकार नाही. यावरून, जर आम्हांस धर्म पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही, तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे? हे भगवंता! तुजकडून आलेला कोणता धर्म आम्ही स्वीकारावा? ते लवकरच कळीव म्हणजे तेणे प्रमाणे तजवीज करता येईल!"* अशी भेदक व विषमता दाखविणारी मांडणी तिने केली. हा निबंध मराठी अक्षर वाङ्मयाचा एक श्रेष्ठ मानदंड ठरावा इतका महत्त्वाचा आहे. दलित साहित्याची ती सुरुवातच होती, असे मानले तर ते वावगे ठरू नये. किती पुढचा विचार मुक्ताने आपल्या निबंधात मांडला होता? हा निबंध जेव्हा ज्ञनोदयाच्या संपादकांनी वाचला तर ते आश्चर्यचकित झाले. दोन समाजात भेदाभेद करणारे दारूण चित्र तिने आपल्या निबंधात स्पष्ट केले होते. ज्ञानोदयाच्या संपादकांनी तो निबंध त्यांच्या अहमदनगरहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रात दि. १५ फेब्रुवारी व १ मार्च १८५५ रोजी दोन भागात प्रसिद्ध केला. एव्हढेच नव्हे तर शासनाने वर्षाच्या शैक्षणिक अहवालात छापला. ना. वि. जोशी यांनीही त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुणे शहराचे वर्णन या ग्रंथात तो आवर्जून प्रसिद्ध केला. खरे म्हणजे मुक्ता एक बंडखोर, विद्रोही व साहित्याची जाण असणारी चाणाक्ष मुलगी होती. परंतु तिने पुढे काहीच लिखाण केल्याचे दिसत नाही. ती त्याच उर्मीने पुढे गेली असती तर महाराष्ट्रात वैचारिक जीवनात क्रांतीकारक लेखिका म्हणून पुढे आली असती व एक नवा इतिहास घडला असता.
सावित्रीमाईंनी जातीसंस्था, परंपरागत रूढी, सामाजिक, धार्मिक व आर्थिक विषमता याविरुद्ध त्या काळी त्यांनी जणू बंडच पुकारले होते. खेड्यातील मुलांना चांगले इंग्रजी लिहिता, वाचता व बोलता यावे, तसेच त्यांना तांत्रिक व शेतीचे शिक्षण द्यावे यावर त्यांचा भर होता. विशेषतः महिलांनी शिकून पुढे यावे, सामाजिक परिवर्तन घडवून आणावे, यासाठी त्यांचा ध्यास होता. उभ्या भारतात स्त्रिया व शूद्रांचा खऱ्या अर्थाने करण्याचे काम सावित्रीमाई व जोतिबांनी केले. वास्तविक महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले हे उभयता एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. समाज सुधारणेचा गजर प्रथमच महाराष्ट्रात झाला व नवयुगाची पहाट त्यांच्यापासून सुरू झाली.
२४ सप्टेंबर १८७३ मध्ये जोतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीमाई या खंद्या कार्यकर्त्या असल्याने त्यांनी संघटनेत स्वतःला झोकून दिले. या संघटनेच्या माध्यमातून पौराहित्य नाकारून साध्या पद्धतीने हुंड्याशिवाय कमी खर्चात विवाह लावण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हातात घेतला. नंतर ही चळवळ देशव्यापी केली. धार्मिक परंपरा नाकारून त्या विरुद्ध बंड त्यांनी पुकारले. नोंदणी विवाहाची पद्धत प्रथम त्यांनी सुरू केली. स्वखर्चाने अनेकांची लग्ने लावून दिली. या चळवळीमुळे पुरोहितांचा धंदा बसला म्हणून त्यांनी प्रखर विरोध केला. कोर्ट कचेरी केली. सावित्रीमाईंना खूप त्रास झाला, परंतु त्या डगमगल्या नाहीत. दि. ४ जानेवारी १८८९ मध्ये त्यांनी आपला मुलगा डॉ. यशवंत याचे लग्न याच पद्धतीने लावले. कदाचित त्या काळातील तो पहिलाच आंतरजातीय विवाह असावा.
१८७७ मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असता सावित्रीमाई व जोतिबांनी गांवोगाव फिरून निधी गोळा केला व धनकवडी येथे *"व्हिक्टोरिया बालाश्रम"* सुरू केला. त्या ठिकाणी हजारो गोरगरीब आपल्या मुलांना घेऊन येत. सावित्रीमाई व त्यांच्या अनेक मैत्रिणींच्या सहाय्याने स्वयंपाक करून त्या बालकांना जेऊ घालीत. किती कष्ट सावित्रीमाईंना पडले असतील याचा विचारच करू शकत नाही.
त्या काळात विधवा ब्राह्मण स्त्रियांवर खूप अत्याचार व अन्याय केले जात असत. त्यांचा दुरुपयोग केला जात असे. अशा नसलेल्या विधवांसाठी सावित्रीमाईंनी कामे सुरू केली. "काळेपाणी टाळण्याचा उपाय" या नावाने आश्रम तथा प्रसूतीगृह सुरू केले. ही माहिती सर्वत्र पाठविली. १८८४ साली जवळपास ३५ ब्राह्मण विधवा त्यांच्याकडे बाळंतपणासाठी आल्या. हा आकडा पुढे १०० च्या वर गेला. सावित्रीमाईंनी स्वतः त्या बायकांची बाळंतपणे केली. *अशीच एक काशीबाई नावाची विधवा ब्राह्मण त्यांच्या आश्रमात आली. तिचे बाळंतपण करून तिचा मुलगा सावित्रीमाईंनी दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केला. त्याचे नाव यशवंत.*
ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांना संघटित करून त्यांचा संप घडवून आणण्याची किमयाही सावित्रीमाई फुल्यांचीच. त्यांना या कामी दीनबंधूचे संपादक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी जोरदार साथ दिली. या ऐतिहासिक संपाची त्या काळी "दी टाइम्स" या वृत्तपत्राने दि. ९ एप्रिल १८९० रोजी ठळक बातमी प्रसिद्ध केली. विशेषतः इंग्लंडमधील स्त्रियांनी सावित्रीमाईंना अभिनंदनपर पत्रे पाठविली.
सावित्रीमाई व जोतिबांनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालविले व दूरदूरहून येणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी आश्रय दिला. सावित्रीमाई या मुलांचे संगोपन एखाद्या मातेसारखे मायेने करीत. त्या कोणासही जेऊ घालीत. जणू अन्नदान हा त्यांचा धर्मच होता. गरीब बायकांची फाटलेले लुगडे बघून त्या आपल्या घरातील लुगडे त्यांना देवून त्यांची लाज राखत असत. स्वतः सावित्रीमाईंची राहणीही खूप साधी असे. अंगावर अलंकार नसे. एकपोत असलेले मंगळसूत्र व कपाळावर भले मोठे कुंकू असे. त्यांच्या पोटी आदराची भावना तर खूपच मोठी होती. त्याकाळी आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे त्यांना भेटायला आवर्जून येत.
२८ नोव्हेंबर १८९० साली जोतिबांचे आजारपणात निधन झाले. सावित्रीमाईंचा मोठा आधारच निघून गेला. खूप एकाकी झाल्या. त्यातूनही त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. अंत्यविधीसाठी दत्तक मुलगा यशवंत याने टिटवे धरले असता त्यांचे पुतणे आडवे आले. त्यास त्याने विरोध केला. शेवटी सावित्रीमाई धैर्याने पुढे आल्या व त्यांनी टिटवे हातात धरले. अंत्ययात्रेत त्या अग्रभागी चालू लागल्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने जोतिबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. भारताच्या हजारों वर्षांच्या इतिहासात एका स्त्रीने अग्नी देण्याचा तो पहिलाच प्रसंग असावा. जोतिबांच्या पश्चातही न डगमगता मोठ्या धैर्याने त्यांनी जोतिबांचे कार्य मोठ्या नेटाने पुढे नेले. सत्यशोधक चळवळीचे नेतृत्वही त्यांनी समर्थपणे पेलले. एव्हढेच नव्हे तर १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. चळवळीत असल्याने त्या चांगल्या साहित्यिक, कवयत्री व वक्त्या होत्या.
१८९७ मध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ सुरू झाली. प्लेग संसर्गजन्य असल्याने मोठ्या प्रमाणात फैलू लागला. सर्वत्र हाहाकार उडाला. घरोघरी लोक मृत्युमुखी पडले. सरकारी योजना अपुरी पडली. अशा परिस्थितीत सावित्रीमाई धाऊन आल्या. जमेल तसे रोग्यांना त्या स्वतः आपला मुलगा डॉ. यशवंत यांच्या दवाखान्यात आणीत व त्यांची सेवा करीत. डॉ. यशवंत अनेकांना बरे करण्याचा शर्थीने प्रयत्न करी. अस्पृश्यांच्या व गोरगरीबांच्या घरी तर प्लेगने धुडगूस घातला होता. प्लेगच्या साथीने आजारी झालेल्या पांडुरंग गायकवाड महार यास सावित्रीमाईंनी आपल्या खांद्यावर घेऊन डॉ. यशवंत यांच्या दवाखान्यात घेऊन आल्या. स्वतः सावित्रीमाईंना प्लेगची लागण झाली. अनेकांना शर्थीने वाढवणाऱ्या सावित्रीमाई मात्र वाचू शकल्या नाहीत. डॉ. यशवंतने खूप प्रयत्न केले, परंतु शेवटी १० मार्च १८९७ रोजी त्यांंचे दुःखद निधन झाले. एका धगधगत्या क्रांतीकारक ज्योतीची अशी समाप्ती झाली. ती खऱ्या अर्थाने पूर्णाहुती होती. अनेकांना साथ देणारी, त्यांच्या सुखदुःखात समरस होणारी, उज्ज्वल स्वप्न दाखविणारी, प्रतिकूल परिस्थितीवर समर्थपणे मात करण्याची प्रेरणा देणारी, शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी, स्त्री शिक्षणाची प्रणेती व त्यांच्या हक्कांसाठी लढणारी अशी बहुगुणी नेतृत्व असलेली सावित्रीमाई मागे अनेक आदर्श ठेवून असंख्यांना पोरके करून गेली.
सावित्रीमाई फुले १८४३ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे जनहितासाठी संघर्ष करीत होत्या. अनेक स्त्रिया व विधवांना त्यांनी जगण्याचा मार्ग दाखविला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शुद्रातीशुद्रा यांच्या प्रगतीसाठी त्या अहर्निश झगडल्या. अनेकांचा रोष विरोध पत्करून, मान अपमान सहन करून समाज हितासाठी लढत राहिल्या. सावित्रीमाई फुले म्हणजे एका महायुद्धाची नायिका होती. अनेकांची आधारस्थान होती, तर गोरगरीबांची महामाता होती.
अशा या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!
सौजन्य: दैनिक सम्राट.
🙏🌹 भवतु सब्ब् मंगलम् 🌹🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत