निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भाजप = काँग्रेस आरक्षण विरोधीच….!!

म्हणून आम्ही म्हणतो

कॉंग्रेस

संविधानाच्या ३४० व्या कलमानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समुहाला राज्यघटनेत नमुद करुन आरक्षण दिले.

ओबीसी समुहाच्या आरक्षणाच्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या नेहरु सरकारने चालढकल सुरु केली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरु मंत्रीमंडळातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हा पहिला पुरावा आहे की,कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधी विचारधारेचा राजकीय पक्ष आहे. पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु हे आरक्षण विरोधी होते.त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशी सुद्धा नाकारल्या आणि काकासाहेब कालेलकर आयोग बासणात गुंडाळून ठेवला. कॉंग्रेस पक्षाच्या प्रधानमंत्र्यांनी तोच कित्ता पुढे ही चालू ठेवला ,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोग लागू केला नाही, कारण कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधी विचारधारेचा राजकीय पक्ष आहे हेच त्यांच्या कारभारातुन अनुभवाने सिद्ध होते. कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत कॉंग्रेस पक्षाने कोणत्याच समुहाला आरक्षण दिले नाही हा अनुभव आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या नरसिंहराव सरकारने खाऊजा धोरण आणले. खाजगीकरणामुळे आरक्षणाचे तत्व संपुष्टात आले आणि आरक्षण संपवण्याची कृती केल्या गेली….!!

कॉंग्रेस पक्षाच्याच राजवटीत ओबीसी आरक्षणाला क्रिमिलेअर लावले गेले. नोकरी पेशातील पदोन्नती मधील आरक्षण मनमोहन सिंह सरकारच्या कारकिर्दीत संपविले गेले. कॉंग्रेस पक्षाने आरक्षण तर कुणाला दिलेच नाही मात्र जे संविधानाच्या माध्यमातून मिळाले होते ते या ना त्या सबबीखाली काढून घेण्याचे पाप कॉंग्रेस पक्षाच्या शासन काळातच झाले हा काही योगायोग नाही तर ते ठरवून राबविलेले धोरण आहे. कॉंग्रेस पक्षाच्या सत्तेचा इतिहास हा आरक्षण विरोधी इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात सुरु असलेली जातिनिहाय जनगणना कॉंग्रेस पक्षाने बंद करून समतेच्या तत्वाला हरताळ फासला त्यामुळे ओबीसी समुहाला ४० वर्षे घटनादत्त अधिकार प्राप्त झालेले आरक्षण मिळू शकले नाही हा आरक्षण विरोधी पुरावा आहे. आज ज्यांना ज्यांना राहूल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणाच्या विधाना बद्दल सहानुभूती किंवा त्यांच्या विधाना बद्दल विश्वास वाटतोय त्या महाभागांनी कॉंग्रेस पक्षाच्या नितीतत्वाचा अभ्यास केला पाहिजे.

कॉंग्रेस पक्षाचे धोरण हे दुतोंडी धोरण आहे. बोलायचे एक मात्र वागायचे वेगळे. जाहीर करायचे एक मात्र अमंल करायचा दुसऱ्या गोष्टी वर.कथणी आणि करणी मध्ये कमालीचा विरोधाभास असलेले धोरण कॉंग्रेस पक्ष राबवितो त्याचा अनुभव असा की, कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटाव असा नारा दिला, गरीबी हटली नाही. दारिद्रय रेषेखालील जनतेची टक्केवारी वाढतचं गेली मात्र कॉंग्रेस पक्षाने भांडवली व्यवस्था पद्धतशीरपणे राबविली आणि देशात भांडवलदार वर्ग तयार झाला. जो कामगारांचे प्रचंड शोषण करतोय. कॉंग्रेस पक्षाने प्रचार केला आम्ही सेक्युलर आहोत अल्पसंख्याक समुहाचे संरक्षण आणि हितरक्षण करतोय मात्र कॉंग्रेस पक्षाच्याच राजवटीत हिंदू मुस्लिम धार्मिक दंगली झाल्या मुस्लिम समुह कायम भयभीत अवस्थेत जगतोय आणि कॉंग्रेस पक्षाच्याच नरसिंहराव सरकारच्या अखत्यारीत बाबरी मशीद उध्वस्त केल्या गेली.अगदी त्याच पद्धतीने आरक्षण संपवण्याची कृती कॉंग्रेस पक्षाच्याच राजवटीत होईल याची नोंद आरक्षणवादी समुहाने घेतली पाहिजे. ज्यांना ज्यांना राहूल गांधी आणि कॉंग्रेस पक्षा बद्दल आजच्या काळात प्रेम उफाळून येत आहे त्या आरक्षणवादी भाबड्या लोकांनी कॉंग्रेस पक्षाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे समजून घेतले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाचा अनुभव आरक्षण विरोधी असतांना त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला पाहिजे असा कुणी सल्ला देत असेल तर तो सल्ला म्हणजे विषाची चव चाखण्याचा प्रकार आहे.

कॉंग्रेस पक्ष आरक्षणवादी नाही. आरक्षण विरोधी आहे हा त्यांच्या शासन काळातील अनुभव आहे. आरक्षणाचे धोरण हे समतेच्या तत्वाला अनुलक्षून आले आहे म्हणून त्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष हा विषमतावादी विचारधारेचा वाहक आहे. समतेच्या तत्वाला हरताळ फासणारा, आरक्षण विरोधी भुमिका घेऊन शासन राबविण्याचा अनुभव देणारा, अल्पसंख्याक समुहाला कायम भयभीत अवस्थेत रहायला भाग पाडणारा दुतोंडी राजकीय पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या शासन काळाचा अनुभव आहे हे आरक्षणवादी समुहाने लक्षात घ्यावे.तरीही कुणी आरक्षणवादी वर्गातील महाभाग कॉंग्रेस पक्षाचे गुणगान गातं असेल तर त्याच्या कडे किंवा त्याच्या चरित्रामध्ये सामाजिक बांधिलकी नाही तर तो कॉंग्रेस पक्षाचा दलाल आहे हेच सिद्ध होते.

: भास्कर भोजने

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!