भीमा कोरेगावचे युद्ध व त्याचे कारण.अशोक सवाई

नुतन वर्षाभिनंदन!
प्रथम वृत्तपत्र संपादक, पत्रकार, वार्ताहर, प्रिय वाचक आणि हितचिंतक आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा!
भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास बहुतांश बहुजनांना माहीत झाला आहे. पण त्यासाठी जे कारण घडले ते बहुतेकां पर्यंत पोहचले नसावे. त्यासाठी हा लेखप्रपंच.
भीमा कोरेगावच्या युद्धात ५०० महार सैनिकां व्यतिरिक्त मराठे, रजपूत, मुस्लिम, व ख्रिश्चन सैनिकही होते. परंतु त्यांचे प्रमाण अत्यअल्प होते. महार सैनिकच जास्त प्रमाणात होते. या रणसंग्रामात एकूण ४९ सैनिकांना वीर मरण आले. त्यापैकी १६ मराठा, २२ महार, ८ रजपूत, २ मुस्लिम व १ ख्रिश्चन असे एकूण ४९ वीर सैनिक धारातीर्थी पडले. म्हणजे हे सर्व बहुजनच होते. जसे बहुजन सैनिक धारातीर्थी पडले तसेच काही इंग्रज सैन्यही मारले गेले. त्यांची संख्या मोठी होती. आज वरील बहुजनांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांची नावे कोरलेला भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ मोठ्या दिमाखात उभा आहे.
आपले पुर्वज सुद्धा पेशवां विरूद्ध लढले. त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवून वीर मरण पत्करले. हे आजच्या रजपूतांना माहित झाले आहे. आणि आपण मुळचे कोण आहोत याचा इतिहास *’आजचे क्षत्रिय पुर्वीचे कोण होते’ (आज के क्षत्रिय पूर्व में कौन थे – हिंदी आवृत्ती)* इतिहास तज्ञ/संशोधक प्रा. विलास खरात लिखित यांच्या वरील पुस्तकातून क्षत्रियांचा म्हणजे रजपूतांचा खरा इतिहास त्यांना कळत आहे. त्यामुळे आता रजपूत जागृत होऊन त्यांची *’क्षात्रधर्म’* ही संघटना बामसेफची संलग्न संघटना बनून मूलनिवासी बहुजनांच्या जागृतीचे काम करत आहे. त्यातून ते दरवर्षी १४ आक्टोबर पासून ते १ जानेवारी पर्यंत. म्हणजेच एका ऐतिहासिक दिवसा पासून तर दुसऱ्या ऐतिहासिक दिवसा पर्यंत. त्यांची संघटना जे इतिहासाबद्दल अनभिज्ञ असलेल्या रजपूतांना त्यांच्या खऱ्या इतिहासाची माहिती देत आहेत. व जागृत करून १ जानेवारीला भीमा कोरेगावला येवून विजय स्तंभाला मानवंदना देण्याचे अभियान चालवत आहेत. म्हणून दर वर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगावला येण्याऱ्या लोकांची संख्या लाखांनी वाढत आहे. आपली व्यवस्था ब्राह्मणांची वर्णव्यवस्था व हिंदू धर्म नसून आपला मूळ धर्म बौद्ध धम्म आहे, आपण मूळचे नागवंशीय आहोत हे त्यांना कळले आह/कळत आहे. त्याप्रमाणे ते उत्तर भारतात जनजागृतीचे काम करत आहेत. एवढेच नाही तर बौद्ध विहाराचे, बौद्ध लेण्यांचे, स्तुपांचे, बोधचिन्ह, बौद्ध प्रतीकांचे एकूणच बौद्ध विरासत याचे रक्षण, जतन करून त्यांचे सुशोभीकरण करण्याचे सुद्धा त्यांनी घोषित केले. त्यामुळे विदेशी ब्राह्मण एकटे पडत चालले आहेत. आणि आता तर संसदेमध्ये दि. १८ डिसेंबर ला गृहमंत्री अमित शहांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर घोर अपमानजनक व आपत्तीजनक टिका टिप्पणी करून मनुवादी व्यवस्था अन् तिच्या चाहत्यांना अधिकच अडचणीत आणले. बहुजन लोक जेव्हा जेव्हा आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने, संविधानिक मार्गाने मनुवाद्यांवर शाब्दिक हल्ले चढवून आंदोलने करतात तेव्हा तेव्हा नेमके हेच मनुवादी व्यवस्थेला सलत असते. याच कारणामुळे तेव्हा क्षत्रिय संघटनेचे नेतृत्व करणारे सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूर (राजस्थान) मध्ये हत्या घडवून आणली असावी असी शंका राजस्थान मधील जनतेने उपस्थित केली होती. त्यामुळे राजपूतांची संघटना अधिक मजबूत बनून ती बामसेफच्या संघटनेची संलग्न संघटना बनली आहे.
बहुजन इतिहास संशोधक, तज्ञ, अभ्यासक आपल्या तार्किक दृष्टीने परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून इतिहासातील खरेखुरे तथ्य जनतेच्या समोर आणतात. तेव्हा मागील पुरावे आपोआप कालबाह्य ठरतात. उदा. उच्च न्यायालयाने अनेक पुराव्यांची छाननी करून छ. शिवरायांचे गुरू रामदास स्वामी नव्हते असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. आणि नवीन पुरावे समोर आल्यावर आधीचे पुरावे कालबाह्य ठरले. तसेच ॲड. अनंत दारव्हटकर यांनी छ. शिवरायांची खरी जन्म तारीख शोधून काढली आहे. बहुजन इतिहास संशोधकांद्वारे इतिहासाच्या खोलवर जावून व पुरावे गोळा करून जो नव्याने इतिहास समोर येतो तो भक्कम तथ्यावर आधारित असतो. व ज्याला कोणी आव्हान देवू शकत नाही तो इतिहास खरा खुरा इतिहास मानला जातो. पुढे याही पेक्षा अधिक सबळ पुरावे कुण्या इतिहास संशोधकान सादर केले तर ते पुरावे ग्राह्य ठरले जातील याप्रमाणे इतिहास अपडेट होत राहतो. बहुजनांसाठी मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे देश परदेशात मनुवादी व्यवस्थेचे पाळेमुळे फार खोलवर रुजलेली आहेत. तेव्हा आपण एकेकटे लढून उपयोगाचे नाही आणि फायदाही नाही. मनुवादी व त्यांचे चेलेचपेटे लोक सोडून आपण सर्व बहुजन संघटना, समाजिक कार्य करणाऱ्या संस्था, पुरोगामी विचारवंत, बुद्धीजीवी वर्ग, व्याख्याते, साहित्यिक असे सर्व एकत्र लढलो तर आणि तरच आपण आपल्या येणाऱ्या नवीन पिढींसाठी त्यांच्या हिताचे काहीतरी चांगले करू शकतो. नाही तर *’कहाॅं गया तो कही नही, क्या लाया तो कुछ नही’* अशी अवस्था होईल हे लक्षात घेतले पाहिजे. जर बहुजन महापुरुषांचा इतिहास वाचला तर तेही सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचा आग्रह करतात. यासाठी मी नेहमी वाचकांना खास करून तरुणाईला इतिहासाचे वाचन करण्याचे आवाहन करत असतो.
सुरवातीला सिद्नाक व पेशवा यांच्यात लढाई नव्हती. परंतु भीमा कोरेगाव युद्धाच्या आधी महार सैनिकांचा सरसेनापती सिद्नाक हा दुसरा बाजीराव पेशवा याला दूरून अंतर राखून भेटला. कारण बाजीरावाला आपला बाट होवू नये म्हणून. भेटल्यावर सिद्नाकने त्याच्यासमोर आपली कैफियत मांडली. श्रीमंत आम्ही मायभूमी साठी आपल्या बाजूने इंग्रजां सोबत लढायला तयार आहोत पण आमच्यावरील जुलूम श्रीमंतांनी मागे घ्यावा. जुलूम कोणता तर कमरेचा झाडू, गळ्यातील गाडगे, कुल्ह्याची घंटी, गळ्यात व हातापायांचा काळा धागा ही आमची अमानुष ओळख काढून घ्यावी.
त्यावर बाजीराव मोठ्या उर्मटपणे म्हणाला अरे धर्म संस्थेने जे तुमच्या साठी नीती नियम घालून दिले त्यात तसूभरही कमी होणार नाही. हे ऐकून सिद्नाक अंतर्बाह्य भडकला रागाने लालेलाल होवून असा काही त्वेषाने गरजून म्हणाला असावा की, श्रीमंता तुम्ही तुमच्या कर्माने तुमच्या पेशवाईच्या मरणाला आवतन देत आहात व तरातरा तेथून निघून गेला असावा. व इंग्रज सैन्याला जावून मिळाला असावा. तेव्हा बाजीरावचे सोवळ्या ओवळ्याचे(?) धोतर व कुडता दरदरून फुटणाऱ्या घामाने चिंब होण्याची वेळ आली असावी. कारण सिद्नाक काळासावळा, अंगपिंडाने मजबूत व उंचपूरा होता. सिद्नाकचा युद्धातील पराक्रम बाजीराव चांगलाच जाणून होता. बाजीरावाने त्याच्या मागणीला नकार दिल्याने रागाने त्याचे डोळे आग ओकत असल्यास नवल नव्हते. तेव्हा त्याचा तो भयानक अवतार पाहूनच बाजीरावची वर म्हटल्याप्रमाणे पतली हालत झाली असावी. सिद्नाकने बाजीरावला त्याची गादी, धनदौलत, जमीन जायजाद किंवा अजून कोणतीही मागणी केली नव्हती. साधी माणूसपणाची, माणसां सारखं जीवन जगण्यासाठी मागणी केली होती. आपली व आपल्या समाजबांधवांची अमानुष ओळख पुसून टाकण्याची मागणी केली होती. जी जगाच्या पाठीवर कुठेही नव्हती आणि नाही. पण पाषाण हृदयी बाजीरावाने सिद्नाकची ती साधी मागणी सुद्धा मंजूर केली नाही. म्हणून सिद्नाक आपल्या छोट्याशा सैन्यासह इंग्रजांसोबत पेशव्यांच्या विरोधात लढला व पेशवाई नष्ट करून जिंकला सुद्धा. तर असे हे भीमा कोरेगाव युद्धाचे कारण होते. कार्यकारणभाव असल्याशिवाय कोणतीही घटना आपोआप घडत नाही. हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा नियम आहे. चमत्कार हा शब्द व असे अनेक शब्द हे बहुजनांसाठी शब्द मोहिनी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. आज पेशवाईंची पिल्लावळ दबक्या आवाजात महारांना गद्दार म्हणते. मग जेव्हा टिपू सुलतान मैसूर (कर्नाटक) मध्ये इंग्रजां विरोधात एकाएकी लढत होता तेव्हा इंग्रजांना मदत कोणी केली हे आधी यांनी सांगीतले पाहिजे.
*शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक भीमा कोरेगावचा विजय स्तंभ* या आपल्या पुस्तकात सुधाकर खांबे म्हणतात “पोटात अन्न नसतांना, तहानेने व्याकूळ झालेले शिरूर ते कोरेगाव पायी चालून दमलेले असतानाही मूठभर महार सैनिकांनी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असे सतत १२ तास ही लढाई अत्यंत त्वेषाने लढून आपल्या पेक्षा ४० पटीने जास्त असलेल्या आणि सर्व शस्त्र संपन्न पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी दारूण पराभव केला, आपल्या अतुलनीय पराक्रमाने लढून अखेर पेशवाईचा अंत घडवून आणला.”
ते पुढे म्हणतात “पेशवाईत फक्त महारांनाच ते पराक्रमी, शौर्यवान व बुद्धिमान असताना सुद्धा पशुतुल्य जीवन जगण्यास त्यांना भाग पाडीत असल्यामुळे महार दुखावलेले होते आणि या घृणास्पद वागणूकीस त्रस्त झाले होते. त्यामुळे पेशव्यांच्या सत्तेविरुद्ध ते भडकले होते त्यात आणखी भर म्हणून महारांचे सरदार शिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना पेशवाईतील आपली अस्मिता बदलण्याबाबत विनंती करून त्यासाठी महार सैनिक आपले प्राण मायभूमी साठी देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. तरीही त्यांनी ही विनंती अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती, आणि म्हणून महारांची संख्या अल्प असली तरी ते अत्यंत शौर्याने, त्वेषाने व प्राणपणाने लढले आपल्या प्राणाची आहुती दिली, आणि अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांच्या राज्य सत्तेविरुद्ध हे एक प्रकारे बंड पुकारले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आणि ब्रिटिशांनी शूर महारांच्या अभूतपूर्व पराक्रमानेच कोरेगाव युद्ध जिंकले. महारांच्या या पराक्रमाला इतिहासात तोड नाही. मूठभर महारांच्या शौर्य व पराक्रमाचे प्रतिक म्हणून भिमा-कोरेगावचा विजय स्तंभ आजही साक्षी रूपाने उभा आहे.”
तर असा या विजय स्तंभाचा थोडक्यात इतिहास आहे.
दि. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या साथीदारांनी या विजय स्तंभाला पहिली भेट देवून मानवंदना दिली. आणि शौर्य वीरांच्या गाथेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेथे जमलेल्या लोकांसमोर स्फुर्तीदायक भाषण केले होते. तेव्हा पासून तेथे लोक मानवंदना देण्यास येवू लागले. प्रथम ही संख्या नगण्य होती परंतु सन १९८५ पासून ही संख्या शेकडोंनी नंतर हजारोंनी आणि आता लोक लाखो-लखोंच्या संख्येने या ठिकाणी येऊन मानवंदना देतात. आज ही शौर्य भूमी व विजय स्तंभ बहुजनांसाठी स्फुर्तीदायी/प्रेरणादायी स्थळ झाले आहे. हे मात्र नक्की.
संदर्भ: शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक भिमा कोरेगावचा विजय स्तंभ लेखक: सुधाकर खांबे (सैनिक कल्याण विभाग पुणे. महाराष्ट्र शासन यांचे कडून देण्यात येणारा विशेष गौरव पुरस्कार सन २००५ ला लेखकाला समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला)
– अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत