डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा संबंध आर एस एस शी जोडण्याचा प्रयत्न

सातारा जिल्ह्यातील कराड येथील लोककल्याण मंडळ ट्रस्ट च्या माध्यमातून डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा संबंध आर एस एस शी जोडण्याचा प्रयत्न एका पत्रकात केला गेला आहे.2 जानेवारी 1940 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेस भेट दिली आणि यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आस्था दाखवली. असा एक संदर्भ दिला जात आहे. ते त्यात असे म्हणाले की काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो.
असा एक संदर्भ देताना तो चलाखीने कृतक इतिहास निर्माण करून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे आपुलकीचे संबंध होते हे त्यातून प्रक्षेपित करण्याचा त्यातील हेतू स्पष्ट आहे.
या पत्रकात कराड येथील बंधुता परिषदेच्या आयोजनाचा संबंध वरील मिथ्या ऐतिहासिक कथनाशी जोडून आजचे बंधुता परिषदेतून समरसताकरण करण्याचा हा डाव स्पष्ट दिसतो आहे.
वरील संदर्भाचा मूळ ऐतिहासिक संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘ जनता ‘ पत्रात नोंदवलेल्या मजकुरातून स्पष्ट समजतो. पण त्यात ते म्हणतात तसा संबंध असल्याचा कोणताही उल्लेख नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनीही लिहिलेल्या खंडांमध्ये कराडच्या २ जानेवारी १९४० रोजी झालेल्या या कार्यक्रमाचा उल्लेख आहे. पण आर एस एस संदर्भातील उल्लेख नाही. कराड नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या मानपत्राचा व तिथे त्यांनी केलेल्या भाषणाचा त्यात उल्लेख आहे.त्या कार्यक्रमानंतर कराडच्या महारवाड्यात त्यांनी केलेल्या भाषणाचाही त्यात उल्लेख आहे. याशिवाय त्यांच्या गाडीला झालेला अपघात व त्यानंतर ते सातारा येथे आले आणि तेथुन पुण्याला मुक्कामाला गेले, असा एकूण सगळाच उल्लेखदेखील आहे. मात्र या सर्व मजकुरात व एकूण प्रसंगात त्यांनी कराडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याचा उल्लेखच नाही. आणि शाखेत भाषण दिल्याचा पुढचा उल्लेख तर दूरचीच बाब आहे.
तथाकथित पत्रकात ही भेट व भाषण केल्याचे वृत्त ९ जानेवारी १९४० च्या केसरीत आल्याचा दाखला दिला आहे.जर हे वृत्त केसरीत नोंदवले आहे तर मग इतर तत्कालीन आंबेडकरी साधन स्त्रोतात त्याचे दाखले का मिळत नाहीत? जनतात त्याची नोंद नाहीच पण अन्यत्र कुठेही तशी नोंद नाही. केवळ आर एस एसलाच सापडलेल्या कागदपत्रात तश्या नोंदी का सापडत आहेत?
अशी अनेक संशयास्पद वृत वा कथने डॉ. बाबासाहेबाशी संघाचे समर्थक का करत आहेत?या सर्वच प्रश्नांचा रोख हेच निर्देशित करत आहे की, त्यांना अश्या फसव्या मजकुरातून आंबेडकरांचे ब्राह्मणीकरण करावयाचे आहे. याचे कारण संघाच्या ब्राह्मणी विचारधारेशी त्यांच्या तडजोडविहिन शत्रूभावी संघर्षात आहे.
- सचिन गरुड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत