धाडसी माता सावित्रीबाई भाग – १.अशोक सवाई.
(इतिहास व वर्तमान)
सदर लेख आजच्या भारतीय नारीला समर्पित
सदर लेखाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला काही इतिहासाची पाने पलटावी लागतील. संपूर्ण जगात मानवी बुद्धीचा विकास होत होता तेव्हा आपल्या देशात सर्वात समृद्ध सिंधू घाटीची सभ्यता होती. आजही या सभ्यतेला जगातील सर्वात प्राचीन सभ्यता किंवा संस्कृती समजले जाते. इतिहास संशोधक प्रा. विलास खरात व डॉ. प्रताप चाटसे *विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध* या आपल्या पुस्तकात ते पानं. ६० वर म्हणतात “भारताची सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. ती इ. स. पूर्व ६००० ते ४००० च्या दरम्यान विकास पावलेली होती. सन इ. स. पूर्व ३१०० मध्ये, युरेशियन ब्राह्मणांनी खैबर खिंडीच्या मार्गाने भारतावर आक्रमण केले. आणि सिंधू संस्कृती नष्ट केली. त्यांच्यामध्ये व मूलनिवासी भारतीयांमध्ये एक हजार वर्षापेक्षा सुद्धा अधिक वर्षे संघर्ष चालला आणि इ. स. पूर्व १५०० च्या दरम्यान तो संघर्ष समाप्त झाला. आक्रमक ब्राह्मणांनी मूलनिवासी भारतीयांना पराभूत केले आणि त्यांना ‘शुद्र वर्णा’ मध्ये गुलाम बनवले” पुढे ते पानं. ६४ म्हणतात “सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती. म्हणजेच स्त्रिया या शासक होत्या” म्हणजे त्या काळात सर्व कारभार स्त्रियांच्या हातात होता. बहुधा म्हणूनच त्या काळातील कारभार स्वच्छ व सुरळीत चालत असावा. आजही भारतात जिथं आदिवासी भाग आहे तिथे काही प्रमाणात त्यांच्या कुटुंबात स्त्रियाच कारभारी आहेत. म्हणजेच त्यांनी सिंधू संस्कृती जोपासली आहे. असेच म्हणावे लागेल.
विदेशी ब्राह्मण व मूलनिवासी यांच्यातील संघर्ष संपल्यावर काही मूलनिवासी ब्राह्मणांना शरण जावून ते त्यांचे गुलाम झाले. जे ब्राह्मणांना शरण न जाता जंगलात गेले ते आजचे आदिवासी झाले. ब्राह्मणांनी मूलनिवासींचा पराभव केल्यानंतर सिंधू संस्कृती मधल्या समृद्ध वसाहती ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात घेतल्या. नंतर पुढे त्यांनी आपली नतद्रष्ट संस्कृती पसरवायला सुरवात केली. त्यासाठी ते यज्ञयाग, कर्मकांडे करू लागले. यज्ञयागासाठी जंगलातील मौल्यवान वनसंपत्ती जाळून खाक करू लागले. जंगलात असलेले आदिवासी त्याला विरोध करू लागले. कारण निसर्ग हा आदिवासींचे दैवत आहे. तेव्हा ब्राह्मण त्या आदिवासींना असुर म्हणत. व स्वतःला सुर (भूदेव) म्हणत. ब्राह्मणांनी त्या काळापासून ते आजपर्यंत. अर्धी अधिक मौल्यवान वनसंपत्ती यज्ञात किंवा होम हवनात जाळून खाक केली. व जंगले विरळ किंवा बोडखे करून ठेवले. पुढे बुद्ध काळात बुद्धांच्या प्रवचनाने लोक प्रभावित होऊन त्यांच्याकडे आकर्षित झाले व ब्राह्मणांच्या कर्मकांडाला आळा बसला. तेव्हा कट्टर ब्राह्मण बुद्धावर राग धरून होते तो त्यांचा राग आजतागायत कायम आहे. त्यांनंतर पुढे सम्राट असोकाने बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन आपल्या जंबूद्विप उपखंडात डोंगर खडकात बौद्ध स्तूप, बौद्ध लेण्या, बोधचिन्ह, बौद्ध प्रतिके, पाली भाषेतील शिलालेख, शिलालेखात बौद्ध जातक कथा साकारल्या. याच बौद्ध जातक कथांवर आधारित ब्राह्मणांनी पुढे काल्पनिक रामायण, महाभारत लिहले. जर वरील रामायण, महाभारत किंवा तत्सम कथा काल्पनिक नहीत तर शासकीय पुरातत्त्व विभागाला उत्खननात रामायण, महाभारतील शस्त्र सामुग्री मिळायला पाहिजे होती, त्यातील राजा महाराजांच्या राजमहालाचे अवशेष, राज्यकारभाराच्या राजमुद्रा, इस्तत: विखुरलेले हत्ती, घोड्यांच्या हाडांचे अवशेष, घोडपाग्यांचे अवशेष, इतरही काही वस्तूंचे अवशेष किंवा निशाण्या, किंवा त्या काळात मंदिरे असतील तर त्या मंदिराचे, किंवा मंदिराच्या कळसाचे अवशेष मिळायला पाहिजे होते पण ते मिळाले नहीत. (फक्त बुद्धांच्या प्रतिकां शिवाय) जर सात कोटी वर्षापूर्वीच्या डायनॉसॉरच्या हाडाच्या सापळ्याचे अवशेष मिळू शकतात तर काही शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायण, महाभारतातील (रामायण, महाभारत हे त्यांच्या कल्पनेप्रमाणे) किंवा तत्सम कथांतील (जे ब्राह्मणांनी लिहून ठेवले) वास्तूंचे, वस्तूंचे अवशेष मिळू नये का? म्हणजे ब्राह्मणांनी ज्या काल्पनिक रचना केल्या त्या शुद्ध काल्पनिक असल्याचे सिद्ध होते.
जोपर्यंत शेवटचा बौद्ध राजा बृहद्रथ होता तोपर्यंत ब्राह्मणांना आपली वैदिक संस्कृती या देशावर लादता आली नाही. परंतु पुष्यमित्र शुंग नावाचा कट्टरपंथी ब्राह्मण बृहद्रथ राजाच्या सैन्यात सामील झाला. राजाची मर्जी संपादन करत करत तो सरसेनापती झाला. बृहद्रथाचे पूर्ण सैन्य त्याच्या अधिपत्याखाली आल्यावर त्याने इ. स. पूर्व १८३ मध्ये वयाने लहान असलेल्या बौद्ध बृहद्रथ राजाची हत्या केली. त्यानंतर ब्राह्मणांना कुणी विरोधक उरला नाही. *१ जानेवारी १८१८ स्वातंत्र्य्याचे बंड* या आपल्या पुस्तकात प्रा. विलास खरात पान नं. ३० वर लिहितात “शिवशाही नष्ट होण्यास नेमके कारण काय तर शिवशाही मध्ये, मंत्रीमंडळामध्ये घुसखोरी केलेले ब्राह्मण! याच ब्राह्मणांनी दोन छत्रपतींना षडयंत्रपूर्वक मारून टाकले. पुढे त्यांनी या हेतूनेच पेशवाईची मुहूर्तमेढ रोवली! मौर्य साम्राज्य फार मोठे साम्राज्य होते. सम्राट अशोकाच्या पणतू राजा बृहद्रथाची हत्या मध्ये प्रदेशातून पाटलीपुत्र साम्राज्यात येवून सैनिक बनून नंतर सरसेनापती बनून पुष्यमित्र शुंगाने इ. स. पूर्व १८३ साली केली हे त्याने अत्यंत अक्कल हुशारीने, षडयंत्रपूर्वक केले. पण यासाठी त्याने सुद्धा घुसखोरी तंत्राचा वापर केला. शंकराचार्य काय किंवा कुमारील भट्ट काय यांनी याच तंत्राचा वापर करून बौद्ध भिक्खूंच्या कत्तली केल्या होत्या” त्यानंतर कपटी चाणाक्ष ब्राह्मणांच्या लक्षात आले की, अफगाणिस्तान पासून ते ब्रह्मदेश पर्यंत व भूतान पासून ते लक्षद्वीप पर्यंत अशा विशाल पसरलेल्या जंबूद्विप उपखंडातील लोकांना शस्त्राच्या लढाईत जिंकता येणार नाही. आपण जर त्यांचे चार मारले तर ते आपला एक तरी मारतीलच. त्यामुळे आपण संख्येने अत्यल्प असल्याने आपण एक एक करून नष्ट होवू व आपले अस्तित्व संपुष्टात येईल पण ते संपणार नाहीत. असा विचार करून भारतीय समाजाला वेगळ्या तंत्राने मानसिक गुलाम बनवण्याचे ठरवले व पुढच्या षडयंत्री कामासाठी त्यांचे षडयंत्री मेंदू कामाला लागले.
मला वाटते पुढे त्यांनी इ. स. मध्ये पाली भाषेचा आधार घेऊन त्यातून त्यांनी संस्कृत भाषा विकसित केली असावी. पाली भाषेत श/क्ष/त्र/ज्ञ हे आजच्या बाराखडीतील चार अक्षरे नव्हती म्हणून अशोकाच्या शिलालेखात पाकित (प्राक्रित=पाकृत), विकमादित (विक्रमादित्य), असोक (अशोक), पियदरसनी (प्रियदर्शनी) खतीय (क्षत्रिय) असे शब्द आढळतात. संस्कृत भाषेतून श/क्ष/त्र/ज्ञ या शब्दाची उत्पत्ती झाली असावी. संस्कृत व इतर सर्व भारतीय भाषांची जननी ही पाली भाषाच होय. काही शेकडो वर्षांपूर्वीची संस्कृत भाषा पाच दहा हजार वर्षे जुनी असल्याचे सांगणाऱ्यांना उत्तर द्यायला पाहिजे. ही संस्कृत भाषा ब्राह्मणांनी फक्त ब्राह्मणांनाच कळावी म्हणून त्यांची कोड भाषा होती. या भाषेच्या श्लोकात इथल्या मूलनिवासींच्या विरोधात ऐब किंवा भलीमोठी गोम भरली आहे. ती देवभाषा असून ती शुद्रांनी शिकू नये असा दंडक घालण्यात आला जर ती भाषा शिकली तर शुद्र घोर पापीष्ट ठरून नरकात जातो. अशी भयानक पण काल्पनिक भीती इथल्या देवभोळ्या शुद्रांना दाखवण्यात आली. तरीही कुणी ती भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कल्पनेच्या बाहेर भयंकर शिक्षा होत असे. त्या भाषेतील ऐब किंवा गोम कळू नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील ती भाषा शिकण्यास कर्मठ ब्राह्मणांनी मनाई केली होती. तरीही डॉ. बाबासाहेब ती भाषा स्वतःच्या जयमतीवर शिकले व त्यांचे षडयंत्रकारी कटकारस्थाने उघडे पाडले.
ब्राह्मणांनी संस्कृत भाषा विकसित केल्यावर संस्कृत श्लोकातून वेद, पुराणे, स्मृती, शृती, वगैरे लिहले. बुद्धांच्या जातक कथांचा आधार घेऊन काल्पनिक रामायण, महाभारत लिहले. हे यासाठी की आपल्या वैदिक धर्मानुसार येथील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चातुर्वणातील लोकांनी आचरण करावे. या चातुर्वणातून पुढे त्यांनी सहा साडेसहा हजार जाती निर्माण केल्या. जातीनिहाय प्रमाणे या जातींनी आपला व्यवसाय व व्यवहार करावा. अशी वैदिक धर्मशास्त्रा प्रमाणे धर्म मार्तंडांद्वारे इथल्या लोकांवर सक्ती करण्यात आली. स्त्रियांवर तर इतके भयंकर कडक नियम लावण्यात आले की विचारता सोय नाही. वरील चार वर्णाच्या बाहेरील सुद्धा एक वर्ण होता. त्याला पंचमा किंवा अस्पृश्य म्हटले जात होते. यांच्यासाठी ‘बाट’ नावाचा मानव जातीवर असा भयंकर अमानवीय कलंक लावण्यात आला की जगाच्या पाठीवर कुठेही नव्हता. या देशात कुत्र्या, मांजरांना, जनावरांना किंमत होती परंतु स्त्रिया व अस्पृश्य लोकांना जनावरांपेक्षाही तिरस्करणीय व हिन वागणूक मिळत होती. किंबहुना शुद्र, स्त्रिया व अस्पृश्य यांच्यासाठीच त्यांनी कर्मठ वैदिक धर्मशास्त्रांची निर्मिती केली होती की काय असे वाटल्यावाचून राहत नाही. याप्रकारे भारतीय मूलनिवासी लोकांना त्यांच्या मरण यातनातून फक्त जिवंत राहण्यासाठी त्यांना मजबूर करण्यात आले होते व मानसिक गुलाम बनवून ठेवले होते. स्त्रिया व अस्पृश्य यांच्या अन्याय, अत्याचारावर इतिहास आजही ओरडून ओरडून बोलत आहे/सांगत आहे. इतिहासाला सत्य लपवण्याची व खोटं बोलण्याची वाईट सवय नाही.
तर ही इतिहासाची थोडक्यात पार्श्वभूमी.
————————————–
(इतिहास व वर्तमान)
धाडसी माता सावित्रीबाई भाग – २.
अशोक सवाई.
आता मुख्य विषयाकडे येवू. वाचकांना फुले दांपत्याचा जन्म, त्यांचे शिक्षण कार्य, त्यांचे तळमळीचे सामाजिक कार्य याची माहिती आहेच. किंवा माईंच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून बरेच जण त्यावर लिहतील. मी येथे फुले दांपत्याच्या धाडसीपणावर माझ्या परीने लिहण्याचा प्रयत्न करत आहे. दि. ११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा फुलेंचा तर दि. ३ जानेवारी १८३१ रोजी माता सावित्रीबाईंचा अशा या दोन दिवसी धाडसी फुले दांपत्याचा जन्म झाला. जसे महात्मा फुले धाडसी होते तसेच माई सुद्धा धाडसी होत्या. जेव्हा महात्मा फुलेंना मारेकरी मारायला आले होते तेव्हा *वो तो आये थे हातों में लाठी लेकर, मगर वापस चले गये मोम बनकर* तर महात्मा फुलेंनी मारेकऱ्यांचे चित्त शुद्ध करून परत पाठवले होते. तसेच माईंनी मुलिंनी शिकावे म्हणून अंगावर शेणामातीचे गोळे झेलले. त्या शाळेत जातांना दोन लुगडे वापरत असत. शाळेत शिकवायला जातांना वाटेत शिणामातीने खराब झालेले लुगडे शाळेत बदलून मुलिंना शिकवत. व परत येतांना पुन्हा खराब लुगडे घालून घरी परत येत. तरीही मुलिंना शिकवण्याचा वसा त्यांनी सोडला नाही. एकदा भर बाजारात केशव भट, गोपू भट व विष्णू भट या भट कंपूने मुलिंच्या शिक्षणासाठी विरोध म्हणून माईंना रस्त्यात अडवले. व त्यांचा अपमान केला. विष्णू भट तर सरळ त्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा माईंनी पायातील वहाण काढून विष्णू भटाला चांगलाच त्या वहाणेचा प्रसाद दिला. माईंनी रागाने लाल होवून रूद्र रूप धारण केले. तेव्हा बाजारात आपली जास्त शोभा नको म्हणून तीनही भट तेथून पळाले. हा भाग सोनी मराठी टिव्ही चॅनेलवर 'सावित्रीजोती' या मालिकेत सन २०२० मध्ये दाखवण्यात आला होता. पुढे या मालिकेला प्रेक्षक नहीत म्हणून ती बंद करण्यात आली. सूज्ञ वाचकांना खरे कारण लक्षात आलेच असणार.
महात्मा जोतिबा फुले हे फुलांची शेती करणारे सधन शेतकरी होते. तसेच ते सरकारी बांधकामाचे ठेकेदार सुद्धा होते. इंग्रज सरकार आपल्या सरकारी बांधकामाचा ठेका त्यांना देत असत. यामुळे फुले दांपत्य ऐषोआरामात जगले असते. परंतु म्हणतात ना ज्यांचा पिंड समाजसुधारकाचा असतो ते स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यांच्या काळात कर्मठ ब्राह्मणांचा तीव्र रोष पत्करून त्यांनी मुली, शुद्र व अस्पृश्य मुलांना मोफत शिक्षण देण्याचे महान कार्य व समाजकार्य केले. जे मनुवादी ब्राह्मणांच्या वैदिक धर्मशास्त्राच्या विरुद्ध होते.
महात्मा जोतिबा फुले हे सहृदयी व सहिष्णुतावादी होते. त्याचे एक उदाहरण 'देशाचे दुश्मन' या पुस्तकातील देता येईल. *'देशाचे दुश्मन'* या पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर आपल्या पुस्तकात पान नं. ३६ वर म्हणतात "टिळकांवर पहिला खटला झाला त्यावेळी त्यांना जामीन होण्यास जोतिराव तयार झाले होते. आपल्या शत्रूलाहि संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे जोतिरावांचे श्रेष्ठत्व हजारो चिपळूणकरांनी अनंत कालपर्यंत दोन्ही हाताने ठोकली तरी किंचितही कमी होणार नाही. हरिदास-पुराणिकाने नाडलेली गरीब ब्राह्मण विधवा असो, नाही तर लाखोटक्याने आपल्यावर गालिप्रदान करणारा टिळक असो. संकटाच्या वेळी सहाय्य करणे हे जोतीरावांचे ब्रीद होते" आपल्या वैचारिक शत्रूला सुद्धा मदत करण्याचे धाडस महात्मा जोतिबा फुलेंकडे होते हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होते.
म्हणूनच मुंबईच्या महासभेत दि. ११ मे १८८८ रोजी त्यांना जनतेच्या वतीने समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वाडेकर यांनी ‘महात्मा’ ही उपाधी बहाल करून सन्मानित करण्यात आले. दिनकराव जवळकर लिखित देशाचे दुश्मन हे पुस्तक बहुजनांनी खास करून मनुवादी व्यवस्थेच्या कच्छपी लागलेल्या बहुजन भक्तांनी जरूर वाचावे. तसेच आपला खरा इतिहास वाचावा कारण आता शालेय नवीन अभ्यासक्रमात हळूहळू मनुस्मृती घुसडण्याचे काम सुरू झाले आहे. मनुस्मृतीचे परिणाम आपल्या येणऱ्या पिढीवर किती भयानक होतील याचा अंदाज नाही. म्हणून म्हणतो वाचन करा, वाचल्यावर समजून घ्या, समजून घेतल्यावर विचार करा, विचार केल्यावर नतद्रष्ट गोष्टींना विरोध करा. जर आपल्या पुढच्या पिढीविषयी प्रेम असेल तर.
माता सावित्रीबाईंच्या काळात लग्न झलेल्या स्त्रिया सौभाग्याचं लेणं म्हणून आपल्या कपाळावर कुंकवाची ठसठशीत आडवी लकीर ओढत असत. हा स्त्रियांसाठी कर्मठ ब्राह्मणांनी आखून दिलेला अघोषित किंवा गुप्त नियम असावा. कारण त्याकाळी नीती नियमांचे सर्व पाठ कर्मठ ब्राह्मणच घालून देत असत. या पाठीमागे त्यांचा तर्क हा असावा की रामायणातील वनवासात असलेल्या सीता मातेच्या कुटी समोर सीता मातेच्या मर्यादेसाठी जी लक्ष्मणाने आपल्या धनुष्याच्या बाणाने जमीनीवर रेषा ओढून ठेवली होती. इकडे बाईच्या मर्यादा अधोरेखित करण्यासाठी तिच लक्ष्मण रेखा कुंकवाच्या रूपात बाईच्या कपाळावर ओढली असावी. असा त्या कुंकवाच्या ओढलेल्या आडव्या रेषेचा अर्थ असावा. म्हणजे ब्राह्मणांच्या मते बाईने आपल्या मर्यादेची रेषा ओलांडून जावू नये. ओंलांडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. हा त्या काळातील स्त्रियांसाठी एक प्रकारचा गर्भित इशारा असावा. पुरुष जे म्हणतील तिच पूर्व दिशा मानावी. पुढे स्त्री च्या कपाळावरील कुंकवाची आडवी लकिर जावून त्या जागी लाल गोल आकाराचे कुंकू किंवा टिकली आली. ही लाल टिकली तरी कशाचे द्योतक आहे? तर स्त्री कितीही प्रगत किंवा प्रगल्भ विचाराची असली तरी तिने पुरुषांसमोर आपले विचार मांडू नये. व्यक्त होवू नये. म्हणजे एकप्रकारे स्त्रियांच्या विचारांना पुरुषप्रधान संस्कृतीने लावलेला हा फुलस्टाॅप आहे. म्हणूनच संभाजी भिडे ऊर्फ मनोहर भिडे एका महिला पत्रकाराला म्हणतो आधी कपाळावर टिकली लाव मग बोल. ही आहे आपल्या देशातील वैदिक व संकुचित पुरुषप्रधान संस्कृती. ज्या स्त्रिया ही संस्कृती झुगारून आपल्या जयमतीवर मोठ्या होतात, त्या देशाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलतात व आपल्या सोबत देशाचे ही नाव मोठे करत असतात.
माता सावित्रीबाई हे जग सोडून जाता जाता अजून एक मोठे धाडस करून गेल्या. जे सर्वसामान्य माणसाच्या कुवती बाहेरचे होते. सन १८९६-९७ मध्ये जेव्हा देशात प्लेगची मोठ्या प्रमाणात साथ पसरली होती तेव्हा सावित्रीमाई प्लेगच्या रुग्णाची सेवा करू लागल्या. त्यांना तालुक्यातील दवाखान्यात औषधोपचार करण्यासाठी घेऊन जावू लागल्या. असीच प्लेगची बाधा झालेल्या एका आठ वर्षांच्या मुलाला आपल्या पाठीवर घेऊन दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांनाही प्लेगची बाधा झाली. आणि रुग्णांना जीवनदान देतादेताच एक दिवस म्हणजे दि. १० मार्च १८९७ या दिवशी त्या या जगाला सोडून गेल्या. महात्मा फुले त्यांच्या आधिच म्हणजे २८ नोव्हेंबर १८९० या दिवशी माईंना सोडून गेले होते तरी त्यांनी त्यानंतरही लोकसेवेचे कार्य आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू ठेवले होते. ही असते महापुरुष व महामातांची महानता. जी निरंतर काळासाठी आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी प्रेरणा देत राहते.
माता सावित्रीबाईंनी धर्म मार्तंडांनी आखून दिलेली वैदिक धर्मरेषा मोठ्या धाडसाने ओलांडून आपल्या बहुजनांच्या येणाऱ्या पिढीतील मुली व महिलांच्या धर्मबेड्या तोडल्या व त्यांना उंच भरारी घेण्यासाठी आकाश मोकळे करून दिले. मातापिता फुले दांपत्यांनी आपल्या हाडांची काडे करून आपल्याला शिक्षणाची संधी मिळवून दिली. पुढे त्या शिक्षणातून नौकरी, व्यवसाय, रोजगार प्राप्त होवून महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होवून त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे हा त्यांचा उद्देश होता. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधाना द्वारे महिलांच्या तमाम अधिकारांना, त्यांच्या मानसन्मानाला सुरक्षा कवच बहाल केले. याच्या आजच्या स्त्रियांना जाणिवा आहेत का? मला आजच्या मुली, महिलांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात १) आज तुमच्या गळ्यात जो टेथस्कोप आहे त्याला बघून देवभोळे रुग्ण तुम्हाला ईश्वराचे दुसरे रूप मानतात ते कोणामुळे? २) तुमच्या डोक्यावर इंजिनिअरची कॅप आहे तुमच्या निर्देशानुसार हाताखाली काम करणारे माणसे आहेत ते कोणामुळे? ३) कलेक्टरच्या खुर्चीवर बसून सही साठी तुमच्या हातात पेन आहे तो कोणामुळे? ४) तुम्ही मंत्रीसंत्री झाल्यावर तुमच्या संरक्षणार्थ पोलिसांचा जो ताफा असतो तो कोणामुळे? ५) तुम्ही उडण खटोले उडवता किंवा त्यातून उड्डाण करून साता समुद्राची सैर करून येता हे कोणामुळे? ६) तुम्ही पोलिसी युनिफॉर्म मध्ये असून माथ्यावर राजमुद्रेची कठोर कर्तव्याची जाणीव करून देणारी व दरारायुक्त आदराची व मानाची कॅप, कमरेला पोलिसी बेल्ट, बेल्टला अडकवलेली पोलिसी रिव्हाॅल्ववर, पायात पोलिसी बुट घालून खाड् खाड् करत रुबाबात चालता तेव्हा सामान्य आदरयुक्त नजरा तुमच्याकडे वळतात व तुम्ही जेव्हा तुमच्या कार्यालयात जाता तेव्हा पोलिस अधिकारी व कर्मचारी तडक उभे राहून कडक सॅल्यूट ठोकतात हे सर्व कोणामुळे? ७) जेव्हा तुम्ही ऑलिंपिक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवता तेव्हा भावूक होवून त्या मेडलचे चुंबन घेता तसे चुंबन आतापर्यंत फुले दांपत्य व आंबेडकर दांपत्याच्या प्रतिमांचे घेतले आहे का हो कधी आदरणीय महिलांनो? तमाम कार्यक्षेत्रात आपण सन्मानिय मोठ्या पदांवर कार्यरत आहात. तेव्हा गांभीर्यपूर्वक विचार करा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर या मजबूत विचारधारेची पेरणी आपल्या विचारात करा. नाही तर थोड्याच अंतरावर उभी असलेली मनुस्मृती तुमची अस्मिता मीटवायला टपली आहे.
दि. १ जानेवारी १८४८ या दिवशी महान समाजसेवक फुले दांपत्यानी महाराष्ट्रातील पुणे येथे भिडे वाड्यात शिक्षणाचे लहानसे रोपटे लावले होते. आज त्याचा मोठ्ठा डेरेदार वृक्ष होवून त्याच्या शाखा साऱ्या देशभर पसरल्या आहेत. आज सारे देशवासी या विशाल वृक्षाच्या सावलीत विसावत असतांना काही निर्दयी लाकूडतोड्यांनी आपल्या मतलबासाठी या वृक्षाच्या फांद्या छाटून त्याला बोडखे करण्यासाठी प्रयत्न चालवला आहे. हे देशवासीयांसाठी घातक आहे.
भारताच्या महान आद्य शिक्षिका माता सावित्रीबाईंच्या जन्म दिवसाला म्हणजेच ३ जानेवारीला शिक्षिका दिवस म्हणून घोषित करून भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावे. तसेच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या सन्मानार्थ व स्मृतिप्रीत्यर्थ म्हणजेच २८ नोव्हेंबर या दिवसाला शिक्षक दिन म्हणून घोषित कारावा. तमाम भारतीयांच्या या दोन जुन्या मागण्या भारत सरकारने आता तरी पूर्ण कराव्याच.
(समाप्त)
देशाच्या आद्य शिक्षिका महामाता सावित्रीमाईंना सदैव नतमस्तक होवून अभिवादन! 🙏🙏🙏
संदर्भ: १) विज्ञानाचा निकाल: ब्राह्मण विदेशी असल्याचे डि. एन. ए. संशोधनाने सिद्ध.
संपादन: प्रा. विलास खरात/डॉ. प्रताप चाटसे.
संदर्भ: २) १ जानेवारी १८१८ स्वातंत्र्याचे बंड.
लेखक: प्रा. विलास खरात.
संदर्भ: ३) देशाचे दुश्मन
लेखक: दिनकरराव जवळकर.
– अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत