डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता
प्रा. डॉ. संजय थोरात.
भाकरी मागितली कि दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांची पत्रकारिता म्हणजे मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन होय. मूक समाजाचे नायकत्व स्वीकारून या समाजाला नेतृत्व देण्यासाठी ३१ जानेवारी १९२० ला मूकनायकचा पहिला अंक प्रसिद्ध केला. १९२७, २८ ला दर शुक्रवारी प्रसिद्ध होणारी बहिष्कृत भारत व समता हि पाक्षिके सुरु केली. १९३० ला सुरु केलेल्या जनता साप्ताहिकाचे पुढे प्रबुद्ध भारत असे रूपांतर झाले. कार्ल मार्क्सच्या मते सर्व चिकित्सेचा प्रारंभ धर्म चिकित्सेपासून होतो. आंबेडकरांनी प्रखर बुद्धिनिष्ठा दाखवत धर्मातील विषमतावादी तत्वावर प्रहार केला. स्त्रिया, अस्पृश्य, बहुजन यांचे शोषण नाकारले. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील अशी भूमिका त्यांनी मांडली. दलित मुक्तीचे साधन म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सूत्र स्वीकारले. लेखनाच्या माध्यमातून वरिष्ठ वर्गाला आत्मपरीक्षण व अस्पृश्य वर्गाला आत्मभान आणण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माची रचना अनेक मजली इमारती सारखी असून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता येत नाही असे ते म्हणत. जाती व्यवस्थेतील दैववादावर आधारित श्रमविभागणी त्यांना मान्य नव्हती. मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून त्यांनी काही काळ हिंदू धर्मातच स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला. कर्म – कांडावर हल्ला चढवला. ज्या लोकांत आपला जन्म झाला त्यांचा उध्दार करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. समतेवर आधारित बौद्ध धर्माचे त्यांना आकर्षण वाटले. आंबेडकरांच्या मते चातु : वर्णाचे जंतू काढून टाकण्याकरता बुद्धाच्या तत्व ज्ञानसारखे उपयुक्त रसायन नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक नितीमत्ता, अहिंसा या मूल्यांचा आंबेडकरांनी आग्रह धरला. अर्थात त्यांनी ब्राह्मण्याप्रमाणेच भिखू संघावर देखील टीका केली. भिखू ऐतखाऊ व आळशी लोकांचे सैन्य नसावे तर ते सुशिक्षित व कार्यप्रवण असावेत असे म्हटले आहे. बुद्धाचे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे सूत्र आंबेडकरांनी स्वीकारले. त्यांच्या लेखनामुळे अस्पृश्यता या विषयाला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले. राजकारणातील मनुष्यबळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अकार्यक्षम नगरसेवकांचा त्यांनी नंदीबैल, मूकस्तंभ, धुमकेतू असा उल्लेख केला. विभूती पूजा हा त्यांनी लोकशाहीचा विपर्यास मानला. उमेदवाराची लायकी व सार्वजनिक कामगिरीकडे लक्ष देऊन मतदान करा असा त्यांचा आग्रह असे. वृत्तपत्र व्यवसाय हा धंदा बनल्याची त्यांना खंत होती. त्यांच्या काही अग्रलेखांचे मथळे, ‘युवक परिषद, सामाजिक परिषद ‘ ‘ हिंदू महासभा व अस्पृश्यता’ ‘ नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ‘ ‘ समाज समतेचे विरोधक ‘ ‘ आमची कैफियत’ भाकरी मागितली दगड दिला ‘ ‘ अर्धवट राजकारणी देशाला विघ्न ‘ ‘ बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व ‘ त्यांच्या विचाराची दिशा स्पष्ट करतात. बहिष्कृत भारताची संपादकी हा पैसा कमावण्याचा धंदा नसून लोकजागृती करता घेतलेली दीक्षा आहे असे त्यांचे संपादकीय धोरण होते. बऱ्याच वेळा ते सर्व २४ रकाने एकटेच लिहीत. अंकात जाहिराती, सोड चिठ्ठयांच्या नोटिसा नसायच्या. गटार गप्पांना वाव नव्हता. सर्व आठ पाने वर्गणीदारांना म्हणजे वाचकांना समर्पित होती. डॉ.आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकजागृतीची स्वयं दीक्षा होती. दारूच्या जाहिराती छापू नयेत असा त्यांचा आग्रह असे. आपल्या लेखनातून स्पृश्यांना कर्तव्याची व अस्पृश्यांना अधिकाराची जाणीव करून देताना त्यांनी शरीर सुखाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या. आंबेडकरांनी आपल्या सर्वच विचारपत्रातून मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन केले. स्वकीयांना सल्ला व टीकाकारांवर हल्ला करत असताना त्यांनी नरकातून गाणाऱ्यांचा स्वर स्वर्गीय असतो हे दाखवून दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत