डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रस्तावना
आधुनिक भारताच्या पायाभरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय मोठे अन् महत्वाचे योगदान आहे. आधुनिक भारताची पायाभरणी करीत असताना अस्पृश्य, स्त्रीया, कामगार अशा समाजातील सर्व दुबळ्या घटकांना सामावून घेण्यासाठी बाबासाहेबांनी घेतलेले परिश्रम, मांडलेले विचार अन् आखलेली रणनीती जागतिक पातळीवर अभ्यासाचा विषय झालेला आहे. १९९० साली भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बाबासाहेबांना मरणोत्तर देवू केला. पण खऱ्या अर्थाने बाबासाहेब हे ‘विश्वरत्न’ आहेत. एका मागास समजलेल्या जातीत जन्मलेले बाबासाहेब राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, कायदा, इतिहास अशा अनेक विषयांत विद्वत्ता मिळवतात, या ज्ञानाचा उपयोग समाजातील दबलेल्या घटकांच्या उद्धारासाठी करतात, हजारो वर्षाच्या गुलामीचा इतिहास असलेल्या समाजाला गुलामीच्या चिखलातून वर निघण्याचा मार्ग दाखवतात अन् त्यांच्या प्रयत्नातून हा समाज आज आपले हक्क व अधिकार मिळवून घेण्यात यशस्वी होवू लागतो ही जगाच्या पाठिवरील क्रांतिकारी घटना आहे.
दलितांचा नेता यापलीकडेही बाबासाहेबांचे मोठे कार्य आहे अन् त्यांचे संपूर्ण भारतीयांसाठी अमुल्य असे योगदान राहिलेले आहे. बाबासाहेबांचे आर्थिक, शेतीविषयक, शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रातील विचार देशाच्या वाटचालीसाठी महत्वाचे ठरले आहेत, आजही मार्गदर्शक ठरत आहेत. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेली लोकशाही, समाजवादी अन् धर्मनिरपेक्ष तत्वांची पेरणी देशाच्या आजवरच्या वाटचालीस सहाय्यभूत ठरलेली आहे.
बुद्धांच्या मूळ विचारांचा जागर करीत बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचे पुनुरुज्जीवन केले. भारतीयांना ज्या महामानवाचा अन् महान अशा धम्माचा विसर पडला होता, तो ‘ बौद्ध धम्म’ बाबासाहेबांनी भारतात पुन्हा रुजवला असल्याने धार्मिक क्षेत्रातही बाबासाहेबांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानले. भारतातील समतावादी विचारांचा प्रवाह बाबासाहेबांच्या माध्यमातून विस्तारला. हा प्रवाह पुढे नेण्याची, यात अनेकांनी सामील होत स्वतंत्र, समता अन बंधुतेवर आधारित समाजनिर्मितीच्या प्रक्रियेला गती देण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
पार्श्वभूमी
महामानवाच्या निर्मितीत तत्कालीन सामजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी महत्वाचा घटक असते. महामानवांना ते ज्या समाजात वाढले त्यापासून पृथक करुन अभ्यासता येत नाही. त्यांची मूळं ज्या समाजातून विस्तारली, त्या समाजाची पार्श्वभूमी आधी तपासावी लागते.
हजारो वर्षांच्या वर्ण-जात व्यवस्थेने अन त्यातील विषमतेने भारतातला फार मोठा समूदाय मानवी हक्कांपासून वंचित राहिला. युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीतून जो जागतिक भांडवलदार वर्ग निर्माण झाला, त्यांच्यातील स्पर्धेतून वसाहतवाद निर्माण झाला. आधीच वर्ण-जातीच्या गुलामीने गर्भगळीत झालेला भारतीय समाज इंग्रजांच्या गुलामीत अडकला. इंग्रजांनी त्यांचा राज्यकारभार चालवण्यासाठी वर्ण-जातीची बंधने अंशत: शिथिल करीत शुद्रातिशुद्र समाजाला वासाहतिक स्पर्धेच्या लढाईत सैन्य म्हणून उतरवण्यासाठी सैनिकी शिक्षणासह अक्षरज्ञान दिले.
बाबासाहेब म्हणजेच भीमराव हे अशा वर्णव्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या पण इंग्रजांनी आपल्या सैन्यात सामील करुन घेवून अक्षरज्ञान दिल्या गेलेल्या कुटुंबात जन्मले.
सैन्यात प्रवेश मिळाला असला, अक्षरज्ञान मिळवण्याची सोय झालेली असली तरी भारतातील अस्पृश्य समाजाला प्रत्यक्ष जगण्यात प्रचंड अवहेलनेला सामोरे जावे लागत होते. राजकीय अधिकार तर दूरच राहिले पण सामाजिक अन् धार्मिक जीवनात त्यांना माणूस म्हणून कसलेही स्थान नव्हते. अशा पार्श्वभूमीत भीमराव वाढत होते. शिक्षण घेत असताना त्यांच्या स्वत:च्या वाट्याला आलेली अवहेलना समाजातील अशाच इतर घटकांच्या दु:खामागील कारणांचा शोध घ्यायला प्रवृत्त करीत होती. अशा सामाजिक पार्श्वभूमीने भीमरावांच्या जाणीवेवर केलेल्या आघातातून अन् त्या आघातांना भीमरावांनी पचवत, त्यातून मार्ग .काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून भीमरावांचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब’ झाले. सामाजिक व्यवस्थेने व्यक्तीच्या जाणीवेवर केलेला आघात, त्या आघाताला त्या व्यक्तिने दिलेले वळण अन् तत्कालीन सर्व उपलब्ध साधनांचा उपयोग करीत, संघर्ष करीत समाजातील इतर घटकांच्या सहाय्याने त्या व्यक्तीने केलेली अभूतपूर्व क्रांती आपण डॉ. बाबासाहेबांच्या रुपाने आज समजून घेणार आहोत.
जडणघडण
१४ एप्रिल, १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे आजोबा मालोजी व वडील रामजी हे सैन्यात होते. शिवाय सैनिकी शाळेला शिक्षण देण्याचेही काम करीत होते. भीमाबाई हे बाबासाहेबांच्या आईचे नाव तर भीमराव रामजी सकपाळ हे बाबासाहेबांचे मूळ नाव. लष्करी छावणी महू येथे असताना बाबासाहेबांचा जन्म झाला असला तरी पुढे त्यांचे कुटुंब दापोली, सातारा अन मुंबई अशा ठिकाणी स्थलांतरित झाले. सातारा येथील ‘कॅंप स्कूल’मध्ये बाबासाहेबांचे चौथी पर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ते एल्फिन्स्टन हायस्कूल व एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अनुक्रमे मॅट्रिक व बी. ए (अर्थशास्त्र अन् राज्यशास्त्र) झाले. दोन्ही ठिकाणी शिक्षण पूर्ण करणारे ते भारतातील पहिले अस्पृश्य जातीतील विद्यार्थी होते. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर कृष्णाजी अर्जून केळूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांच्या कौतुकाची जी सभा झाली, त्यात केळूस्करांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्रावरील पुस्तक भेट दिले. हे पुस्तक वाचून पहिल्यांदा बाबासाहेबांवर बुद्धविचारांचा प्रभाव पडला.
१९०६ साली बाबसाहेबांचा दापोलीच्या वलंगकर कुटुंबातील रमाबाई यांच्याशी विवाह झाला आणि १९१२ साली त्यांना यशवंत हे पहिले अपत्य झाले.
बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्या मदतीने बाबासाहेबांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठ, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन संस्था अशा ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. एम. ए(डबल), पीचडी, एमएस्सी, बार-ॲट-लॉ, डिएसस्सी, एल.एलडी अन डि.लीट अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या.
भारतात शिक्षण घेत असताना इथल्या वर्णव्यवस्थेतील विषमतेमूळे त्यांना सोसावे लागलेले त्रास अन परदेशातील मुक्त वातावरण त्यांनी अनुभवले. परदेशात शैक्षणिक पदव्या घेताना जे अनेक प्रबंध बाबासाहेबांनी लिहिले ते पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. त्यातला ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध महत्वाचा आहे. बासाहेबांचे उच्च शिक्षण हे शिष्यवृत्तीतून झाले. शिष्यवृत्ती मिळवण्यात अनेक चढउतार झाले. अनेकवेळा शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले, नोकरी करावी लागली. पण पुन्हा पैशांची सोय होताच बाबासाहेबांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले.
अनेक खाचखळग्यातून जात, आर्थिक अडचणींवर मात करीत, सामाजिक अवहेलना सहन करीत अन् व्यक्तिगत सुखाचा त्याग करीत बाबासाहेबांनी शिक्षण घेतले. बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास अन् त्यासाठीचे संघर्ष हा लिखाणाचा स्वतंत्र विषयच होवू शकतो एवढा चढउतार, संघर्ष व त्याग त्यामागे आहे. विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांनी आपला अभ्यास, जिद्द आणि चिकाटीने जगभर नावलौकिक मिळवले.
वकील म्हणूनही बाबासाहेबांनी महत्वाच्या न्यायालयीन लढाया जिंकल्या. केशवराव जेधे, जवळकर व त्यांचे काही सहकारी ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या न्यायालयीन लढाईत अडकले तेव्हा बाबासाहेबांनी त्यांचे वकीलपत्र घेवून त्यांची निर्दोष मुक्तता केली.
मूकनायक, समता आणि बहिष्कृत भारत
अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही बाबासाहेबांमधील सामाजिक जाणीवा जागृत होत्या. धार्मिकतेच्या आडून ज्या समाजाचा आवाज दाबला गेला आहे, ज्यांना बहिष्कृत केले गेले आहे अशा समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी मुकनायक आणि समता हे पाक्षिक तर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र चालवले. या पाक्षिक अन वृत्तपत्रांनी बहुजन समाजाचे आत्मभान तर जागे केलेच पण तत्कालीन राजकीय धोरणांवर प्रचंड प्रभाव पाडला.
आज मिडिया ‘बिकाउ’ झाली असा गळा काढत सगळ्या चळवळींनी मान टाकलेली असताना बाबासाहेबांनी त्याकाळी बिकट परिस्थितीतही स्वत:ची स्वतंत्र ‘मिडिया’ उभी केल्याची घटना प्रेरणादायी ठरते.
बहिष्कृत हितकारिणी सभा
१९२४ च्या दरम्यान बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून बहिष्कृत समाजासाठी शाळा, वाचनालये, वसतीगृहे स्थापण्यास सुरुवात केली. ‘शिका, संघटीत व्हा अन् संघर्ष करा’ हा नारा दिला. बहिष्कृत समाजाला शिकल्याशिवाय, संघटीत होवून आपल्या न्याय्य-हक्कासाठी संघर्ष केल्याशिवाय तरुणोपाय नाही हे बाबासाहेबांनी सुरुवातीच्या काळातच स्पष्ट केले. बाबासाहेबांनी दिलेला हा मूलमंत्र आजही आवश्यक अन् दिशादर्शक आहे.
पुण्यातील शिवराम जानबा कांबळे या चळवळ उभी करणाऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क झाल्यानंतर त्याच्यासोबत बाबासाहेबांनी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट दिली. पेशवाईतील जुलुमाला कंटाळून, पेशवाईला ठोस उत्तर देण्यासाठी महार लोकांनी इंग्रजांसोबत पेशवाईविरुद्ध लढा दिला होता. बाबासाहेबांनी या लढ्याचा अन् भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा दाखला देत बहिष्कृत समाजाला ‘तुम्ही गुलाम नाहीत तर यशस्वी योद्धे आहात’ ही प्रेरणा दिली.
महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह
सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यता पाळू नये असा नियम झालेला असतानाही महाड पालिका सनातन्यांच्या दबावाखाली हा नियम पाळत नव्हती अन् महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना जाण्याचे अधिकार नव्हते. म्हणून, बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हाती घेतला. बाबासाहेबांच्या विचारांशी सहमत असणारे स्पृश्य, अस्पृश्य असे सगळे यात सामील झाले. सत्याग्रह १९२७ ला यशस्वी झाला तरी काही काळ महाडच्या तळ्याचा खटला न्यायालयात प्रलंबित होता. महाडचे न्यायालय, ठाणे न्यायालय अन मुंबई उच्च न्यायालय अशा तिन्ही ठिकाणी अनुक्रमे १९३१, १९३३ आणि १९३७ साली ही न्यायालयीन लढाईही यशस्वी झाली. या लढ्यातूनही बाबासाहेबांनी अस्पृश्यांना आपल्या कायदेशीर अन् मानवी अधिकारांसाठी सत्याग्रह तसेच न्यायालय या दोन्ही स्तरावर लढण्याची शिकवण दिली.
मनुस्मृती दहन
भारतातल्या वर्ण-जात विषमतेला धार्मिक अधिष्ठान होते. ‘मनुस्मृती’सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून या विषमतेचे संहिताकरण करण्यात आले होते. ही विषमता नाकारायची असेल तर ज्या संहितेवर अन् धार्मिक अधिष्ठानावर ही विषमता आधारित आहे तो ग्रंथ नाकारला पाहिजे असे ठरवून बाबासाहेबांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी शुद्रातिशुद्र अन् स्त्रीयांच्या मागासलेपणाला कारणीभूत असलेल्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीर दहन केले.
जगाच्या पाठीवर ज्या धार्मिक क्रांत्या झाल्या त्यातील ही एक महत्वाची घटना आहे. मनुस्मृतीच्या दहनाद्वारे बाबासाहेबांनी विषमतेची पेरणी करणाऱ्या विचारांचे दहन करण्याचा संदेश दिला, विषमतेचे समर्थन करणाऱ्या धार्मिक मान्यतांचे दहन करण्याचा संदेश दिला.
मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि धर्मांतराची घोषणा
बाबासाहेबांच्या विचारांतून अनेक ठिकाणी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलने झाली. नाशिकच्या काळाराम मंदिरप्रवेशाचे आंदोलन प्रसिद्ध आहे. ही आंदोलने अस्पृश्यांना मंदिर अन् देव यांत गुंतवण्यासाठी छेडलेली नसून अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाने देव बाटत नाही हे सिद्ध करण्यासाठी होती हे बाबासाहेबांनी स्पष्ट केले. शिवाय, या आंदोलनांच्या माध्यामातून आजवर दूर लोटलेल्या आपल्याच धर्मातील अस्पृश्य घटकांना स्पृश्य समाजाने आतातरी जवळ घ्यावे अन् त्यांना माणूस म्हणून स्विकारावे यासाठीची ती हाक होती.
अस्पृश्यांना त्यांचा माणूस म्हणून जगण्यासाठीचा हिंदूधर्मातील संघर्ष बाबासाहेबांनी अनेक आंदोलनाच्या माधमातून अनुभवला. हिंदू धर्मात अस्पृश्यांना कधीही मानाचे स्थान मिळणार नाही हे ओळखत विषमतेवर उभ्या असलेल्या धर्माला नकार देवून समतेवर आधारित धर्माचा पर्याय देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे १९३५ साली बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली.
गोलमेज परिषदांमधला सहभाग अन् पुणे करार
भारतातील राजकीय असंतोष शमवून भारताला वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य देण्यासाठी अन् त्यासंदर्भात कायदे बनवण्यासाठी इंग्रजांनी विविध गोलमेज परिषदांत भारतातल्या विविध गटांच्या नेतृत्वाला सामावून घेतले. या गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेबांनाही निमंत्रित करण्यात आले. बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्काचा मुद्दा या परिषदांमध्ये मांडला आणि अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघाची आवश्यकता पटवून दिली. अशारितीने अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ देण्याची तयारी इंग्रजांनी दाखवलेली असताना म. गांधी यांनी यामुळे समाजात फूट पडेल अशी सबब पुढे करुन अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघ मागणीविरोधात आमरण उपोषण सुरु केले. शेवटी पुण्यातील येरवडा येथे गांधी-आंबेडकर यांच्यात करार होवून अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाऐवजी अस्पृश्यांसाठी राखीव मतदार संघावर तडजोड झाली. या कराराला ‘पुणे करार’ म्हणतात. करारातील तडजोडींवर बाबासाहेब नाराज होते अन् नाईलाजाने त्यांना या तडजोडी कराव्या लागल्याचे त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले.
राजकीय पक्षाची स्थापना, फेरबदल आणि भूमिका
१९३६ साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली. वर्ग अन् वर्ण विषमतेने बाधीत घटकांचे राजकीय हक्क प्रस्थापित करण्यासाठीचे हे पाऊल होते. राजकीय सत्तेशिवाय आपल्या समाजाचे मानवी हक्क प्रस्थापित करता येणार नाहीत याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच ‘सत्ताधारी जमात बना’ असा सल्ला ते शोषितांना देतात. सत्तेचा साधन म्हणून वापर करीत आपल्या मानवी हक्कांचे साध्य गाठण्यासाठी ते राजकीय हक्कांना महत्वाचे मानतात. पुढे १९४२ साली ‘ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’ या पक्षाची बाबासाहेबांनी स्थापना केली. १९४० ते १९४६ दरम्यान बाबासाहेब तत्कालीन इंग्रज केंद्र सरकारात कॅबिनेट मंत्री राहिले. कामगार, पाटबंधारे अन् ऊर्जा अशी खाती त्यांनी सांभाळली. त्याकाळात त्यांच्या खात्यात त्यांनी अवलंबलेल्या धोरणांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर धोरणांवर पडला अन् शेती, उद्योग, पाटबंधारे, ऊर्जा अशा सर्व क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडले.
१९५६ साली बाबासाहेबांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. त्यांच्या हयातीत ही स्थापना होवू शकली नाही. पण त्यांच्या पश्चात हा पक्ष स्थापन झाला अन् दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत तब्बल ९ उमेदवार या पक्षाच्या वतीने लोकसभेवर निवडून गेले. पुढे गटातटाच्या अन् तडजोडीच्या राजकारणाने या पक्षाचे काय झाले हे आपणास ठाऊक आहेच.
बाबासाहेबांच्या राजकीय भूमिका स्पष्ट अन् ठाम होत्या. मनमाडच्या रेल्वे कामगारांसमोर दिलेल्या भाषणात ‘ब्राह्मण्यशाही आणि ‘भांडवलशाही’ हे आपले दोन प्रमुख शत्रू असल्याचे बाबासाहेब अधोरेखित करतात. वर्ग-वर्ण विरोधी लढा अन् स्त्रीयांना समान अधिकार हे बाबासाहेबांच्या राजकीय धोरणांच्या केंद्रस्थानी होते.
संविधानाची निर्मिती आणि प्रथम कायदामंत्री
लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता यावर उभे असलेल्या भारताच्या संविधानाचा मसुदा बाबासाहेबांनी लिहिला म्हणून ते ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ म्हणून ओळखले जातात. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. शिवाय धर्म, भाषा, चालीरीती अशा सर्व बाबतीत प्रचंड विविधता भारतात आढळून येते. अशा विविधता असलेल्या देशाला एका संविधानात एकत्र बांधण्याचे महत्वपूर्ण कार्य बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते अन् त्यावेळी बहुमत कॉंग्रेसचे होते. त्यामुळे संविधानाचा मसुदा बनवण्यासाचे पूर्ण स्वातंत्र्यही बाबासाहेबांना नव्हते, तत्कालीन राजकीय मर्यादाही त्यांच्यावर होत्या हे देखील आपण समजून घेतले पाहिजे.
बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री राहिले. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत त्यांचा मुंबई मतदारसंघातून पराभव झाला. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला पण ते राज्यसभेचे सदस्य राहिले. हिंदू कोड बिलाला विरोध झाल्याने बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
हिंदू कोड बिल
हिंदू धर्मात शुद्रातिशुद्रांसह महिलांवरही अन्याय झाला. महिलांवरील अन्यायालाही धार्मिक अधिष्ठान होते. म्हणून हिंदू स्त्रीयांना नाकारले गेलेले अधिकार मिळवून देण्यासाठी हिंदू महिलांना घटस्फोटसंबंधी अधिकार देणारी, पित्याच्या संपत्तीत मुलाच्या बरोबरीने वारसाहक्क देणारी, पोटगी व दत्तकाचे अधिकार देणारी संहिता निर्माण करणे गरजेचे आहे हे ओळखून बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिलाचा’ प्रस्ताव मांडला. त्याला सनातन्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
पुढे याच हिंदू कोड बिलाचे चार भागात विभाजन करुन हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा असे चार कायदे अस्तित्वात आले.
बाबासाहेबांनी सर्वप्रथम या देशात महिलांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला. जे लोक आज स्त्री स्वातंत्र्याची भाषा करतात त्याच पक्षाच्या व वृत्तीच्या लोकांनी हिंदू कोड बिलाला कडवा विरोध केला होता.
बौद्ध धम्मात प्रवेश
१९५६ साली नागपूर येथे बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्मात प्रवेश केला. जगाच्या पाठिवरील हे सर्वात मोठे धर्मांतर ठरले.
सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील धर्मश्रद्धेचे महत्व बाबासाहेब जानून होते. म्हणूनच शोषण, कर्मकांड, अंधश्रद्धा यावर आधारित धर्म नाकारत असताना सर्वसामान्य माणूस हा अश्रद्ध होवून भरकटला जावू नये यासाठी त्यांनी बुद्धांचा समतावादी, विज्ञानवादी अन् विवेकवादी धम्म शोषितांना देवू केला. बौद्ध धम्मात घुसडल्या गेलेल्या चुकीच्या बाबींना वगळून बुद्धांचा मूळ विचार पुन:स्थापित केला. त्यासाठी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाची रचना केली. बाबासाहेबांनी संगितलेला हा धम्म ‘नव बौद्ध’ म्हणून ओळखला जातो.
वैचारिक आयुधे
बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय आयुष्यात देशातील शोषित समाजाला शोषकांविरुद्ध लढण्यासाठी विपुल लिखाण करुन वैचारिक आयुधे निर्माण करून दिली. प्रॉब्लेम ऑफ रुपी, व्हू वेअर दी शुद्राज, थॉट्स ऑन पाकीस्तान, बुद्धा ॲंड हिज धम्मा, बुद्ध ॲंड कार्ल मार्क्स अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
मुकनायक अन् बहिष्कृत भारतातील अनेक लेख आजही शोषित समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहेत.
शेतीविषयक विचार
बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार दुर्लक्षित राहिले. शेतीचे राष्ट्रीकरण करुन, सरकारने शेतजमीनी विकसित कराव्यात अन् त्या कसण्यासाठी द्याव्यात. पीकपद्धती, पीकप्रकार, शेतमालाला भाव याबबतीत निश्चित नियमावली करुन शेतीविषयक व्यवहारांवर शासनाने नियंत्रण ठेवावे असे विचार बाबासाहेबांनी मांडले. शेतीसाठी पाणी महत्वाचे असल्याने पाण्याचे नियोजन करावे असेही विचार मांडले. त्यांच्या शेतीविषयक विचारांतून स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांच्या फायद्याचे अनेक निर्णय घेतेले गेले. पण ‘सामूदायिक शेतीचा’ त्यांचा मूळ विचार दुर्लक्षित राहिला. आज देशात शेतकरी अतिशय बिकट अवस्थेतून जात आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतकरी अडगळीत पडला आहे. बाबासाहेबांचे शेतीविषयक धोरण आजही दिशादर्शक ठरणारे आहे.
समारोप
६ डिसेंबर, १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
पिडीत घटकांना न्याय मिळवून देणारे जगाच्या पाठीवर जे महामानव होवून गेले त्यात बाबासाहेबांचे नाव सन्मानाने घेतले जाते. वर्ग, वर्ण अन् लिंग भेदाविरुद्ध बाबासाहेबांनी मांडलेले विचार अन् केलेले कार्य आजच्या काळातही प्रेरणादायी अन् दिशादर्शक आहे. बाबासाहेबांचे ओठावर नाव असणारे अन् पोटात मात्र भांडवलदार, जमीनदार अन् सवर्ण वर्गाचे हित बाळगणारे दुटप्पी राजकारणी आज सर्वत्र दिसतात. बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग ‘व्होट बॅंक’ जपण्यासाठी केला जात असतानाच्या काळात आपण त्यांच्या विचारांची मशाल घेवून चळवळ चालू ठेवण्याचा संकल्प करुया.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
(दि. २७ फेब्रूवारी, २०२२ रोजी लिहिलेला लेख आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुन्हा प्रसारित करीत आहे.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत