दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपान

आधुनिक भारतातील ‘पहिला’ बुद्धांचा पुतळा बडोद्यात उभारला गेला !

  • स्नेहा मंगसुळीकर, वारणानगर
    (९६७३०८४८२३) ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जनतेसाठी खुला झालेला गुजरातमधील जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा ‘Statue of Unity’ (एकतेचे प्रतिक) म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांवरून समाजात घडून येणारी चर्चा प्रबोधनाऐवजी वाद अधिक वाढवताना दिसते. या महापुरुषांचे विचार जनतेच्या मनात रुजवण्याऐवजी त्यांचे ‘दैवतीकरण’ करण्यावरच अनुयायांचा भर असतो. परिणामी ‘कुणाचा पुतळा अधिक उंच’ या इर्षेतून बसवले जाणारे महापुरुषांचे पुतळे ‘कर्मकांडे आणि राजकारणाचे हॉटस्पॉट’ ठरतात. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर १९१० रोजी बडोद्याच्या ज्युबिली बागेत बुद्धाचा पुतळा बसवण्यापाठीमागची महाराजा सयाजीरावांची ‘तात्विक’ भूमिका आजही महापुरुषांच्या अनुयायांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. बडोद्यातील बुद्ध पुतळा अनावरणाच्या निमित्ताने महाराजा सयाजीरावांची महापुरुषांच्या पुतळ्यांमागील भूमिका समजून घेणे समकालीन परिस्थितीत अत्यावश्यक ठरते. ३१ डिसेंबर १९१० रोजी बडोद्याच्या ज्युबिली बागेत बसवलेला बुद्धाचा पुतळा सयाजीरावांनी जपानहून आणला होता. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चबुतर्‍यावर बौद्ध धर्माची तत्वे कोरलेली होती. महापुरुषाचे विचार रुजवण्यासाठी हा अनोखा मार्ग सयाजीरावांनी अनुसरला. या पुतळ्याच्या अनावरण समारंभात केलेल्या भाषणात सयाजीरावांनी पुतळा बसवण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भाषणात सयाजीराव म्हणतात, “ही मूर्ती जपानहून मागविलेली आहे. मूर्ती आणण्याचा हेतू एवढाच की, महात्मा बुद्ध हिंदुस्थानात जन्मले होते. या गोष्टीचे स्मरण असावे: तसेच धर्माच्या आणि आचाराच्या दृष्टीने योग्य अशा सिद्धांताकडे आपल्या लोकांची दृष्टी जावी.” आपल्या देशात जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारांची ‘आठवण’ जनतेला राहावी यासाठी बुद्धाचा पुतळा बसवण्याची सयाजीरावांची ‘दृष्टी’ बौद्ध धर्माचे भारतातील अस्तित्व निष्प्रभ असतानाच्या काळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारक ठरते. या समारंभातील महाराजांचे भाषण त्यांच्या बौद्ध तत्वज्ञानाच्या संतुलित आणि प्रगत आकलनाचा पुरावा आहे. या भाषणात महाराज म्हणतात, “बुद्धाचे जीवन काय शिकविते याविषयी थोडी माहिती मी देतो. महात्मा बुद्धांच्या उपदेशाचे सार एवढे होते की, मनुष्याला चांगली स्थिती प्राप्त होणे, हे त्याचे नशीब किंवा दैवयोग यावर नसून खास त्याच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. आपण जसे कर्म करावे, जसा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे लहानमोठे होऊ शकतो. बौद्ध सिद्धांताप्रमाणे ब्राह्मण-क्षत्रियादिवर्ण, गुणकर्मावर समजला जातो, जन्मावरून नाही.” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या अगोदर ४६ वर्षे सयाजीरावांनी ‘बुद्ध आपल्याला का हवा आहे’ याची केलेली कारणमीमांसा आजही तंतोतंत लागू होते. १९१० च्या भाषणात ही कारणमीमांसा करण्याच्या खूप आधीपासून सयाजीरावांनी बडोद्यात आणि बडोद्याबाहेरदेखील बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले होते. १८९८ पूर्वीपासूनच सयाजीरावांचा बुद्धाशी चांगला परिचय होता. धर्माचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करणाऱ्या सयाजीरावांनी १८९८ मध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या ग्रंथमालेत केळूसकर गुरुजीलिखित बुद्ध चरित्राचे प्रकाशन केले. हे आधुनिक काळातील कोणत्याही भारतीयाने लिहिलेले पहिले बुद्धचरित्र होते. केळूसकरांचे हे बुद्धचरित्र बुद्धाचा एक वैज्ञानिक दृष्टीचा महापुरुष म्हणून वेध घेते. या ग्रंथाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक जीवनातील आणि धर्मांतराच्या निर्णयातील स्थान क्रांतिकारक होते.

१८९८ पासूनच आधुनिक महाराष्ट्राला बुद्धाचा परिचय करून देण्यास महाराजांनी सुरुवात केली होती. महाराष्ट्रात बौद्ध धर्म प्रसारात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या धर्मानंद कोसंबींना सयाजीरावांनी राजाश्रय दिला होता. १९०८ ते १९११ अशी तीन वर्षे बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रसार आणि ग्रंथलेखन करण्यासाठी सयाजीरावांनी कोसंबीना दरमहा ५० रु. शिष्यवृत्ती दिली. १९०९ मध्ये महाराजांनी बडोद्यात कोसंबींच्या बौद्ध धर्मावरील ५ भाषणांचे आयोजन केले होते. त्यातील ३ भाषणे ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या नावाने छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात आज उपलब्ध आहेत. पुढे १९१० मध्ये धर्मानंदांना अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात प्रा.वाटन यांच्या बौद्ध धर्मातील ‘विशुद्धी मार्ग’ या ग्रंथावरील संशोधनात सहकार्य करण्यासाठी बोलविण्यात आले. सयाजीराव महाराजांची परवानगी घेऊन कोसंबी १९१० मध्ये हार्वर्ड विद्यापीठात गेले. याच वर्षी महाराजांनी बडोद्याच्या ज्युबिली बागेत जपानहून आणलेला बुद्धाचा पुतळा बसवला. हा योगायोग ‘अपूर्व’ होता.

कोसंबींच्या अमेरिका वारीदरम्यानच महाराज जपानला निघाले होते. महाराज पुढे जपानवरून अमेरिकेला जाणार असल्याने कोसंबींना ते स्वतःबरोबर येण्याचा आग्रह करत होते. परंतु त्यांची प्रवासाची व्यवस्था हार्वर्ड विद्यापीठाने केली असल्याने ते स्वतंत्रपणे अमेरिकेला गेले. महाराजांच्या परवानगीमुळेच शक्य झालेली ही अमेरिका वारी बौद्ध धर्माच्या कामासाठी व त्यांचा मुलगा दामोदर यांच्या शिक्षणासाठी फलदायी ठरली.

    १९१२ मध्ये अमेरिकेहून परतल्यानंतर धर्मानंदांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतर प्राध्यापकांपेक्षा दरमहा २५ रु. कमी वेतनावर पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. याच दरम्यान महाराज मुंबईत आले असता कोसंबींनी भेट घेवून सर्व वृत्तांत सयाजीरावांना कथन केला. कमी पगारावर नोकरी स्वीकारल्याबद्दल सयाजीराव त्यांना रागावले. याचवेळी फर्ग्युसन कॉलेजमधील पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याची कोसंबीनी केलेली विनंती मान्य करून महाराजांनी दर महिन्याला पंधरा रुपयांच्या दोन आणि दहा रुपयाच्या दोन अशा चार शिष्यवृत्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू केल्या. या चार शिष्यवृत्या १९१२ ते १९१८ या कालावधीत कोसंबी या कॉलेजमध्ये नोकरीत असेपर्यंत चालू राहिल्या. विशेष म्हणजे पाली भाषा शिकवणारे फर्ग्युसन कॉलेज हे तत्कालीन मुंबई प्रांतातील एकमेव कॉलेज होते. सयाजीरावांनी दिलेल्या शिष्यवृत्त्यांमुळेच फर्ग्युसन कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना पाली भाषा शिकवू शकले.

    १९३० पासून महाराजांनी बडोदा कॉलेज आणि बडोदा हायस्कूल या दोन ठिकाणी पाली भाषा शिकवण्याची व्यवस्था केली होती. कोसंबींचे फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी चिंतामण वैजनाथ राजवाडे हे बडोदा कॉलेजमध्ये पाली भाषेचे पहिले प्राध्यापक होते. औपचारिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करतानाच सयाजीरावांनी विविध बौद्ध धर्मविषयक ग्रंथांचे प्रकाशन करून जनतेचे आकलन वाढवण्यावर भर दिला. कोसंबींचे विद्यार्थी असणाऱ्या चिंतामण वैद्यनाथ राजवाडे यांच्याकडून महाराजांनी बडोदा संस्थानसाठी बौद्ध धर्मावरील दोन पुस्तकांचे मराठी भाषांतर करून घेतले. महाराजांनी प्रकाशित केलेले बौध्द धर्मासंदर्भातील केळुसकरलिखित ‘गौतम बुद्ध चरित्र’ (१८९८), रामचंद्र नारायण पाटकरलिखित ‘बौध्दधर्म अर्थात धर्मचिकित्सा’ (१९३२), रामराव मार्तंड भांबुरकरलिखित ‘भगवान बुध्दचरित्र व धर्मसार संग्रह’ (१९३४), ना. गो. कालेलकरलिखित ‘बुद्धकालीन भारतीय समाज’ (१९३६) यांसह मराठी भाषेतील ६ व इंग्रजी भाषेतील १३ असे एकूण १९ ग्रंथ त्यांनी राबवलेल्या बौद्ध तत्वज्ञान साक्षरतेच्या महाप्रकल्पाची साक्ष देतात.

     १८८५ मध्ये महाराजांच्या आश्रयाने बडोद्यात ‘बडोदावत्सल’ साप्ताहिक सुरु करणाऱ्या दामोदर सावळाराम यंदे यांना पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे मराठी अनुवाद अग्रक्रमाने प्रकाशित करण्याची सूचना सयाजीरावांनी केली होती. महाराजांच्या धर्मविषयक भाषणात बुद्धाचा गौरवाने उल्लेख वारंवार आढळतो हा अपघात नाही. ‘महात्मा’ बुद्धाचे प्रशंसक असणाऱ्या सयाजीरावांनी २७ मार्च १९३४ रोजी मुंबई येथील डॉ. नायर यांच्या बुद्ध विहाराचे उद्घाटन केले.

    आधुनिक भारतात बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे सयाजीराव एकमेव प्रशासक होते. केळूसकरांचे बुद्धचरित्र वाचून बौद्ध धर्म स्वीकारलेले मुंबईचे ए.एल. नायर आधुनिक भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात सयाजीरावांचे असणारे स्थान अधोरेखित करताना म्हणतात, “But my admiration for His Highness is still further intensified by the fact that long before this renaissance of Buddhism in India, His Highness had taken great interest in Bhagawan Buddha, and showed the greatest love for him.” बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करताना या धर्माबाबत एकांगी प्रबोधन होऊ न देण्याची काळजी सयाजीरावांनी जाणीवपूर्वक घेतली. त्यामुळेच हिंदूबहुल बडोदा संस्थानात शांततापूर्ण मार्गाने बौद्ध धर्म ‘रुजू’ शकला. धार्मिक सुधारणा करताना सयाजीरावांनी घेतलेली ही काळजी आजच्या भारतीय समाजासाठी ‘आदर्शवत’ आहे.

  आधुनिक भारतात सर्वप्रथम सयाजीरावांनी बडोदा संस्थानात बुद्ध जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. सयाजीराव महाराजांनी त्यांच्या अभ्यासिकेत अभ्यासाच्या टेबलावर बुद्धांची मूर्ती ठेवली होती. स्वतःच्या अभ्यासिकेपासून सार्वजनिक बागेत बसवलेल्या बुद्धाच्या पुतळ्यांना सयाजीरावांनी दिलेले तात्विक अधिष्ठान आजच्या भारतीय समाजासाठी अनुकरणीय आहे. आधुनिक भारतात बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे पहिले प्रशासक म्हणून सयाजीरावांचे असणारे योगदान आजअखेर अज्ञात आहे. आधुनिक काळातील भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास बडोदाकेंद्री दृष्टीकोनातून नव्याने लिहिल्याशिवाय सयाजीरावांच्या विचार, कृती आणि दृष्टीतील क्रांतीकारकता आपल्याला कळणार नाही. म्हणूनच आजच्या दिवशी या बाबींचे पुनर्वाचन अनिवार्य ठरते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!