अस्सल आंबेडकरवादी बुद्धिजीवी, नोकरदार, श्रमजीवी, विद्यार्थी आणि माता भगिनींनो,
नागभूषण बनसोडे
नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक ही लोकशाहीचा मरणोत्सव ठरते की काय अशी भिती निर्माण झाली होती, पण देशातील तमाम एस सी, एस टी, मुस्लिम व ओबीसी बांधवांनी आपल्या बहुमूल्य मताचा वापर करत हे संकट तात्पुरते तरी परतून लावले आहे. या लढाईत आंबेडकरवादी समाजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. खरे तर लोकसभेची निवडणूक ही उन्मत्त सरकार आणि देशातील जनता अशीच झाली होती. लोकशाही अन् संविधानाला निर्माण झालेला धोका फक्त तुमच्या अनमोल मतामुळे टळला आहे, यामध्ये विरोधी पक्षांचे योगदान विशेषतः राज्यांतील महविकास आघाडीचे योगदान हे नाममात्र आहे हे आपणास चांगले ठाऊक आहे.
आता विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आता जर कोणी लोकशाही अन् संविधानाला परत धोका आहे म्हणून आवई उठवली तर अशा कोल्हेकुईला आपण कदापिही बळी पडता कामा नये हेच आग्रहाचे सांगणे आहे.
लोकसभेच्या निकालानंतर लगेच सुप्रीम कोर्टाने अन्यायकारक निकाल देत एस सी अन् एस टी यांच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण, क्रिमी लेअर, अन् सर्वात धोकादायक अट म्हणजे एका पिढी पुरतेच आरक्षण हे अडथळे निर्माण करून आपल्या उन्नतीची मुख्य वाटच रोखली आहे. निवडणुकीत संविधान रक्षक होऊन उर बडवून घेणाऱ्या सर्वच पक्षांनी या विषयावर संसदेत विरोध करायला हवा होता पण प्रत्यक्षात मात्र या सर्व लोकांची दातखीळ बसलेली दिसतं आहे, एवढेच काय उठसूट संविधानाचा हवाला देणाऱ्या कांग्रेस पक्षाने त्यांचे राज्य असलेल्या राज्यात या निर्णयाचे स्वागत केले आहे याचा अर्थ अगदीं स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला पाहुण्यांच्या काठीने साप मारायचा आहे म्हणूनच ते या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत.
आपण सर्वांनी हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन, व्यक्तिगत सुखाचा त्याग करून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून संविधाना द्वारे राखीव जागांची तरतूद केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी जर प्रत्येक राज्यांनी चालू केली तर सर्वप्रथम आपण शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या अपंग होणारं आहोत. अन् एकदा आपण त्या अवस्थेत पोहोचलो की आपले उरले सुरले राजकिय अस्तीत्व संपुष्टात येणार आहे, अन् देशातील सर्वच प्रस्तापित राजकीय पक्षांना हेच हवे आहे.
प्रसंग अतिशय बाका होत चालला आहे अन् विधानसभेत आपलीं बाजू मांडणारा एकही माईचा लाल दिसतं नाही. सुप्रीम कोर्टाने या निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे त्यामूळे आता एकतर रस्त्यावरची आरपार लढाई लढायची किवा बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवायचे हे दोनच पर्याय आपल्यापुढे शिल्लक आहेत. म्हणून यावेळेस मतदान करण्या आगोदर आपल्या समाजाच्या हक्कासाठी सदैव तुमचा हाकेला धावून येणारे, कांग्रेस, राष्ट्रवादी सारख्या पक्षांच्या वळचणीला न लागणारे स्वाभिमानी उमेदवार कोण कोण आहेत याचा शोध घेऊन,जे लोक आपल्या हिताचे तारण करणारं आहेत त्यांनाच आपले बहुमूल्य मत द्यायचे आपल्या मेंदूवर बिंबवून घ्यावे.
लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही वाचवू पाहणारे पक्ष, फुटकळ पत्रकार काय बोंबलतात याकडे अजिबात लक्ष देऊ नये. लक्षांत ठेवा, निकालानंतर कोणता बेडूक कुठे उडी मारेल हे त्या बेडकाला सुध्दा ठाऊक नाही, निवडणुकीच्या नावाखाली सत्तेचा मालिदा आपळ्याच वाट्याला यवा म्हणून बिनबुडाच्या मडक्यांची निर्लज्ज दहीहंडी चालू आहे.
तुमच्या मताची किंमत ही केवळ मीठ मिरची तेवढी नाही तर सरकारे उलथून टाकण्याची क्षमता तुमचा एका मतात आहे हे सदैव ध्यानात असू द्या.
आपण जर आपल्याच पक्षाला मते दिली तर भाजपचा फायदा होतो या दुषप्रचाराला बळी पडाल तर आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारणार हे निश्चित आहे कारण गेल्या १० वर्षात आपण ज्याना मते दिली ते लोक आपल्या किती प्रश्नावर रस्त्यावर आले हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे अन् मग त्या अनुषंगाने निर्णय घेतला पाहिजे. समोर उभ्या असलेल्या शत्रूला भिडणे सोपे असते पण आपल्या खांद्यावर हात टाकून आपला शक्तिपात करणाऱ्या शत्रूला ओळखून त्याचा बंदोबस्त करणे अवघड असते, हे लक्षांत असू द्या. यावेळेस अशा दोन्ही शत्रूंना पाणी कसे पाजायचे हे तुमच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून आहे.
लक्षांत ठेवा, बाबसाहेब आणि बाळासाहेब या दोघांनाही व्यक्तिगत पातळीवर काहीच अडचणी नव्हत्या आणि नाहीत. वयाच्या सत्तरीत सुध्दा, जीवावर आलेले संकट न पाहता एस सी, एस टी, अन् ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आपल्याच माणसाला, आरक्षण वाचविण्याच्या लढाईत जे लोक मैदानात उतरले आहेत, अशा लोकांना जर यावेळेस आपण साथ नाही दिली तर आपलयाला आरशात तोंड पाहण्याचा अधीकार राहील काय ??
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यपद्धतीबद्दल आपले मतभेद असू शकतात, ते मिटविण्याचा प्रयत्न करु या, किंवा स्वंतत्र चर्चेसाठी ठेवू या, पण त्याचबरोबर हे ही पाहा की बाकीच्या पक्षातील अडानचोट लोकांना सुद्धा लोक एवढ्यासाठी निवडून देतात की तो आपल्या जातीचा आहे म्हणून, थोडक्यात काय तर ते जातीसाठी कायमच माती खातात मग ढोंगी पुरोगाम्यांचा गड राखण्यासाठी आपल्या चळवळीची माती किती दिवस करायची ??
प्रस्तापित पक्षांनी टाकलेले तुकडे घेऊन आपल्या प्रभागात फिरणारे पाळीव प्राणी तुम्हाला गल्लोगल्ली दिसतील, तुमचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील पण आता आपण आपल्या इमानाला, बाबासाहेबांनी दिलेल्या अनमोल अधिकाराला, अन् समजाहिताला जागले पाहिजे.
आपल्याच मतावर निवडून येऊन, आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मौन बाळगणाऱ्या बेईमान लोकांना कोणत्याही परिस्थितीत आपली माते देउन विषारी सापाला दूध पाजण्याचे पाप आता परत करायचे नाही याची खात्री करायला हवी.
महायुती किंवा माहाविकास आघाडी यांच्या जाळ्यात न अडकता आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करु पाहणाऱ्या उमेदवाराच्या मागे आपण शिलेदार म्हणून उभे ठाकले पाहिजे.
शत्रूच्या महालाची राखण करण्यापेक्षा आपल्या हक्काची झोपडी कशी उभा राहील यासाठी आप्ली शक्ती पणाला लावू या, ज्यांना आंबेडकर नावाची गरज नाही त्यांना माती चारू या.
महाराष्ट्रात वेळोवेळी आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारे, कांग्रेस व राष्ट्रवादी सारख्या पक्षांना भीक न घालणारे निर्भिड लोक यावेळेस मैदानात उतरले आहेत. आपण अशा लोकांची ताकत बनू या. राजकीय, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात आंबेडकरी समाजाची कोंडी करु पाहणाऱ्या सरंजामी वृत्तीला दंडुका दाखवायची नामी संधी आता आली आहे, तिचा योग्य वापर करून आंबेडकरी चळवळीला बहिष्कृत करु पाहणाऱ्या पक्षांना त्यांची लायकी काय आहे हे येणाऱ्या २० तारखेला आपल्या मताचा वापर करून दाखवून देऊ या,
अन् बाबासाहेबांच्या विचारांचे शिलेदार विधानसभेत पाठविण्यासाठी संविधानाची शपथ घेऊ या……
नागभूषण बनसोडे
सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत