लेखांक क्रमांक 438 दिनांक 23.12.24
बुद्धाचा धम्म: ब्राम्हण भिक्षुच्या लेखणीतून !
५. भगवान बुद्ध आणि सारिपुत्त ह्यांची अंतिम भेट
अनु क्र १ ते २० चिकित्सा आणि विश्लेषण —
तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गन्धकुटी विहारात राहत होते. सारिपुत्त पांचशे भिक्खू बांधवांसह तिथे आला. तथागतांना अभिवादन केल्यानंतर त्यांना सांगितले की, पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाचा अंतिम दिवस येऊन पोहोचला आहे. तथागत मला ऐहिक जीवनातून मुक्त होण्याची परवानगी देतील काय ? तथागतांनी सारिपुत्ताला विचारले की, परिनिर्वाणासाठी त्याने स्थान निवडले असेल तर. सारिपुत्ताने तथागताला सांगितले, “माझा जन्म मगध देशातील नालक गावात झाला होता. ज्या गावात माझा जन्म झाला होता ते अजूनही आहे. ते घर मी माझ्या परिनिर्वाणासाठी निवडले आहे. तथागत उतरले, ” प्रिय सारिपुत्ता ! तुला जे आवडेल ते कर.” सारिपुत्ताने तथागतांच्या चरणावर डोके ठेवले आणि म्हणाला, “आपल्या चरणवंदनाच्या एकमेव आशेसाठी एक हजार कल्पापर्यंत मी पारमितांचा सराव करून निष्णांत झालो होतो. माझा हेतू साध्य झाला आहे आणि माझ्या आनंदाला अंत नाही. आपला पुनर्जन्मावर विश्वास नाही, म्हणून हीच आपली शेवटची भेट. तथागतांनी माझ्या दोषांबद्दल क्षमा करावे. माझा शेवटचा दिवस आलेला आहे. तथागत म्हणाले सारिपुत्ता ! “क्षमा करण्यासारखे काहीच नाही.”जेव्हा सारिपुत्त जाण्यासाठी उठले तेव्हा त्याच्या सन्मानार्थ तथागत उठले आणि गन्धकुटी विहाराच्या वऱ्हांड्यात उभे राहिले. सारिपुत्त तथागतांना म्हणाले, ” जेव्हा मी प्रथमच आपणास भेटलो तेव्हा मला आनंद झाला होता, आणि आताही आपणास भेटलो मला आनंद झाला आहे. आपली ही शेवटची भेट आहे, ह्याची मला जाणीव आहे. पुन्हा मला आपले दर्शन होणार नाही. त्याने आपले दोन्ही हात जोडून तथागतांकडे पाठ न करता सारिपुत्त तेथून निघून गेले. तेव्हा उपस्थित बंधूंना तथागत बुद्ध म्हणाले, “आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा.” प्रथमच एकत्रित जमलेले सर्व भिक्खू तथागतांना सोडून सारिपुत्ताच्या मागे गेले. सारिपुत्त आपल्या गावी पोहोचल्यावर ज्या घरात त्याचा जन्म झाला होता त्याच घरातील खोलीत तो मरण पावला. त्याचे अग्निसंस्कार केले गेले व त्यांच्या भस्मावशेष (अस्थी ) तथागत बुद्धा पाशी नेल्या गेले. सारिपुत्ताचे भस्मावशेष स्वीकारल्यावर तथागत भिक्खूंना म्हणाले, “तो सर्वोच्च शहाणा होता. त्याचा उपजत लोभी स्वभाव नव्हता. उत्साही आणि कठोर परिश्रमी होता. तो पापाचा अतिशय तिरस्कार करीत असे. हे बंधूंनो ! त्याच्या अस्थींकडे पहा. तो पृथ्वी समान क्षमाशील होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. त्याच्यावर कोणत्याही इच्छेने नियंत्रण केले नव्हते. त्याने सर्व वासना, कामेच्छांवर विजय मिळविला होता. सहानुभूती, मैत्री आणि प्रेम ह्यांनी परिपूर्ण होता. त्याच सुमारास महामोग्गलायन राजगृहासमीप एका निर्जन विहारात राहत होता. त्यावेळी तथागत बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोग्गलायनच्या दुःखद मृत्यूची वार्ता तथागतांना सांगितल्या गेली. सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे दोघे तथागतांचे मुख्य शिष्य होते. त्यांची (बुद्धाची ) शिकवण (तत्वे ) पुढे चालू ठेवण्यासाठी तथागत या दोघांवर अवलंबून होते. दोघांचेही निधन त्यांच्या हयातीत झाल्याने तथागतांवर अतिशय परिणाम झालेला होता. आता श्रावस्तीमध्ये राहणे पसंत नव्हते म्हणून त्यांनी तेथून निघून जाण्याचे ठरविले.
हे प्रकरण संयुक्त निकाय,45 : 2: 3 तथा अठ्ठकथा मधून घेतलेले आहे.
दुःखाचे कारण, आपले मित्र, आई वडील आणि स्नेही यांच्या कायमच्या वियोगामुळे सुद्धा आहे. या योगाने तथागत सुद्धा दुःखी झाले होते. अशा दु:खापासून कोणाचीही मुक्ती नाही.
ह्या प्रकरणात अनु क्र. ७ मध्ये, सारिपुत्त म्हणतो, “त्याने एक हजार कल्पापर्यंत पारमितांचा अभ्यास बुद्धाच्या चरणवंदनेसाठी केला होता. आणि त्याची ही इच्छा सफल झाल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.”
एक कल्प म्हणजे विश्वाची उत्पत्ती आणि विलय यांच्यामधील काळ हा कल्प होय. ह्याचा अर्थ- विश्वाची उत्पत्ती आणि विलय एक हजार वेळा झालेला असावा. मग प्रश्न निर्माण होतो की, विश्वाची उत्पत्ती आणि विलय एक हजार वेळा झाला असेल तरीही सारीपुत्त कसा जिवंत राहिला ?
कल्प म्हणजे काय ? ते पाहू !
वैदिक धर्मातील विष्णुपुराणातील माहिती नुसार —
कृतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग असे चार युग मिळून एक महायुग होतो. ते खालील प्रमाणे –
कृतयुग = ४८०० वर्षे
त्रेतायुग = ३६०० वर्षे
द्वापरयुग = २४०० वर्षे
कलियुग = १२०० वर्षे
महायुग = १२००० वर्ष
अशा ७१ महायुगांचा
एक कल्प होतो. संदर्भ RIDDLES IN HINDUISM अनुवाद – डॉ.न.म.जोशी. पृष्ठ क्र २५५ प्रकरण २४ कलियुगाचे कोडे
म्हणून एक कल्प =
७१ × १२००० = ८५२००० वर्षे
१ हजार कल्प =
१००० × ८५२०००
= ८५२०००००० वर्षे होतात
ही हिंदू धर्मातील कल्पाची कल्पना, एक हजार कल्पापूर्वी सारिपुत्ताने कोणत्या आधारावर सांगितली ? आणि एक हजार कल्पानंतरही कशी स्मरणात ठेवली ? मग तो सर्वोच्च विद्वान कसा ? ह्याबाबत बुद्धाने सारिपुत्ताची ह्या फोकनाड कल्पाबाबत कान उघाडणी का केली नाही ?
दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महामोग्गलायनची हत्या बुद्धाच्या शत्रूंनी केली. त्याच्या मृतदेहाची अंत्यविधी झाली होती काय ? जर झाली नसेल तर महामोग्गलायनला सुगती प्राप्त झाली की दुर्गती प्राप्त झाली ?
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
हिंदू जात आपले पाप आपल्या प्रांतातच ठेवील तरी बरे. पण नाही, जिकडे जाईल ती आपल्या पापाची पेरणी केल्याशिवाय राहणार इतकी ही हिंदुजात उपद्रवी आहे. संदर्भ – खंड १९ पृष्ठ क्र ३५७-३५८. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार हिंदू जात बौद्ध धम्मात भिक्खू बनून जरी आले तरी कल्पाची मांडणी करून त्यांनी आपल्या पापाची पेरणी बौद्ध धम्मात सुद्धा केलेली आहे असे दिसून येते.
म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
ज्याला बुद्धाची मुळ शिकवण माहित आहे, तो असे सुत्तपिटक वाचून वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. संदर्भ – खंड २० पृष्ठ क्र ३९० पैरा २. असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते उगीच नाही.
परंतु आश्चर्य म्हणजे एक हजार कल्पावर आजपर्यंत कोणीही ब्र सुद्धा काढला नाही.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
23.12.24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत