
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
बाबासाहेबांना बडोदा सरकारने स्कॉलरशिप दिली होती कि शैक्षणिक कर्ज दिले होते, हा मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडण्याची गरज होती. साधारणपणे स्कॉलरशिपचा अर्थ विध्यार्थ्याला दिलेले अर्थ साह्य असा आपण घेतो. परत करावे लागणारे अर्थसाह्य याला आपण कर्जच म्हणतो. हे कर्ज परत करण्यासाठी बडोदा सरकारकडून अनेकदा आलेली स्मरणपत्रे वाचली की याचा उलगडा आपोआपच होतो.
१९०७ साली बाबासाहेबांनी अस्पृश्यता, जातीयता आणि गरिबीच्या पार्श्वभूमीवरच मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडील रामजी सुभेदार यांची ५० रुपयांची मासिक पेन्शन संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत तोकडी होती, त्यामुळे बाबासाहेबांना पुढे शिक्षण घेणे कठीण वाटत होते. पण कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांच्या मध्यस्तीने बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून झालेल्या आर्थिक तरतुदीमुळे १९१२ मध्ये बाबासाहेबांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेबांना बडोदा संस्थानांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या अटीनुसार बडोदा संस्थानात नोकरी करणे बंधनकारक होते.
बडोदा करारानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर २३ जानेवारी १९१३ रोजी बडोद्यात नोकरीसाठी हजर झाले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला रामजी पित्यांनी विरोध केला. बडोदा संस्थान हे कट्टर जातीयवाद्यांचा अड्डा असल्याने बाबासाहेबांना फार त्रास सहन करावा लागेल, याची स्पष्ट पूर्वकल्पना रामजी पित्यांना होती. परंतु पित्याच्या सल्याकडे दुर्लक्ष करून सयाजीराव गायकवाडांना दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी ते बडोदा सरकारच्या सेवेत दाखल झाले.
बडोदा राज्याच्या नोकरीत पोहोचण्यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य जातीचे असल्याची बातमी बडोद्यात पोहोचली होती. या ठिकाणी मुक्कामाची कोणतीही व्यवस्था नव्हती. पहिले दोन तीन दिवस त्यांनी बडोदा येथील दलित वस्तीत मुक्काम केला. नंतर आर्य समाजाचे कार्यकर्ते पंडित आत्माराम यांनी आर्य समाजाच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या राहण्याची सोय केली. मुक्कामाची गैरसोय तसेच कार्यालयात जातीयवादी सहकाऱ्यांकडून होणारा छळ असह्य होत असला तरी ते नोकरी करीत होते, परंतु वडिलांच्या गंभीर आजाराची माहिती मिळाल्यामुळे त्यांना मुंबईला परत जावे लागले. मुंबईत आल्यानंतर २ फेब्रुवारी १९१३ रोजी बाबासाहेबांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
दरम्यान वडिलांच्या जाण्याच्या दुःखातच त्यांनी मुंबईत आलेल्या महाराजा सयाजीरावांची भेट घेतली. त्यांना बडोद्यात होणाऱ्या त्रासाची व कौटुंबिक अडचणींची माहिती देण्यात आली आणि पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्त इत्यादींचा अभ्यास करण्याचा आपला मनोदय महाराजांना सांगितला.
१९१३ साली बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांना अमेरिकेतील मुक्त आणि लोकशाही वातावरण पाहून अत्यंत आनंद झाला. तिथे ना अस्पृश्यता होती ना उच्चनीचता. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए आणि पीएचडी या पदव्या संपादन केल्या. त्यांनी ‘कास्ट्स इन इंडिया’ हा उकृष्ट निबंध हि तेथेच लिहिला. बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अधिक अभ्यास करून लंडन मध्येच कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी तेथे प्रवेश घेतला. एक वर्षाच्या अभ्यासानंतर शिष्यवृत्तीचा कालावधी संपला व पुढे महाराजा सयाजीरावांना विनंती करूनही आर्थिक तरतूद होऊ शकली नाही. बडोदा संस्थानाने त्यांना तात्काळ भारतात परत बोलावले. चार वर्षात पुन्हा परत येण्याच्या परवानगीने इंग्लंड सोडून २१ ऑगस्ट १९१७ रोजी बाबासाहेब मुंबईत आले. ठरलेल्या करारानुसार सप्टेंबर २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बडोदा येथे आले.
बाबासाहेबांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मुंबईत पदवीच्या शिक्षणासाठी व अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिल्याचे कौतुक सयाजीराव गायकवाड व बाबासाहेबांच्या चरित्रकारांनी इतके ठासून घासून लिहिले आहे की ते वाचल्यानंतर असे वाटते की, ती स्कॉलरशिप दिली नसती तर बाबासाहेब शिक्षण घेऊच शकले नसते. तरी सुद्धा बाबासाहेबांनी वारंवार महाराजांचे ऋण व्यक्त केलेले असल्यामुळे आपण सारे भारतीय सुद्धा महाराजांचे ऋणीच आहोत, यात दुमत नाही.
वास्तविकतः बाबासाहेबांच्या वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी बाबासाहेबांवर आलेली होती. आर्थिक अडचणी एवढ्या होत्या की स्वतःची रमेश, इंदू, राजरत्न ही सोन्यासारखी मुलं डोळ्या देखत औषधोपचारा अभावी प्राणास मुकली होती. प्रचलित जाती व्यवस्था एवढी भयानक होती की, बाबासाहेबांनी वित्त सल्लागार म्हणून स्वतःची कन्सल्टन्सी काढली होती, ती चालली नाही. बॅरिस्टर होऊन आल्यानंतर वकिली सुरू केली तेव्हा ही तोच अनुभव. अशा परिस्थितीत बडोदा सरकारचे कर्ज परत करण्याच्या नोटिसा येत असल्यामुळे बाबासाहेब अत्यंत दुःखी होत असत.
दिनांक ६ डिसेंबर १९२४ रोजीचे बडोदा सरकारचे पत्र पाहिल्यावर तर बाबासाहेब हादरून गेले. त्यामध्ये लिहिले होते की, “बाबासाहेबांच्या शिक्षणावर जो खर्च झाला होता, मग त्यामध्ये स्कॉलरशिप, पोषाखासाठी दिलेले पैसे, प्रवासखर्च, पुस्तकासाठी दिलेले पैसे इत्यादी एकूण रु. २०,४३४ तात्काळ परत करा अन्यथा आपल्यावर न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्यात येईल” बाबासाहेबांनी यापूर्वीही आलेल्या प्रत्येक स्मरणपत्राला उत्तर देताना आपले कर्ज मी परत करणार असून मला काही दिवसांची मुदत द्या असेच म्हटले होते. या पत्रालाही त्यांनी दिनांक ९ डिसेंबर १९२४ रोजी सविस्तर उत्तर दिले होते. यामध्ये बाबासाहेबांनी आपली सध्या पैसे परत करण्याची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसल्याचे नमूद करून माझ्याकडे पैसे आल्या बरोबर मी आपले पैसे परत करीन अशी हमी दिली होती. बाबासाहेबांनी यापूर्वी स्मरणपत्राला उत्तर देताना बडोदा सरकारला एक पर्याय सुचवला होता की, “माझ्यावर एक दलित विद्यार्थी म्हणून केलेला खर्च बडोदा सरकारच्या खाजगी वापरात येणे ऐवजी मी ते पैसे मुंबई विद्यापीठास देतो. त्यातून दलित विद्यार्थ्यांसाठी महाराजा सयाजीरावांच्या नावे स्कॉलरशिप सुरू करावी.” परंतु ६ डिसेंबर १९२४ चे पत्र वाचल्यावर बाबासाहेबांची ही सूचना निष्ठूरपणे फेटाळल्याचे दिसून येते. या प्रसंगामुळे बडोदा संस्थान दलित विध्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपबाबत खरोखरच दयाळू व गंभीर होते का? हा विचार ही डोकावून जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा संस्थानात लेखा विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी दिली गेली होती. परंतु बाबासाहेबांना अपेक्षित होते की, त्यांना महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी दिली जावी, कारण ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पदवी संपादन करणारे व लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्राचा डॉक्टर ऑफ सायन्स चा अभ्यास करणारे स्कॉलर होते. अमेरिकेतून अर्थशास्त्रात पीएचडी करणारे त्यावेळी बाबासाहेब भारतातील एकमेव व्यक्ती होते. त्यामुळे त्यांनी ही अपेक्षा व्यक्त करणे साहजिक होते. परंतु तसे झाले नाही. जागा रिक्त नसल्याचे कारण सांगून त्यांना कारकुनी काम देण्यात आले. बाबासाहेबांनी करारभंग केल्याचा कलंक लागू नये म्हणून तेही मान्य केले.
बडोदा सरकारचे दिवाण मनुभाई मेहता यांनी श्री नारायण राव यांना दिनांक ७ जून १९१८ रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांना सरकारी विश्रामगृहात राहण्याची सोय करण्यात आली असल्याचा उल्लेख असून महाराजा सयाजीराव व बाबासाहेबांवर संशोधन करणारे संशोधक यांनी हा संदर्भ अधिक ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु खुद्द बाबासाहेबांनी ‘वेटिंग फॉर ए विजा’ या त्यांच्या आत्मचरित्रात व कल्याण येथे १७ मे १९३६ रोजी धर्मांतराच्या घोषणेस जाहीर पाठिंबा देण्यासाठी आयोजित सभेतही बडोद्यातील प्रसंग कथन करताना म्हटले होते की, त्यांना दहा दिवस पारशी धर्मशाळेत राहावे लागले होते. अकराव्या दिवशी पारशांनी जीवे मारण्याची धमकी देऊन खोली सोडण्यास मजबूर केले. त्यानंतर बाबासाहेबांनी कार्यालयात जाऊन विश्रामगृहाची किंवा स्टाफ क्वार्टरची सोय होते का याची चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. हे भाषण देत असताना बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. (डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग-१, पृष्ठ ४७९-४८०). याचा अर्थ १८ वर्षांपूर्वीचा बडोद्याचा प्रसंग बाबासाहेबांच्या किती जिव्हारी लागला होता हे स्पष्ट होते. मग प्रश्न असा उपस्थित होतो की वरील पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे विश्रामगृहाची केलेली सोय बाबासाहेबांना उपलब्ध का झाली नाही? यात चूक कोणाची होती? त्यांच्यावर महाराजांनी काय कारवाई केली? बडोदा सरकारच्या कार्यालयात काम करत असताना दुरून फायली फेकणाऱ्यावर तसेच जातीवरून कोंडी करणाऱ्यावर काय कारवाई केली? या प्रश्नांची उत्तरे सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रकारांनी व संशोधकांनी शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आढळून येत नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. जिथे तात्पुरत्या विश्रामगृहाची केलेली सोय उपलब्ध होऊ दिली नाही, तिथे त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून नव्या घराची व्यवस्था केली जाणार होती म्हणने तर अजूनच हास्यास्पद वाटते. या सर्वांची कागदोपत्री पुरावे म्हणून वापरण्याची सोय असली तरी प्रत्यक्षात या गोष्टी कृतीत उतरल्याच नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असूनही संशोधक मात्र सत्य घटनेस न्याय देण्यात कमी पडत आहेत किंवा सत्य दडपण्याची खटपट करीत आहेत याची खंत वाटते.
प्रचंड बुद्धिमान आणि जगातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठांच्या सर्वोच्च्य पदव्या असूनही त्यांची जात पदोपदी त्यांच्या मार्गात आडवी येत होती. बडोदा संस्थानातील कार्यालयात काम करत असतांना सहकर्मचारी सतत अपमान करत होते. शिपाई फायली दुरूनच फेकून देत होते, पाणी आणूनही देत नव्हते व पाण्याच्या भांड्याला हातही लावू देत नव्हते. राहायला जागा मिळत नव्हती. त्यामुळे एका पारशी धर्मशाळेत एदलजी सोराबजी या नावाने पारशी म्हणून राहावे लागले. परंतु ते नाटकही फार दिवस चालले नाही. लोकांना जेव्हा कळले की ते अस्पृश्य आहेत तेव्हा दहा बारा लोकांचा हिंसक जमाव हातामध्ये काठ्या घेऊन बाबासाहेबांना धमकावू लागला. बाबासाहेबांच्याच म्हणण्या प्रमाणे परिस्थिती एवढी गंभीर झालेली होती की, त्या ठिकाणी कदाचित खून खराबाही होऊ शकला असता.
दिवसभरात जागा रिकामी करण्याची धमकी देऊन ते गुंड निघून गेले. बाबासाहेबांनी दिवसभर दुसऱ्या जागेचा शोध घेतला परंतु सर्व प्रयत्न वाया गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१३ आणि १९१७ मध्ये बडोदा राज्यातील दोन्ही नोकऱ्या दरम्यान आलेल्या अडचणी संदर्भात व झालेल्या अन्यायाविरोधात महाराज आणि दिवाण यांच्याकडे अनेक निवेदने दिली होती, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. बाबासाहेबांना शिष्यवृत्ती आणि नोकरी देणारे राज्य बडोदा सोडून जाण्यास भाग पाडल्यावरही राज्याचे प्रशासन काहीही करत नाही हे समजणे कठीण आहे.
सयाजीराव गायकवाड यांचे सुधारक राजघराणे होते. त्यांनी वेळोवेळी दलितांच्या उत्थानासाठी अनेक कायदे केले होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या हेतूने अनेक पाऊले उचलली होती. असे असतानाही महाराज व त्यांचे सुधारणावादी प्रशासन त्यावर काहीच कार्यवाही करत नाहीत व बाबासाहेबांना परत जाण्यापासून थांबवत नाहीत, हे खरोखरच लाजिरवाणे व न समजणारे कोडे आहे. भारतातील संस्थानिकांविषयी दि २३ एप्रिल १९३९ रोजी फलटण संस्थानाधिपती समोर एका व्याख्यानात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “गो-ब्राह्मण प्रतिपाल हे त्या वेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गो-ब्राह्मण प्रतिपाल म्हणजे गाईंना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजाचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही, असे समजण्यात येई.” हे भीषण वास्तवही संस्थानिकांच्या चरित्रकारांनी दृष्टीआड केल्याचे जाणवते.
अशा संकट समयी कोणत्याही मित्रांनी आश्रय दिला नाही. शेवटी परत मुंबईला जाण्याशिवाय मार्गच उरला नाही. त्यामुळे बाबासाहेब सयाजी बागेतील एका झाडाखाली पाच तास बसले. त्या ठिकाणी त्यांना आपल्या आई वडिलांचीही फार आठवण आली. त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांना वाटले मी एवढा विद्याविभूषित असून माझ्यावर हि वेळ आली आहे तर माझ्या सामान्य अस्पृश्य बांधवांवर किती अन्याय होत असतील. त्या दिवशी रात्री ९ वाजता रेल्वेने त्यांनी बडोदा कायमचे सोडले व मुंबईला परत गेले. बडोदा येथील सयाजी बागेत बसल्यानंतर बाबासाहेबांनी केलेल्या संकल्पाबद्दल बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर, चांगदेव खैरमोडे आणि गेल ओम्वेट यांनीही काही लिहिले नाही. तथापि, बाबासाहेबांच्या गुजराती आत्मचरित्राचे लेखक डॉ. पी.जी. ज्योतीकर यांनी लिहिले आहे की, “बडोदा येथील त्या बागेतील वृक्षाखाली बाबासाहेबांनी प्रतीज्ञा केली होती की, मी ज्या समाजात जन्मलो आहे, त्या समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी मी माझे प्राण पणाला लावीन.” ज्या ठिकाणी त्यांनी समाजाला या जातीभेदाच्या दलदलीतून मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या ठिकाणास आज ‘संकल्प भूमी’ म्हणून ओळखले जाते.
भीमराव सरवदे, औरंगाबाद
९४०५४६६४४१
(लेखक सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी असून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत