रिपब्लिकन बोळवण आणि आतून पोखरणे
बसपा व वंचितची बौद्धांनी साथ सोडली आहे,ही बाब २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट झाली.त्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही,हे सत्य आहे.परंतु यावेळी काहींना १ हजाराचाही आकडा पार करता आला नाही.हेही दिसून आले.यावरून सद्य परिस्थितीत दोन्ही पक्ष राज्याच्या राजकीय पटलावरून अस्तंगत झाले,हे अधोरेखित होते.
बसपाची कामगिरी खालावल्यानंतर वंचितने पर्याय उभा केल्याचे मानले जात होते,परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील वंचितचा २५ लाख मतांचा आकडा २०१९ मध्ये १५ लाखावर व २०२४ मध्ये १४ लाखावर आला आहे.२१ जागांवर वंचितच्या उमेदवारांना १ हजारांपेक्षा कमी मते मिळाली.२१ मतदार संघात न पेक्षा बरी कामगिरी राहिली.परंतु उर्वरित सर्व ठिकाणी एकाही उमेदवाराला अनामत रक्कम वाचविता आली नाही.हे विशेष.
स्व:बळाचा नारा आणि तिकिटे वाटत सुटणे हा दोन्ही पक्षाचा समान धागा आहे.या सूञाप्रमाणे राज्य ताब्यात घेण्याचे दिवास्वप्न पूर्ण करण्याची त्यांची अतृप्त इच्छा यावेळीही दिसली.२८८ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी बसपाने सर्वाधिक २५९ व वंचितने त्या खालोखाल २०० उमेदवार उभे केले.यावरून त्यातील असंख्य पणती जुळवाजुळव करण्यासाठी ठेवल्या गेल्याच्या शंकेला बऱ्याच प्रमाणात पालवी फुटल्याचे दिसले.
वंचितकडे मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठ फिरविली असताना एक मोठी गंमत मतदानोत्तर कलचाचणीने केली.काही ठिकाणी वंचितच्या विजयाचा अंदाज बांधला.त्याने वंचितच्या आशा इतक्या पल्लवित झाल्या की,नेत्याला राहावले नाही.काही तासात लागणाऱ्या निकालाची किंचितही प्रतिक्षा न करता वंचित विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे निकालापूर्वी जाहीर करून स्वतःचेच हसे करून घेतले.त्यामुळे निकालानंतर जी फजिती झाली,ती सर्वांना दिसली.एका प्रवक्त्याच्या म्हणण्याप्रमाणे यावेळी वंचित विजयाचा गुलाल उधळणार होती.परंतु हा आनंदही वाट्याला आला नाही.शुन्य गुणांच्या आकडयात अपेक्षेप्रमाणे बदल झाला नाही.नेत्याने सत्तेसोबत जाण्याचे ठरविले होते.परंतु वंचितच्या दयनीय पराभवाने ते त्यालाही मुकले.
पूर्वी राजकारणात नसलेल्या राजरत्न आंबेडकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर रिपाइं या जुन्याच नावाने नवीन पक्ष स्थापन केला.तत्पूर्वी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी मैञी करून त्यांच्या सहाय्याने पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले असताना त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीने ते इतके भावनिक झाले की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहिला.परंतु त्यावेळच्या रूमालाची आठवण ठेवण्याइतकीही मदत जरांगेनी न केल्याने राजरत्न यांनी स्वतः व्यतिरिक्त दुसरे उमेदवार निवडणुकीत उभे केले नाही.वाशीममधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.यावेळी त्यांच्या सोबतीला असणाऱ्यांची संख्या काहींना पाचसहा इतकी दिसल्याने त्यांच्या उमेदवारीसंदर्भात जी शंका घेतली गेली ती निकालानंतर खरी ठरली.साध्या ग्रामपंचायतीच्या पराभूत उमेदवाराइतकीही मते त्यांना घेता आली नाही. १६२ मतांमध्ये ते आणि त्यांचा पक्ष न उघडण्यासाठी सिलबंद केलेल्या पेटीप्रमाणे गुंडाळला गेला.या संपूर्ण परिस्थितीने त्यांनी हे धाडस करण्यामागे अर्थकारण आहे,असा आरोप कोणीही करू शकतो.
बसपाचे संस्थापक कांशीराम यांचा वारसा सांगणारे आझाद पक्षाचे अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद यांनी पक्षाचा विस्तार करण्याच्या बहाण्याने राज्यात शिरकाव करून मुंबईच्या उपनगरातील वर्सोवामधून सिलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध असलेले एजाज खान यांना उभे केले.त्यांचे इंस्टाग्रामवर ५० लाखांपर्यंत फाॅलोअर आहेत,असे म्हणतात.शिवाय बाॅलीवूडमधील चिञपट तसेच माॅडेलिंग हे त्यांचे क्षेत्र असल्याचे सांगितले जाते.अशा लाखोंच्या चाहत्याला मतदारांनी १५५ मते देऊन केलेली नाचक्की आझाद यांना विसरताच येणार नाही.
वंचितचे राजकारणात विजयाची अपेक्षा नसल्याने ते विस्कटले.भारिपबमसं विसर्जित करून स्थापन झालेल्या वंचितने नवजात असतांना राजकारणात मारलेल्या मुसंडीचे सर्वांनाच कौतुक होते.परंतु वंचितच्या मताचा लाभ आरएसएस, भाजपला होतो हे बौद्धांना कळत गेले.म्हणून बौद्धांनी तिलाही झटकले.भारिपबमसंच्या राजकारणात लक्षनीय मते घेऊन विजयाच्या जवळ गेलेल्या अनेकांना दुसऱ्यांदा तिकीट मिळाले नाही.कोणाचीही उंची वाढू दिली गेली नाही.तसा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना बेदखल करून पक्षातूनही काढले गेले.अकोल्यात वंचितची ३० वर्षांपासून सत्ता आहे.परंतु इतक्या वर्षात दखल घ्यावी, असे कोणतेही भरीव काम दिसत नाही.
बौध्द मतांवर राजकारण करणारे बसपा,वंचित,व इतर पक्षांची स्वतःची पृष्ठभूमि नाही.ते सर्व रिपाइंपासून वेगळे होऊन तयार झाले.रिपब्लिकन राजकारणाला कुरतडून व आतून पोखरून त्यांनी रिपब्लिकन राजकारणाची माती केली. पक्ष म्हणून त्यांचा विस्तार झाला.परंतु विजयाचा संकल्प मागे पडला.त्याची जागा धंदेवाईक राजकारणाने घेतली. त्यांचे हे राजकारण बौद्धांना आता कळायला लागले आहे.म्हणून २०२४ मध्ये हे सर्व पक्ष संपल्यात जमा झाले. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन राजकारण नव्याने उभे करायला मोकळी जागा निर्माण झाली आहे.नव्या रिपब्लिकन राजकारणाची उभारणी करण्यासाठी कंबर कसली गेली पाहिजे.त्याची आज नितांत गरज आहे.
जोगेंद्र सरदारे
९४२२१३८३२२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत