दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

माझे नावडते प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग

संकेत मुनोत

प्रधानमंत्री कसा असावा? तर मस्त भरपूर भाषणे करणारा. जे केले नाही ते पण मीच केले असे सांगणारा. स्वतःच्या चुकांचे खापर पूर्वीच्या सरकारवर टाकणारा. मस्त बॉलीवूडच्या हिरो-हिरोईनसोबत, पशु पक्ष्यांसोबत रोज वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शूट करणारा आणि असा सगळा टाइमपास करूनही, पहा ”मी कसा १८-१८ तास काम करतो” अश्या बाता मारणारा! पण डॉ मनमोहन सिंगांना त्यांच्या दुर्बुद्धीमुळे हे जमत नव्हते.

त्यांनी चुकीचे अनेक मोठे मोठे निर्णय घेतले. पण त्यातले ५ निर्णय खूप भयंकर होते.

१. पहिला म्हणजे Economic Reforms 1995 – ते प्रधानमंत्री असताना एक काळ असा होता कि पूर्ण जग मंदीच्या गर्तेत होते, रोज शेअर मार्केट ढासळत होते. खरंतर यावेळी करायला काय हवे होतं? तर नोटबंदी किंवा थाळी वाजवा, टाळ्या वाजवा, दिवे लावा यासारखा इव्हेंट. यात सांगता आल असतं कि आज पूर्ण जग आर्थिक मंदीमुळे नैराश्यात आहे. त्यावेळी जे जे लोक आर्थिक ताणातून जात होते त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या हे लोकांना सांगता आले असते. पण असलं काही प्रभावी करायचं सोडून डॉ. मनमोहन सिंग यांनी अशी काही धोरणे आखली कि भारताला याचा धोकाच पोहोचला नाही. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या स्थानावर नेऊन ठेवली होती आणि आज जसा GDP शब्द आपण negative साठी वापरतो तसा तेव्हा तो positive साठी वापरला जायचा. पण पॉजिटीव्ह असणं वाईटच नाही का?

२. त्यांचा चुकीचा दुसरा निर्णय म्हणजे माहिती अधिकार कायदा. ज्याच्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर थांबला. पण भ्रष्टाचार ही काय थांबवायची गोष्ट असते काय? उलट ”ना खाता हू, न खाने दूंगा” असं म्हणत भरमसाठ भ्रष्टाचार करायचा. ED, CBI, RBI, EC आणि अश्या सगळ्या स्वायत्त संस्थांना आपले बाहुले बनवायचे आणि तरीही विरोधात कोणी जिंकले तर त्यांच्यातील उमेदवार शेकडो कोटी देऊन विकत घ्यायचे. वृत्तपत्रात पहिल्या पानावर आणि टीव्हीच्या सगळ्या वाहिन्यांवर स्वतःच्या हजारो कोटींच्या जाहिराती द्यायच्या. एवढे करायला पैसे कुठून आले, त्याचा हिशोब विचारायचा नसतो. कारण तो भ्रष्टाचार थोडीच असतो? पण डॉ. मनमोहन सिंगांना कमी विद्वात्तेमुळे हे जमलेच नाही.

३. तिसरा चुकीचा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार देणारी मनरेगा योजना – आज नवीन रोजगारनिर्मिती सोडा, लाखो रोजगार गेले आहेत. नाईलाजास्तव याच मनरेगा योजनेअंतर्गत अनेकांना रोजगार मिळतो आहे. पण खरं करायला काय हवे होतं? लोकांना सरळ ”भजी तळा” वगैरे सारखे सल्ले द्यायला हवे होते आणि जो काही राष्ट्रीय रोजगार सर्वेचा चार्ट आहे तोच बंद करायला हवा होता. पण डॉ. मनमोहन सिंगांना कमी विद्वात्तेमुळे ते ही जमले नाही.

४. चौथा महत्वाचा चुकीचा निर्णय म्हणजे Civil Nuclear Deal – या निर्णयवेळी त्यांच्यासोबत जे सत्तेत होते त्यांनी याला विरोध करत पाठिंबा काढून घेऊ असे म्हटले. पण पाठिंबा जाऊनही डॉ मनमोहन सिंग यांनी ते बिल पारित करुन पुन्हा मजबूत सरकार स्थापन केले. इथे एक मुद्दा सोनिया, राहुल किंवा कुणाचा बाहुला म्हणण्याचा पण येतो. ते जर दुसऱ्या कुणाचा चमचा असते तर असा निर्णय घेणे त्यांना स्वतःला शक्य झाले असते का? नाही ना ? पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. पण आपण मात्र त्यांना कुणाचा तरी चमचा, बाहुला, आज्ञाधारक इ. म्हणत राहूया…

५. पाचवा चुकीचा निर्णय Food security Bill चा. याबद्दल तुम्ही स्वतः जाऊन वाचा, याचे फायदे आपण आजही घेत आहोत

पण वरील सर्व करतांना त्यांचे चुकले काय? तर त्यांनी सामान्य लोक, मध्यमवर्गीय, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी, कामगार इत्यादी सर्वांचा विचार केला. पण विचार कोणाचा करायला हवा होता? तर अदानी अंबानी यांचा! त्यांच्यामुळेच तर आपला देश चालतोय ना! बाकी आपण कुठे काय करतोय? पण इथे डॉ मनोहन सिंग यांचे चुकलेच!

अजून एक मुद्दा सहानुभूतीचा! त्यांनी कधीही भाषणात रडून स्वतःचे बालपणातील गरिबीचे किस्से सांगितले नाहीत. किंवा निवडणूक आली कि आपल्या आज्जीसोबत फोटो काढून त्याचा मत मिळवण्यासाठी वापर केला नाही. फाळणीमुळे त्यांना सर्वस्व गमावून पाकिस्तानातून भारतात यावे लागले. त्याच दरम्यान आईचा मृत्यू झाल्याने आज्जीने त्यांचा सांभाळ केला. घरातील गरिबीमुळे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात रात्री जागून अभ्यास केल्यामुळे त्यांचे डोळे खराब झाले. त्यांच्या जाड भिंगाचा चष्मा आजही त्याची साक्ष देतो. शिक्षणातील प्रत्येक वर्षात पहिला नंबर मिळवत त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठापर्यत मजल मारली. पण दुर्बुद्धीमुळे यातील कुठल्याही गोष्टीचा त्यांनी सहानुभूती गोळा करण्यासाठी उपयोग केला नाही.

खरंतर स्वतःच्या कार्यकाळात स्वतःच्या प्रेरणादायी आयुष्यावर एक मस्त चित्रपट त्यांना काढता आला असता आणि त्याला भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळाला असता. त्यांच्या तर सगळ्या पदव्यासुद्धा खऱ्या होत्या!

एक मुद्दा मौनी बाबाचाही – प्रधानमंत्र्याला भाषणात थापा मारता यायला हव्यात. पण मनमोहन सिंग यांच्यात हा चांगला गुणच नव्हता. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तब्बल १९९८ एवढी भाषणे केली आहेत. फक्त फरक एवढा होता कि ती ”मनकी बात” सारखी एकतर्फी नव्हती. तर लोकसभा आणि राज्यसभा सारख्या सदनांमध्ये दुतर्फी संवाद साधून केली. त्यांच्या मुलाखती पहिल्या तर मुलाखत घेणारे पत्रकार ही मूर्ख असावेत असे दिसते. सरकारच्या वेगवेगळ्या धोरणविषयी अवघड प्रश्न त्यांना विचारले गेले. तुम्ही आंबे कसे खाता? तुम्ही खिशात पाकीट ठेवता कि नाही? तुम्ही कसे महान आहात वगैरे प्रश्न विचारायला हवेत ना? पण त्यावेळी पत्रकार पण चांगले नसावेत.

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य , रोजगार, शिक्षण, अर्थव्यवस्था इ वर काम करायचे सोडून मस्तपैकी हिंदू-मुस्लिम वाद आणि इतर गोष्टीत लोकांचे लक्ष विचलित करायला हवे होते. पण असतात काही-काही लोक ज्यांना या महत्वाच्या गोष्टी समजत नाहीत ते असले प्रकार करायचे सोडून मुख्य काम करत राहतात.

म्हणूनच डॉ. मनमोहन सिंग माझे नावडते प्रधानमंत्री आहेत!

संकेत मुनोत

टीप – व्यक्ती गेल्यानंतर बरं बोलायची आपली थोर संस्कृती आहे म्हणून वर चार गोष्टी त्यांच्या मांडल्यात. अन्यथा डॉ. मनमोहन सिंगांना श्रध्दांजली? आणि मी? कभ्भी नही!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!