रिपब्लिकन बोळवण अणि वर्तुळातील बेडकं
*बाबासाहेब ” मी राजकारणाच्या समुद्रात खोलवर पोहतो.काठावरच्या घोटाभर पाण्यात नाही ” असे म्हणाले आहेत.यातून समाजासाठी राजकारणात पूर्ण वेळ व जीव ओतून काम करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली आहे.* परंतु त्यांच्या तात्पर्याच्या अगदी उलट काहींनी राजकारणाला पावसाळ्यात सर्वञ वावरणाऱ्या व नंतर दडून बसणाऱ्या बेडकांप्रमाणे मौजेचा विषय बनविला आहे.निवडणूक लागली की त्यांचे वावरणे सुरू होते व ती संपली की ते राजकारणातून अंग चोरुन घेतात.मधल्या काळात त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
रिपब्लिकनांच्या राजकारणाचा खेळ खंडोबा करण्याचा हा संपूर्ण दोष अशा प्रकारचा औटघटकेचा राजकीय पेहराव धारण करणाऱ्यांचा आहे. ५ वर्षांतील ४ वर्षं ११ महिने १५ दिवस ते सक्रिय राजकारणात कोठेही आढळत नाही.परंतु नंतरच्या १५ दिवसातील त्यांची राजकीय भूमिका जाहीर करून बौद्धांना आवाहन करण्याची पद्धत पाहिली की, असे वाटते,रिपब्लिकनांच्या राजकारणाची खरी चिंता त्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणालाही नाही.
या पार्श्वभूमीवर राजकारणात नसलेल्या परंतु निवडणूक पाहून त्यमध्ये लुडबुड व नसती उठाठेव करणाऱ्या अराजकीय व्यक्ती कोणत्या कार्याशी जुळून आहेत,याचा शोध घेणे जरुरीचे ठरते.यात वर्तुळ परिषद नावाने वर्तुळात रमणाऱ्या बुध्दीजीवी बौद्धांचा एक समूह आहे.त्याचे पुढारपण धम्मकार्याची झुल पांघरलेले अशोक सरस्वती करतात.त्यांचे म्हणणे असे आहे की,राजकारण हे त्यांचे क्षेत्र नाही.परंतु निवडणूक काळात ते व त्यांचे सहकारी ज्या प्रकारे राजकीय भूमिका घेतात,त्यावरून त्यांची धम्म आणि नीती दोन्ही एक नाहीत.त्यात सरळमिसळ आहे.तशी नसती तर त्यांनी ताकाला जाऊन भांडे लपविले नसते.
धम्मकार्य करणाऱ्यांनी राजकारण करू नये,असे मुळीच नाही.राजकारणाच्या शुद्धीसाठी ते आवश्यकही आहे. परंतु ते प्रसंगोपात नसावे.ती निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने त्यात धरसोडपणा नसावा.त्यात सातत्य असले पाहिजे.वर्तुळ परिषदेचा राजकारणात अशा प्रकारचा कोणताही सहभाग नाही.
ऐरवी राजकारणाची पालखी वाहण्यापासून दूर असणारे परिषदेच्या वर्तुळातील काही बिगर राजकारणी प्रमुख चेहरे निवडणुकीच्या हंगामात राजकीय मुखवटे धारण करण्यापासून चुकत नाही. एखाद्या रिपब्लिकन गटाप्रमाणे किंवा एखाद्या लहान पक्षाप्रमाणे परिषदेची भूमिका व निर्णय कोणी विचारो न विचारो पञकातून जाहीर करीत अमक्या – तमक्याला मतदान करण्याचे मतदारांना आवाहन करणारी त्यांची ती पंधरा दिवस ते महिण्याभरापर्यंतची सक्रियता पाहिली तर तेच खरे राजकारणी वाटतात.यावेळी न मागता या परिषदेने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला,यात नवल नाही.परंतु रिपब्लिकन गटांची वाट अडवून बिगर राजकारण्यांनी असा राजकीय हस्तक्षेप करणे म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना बनण्याचा हा प्रकार आहे.
इतर अनेक नावांपैकी कास्ट्राईब ही शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना चालविणारे अरूण गाडे यांचे क्षेत्र समाजकारणाचे आहे. राजकारणी म्हणून त्यांची कोणतीही प्रतिमा नाही.परंतु कोणतीही निवडणूक असो चार दोन माणसांना हाताशी धरून ते उमेदवार उभा करतात किंवा कोणाला पाठिंबा देतात.पाठशिवणीच्या मनोरंजनात्मक खेळाप्रमाणे खेळल्या जाणाऱ्या या प्रकाराला राजकारणाचा संदर्भ लावता येत नाही.
अशा अराजकीयांना आवर घालून रिपब्लिकनांची ताकद उभी करू शकणारे राजकारण उभे राहू शकले नाही.याचे एक कारण खोरीपचे जुने जाणते राजकारणी प्रा.अशोक गोडघाटे स्व:निवृत झाले.हे सुध्दा आहे.दशकभरापूर्वी खोरीपच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांना बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचा सशक्त राजकीय वारसा समोर नेण्यासाठी पक्षाचे नेतृत्व करण्याची गळ घातली होती.परंतु अशी सर्वांच्या हिताची योग्य भूमिका घेण्याऐवजी ते घरी बसले.परंतु आताच्या निवडणुकीत त्यांनी स्व: निवृत्ती मधून बाहेर येत उत्तर नागपुरातील काॅंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्यासाठी बैठका घेतल्या आणि प्रचार केला.घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी घेण्यास नकार देणारे इतर पक्षाच्या उमेदवारांसाठी झटतात,ही रिपब्लिकन राजकारणाची शोकांतिका आहे.
आताच्या निवडणुकीच्या राजकारणात पैशाचा महापूर वाहतो.ही परिस्थिती पाहता अराजकीय समाजकारणी, धम्म कारणी व संस्कृतीकारणीयांचे केले जाणारे पाठिंब्याचे राजकारण फुकटात होणार नाही.वसूलीची किंमत कमी जास्त होईल,इतकेच.परंतु या वसुलीचा बळी रिपब्लिकनांचे राजकारण ठरते.म्हणून प्रासंगिक कराराप्रमाणे असलेल्या या १५ दिवसाच्या राजकारणाचा निषेध करावा तितका कमीच आहे. अशा शुद्ध दुकानदारीमुळे बौध्दांची बदनामी होते,ते वेगळेच.
रिपब्लिकन राजकारणातील भाऊगर्दीत अनेकजण सामील असल्याचे दिसतात.परंतु त्यातील राजकारणाचे गांभीर्य समजून त्या प्रकारचे राजकारण करणारे बोटावर मोजण्याइतके सुध्दा नाहीत.म्हणून प्रामाणिक लोकांच्या हातात रिपब्लिकन राजकारणाची सूत्रे दिली गेली तरच अराजकारण्यांचे राजकारण संमाप्त होईल.
जोगेंद्र सरदारे
९४२२१३८३२२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत