डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण
डॉ. आंबेडकरांची मुंबईतील महाप्रचंड अंत्ययात्रा (७ डिसेंबर १९५६). डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते.
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील ‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.
📰🗞️ पत्रकारिता:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. ते एक निष्ठावान संपादक आणि सव्यसाची लेखक होते. ते चळवळीत वर्तमानपत्र खूप महत्त्वाचे मानीत. ते म्हणतात, “कोणतेही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.” यामुळे त्यांनी आपल्या चळवळीत पाच वर्तमानपत्रे वापरली.
३१ जानेवारी १९२० रोजी, बाबासाहेबांनी अस्पृश्यांवरील अन्याला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले. यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छ. शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. ३ एप्रिल मध्ये बहिष्कृत भारत पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची लेखनी झुंजार, क्रांतिकारी आणि प्रभावी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी स्वतःला दलितांचे हितचिंतक समजणारे महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
गंगाधर पानतावणे यांनी १९८७ साली भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. त्यांनी त्यांच्या ग्रंथात म्हटले आहे की, “या मुकनायकाने बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. बाबासाहेब महान पत्रकार होते.”
📜🎖️🏆 पुरस्कार आणि सन्मान, मानध पदव्या
५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाची मानध एल.एल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत वॅलन्स स्टीव्हन्स.
५ जून १९५२ रोजी बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मिती, सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने ‘एलएलडी’ (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.
📜 डी.लिट.
हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने १२ जानेवारी १९५३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही मानद पदवी प्रदान केला.
🟡 बोधिसत्व
भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘महान बोधिसत्व’ व मैत्रेय म्हणतात. इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता लामांनी सुद्धा त्यांना ‘बोधिसत्व’ संबोधले होते. बाबासाहेब हे बोधीसत्व होते परंतु त्यांनी कधीही स्वतःला बोधीसत्व म्हटले नाही.
🇮🇳 भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते स्वीकारताना डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य, मजूर व स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्मितीचे केलेले राष्ट्रीय कार्य तसेच आयुष्यभर समता स्थापनेसाठी केलेला प्रखर संघर्ष यासाठी ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) देण्याचे भारत सरकारने एप्रिल १९९०च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचे हस्ते डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. १४ एप्रिल १९९० हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल/अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.
🌀 वारसा
बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणूनच्या वारस्याचा आधुनिक भारतावर पडलेला प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टीकोन बदलला आहे. एक विद्वान म्हणून त्यांची प्रतिष्ठा असल्याने स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्यासाठी ते मसूदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजावर टीका केली. हिंदू धर्म हा जातिव्यवस्थेचा पाया असल्याच्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. बौद्ध धर्मातील त्यांच्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या रूचीमध्ये एक पुनरुज्जीवन घडून आले.
अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, विमानतळे, महाविद्यालये, मैदाने, नगर, संघटना, पक्ष, स्टेडियम, दवाखाने, कारखाने, महामार्ग, रस्ते, इत्यादी त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली त्यांच्या सन्मानार्थ नामांकित केल्या गेलेल्या आहेत. भारतीय संसद भवनात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र प्रदर्शित केले आहे.
१९२० च्या दशकात बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या घरात राहिले होते, ती वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर आंतरराष्ट्रीय आंबेडकर स्मारक म्हणून केले गेले आहे.
आंबेडकरांना २०१२ मध्ये हिस्ट्री टीव्ही 18 आणि सीएनएन आयबीएन यांनी आयोजित केलेल्या सर्वेक्षणात “द ग्रेटेस्ट इंडियन” म्हणून सर्वाधिक मतदान दिले गेले होते. जवळजवळ २ कोटी मते टाकली गेली होती आणि याच्या शुभारंभानंतर त्यांना ‘सर्वात महान भारतीय’ किंवा ‘सर्वात लोकप्रिय भारतीय’ व्यक्ती घोषित केले गेले.
आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि कामगार संघटनांना जन्म दिला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानामधील रूची वाढली आहे. १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात. भारतीय बौद्ध अनुयायी त्यांना बोधिसत्व व मैत्रेय असे संबोधतात.
🌹 प्रेरणादायी आंबेडकर
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देशातील सर्वसामान्य लोक तर विसरले नाहित, उलट त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र जोमाने प्रचार होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान ‘आंबेडकरवाद’ हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे देशातील शोषित पीडित जनता जागृत होत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे कालबाह्य ठरले नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळत आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. आज ते नेते डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानते. युरोपाचे ह्रदय असलेल्या हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी हा विचार हंगेरीतील जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांनी आपल्या स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत समानता पाहिली. आणि ते आंबेडकरांपासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली आहे. हंगेरीयन लोकांनी २००७ मध्ये सांजाकोजा शहरात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. बहुतेक आंबेडकरांचे नाव असलेली ही विदेशातील एकमेव शाळा असावी. या विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे. त्या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला भेट दिला होता.
कार्ल मार्क्सच्या जीवनकाळात त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित क्रांती घडली नाही. परंतु १९१७ मध्ये रशियामध्ये मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे क्रांती घडून आली. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात आणि बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रकाशित केलेल्या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मागणी आहे. तैवान देशात डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी ग्रंथाच्या लाखो प्रती प्रकाशित करून हे ग्रंथ मोफत वाटले जात आहेत.
प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत. बाबासाहेबांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित आहेत. विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. आज सवर्त्र डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते, त्या समाजात ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास १०० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.
भारतीय समाजावरील प्रभाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. बाबासाहेब हे पददलितांचे उद्धारक होतेच शिवाय ते देशात शोषित, पिडित, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचेही उद्धारक होते.
🔺 जातिव्यवस्थेचे उच्चाटन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेस खिंडार पाडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.
🔮 अस्पृश्यांची उन्नती
त्यांच्या कार्यामुळे हजारों वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणार्या अन्यायाची जाणिव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणिव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात जाते. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.
🌐 बौद्ध धर्माचा प्रसार
इ.स.पू. ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये आपल्या अनुयायांसह नवयान बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रचारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही अनेक राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ६० वर्षापासून दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने स्वीकारतही आहेत. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाची सुरूवात केली. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.
आमूलाग्र परिवर्तनास चालना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले आणि जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली. तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.
♻️ दलित चळवळीचा उदय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरूवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने ‘आंबेडकरवादी चळवळ’ म्हटले जाते.
लोकप्रिय संस्कृतीमध्ये
अनेक चित्रपट, नाटके, पुस्तके, गीते-भीमगीते आणि इतर साहित्य बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित आहेत. २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. चित्रपटाला लांब आणि वादग्रस्त घटनांनंतर प्रकाशीत केले गेले होते. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारताच्या संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ‘संविधान’ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती.अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला.
🔷 भीमयान : अस्पृश्यतेचे अनुभव हे आंबेडकरांचे ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांचे लहानपणापासून प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ राजकीय कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.
लखनौ मधील आंबेडकर स्मारक त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत.
गूगलने १४ डिसेंबर २०१५ रोजी मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४ वा वाढदिवस साजरा केला. हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डममध्ये चित्रित करण्यात आले होते.
🌀 आंबेडकर प्रतीके
अनेक गोष्टीं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीके बनलेल्या आहेत, त्यापैकी काही खालिलप्रमाणे :-
🔷 भीम ध्वज
भारतीय बौद्ध ध्वज – (भीम ध्वज)
हा बाबासाहेबांचा अशोकचक्र चिन्हांकित निळा ध्वज भारतातील बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे नियमित वापण्यात येतो. या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. बाबासाहेब हे समतेचे पुरस्कर्ते होते. या ध्वजावर सम्राट अशोकांचे पांढऱ्या रंगात बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले अशोकचक्र असते. बहुतांश वेळा या ध्वजावर ‘जय भीम’ असे शब्द लिहिलेले असतात. हा ध्वज भारतीय बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो, बौद्ध विहार किंवा बौद्ध मंदिरसमोर हा ध्वज पंचशील बौद्ध ध्वजांसह उभा केलेला असतो. दलित आणि बौद्धांच्या घराच्या छतावरही हा ध्वज लावला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. भारताबाहेर विदेशात हा ध्वज तेथील आंबेडकरवादी लोक वापरत असतात. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शिवजयंती, मनुस्मृती दहन दिन आदी उत्सवाच्या वेळी या ध्वजाचा वापर होत असतो. भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षाच्या सर्व गटांत हा ध्वज पक्षचिन्ह आहे.
🔷 नवयान
नवयान बौद्ध धम्म हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे प्रतिक आहे. नवयानचे स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली आहे. भारतातील कोट्यवधी शोषित, पिडित दलित जनतेच्या धार्मिक गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना त्यांना या नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली. नवयान हा शुद्ध स्वरूपाचा नवीन बौद्ध धम्म (नवबौद्ध धर्म) होता, ज्यात अंधश्रद्धा, जातियता यांना थारा नव्हती. हा नवा बौद्ध संप्रदाय महायान, थेरवाद व वज्रयान या बौद्ध संप्रदायांपेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे.
🌐 आंबेडकर जयंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन (जयंती) हा भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगातील ६५ पेक्षा अधिक देश दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिल २०१७ पासून आंबेडकर जयंती ही ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.
🎞️📺🎭 चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व नाटके
भीम गर्जना – मराठी चित्रपट (१९९०)
बालक आंबेडकर – कन्नड चित्रपट, हिंदीमध्ये डब (१९९१)
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर – मराठी चित्रपट (१९९३)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – इंग्रजी भाषेतील चित्रपट, अनेक भारतीय भाषेत डब (२०००)
डॉ. बी.आर. आंबेडकर – कन्नड चित्रपट (२००५)
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) – मराठी चित्रपट, हिंदीमध्ये डब (२०१०)
शूद्रा: द राइझिंग – हिंदी चित्रपट (२०१०), आंबेडकरांना समर्पित चित्रपट
अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित हिंदी चित्रपट (२०१३)
रमाबाई – कन्नड चित्रपट (२०१६)
बोले इंडिया जय भीम – मराठी चित्रपट (हिंदी डब) (२०१६)
बाळ भिमराव – मराठी चित्रपट (२०१८)
🎞️ दूरचित्रवाणी मालिका
डॉ. आंबेडकर — दुरदर्शन दूरचित्रवाणी वरील हिंदी मालिका
नाटके
वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक – प्रा. रामनाथ चव्हाण)
डॉ. आंबेडकर आणि गांधीजी – नाटक
प्रतिकार – नाटक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत