देशभक्ती आणि देशद्रोहाची पाळेमुळे

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””‘
ते तुला दाखवत होते धिक्काराचे काळे झेंडे.
ते करीत होते तुझ्याविरोधात घोषणा;
देशद्रोही!देशद्रोही!!देशद्रोही!!!
का बरं?
तु अशी कोणती गद्दारी केली होतीस त्यांच्याशी?
त्यांच्या अत्याचारी धर्म आणि देशाशी?
त्यांनीच गुलामीच्या साखळदंडात
गुलाम केलेल्या त्यांच्या मातृभूमिशी?
पण,तु गद्दारीच्या त्यांच्या घोषणांचा उकळता लाव्हा रस उरात पेटवत.
ते घोषणा देणारे गुलाम
ज्यांच्या विरोधात लढत होते
स्वातंत्र्याचा लढा.
त्यांच्याच साम्राज्यात जाऊन ठणकावलेस त्यांना
त्या कोणत्याही स्वातंत्र्य योद्ध्याच्या काळजात नसलेल्या निर्भयतेने..
“परत जा!परत जा!!
इंग्रजांनो;आमच्या देशातून परत जा!!!”
इंग्रजांच्या छाताडावर थयथया नाचत
त्यांच्याच साम्राजातून फोडलीस सिंहगर्जना
तुला देशद्रोही म्हणणाय्रांच्या थोतरीत
राष्ट्रभक्तीची दिलीस चपराक सणसणीत
ते निरखू लागले आपलाच चेहरा
आपणच बनवलेल्या राष्र्टभक्तीच्या आरश्यात.
आणि तुला देशद्रोही ठरवणारांचा चेहरा
झाला शरमिंदा त्या आरश्यात
तुझ्यावर त्यांनी फेकलेल्या काळयाकुट्ट देशद्रोहाच्या रंगात.
तुझा चेहरा अजुनच तेजःपुंज भासत होता.अन्…
तुझ्यापुढे ते पार निस्तेज असल्याचे
त्यांची त्यांनाच कबूल करावे लागत होते;
“तुम्हीच खरे देशभक्त आहात.”
मग,का बरं त्यांनी तुला धिक्कारले होते?
त्यांच्याच पुर्वजांनी शतकानुशतके परकीयांच्या गुलामीच्या पखाली वाहिल्या असतांना
परकीयांना आपल्या बहिणी,लेकी नजर करून
प्रत्येक आक्रमकांची केली नव्हती काय त्यांनीच स्वार्थांध गुलामी?
तुझ्या पुर्वजांवर त्यांनीच
लादली नव्हती का पशूतूल्य गुलामी?
हजारो वर्षे धर्माज्ञा म्हणत देव-धर्मांच्या साक्षीने.
“ढोर,गंवार,पशू, शूद्र,नारी|
यह सब ताडकन के अधिकारी||”ची जपमाळ जपत.
ती जपमाळ जपणाय्रांच्या हजारो वर्षांच्या गुलामीचे साखळदंड तोडण्यासाठी
तु थोपटलेस दंड.
म्हणूनच तर तुला त्यांनी देशद्रोही ठरवले होते ना?
देशद्रोहाचा चिखल फेकत
तुझ्या त्या गर्जनेने जेव्हा पेटल्या दाहीदिशा.
तेव्हा कुठे स्वातंत्र्याची पहाट झुंजूमुंजू होऊ लागली होती.
पण, स्वातंत्र्याच्या बाजारगप्पा मारणारे ते.
तुझ्या लेकरांवर त्यांनी लावलेलं धर्मांध पारतंत्र्य मात्र
असेतु हिमाचल कायम ठेवण्याच्या धर्मांधतेने पछाडलेले होते त्यांना.
आणि तु तर त्यांच्या दिडशे वर्षांच्या गुलामीतून
त्यांना स्वातंत्र्य बहाल करतांना
घातली होतीस अट;
हजारो वर्षांच्या त्यांच्या देव-धर्माच्या गुलामीतून स्वातंत्र्य बहाल करण्याची.
स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी आक्रोश करणाय्रानी.
त्यांच्या हजारो वर्षांच्या गुलामांना धर्म बुडेल म्हणत
नाकारला होता त्यांनी स्वातंत्र्याचा अधिकार जेव्हा,
त्यांनी हजारो वर्षे जाती-धर्माचे गुलाम केलेल्यांची
त्यांच्या धर्मांध गुलामीतून मुक्ती
मुक्तीच्या पथावरून वाटचाल करीत
तु दिली होतीस दीक्षा मुक्ती पथाची तेव्हा.
मुक्ती पथावरून चालता चालता
त्यांच्या लैंगिक धर्मांध गुलामीतून
साय्रा गुलाम बायांच्याही केली होतीस मुक्ती.
पण,तु स्वत:च त्यांच्या जाती धर्माचा गुलाम असतांना
त्यांच्याच बायांची आणि बाप्यांचीही
मुक्ती करायचा धर्मद्रोह कसा करू शकतोस?
तु कसा माजवू शकतोस
त्यांच्या देव, धर्म,धर्मग्रंथांविरूद्ध अधर्म?
कसा पेरू शकतोस धर्माच्या काळोखात
ज्ञानाचा प्रकाश?
प्रकाश पेरतांना कसा आणू शकतोस
त्यांचा अधर्म धोक्यात?
म्हणूनच तर तु कितीही देशभक्तीचे शीलालेख कोरलेस तरी
तु ब्राह्मण नसूनही अधर्माला गाडणारा असल्यानेच.
ते तुला त्यांचा मुक्ती दाता म्हणून स्विकारतील तरी कसे?
ते त्यांच्या देशाचा महानायक तुला म्हणतील तरी कसे?
ते तुला तुझ्या अस्पृश्य जातीतच गाडून टाकतील.
बळी राजा सारखे.
फक्त ते संधी शोधताहेत,तुला देशद्रोही ठरवायची.
तुला,तुझ्या मानवी मूल्यांना पाळामुळांसकट काळाच्या काळोखात गाडायची.
बुद्धाच्या मानवतेला गाडून टाकलं तसं
तुलाही गाडून टाकायची.
म्हणूनच तर म्हणतोय;
तुझ्यावरच्या त्यांच्या देशद्रोहाच्या आरोपांची
चामडी सोलायची वेळ आता आलीय.
त्याच्या धर्माधिष्ठित देशभक्तीची देशद्रोही पाळेमुळे
उखडून काढायची वेळ आता आलीय.
-जयवंत हिर महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ६८वा महापरिनिर्वाण दिन
६डिसेंबर२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत