दिन विशेषदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आंबेडकर युग येतेय !

रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक आणि समीक्षक आहेत

देशात विविध कारणांवरून घडत असलेल्या घटनांचा वेध घेता आंबेडकर युग येत असल्याचे दिसतेय. मुद्दा इतकाच की ही चाहूल आहे. मात्र , चाहूल मोठी आहे !

हे आंबेडकर युग कुणी आणले नाही. ते स्वतःहून आले नाही. ते केवळ राजकीय नाही. ते भावनिकतेचा उद्रेकही नाही. या युगाला श्रध्दा , अस्मिता या नेहमीच्या चौकटीची तेव्हढीच बैठकही दिसत नाही.

आंबेडकर ही या देशाची निर्विवाद गरज झालीय. ते निदान , देशभान , समाधान असण्याची जाण झालीय. म्हणून ती मुसमुसून बाहेर येतेय.

     सध्या जे चाललेय याला उत्तर केवळ आंबेडकर होऊ शकतेय.

आंबेडकरांनी जे दूरचे पाहिले ते अधिक स्पष्ट होत आहे. ते केवळ संविधान शिल्पकार , धम्मधर वा विशिष्ट समाजघटकांसाठी एव्हढेच मर्यादित नव्हते. ते संपूर्ण राष्ट्राचे होते. संपूर्ण राष्ट्रहितासाठी होते. खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते. ते पटतेय आता. आता आंबेडकर अधिक वाचले जाईल. अधिक समजून घेतले जाईल , हे नक्की !

     आंबेडकरांनी मजूर मंत्री (१९४२) , कायदे मंत्री (१९४७) म्हणून जे ऐतिहासिक कार्य केले ते अद्याप लोकसंवादात नाही. खऱ्या अर्थाने ते श्रमिकांचे हितनायक व स्त्रीउध्दारक होते. पण ते प्रचारात नाही. अनुल्लेखात दडवले गेले. त्यांनी खडतर परिश्रम घेऊन हिंदू कोड बिल लिहिले त्याचा लाभ कुणाला झाला हे सांगायला हवे. 

त्यांनी स्वतंत्र देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला , तो कां ? तरतूद असतांना ओबीसी गणनेसाठी आयोगाची निर्मिती न करणे हेही ठळक कारण होते.

     आंबेडकर हे कांग्रेस आणि गांधीजी यांचे विरोधात होते. ते लपून नाही. लंडन येथे झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत (१९३०, ३१) ही विरोधाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यांनी रानडे , गांधी आणि जिना (१९४३) व कांग्रेस आणि गांधीजी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले ? (१९४५) लिहून सुध्दा स्पष्ट केले. तेव्हाची ती गरज होती. याचा अर्थ तेव्हढेच आंबेडकर होते असा अर्थ घ्यायचा काय ?

आंबेडकरांनी भारतातील जाती, त्यांची कार्यपद्धती, उदगम आणि विकास (१९१६) , भारतातील लहान तुकडे असलेल्या शेतजमिनी व त्यातून उदभवलेल्या समस्या (१९१८) , रुपयाचा प्रश्न (१९२३) , जातीचे निर्मूलन (१९३६) , संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य (१९३९) , पाकिस्तान वर विचार (१९४०) , शूद्र (ओबीसी) पूर्वी कोण होते ? (१९४६) , अस्पृश्य (१९४७) , संस्थाने आणि अल्पसंख्याक (१९४७) , हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती (१९५०) , हिंदू कोड बिल (१९५१) , हिंदुत्वातील कूटप्रश्न (१९५४) , क्रांती आणि प्रतिक्रांती (१९५५) , बुध्द की कार्ल मार्क्स (१९५६) व बुध्द आणि त्याचा धम्म (१९५६) याही ग्रंथरचना केल्या. ही सर्व अक्षरबध्दता व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीश्वास देणारी आहे. त्यातून त्यांचे देशप्रेम व लोकप्रेम स्पष्ट दिसते.
याशिवाय भारताचे संविधान (१९४९) लिहिले.

     आंबेडकरांचे प्रांत आणि देश या दोन्हीतील संविधानिक कार्य‌‌‌ अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी वेळोवेळी आणलेली बिले आजही अभ्यासाची ठरु शकतात. त्यांनी निर्माण व संपादित केलेली मूकनायक (१९२०) , बहिष्कृत भारत (१९२७) , जनता (१९३०) व प्रबुद्ध भारत (१९५६) ही वृत्तपत्रे व त्यातील लेखन आजही अभ्यासनीय आहेत. 

     आंबेडकरांनी प्रसंगोत्पात देशाला दिलेले इशारे तेव्हढेच आस्थेचे आहेत. सांसदीय शासनपध्दती असो की लोकशाही, त्यांच्या यशस्वीतेच्या आवश्यक अटी त्यांनी वारंवार सांगितल्या आहेत. त्या नजरेआड करता येणार नाहीत. त्यांनी विरोधी पक्षाची महत्ता सुध्दा सांगितली.

जर या बाबींकडे दुर्लक्ष केले तर हा लोकशाहीचा डोलारा केंव्हाही कोसळू शकतो , हेही सांगितले.

     बाबासाहेब आंबेडकर असेच अनेक अंगांनी देशाची आवश्यकता झालेय. त्यात देशाचेच भले आहे. देश मागे जाणार नाही. पूढेच जाईल. पुढचे पाहील.

देशही म्हणू लागेल ..

आभाळ मोजतो आम्ही
भीमा तुझ्यामुळे !

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!