राजकीय गौसे — अनंत दा. राऊत
राजकीय गौसे कुत्र्यासारखं
हुंगत राहतात इथं तिथं
कुणी एखादा चविष्ट असा
मांसाचा तुकडा खायला टाकतं का म्हणून
फार मोठ्या निष्ठेने चाटून पाहतात
वेगवेगळ्या पक्ष मालकांचे बूट
हलवत राहतात लखलख शेपूट
अन् गाळून पाहतात खूप खूपशी लाळ
हा कुठे कुठे हुंगून आलेला आहे
याचा विचार न करता
तेही करतात त्याचं भरभरून स्वागत
सारेच मालक याला हवा तो स्वादिष्ट तुकडा
देण्याच्या क्षमतेचे असतातच असं नाही
राजकीय गौसा फार चाणाक्ष असतो
काही दिवस ज्याचे निष्ठेने बूट चाटले
त्या मालकाची अन् त्याच्या पक्षाची
पीछेहाट होत आहे हे लक्षात येताच
राजकीय गौसा टुणुक्कन्
दुसऱ्या पक्षात उडी मारतो
आणि दुसऱ्या मालकाचे पाय
तेवढ्याच निष्ठेने चाटत राहतो
असं एकदा दोनदा नव्हे तर कैकदा घडतं
तरीही या गौशांना
राजकीय नेता म्हणून मिरवता येतं
स्पर्धेत उतरता येतं
अन् बऱ्याच गौशांना आपले महान मतदार
निवडून देखील देतात
राजकीय गौशांचा
आज सारीकडे
सुळसुळाट झालेला आहे
आपल्या देशाचं राजकारण आज
आदर्शाचं उत्तुंग शिखर गाठतं आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत