बौद्धांनी लग्नात ‘ हळद ‘ लावावी, की लावू नये….? (एक चिंतन )
बौद्ध म्हणून मिरवणाऱ्यांनी कोणत्याही गोष्टींचा अतिरेकी विरोध करण्याचा आटापिटा करण्यात खरेच काहीही अर्थ नसतो. एकतर, जे बौद्ध म्हणवून घेतात, परंतु त्यांचा बौद्ध धम्माविषयी अभ्यास तर काडीचीही नसतो,अशांच लोकांमध्ये हा धार्मिक कडवेपणा दिसून येतो. फक्त बौद्धांमध्येच हा प्रकार नाही, तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इ. धर्माच्या लोकांमध्येही हाच प्रकार आढळून येतो. विशेष म्हणजे,जे लोक धर्मांतरीत झालेले आहेत, भलेही मग ते सुशिक्षित असोत, की अशिक्षित, त्यांच्यातच हे अति कडवेपणाचे दोष ठासून भरलेले आढळतात. त्याचे कारण म्हणजे ‘ फक्त आम्हीच या धर्माचे नीती-नियम काटेकोरपणे आचरणात आणतो, बाकी कोणीच नाही ‘ हे दाखवून श्रेष्ठत्व मिरवण्याचा पोकळ दांभिकपणा होय….
आणि, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ बौद्ध धम्मात लग्न समारंभात हळद लावत नाहीत, आणि बौद्धांनी ती लावू नये ‘ हा एक असाच कडवा व कट्टर गैरसमज होय.
आता, हळदीचा आणि एखाद्या कोणत्याही धर्माचा काय आणि कसला संबंध येतो….? लग्नविधीत हळद लावणे, ही काय एखाद्या विशिष्ट धर्माचीच काय ती मक्तेदारी आहे काय….? तर असे मुळीच नाही. हळद या देशात हिंदूंप्रमाणेच शिख, जैन, बौद्धच काय, अगदी मुसलमानांमध्येही लावतात. तशीच ती आदिवासी जन-जमातींमध्येही विवाहप्रसंगी लावली जाते. ‘ विवाह प्रसंगी हळद लावणे ‘ हे कुठलेही धार्मिक विधीशी संबंधित कार्य नाही, तर तो एक सांस्कृतिक प्रकार आहे, जो येथे अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. त्याचे महत्त्वाचे कारण असे, की ‘ हळद ‘ ही जंतुनाशक व बुरशीनाशक आहे. तसेच हळदीमध्ये ‘ अँटिसेप्टिक ‘ हा गुणधर्म असल्याने, हळद ही शरीरावरील जखमा, त्वचारोग बरे करण्यास उपयोगी ठरते. तसेच, ती हाडांना लागलेला मुकामार व सूज देखील कमी करते. पूर्वीच्या काळात आजच्यासारखी सुधारित जीवनपद्धती व आधुनिक औषधोपचार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे अनेक आजारांवर गावठी उपचार म्हणून औषधी वनस्पती, त्यांची मुळे, झाडपाला, काष्ठौषधी, व हळदीचाच प्रामुख्याने वापर केला जात असे. ग्रामीण भागातील जनजीवन हे खडतर असे. पाणी देखील नदीवरून किंवा विहिरीवरून, दूर अंतरावरूनच आणावे लागत असे. भांडीकुंडी जास्त नसल्यामुळे, पाण्याचा साठाही मर्यादितच असे. त्यामुळे, अगदी रोजच्या रोज, नित्यनेमाने सर्वच जण अंघोळ करून रोजच कपडेही कोणी धूवत नसत. शारीरिक स्वच्छतेच्या अभावी बहुतांश स्त्रिया -पुरुषांना व बालकांना देखील खरुज, नायटा, इसब, गजकर्ण इ. त्वचारोगांनी कायमच ग्रासलेले असे. अगदी वीस -पंचवीस वर्षांपूर्वी पर्यंत खेड्यापाड्यांतील बहुतांश लोक या समस्येने हैराण असत. त्यामुळे, मग साहजिकच नवरी किंवा नवरदेव या पैकी कोणासही , किंवा दोघांनाही एकमेकांपासून अशा त्वचारोगांचे संक्रमण होऊ नये, किंवा असल्यास ते नष्ट व्हावे, तसेच, घाम व इतर कारणांमुळे येणारी शरीराची दुर्गंधी नष्ट व्हावी, या उदात्त हेतूनेच लग्नामध्ये ‘ हळद लावणे ‘ हा प्रकार रुढ झाला. शिवाय, हळदीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे, हळद लावल्याने, काळासावळा रंगही अगदी तजेलदार होतो, व तो उठून दिसतो. ” पी हळद, अन् हो गोरी…” हा वाक्प्रचार देखील याच संदर्भात प्रसिद्ध आहे. म्हणून, ‘ लग्न समारंभात नवरा व नवरीचे सौंदर्य खुलून दिसावे ‘, म्हणूनही हळदीचा उपयोग करण्यात येऊ लागला.
म्हणून, अगदी प्रकर्षाने सांगावेसे वाटते, की ‘ लग्नात हळद लावणे ‘ ही काही कोणा एका धर्माची मक्तेदारी नाही. तर ती येथे सर्वत्र प्रचलित असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे, आणि ती अनेक शतकांपासून येथील समाजात चालत आलेली आहे. प्रथा-परंपरांचे स्वरूप हे कधीही संकुचित असता कामा नये, हे या गोष्टींना विरोध करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे…..” ----- अशोक नगरे -----
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत