(संवैधानिक)
– अशोक सवाई.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाला भारतीय लोकांनी स्विकृत केले आणि तेव्हापासून आपले राष्ट्र सार्वभौम राष्ट्र झाले. आज संविधानाच्या कलमानुसार देशाचा कारभार सुरू आहे. देशासाठी संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हा दिवस संविधान दिवस म्हणून आपण भारतीय पाळतो आहोत. आणि तो पाळलाच पाहिजे. भविष्यात त्याचे स्वरूप फार मोठ्या प्रमाणात होवो.
संविधान सभेतील पहिली सभा ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली होती. व शेवटची सभा २४ जानेवारी १९५० रोजी झाली. दरम्यान १२ संविधान सभा झाल्या. व संविधान पूर्ण व्हायला २ वर्ष ११ महिने व १८ दिवसाचा कालावधी लागला. दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान लिहून पूर्ण झाले होते. वरील कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती अपरिमित कष्ट उपसले होते हे मी माझ्या आधीच्या ‘मतदान नव्हे मताधिकार’ या लेखात मांडलेच आहे. संविधान जरी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लिहून पूर्ण झाले असले तरी ते २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले. म्हणजे त्याची अंमलबजावणी साऱ्या भारतभर सुरू करण्यात आली. त्याला कारण असे की, दि. २६ जानेवारी १९३० ला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लाहोर मध्ये तिरंगा फडकावला होता. परंतु १४ ऑगस्ट १९४७ ला देशाची फाळणी होवून पाकिस्तानचा जन्म झाला. आणि लाहोर पाकिस्तानात गेले. २६ जानेवारी १९३० साली जेव्हा लाहोरमध्ये तिरंगा फडकवला गेला अर्थातच तेव्हा त्या तिरंग्याच्या मध्यभागी गांधींचा चरखा होता. त्याला दि. २६ जानेवारी १९५० या दिवशी २० वर्षे पूर्ण होणार होते त्या दिवसाचे औचित्य साधण्यासाठी दि. २६ जानेवारी १९५० ला राष्ट्रध्वज फडकावून संविधान अमलात आणले गेले. दि. २४ जानेवारी १९५० च्या शेवटच्या सभेत आपल्या राष्ट्रध्वजाला स्विकृती देण्यात आली तसेच रवींद्र नाथ टागोर द्वारे लिहलेल्या राष्ट्रगीताला (जन… गण… मन) संमती देण्यात आली. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील सेना दलाचे कॅप्टन राम सिंह ठाकूर यांनी राष्ट्रगीताची धून बनवून संगीत रचना केली. हे राष्ट्र गीत ५२ सेकंदात वाजवले जाते. अशा रीतीने गणराज्य कींवा गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिवस सुरू झाला. दि. २६ जानेवारी २०२५ मध्ये आपला प्रजासत्ताक दिवस ७५ व्या वर्षात पदार्पण करेल म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करेल. त्या दिवसाचे राष्ट्रीय महत्व निश्चितच मोठे असेल.
संविधानामुळे सर्व भारतीय नागरिकांना समानतेचा दर्जा मिळणार होता. समान अधिकार मिळणार होते. ऊचनीच, जात धर्म, लिंगभेद, भाषा भेद, प्रांत भेद असा कोणताही भेदाभेद उरणार नव्हता. पुर्वी ब्राह्मणांनी गंभीरातील गंभीर गुन्हा केला तरी त्याला शिक्षा होत नव्हती. परंतु आता गुन्हेगाराचा जसा गुन्हा तशी सजा मिळणार होती. ब्राह्मणांचे वर्चस्ववादाचे वस्त्रे खाली उतरणार होते. म्हणून ब्राह्मणांचा संविधानाला कट्टर विरोध होता. मनुस्मृतीतील सूचनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर तर्कसंगत उत्तरे देवून त्यांच्या सुचना फेटाळून लावल्या. त्यामुळे संविधान सभेतील उच्च शिक्षित व विद्वान सवर्ण सदस्यांना सुद्धा बाबासाहेबांना समर्थन देण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. मनुस्मृतीतील कोणताही नियम संविधानात समविष्ट न केल्याने ब्रम्हवृंद ठणाणा बोंबा मारत होते. त्यांच्या ऑर्गनायझर मधून संविधान विरोधात रकानेच्या रकाने लिहले जात होते. शेवटी संविधान सभेतील सदस्यांना सांगावे लागले की देश संविधाना प्रमाणेच चालेल. मग शेवटी मनुवादी जरा शांत झाले. विशेषतः नागपूरच्या रेशीम बागेतील आर एस एस चे मुख्यालय.
ज्यांच्या गळ्यात आपण मडके अडकवले, कमरेला झाडू लटकवला त्यांच्याच एका महाराच्या पोराने देशाचे संविधान लिहिले आणि आपल्याला आता त्याच संविधानाच्या चौकटीत राहून नाक घासत जगावे लागणार आहे. ही जळजळीत सल कट्टर मनुवाद्यांच्या मनात कायम स्वरूपी रुतून बसली. त्यामुळेच आज त्यांची सत्ता असल्याने या नाही त्या कारणाने संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न होत आहे किंवा संविधानाची अवमानना किंवा संविधान बदलण्याची भाषा वापरण्यात येत आहे.
जेव्हा संविधानाची शेवटची सभा झाली त्याच सभेत संविधानाचे सर्वेसर्वा, निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा देवून ठेवला होता. *’अगर इस संविधान पर अंमल करने वाले लोग अच्छे और इमानदार होंगे तो इसके परिणाम अच्छे आयेंगे मगर संविधान कितना भी अच्छा क्यों न हो और उस पर गलत लोग काम करेंगे तो परिणाम अच्छे नही निकलेंगे।* हा धोक्याचा इशारा त्यांनी वरीलप्रमाणे मनुवाद्यांचा विरोध लक्षात घेवूनच आजपासून ७४ वर्षापूर्वीच देवून ठेवला होता. आज त्यांचा तो इशारा तंतोतंत खरा ठरला आहे. त्याच सभेत ते पुढे म्हणाले होते की, राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा मिळायला पाहिजे तरच लोकशाहीला पूर्णत्व येवू शकेल. हे त्यांनी फार हिरिरीने व कळकळीने सांगितले होते. येत्या दि. २६ नोव्हेंबर २०२४ पासून संविधान दिवस ७५ व्या वर्षात म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. परंतु आज संविधान कोणाच्या हातात आहे हे तुम्ही आम्ही जाणतोच आहोत. बहुजन महापुरुषांचे विचार हे काळाच्या कित्येक वर्षे पुढे असतात हे काही खोटे नाही. म्हणूनच ते महापुरुष असतात.
त्यावेळेला बीबीसी ला मुलाखत देताना बाबासाहेब संविधान व लोकशाही बद्दल काय म्हणाले होते. त्या मुलाखतीचा व्हिडिओ रेकॉर्डींग युट्युब वर उपलब्ध आहे. ती रेकॉर्डिंग अभ्यासकांनी खास करून अभ्यासू तरुणाईने अवश्य बघावी. तरूण वर्गाने इतिहासाचे चौफेर वाचन करावे हे माझे नेहमीचे सांगणे आहे
सर्व भारतीय संविधान प्रेमींना भारतीय संविधान दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधान चिरायू होवो.
जयभीम मुळे जय संविधान आहे, जय संविधानामुळे जय भारत आहे आणि जय भारतामुळेच आपल्या सर्व भारतीयांचा जय आहे
🙏🙏🙏
– अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत