आपण भारतीय कोणत्याही जातीचे, धर्माचे पंथाचे असु… प्रज्ञासूर्य महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात आहोत.
आपण भारतीय कोणत्याही जातीचे, धर्माचे पंथाचे असु… प्रज्ञासूर्य महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणात आहोत. एका आयुष्यात त्यांनी हजारो वर्षांची विषमता संपवून सर्वांना समानता देणारा राष्ट्रमंत्र दिला.
अमानुष धर्मांधतेला वेसन घालून माणूसपणाचे श्वास मोकळे केले.नमन तर त्यांना केलेच पाहिजे.पण आता सर्वच जातीधर्मांनी एका सुबुध्द भारतासाठी बाबासाहेबांनी बांधलेल्या रस्त्याची काळजी घेतली पाहीजे. धर्मांध महाशक्ती तर हा रस्ता उधडवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेच शिवाय या कामात ते बिगारी म्हणून आपलाच वापर करताहेत. या बिगार्यांचेही प्रबोधन आपल्याला करायचे आहे.
” कुणी हक्क मागायला उभा राहीला तर तो निश्चितच बाबासाहेबांच्या मार्गावर जातो ” महाशक्तीला नेमके हेच नको आहे. मग ते आपल्यातलेच घोडा, गाढव, वाघ, मांजर बुध्दीभेदाने बिगारी बनवत सुटले आहेत. बाबासाहेबांचं ऐकतो तो शिकतो, संघटीत होतो आणि संघर्ष करतो. हे कार्यकारणभाव असलेले सत्य आहे. महाशक्तीला त्यांच्याशी संघर्ष करणारे नकोत तर आपसात कलह माजवणारे हवे आहेत. आपण वेळीच सावध झाले पाहीजे. नव्हे , आता समाजाला दिशा द्यायचे, शिकवायचे काम आंबेडकरी समाजाचे आहे. कारण आंबेडकरी समाजाला महाशक्तीचा भेद करायचे बाळकडू मिळालेले आहे. उर्वरीत समाज आजही निर्बुध्द आहे. त्याला जागा करुन घटनेच्या शक्तीची जाणीव करुन द्यायला हवी. “घटना” हाच सर्व भारतीयांचा एकमेव धर्म आहे. बाकी सगळे धर्म उंबरठ्याच्या आतील परिघातच राहावेत.
आपण मध्ययुगीन कालातील शेण खाणारी कर्मकांडी अमानुष हैवाने नव्हे तर आधुनिक भारतातील सुबुध्द नागरीक आहोत.
” निधर्मी राष्ट्र प्रथम ” हेच आपले ब्रिद आहे. हीच बाबासाहेबांची शिकवणूक आहे. आणि तिच्याशिवाय आपणा कुणा भारतीयांना तरणोपाय नाही.
सध्याची सरंजामी मनोवृत्ती , इर्षा, द्वेष, घृणा आणि श्रेष्ठत्वाची अहंता आपल्या सर्वांनाच विनाशाच्या खाईत लोटणारी आहे. गुलाम बनवणारी आहे. ही परिस्थिती आपल्या पुढच्या पिढ्यांना अस्थीर आणि असुरक्षीत करणारी आहे.
बाबासाहेबांना समजून घेण्याची वेळ अद्याप टळलेली नाही. खरे तर त्यांना समजून घेण्याची हीच वेळ आहे ” प्रातःकाल हा विशाल भूधर , सुंदर लेणी तयात खोदू ” विसरा आपापले वैयक्तिक धर्म.
आपण कितीही व्यस्त असा ; हातातले काम दोन मिनीटांसाठी थांबवा. बाबासाहेबांचे स्मरण करा. आणि तुमच्या आतल्या ” भारतीय नागरिका”ला जागवा. हिच बाबासाहेबांना खरी वंदना आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा,
अभिमानाने “जयभिम ” म्हणा. आपोआप तुमचा ऊर राष्ट्राभिमानाने भरुन येईल. बाबासाहेब महामानव होते. महामानव कुणा एकाचा नसतो. तो सर्वांचा पितामहच असतो. ” जयभिम ” ही घोषणा नाही. अभिवादन आहे. विश्वमानव्याचा महामंत्र आहे तो.
जयभिम भारत !!
~•~
गणेश हनुमंत दिघे
यांनी ६ डिसेंबर पूर्वसंध्येला लिहिलेलं चिंतन ❤️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत