देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी

कुठल्यातरी शायरने म्हटले होते “खंडहर बता रहें हैं के इमारत कितनी बुलंद थी….”. नालंदा विश्वविद्यापीठाचे प्राचीन अवशेष पहिले कि वरील ओळी आपसूक आठवतात! जगातील सर्वात प्राचीन विश्वविद्यापीठ म्हणून ‘नालंदा’चा गौरव आहे! मुळात विद्यापीठ ही संकल्पना बौद्ध संस्कृतीची देन आहे. प्राचीन भारतात गुरुकुल पद्धत होती ज्यात विद्यार्थी गुरूच्या घरी जाऊन शिकत. मात्र यात ठराविक विद्यार्थ्यांनाच शिक्षण मिळत. सर्वांसाठी शिक्षण नव्हते! भ.बुद्धांच्या काळात अनेक दानशूर व्यक्तींनी विहार, वने अथवा संघाराम बांधून दान दिली. याच विहारात किंवा संघारामात नवदीक्षित भिक्खू आणि वयस्कर भिक्खू अथवा अर्हत एकत्र राहून अध्ययन आणि अध्यापन करीत. हीच संघराम अथवा विहारे त्याकाळातील विद्यापीठे होती.

सम्राट अशोकांच्या काळी डोंगरांमध्ये लेणीं कोरण्यात आली आणि कालांतराने या बुद्ध लेणीं, विद्यापीठाचे काम करू लागल्या. कान्हेरी, जुन्नर, अजंठा, नाशिक येथील बुद्ध लेणीं काही ठळक उदाहरणे आहेत. मुक्त व स्वतंत्र परंतु मानवकल्याणाचा उद्देश असलेल्या विचारांना, बौद्ध संस्कृतीने नेहमीच प्रोत्साहन दिल्यामुळे, अनेक विषयांमध्ये बौद्ध आचार्यांनी मूलभूत सिद्धांत मांडले ज्यांच्या ज्ञानशाखा आजही जगभरातील विद्यापीठात शिकविले जातात.

इ.स.पूर्व ६०० ते इ.स. ११०० हा १५०० वर्षांचा काळ, बौद्ध संस्कृतीचा उत्कर्षाचा काळ होता. इ.स.पूर्व ५व्या शतकात सुरु झालेले तक्षशिला हे जगातील सर्वात प्राचीन शिक्षाकेंद्र होते. नालंदा, एक विश्वविद्यापीठ होण्याची कित्येक शतके आधी, एक बौद्ध विहार म्हणून नावाजलेले होते. तेथे अनेक बौद्ध भिक्खू आणि बौद्ध आचार्य एकत्र राहून धम्म अध्ययन करीत.

इ.स. ४२५ मध्ये गुप्त वंशाच्या सम्राट कुमारगुप्त पहिला याने नालंदा विश्वविद्यापीठाची निर्मिती केली. या विश्वविद्यापीठाला संपूर्ण राजाश्रय होता. कुमारगुप्त पहिलाचे वारसदार, बुद्धगुप्त, तथागतगुप्त, बालादित्य आणि वज्र यांनी देखील नालंदाला सढळ हाताने मदत केली. यानंतर पुर्नवर्मन, हर्षवर्धन आणि पाल राजवंशाने या विश्वविद्यापीठाचा प्रचंड मोठा विस्तार केला. याच दरम्यान नालंदापासून प्रेरणा घेत, सोमपुरा, वल्लभी, विक्रमशिला, जगद्गल्ला, ओदंतपुरी अशा अनेक बौद्ध विद्यापीठांची स्थापना झाली जी जगविख्यात होती.

हुयांग त्सांग आणि इ त्सिंग या बौद्ध भिक्खुंनी आपल्या प्रवासवर्णनात नालंदाचे वैभव लिहून ठेवले आहे. भ.बुद्धांच्या काळी नालंदा हे एक प्रसिद्ध गाव होते. भ.बुद्धांनी अनेकवेळा येथे देशना दिली तसेच भ.महावीर यांनी १४ वर्षावास येथे व्यतीत केले होते.

नालंदा मध्ये एकाच वेळी १०,००० विद्यार्थी आणि २००० प्राध्यापक एकत्र राहून अभ्यास करीत असत. ‘धर्मगंज’ नावाचा ग्रंथालय परिसर होता ज्यात रत्नसागर, रत्नादधि आणि रत्नरंजका नावाच्या तीन नऊ मजल्याच्या इमरती होत्या, ज्यात ६४ विषयांचे लाखो हस्तलिखित ग्रंथ होते! या विश्वविद्यापीठामध्ये जगभरातील विद्यार्थी, शिक्षक ज्ञान मिळविण्यासाठी येत. नालंदाच्या प्रवेश मात्र अतिशय कठीण होता. त्यांचा प्रमुख द्वारपाल हा आत्ताच्या काळातील पीएचडी होता व सर्व विद्यार्थ्यांची पहिली परीक्षा तो घ्यायचा! त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मग आतमध्ये दुसऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागे. येथे राहणे, भोजन आणि शिक्षण सर्व विनामूल्य होते आणि ते सतत ७०० वर्षे चालले होते! म्हणूनच हुयांग त्सांग म्हणतात त्याप्रमाणे याचे नांव ‘ना अल इलम दा’ म्हणजेच “कधीही न आटणारे दान” असे होते! त्याकाळी येथे तिबेट, जापान, चीन, पर्शिया, कोरिया, टर्की, इंडोनेशिया आणि ग्रीस येथील विद्यार्थी अभ्यासासाठी येत. १२व्या शतकाच्या दरम्यान संपूर्ण नालंदा विश्वविद्यापीठ जाळून टाकण्यात आले आणि त्यात लाखो ग्रंथ भस्मसात झाले, मात्र तरीही काही भिक्खुंनी थोडीफार हस्तलिखिते आपल्याबरोबर नेली जी सध्या लॉस अंजिलस, न्यू यॉर्क आणि तिबेट मधील संग्रहालयात सुरक्षित आहेत.

नालंदाची महती जगभरात पसरली ती त्याच्या १७ विद्वान विद्यार्थ्यांमुळे! खऱ्या अर्थाने ते सर्व बोधिसत्व होते! दलाई लामा देखील या सर्वांबद्दल आदर व्यक्त करताना आपण त्यांचे शिष्य असून त्यांच्याच विचारांचा वारसा चालवतोय असे आवर्जून सांगतात!

१. “नागार्जुन” हे ‘माध्यमक’, ‘शून्यवाद’ आणि ‘निस्वभाववाद’ तत्वज्ञानाचे जनक समजले जातात. एखादी वस्तू अथवा विचार याला स्वअस्तित्व नसून ते इतरांच्या अस्तित्वावर अवलंबून असतात म्हणजेच त्यांचे स्वतःचे स्वभाव नसतात. उदा. आपले शरीर हे अनेक मज्जारज्जू, हाडे, मांस, रक्त, नसा यांनी बनलेले आहे. म्हणजेच यांचे मूळ घटक म्हणजे पेशी (मांसपेशी, हाडपेशी) आहेत. प्रथिने आणि पाणी यांच्या अनेक रेणू पासून पेशी तयार होतात. अनेक अणुंमुळे रेणू तयार होतात. हे अणू कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून तयार होतात आणि हे सर्व घटक आपल्या वातावरणात अस्तित्वात असतात. याचाच अर्थ आपले शरीर हे अनेक घटकांपासून बनले असून त्याचे स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नाही! मनुष्यात उद्भवणाऱ्या अनेक विकारांना जर हेच प्रमाण लावले तर त्या विकारांचा फोलपणा किंवा मिथ्यापणा समजून येतो. याच अनुषंगाने नागार्जुनाने ‘मुलमाध्यमकाकारिका’ हा ग्रंथ लिहिला जो बुद्धांच्या ‘प्रतित्यसमुत्पाद’ या संकल्पनेवर आधारित आहे.

२. “आर्यदेव” हे नागार्जुनांचे अतिशय विद्वान शिष्य ज्यांनी अज्ञान, अनित्यता आणि क्षणिकवाद यावर ४०० पदांचे चतुःशतक लिहिले. महायान माध्यमिका विचारधारेचे ते सहसंस्थापक समजले जातात. दक्षिण भारतात राहून त्यांनी अनेक विहारे बांधले.

३. “असंग” हे ४थ्या शतकातील महायानच्या ‘योगाचार’चे संस्थापक असून, त्यांचा भाऊ ‘वसुबंधू’ सह त्यांनी लिहिलेले ‘अभिधर्मसमुच्चय’, ‘बोधिसत्त्वभूमी’, ‘योगाचारभूमिशास्त्र’, ‘महायानसूत्रालंकार’ आणि ‘विज्ञानवाद’ हे संस्कृत भाषेतील सर्वोत्तम ग्रंथ लिहिले. ध्यानाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी अनेक विहारांची स्थापना केली ज्यात हजारों अभ्यासू भिक्खू तयार झाले.

४. “वसुबंधू” यांनी ‘अभिधर्मकोशकारिका’ ही अभिधर्मवर अभ्यासात्मक टीका लिहिली. बौद्ध तत्वज्ञान आणि संकल्पना यावर कोणत्या पद्धतीने आणि कशी व्याख्या करावी याचे अतिशय पांडित्यपूर्ण ‘व्याख्यायुक्ती’ हा ग्रंथ लिहिला. बुद्धविचारधारेवर त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा मोठी आहे. ‘वादविधी’, ‘विज्ञाप्तिमात्रताशास्त्र’, ‘दशभूमिकाभाष्य’ हे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. वसुबंधूंनी ‘वादविधी’ या ग्रंथांमधून बौद्ध तर्कशास्त्रची सुरुवात केली असे म्हणावे लागेल.

५. “दिग्नाग” हे नालंदा विश्वविद्यापीठाचे अतिशय विद्वान विद्यार्थी आणि अध्यापक होते. प्रमाणशास्त्र आणि तर्कशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. दिग्नागनुसार कोणत्याही वस्तूची सत्यता ही प्रत्यक्षज्ञान आणि अनुमान ज्ञान या दोन सिद्धांतावर आधारित आहे. भाषा, तर्क आणि अनुमान या त्यांच्या सिद्धांताने भारतीय तर्कशास्त्राचा एक नवीन पाया रचला गेला. वसुबंधूंचे शिष्य असणारे दिग्नाग यांनी ‘प्रमाणसमुच्चया’ हा प्रमाणशास्त्रावरचा अजोड ग्रंथ लिहिला. ‘हेतुचक्र’, ‘आलंबनपरीक्षा’, ‘अभिधर्मकोशमर्मप्रदीपा’, ‘अष्टसहस्रिकाप्रज्ञापारमिता’, ‘त्रिकालपरीक्षा’ आणि ‘न्यायमुख’ हे ग्रंथ लिहिले.

६. “धर्मकीर्ती” हे नालंदा विश्वविद्यापीठाचे प्रमाणशास्त्राचे विद्वान विद्यार्थी होते. धर्मकीर्ती यांनी “प्रमाणवर्तिका” हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या नुसार वस्तुच्या अनुभूतीची सत्यता ही त्या वस्तुच्या अपेक्षित कामाची क्षमता असते. प्रत्येक वस्तुचे स्वलक्षण हे क्षणिक असते. बौद्ध तत्वज्ञान दोन सत्य मानते – संवृत्ती सत्य आणि परमार्थ सत्य. ‘प्रमाणवाद’ सिद्धांताची मांडणी आणि त्याची तत्वज्ञानिक मीमांसा याचे श्रेय दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांना जाते. धर्मकीर्ती यांनी ‘संबंधपरीक्षावृत्ती’, ‘प्रमाणाविनिश्चय’, ‘प्रमाणवृत्तिकाकारिका’, ‘न्यायबिंदुप्रकरण’, ‘हेतुबिंदुनामप्रकरण’, ‘वादन्यायानामप्रकरण’ अशा अभ्यासू ग्रंथांची निर्मिती केली.

७. “गुणप्रभा” हे वसुबंधूंचे शिष्य होते आणि विनयपिटकावर स्वतःचे भाष्य “विनायसूत्र” लिहिले जे आजही एक प्रमुख ग्रंथ मानण्यात येतो.

८. “शक्यप्रभा” हे नालंदाचे आचार्य शांतरक्षित यांचे शिष्य होते व ‘विनय’ मध्ये अतिशय विद्वान समजले जात. त्यांनी काश्मीर मध्ये बुद्धविचारांचा जोरदार प्रचार केला.

९. “बुद्धपालित” यांनी नागार्जुन आणि आर्यदेव यांच्या ग्रंथावर अतिशय विद्वत्तापूर्ण टीका लिहिली. मध्यमका-प्रासंगिक विचारधारेचे ते संस्थापक समजले जातात. नागार्जुन यांच्या ‘मुलशास्त्र’ वर त्यांनी ‘बुद्धपालितवृत्ति’ नावाची टीका लिहिली.

१०. “भावविवेक” हे बुद्धपालित यांच्या समकालीन होते व त्यांनी देखील नागार्जुनांच्या ग्रंथावर “प्रज्ञाप्रदीपा” नावाची टीका लिहिली. त्यांच्या मते ‘निस्वभाव’ किंवा ‘स्वभावशून्यता’ हे स्वातंत्रानुमना हवी. प्रासंगिक विचारधारेपेक्षा स्वतंत्र विचारधारा प्रस्थापित केल्यामुळे त्यांना ‘स्वतंत्रिका-मध्यमका’ विचारधारेचे संस्थापक समजले जातात. ‘मध्यमकाहृदयकारिका’ आणि त्यावरची स्वटिका ‘तर्कज्वाला’ हे स्वतंत्र ग्रंथ लिहिले. भारतीय तर्कशास्त्रात, दोन विधानांवरून निष्कर्ष किंवा अनुमान काढण्याची पद्धत भावविवेक यांनी प्रथम सुरु केली.

११. “चंद्रकीर्ती” हे नालंदाचे विद्यार्थी होते ज्यांनी नागार्जुनांच्या विचारधारेचे प्रवर्तक समजले जातात. त्यांनी ‘प्रसन्नपदा’, ‘माध्यमकावतारा’, ‘चतुःशतकटिका’, ‘युक्तिशस्तिकावृत्ती’, ‘शून्यतासप्तवृत्ती’, आणि ‘त्रिशरणसप्तति’ ग्रंथ लिहिले.

१२. “शांतरक्षिता” यांनी तिबेट मध्ये सर्वात पहिले विहार बांधले आणि अनेक तरुणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांच्यामुळे तिबेटमध्ये बुद्धविचार विशेषतः महायान विचारधारा यांचा प्रसार झाला. शांतरक्षिता यांनी ‘अष्टतथागतस्तोत्र’, ‘तत्वसद्धी’, ‘संवरविमशकवृत्ती’, सत्यद्वयविभंगपंजिका’, ‘परमार्थविनिश्चय’, ‘वादन्यायटिकाविपणचितार्थ’, ‘तत्त्वसंग्रह’ आणि ‘माध्यमकलांकार’ हे ग्रंथ लिहिले.

१३-१४. “कमलशीला” आणि “हरिभद्र” हे दोघे शांतरक्षित यांचे विद्वान शिष्य होय. प्रमाण आणि ध्यान या विषयांत हे दोघे पारंगत होते. कमलशीला यांनी ‘भावनाक्रम’ नावाचे तीन ग्रंथ ध्यानावर लिहिले, तर हरिभद्र यांनी प्रमाण, माध्यमका आणि अभिधम्मावर, ‘अभिसमयालंकार-लोकप्रज्ञापारमिता व्याख्या’ आणि ‘अभिसमयालंकारविवरती’ तसेच प्रज्ञापारमितावर पंचवीस हजार ओळींच्या व्याख्येचे पुनर्लिखाण केले.

१५. “विमुक्तीसेना” हे प्रज्ञापारमितेचे एक आचार्य होते ज्यांनी ‘अभिसमलंकार’वर टीका लिहिली. वसुबंधूंच्या चार विद्वान शिष्यांपैकी हे सर्वोत्तम होय. ते सर्व पारमिता विशेषतः प्रज्ञापारमिता मध्ये अतिशय अभ्यासू आणि दिशादर्शक मानले जातात.

१६. “शान्तिदेवा” हे नालंदाचे विद्वान होते ज्यांनी बोधिचित्त आणि सहा पारमितांवर आधारित ‘बोधिचर्यावतर’ हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. शिक्षासमुच्चया कारिका’ हा एक ग्रंथ शांतीदेवांनी लिहिला.

१७. “अतिशा” हे नालंदाच्या ‘बोधिसत्व’ विद्यार्थ्यांमधले शेवटचे विद्यार्थी होय. ‘बोधिपथप्रदिपा’ हा ध्यानमार्गाचे अप्रतिम ग्रंथ असून ध्यानाच्या उच्चतम अवस्थाप्रप्तीसाठी अभ्यासनीय आहे. ‘बोधिपथप्रदिपापंजिकानामा’, ‘चरयासंग्रहप्रदिपा’, ‘बोधिसत्त्वमान्यवली’, माध्यमकारत्नप्रदिपा’, ‘महायानपथसाधनासंग्रह’, ‘शिक्षासमुच्चया अभिसमया’, ‘प्रज्ञापारमितापिण्डार्थप्रदिपा’, ‘एकवीरासाधना’ आणि ‘विमलरत्नलेखा’ हे ग्रंथ अतिशा यांनी लिहिले.

नालंदा विश्वविद्यापीठ हे बुद्धांच्या काळानंतरचे प्रथमच असे अभ्यासकेंद्र होते जेथे त्यांच्या प्रत्येक विचारांचा काटेकोर अभ्यास, सटीक विश्लेषण आणि प्रदीर्घ काळापर्यंत ग्रंथनिर्मिती चालू होती. म्हणूनच येथे ज्ञानियांचा मळा सतत बहरलेला होता आणि त्यातूनच बोधिसत्वांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. नालंदा मधील या “बोधिसत्व” विद्यार्थ्यांनी अनेक नवीन ज्ञानशाखा सुरू केल्या ज्यांचा अभ्यास आजही जगभर चालू आहे. भारतीय इतिहासात कोणत्याही संस्कृतीने येवढे प्रचंड योगदान शिक्षण क्षेत्रात दिले नाही….म्हणून तर त्याकाळी भारत हा खरा “विश्वगुरू” होता!

अतुल मुरलीधर भोसेकर

९५४५२७७४१०

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!