देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

महाराष्ट्र नावाचा इतिहास

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात इ.स. ३६५ मध्ये कोरलेल्या ‘एरण’ गावाच्या स्तंभलेखात श्रीधर्मवरम्याचा आरक्षिक व सेनापती सत्यनाग याने स्वतःला ‘महाराष्ट्रीय’ असे म्हटले आहे. हा स्तंभलेखातील महाराष्ट्राचा उल्लेख सर्वात प्राचीन ठरतो.

सम्राट अशोकाच्या काळात तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेत ठरल्यानुसार बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी इ.स.पु. २४६ मध्ये महाधम्मरक्खीताला ‘महारठ्ठ’ देशात पाठवल्याचा उल्लेख महावंश व दिपवंश या बौद्ध ग्रंथात आढळतो.

इ. स. ७ व्या शतकात चिनी यात्री युआनत्संग हा भारतात आला होता. त्याने चालुक्य राजा पुलकेशी (दुसरा) च्या राज्यास भेट दिली होती. या चालुक्यांच्या राज्याला त्याने ‘मोहोलाच’ म्हणजेच महाराष्ट्र असे म्हटले.

ऐहोळी येथील (विजापूर जिल्हा मलप्रभा तीरी) जितेंद्र मंदिराच्या कोरीव लेखात पंडित राविकिर्तीकृत प्रशस्तीश्लोक दिले आहेत. त्यातील एका श्लोकात सत्याश्रय पुलकेशीने ९९ हजार गावे असणाऱ्या व महाराष्ट्रक नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीनही प्रदेशांचे अधिपत्य मिळविले अशी नोंद आहे. हा लेख इ.स. ७१२ मधील आहे.

श्री. व्यं. केतकर यांच्या मते महाराष्ट्र हा शब्द व भाषा वररूचीच्या काळी होती. वररूचीचा काळ ख्रिस्तपूर्व ८००-६०० धरला आहे.

महाराष्ट्र म्हणजे मोठे अथवा विस्तृत असा अर्थ रा. काणे काढतात.

जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची व्युत्पत्ती त्यांनी दिलेली आहे. याच मताला अलेक्झांडर रॉबर्टसन, जोतिबा फुले, डॉ.एन. जी. भवरे व डॉ. पुरुषोत्तम खानापूरकर यांनी पाठींबा दिलेला आहे.

श्री. वामनराव भट यांनी म्हटले आहे कि प्राचीन काळी महार हे एक राष्ट्र होते.

डॉ. दत्तात्रय खानापूरकर यांच्या मते महार हे महाराष्ट्राचे मूलनिवासी असून ते एके काळी महाराष्ट्राचे राजे होते.

राजारामशास्त्री भागवत यांच्या मते महार हे अतिपुरातन काळचे अस्सल देशी लोक असून ते नाग लोक होते. तसेच महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.

रामकृष्ण भांडारकर यांच्या मते राष्ट्रीक उर्फ रठ्ठ नावाचे प्रसिद्ध असे लोक होते. त्यांनीच स्वतःला ‘महा’ जोडून ते स्वतःला महारठ्ठ असे म्हणत. म्हणून त्यांच्या देशाला महारठ्ठ असे नाव पडले यालाच संस्कृत मध्ये महाराष्ट्र म्हणतात.

श्री. एच. एल. कोसारे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव ज्या भूप्रदेशाला लावण्यात येते. त्या भूभागात नागवंशाच्या महार गणाच्या लोकांनी प्राचीन काळात मोठ्या संख्येने येऊन निरनिराळ्या भागात वसाहती प्रस्थापित केल्या होत्या. इतरही गणाचे लोक या प्रदेशात होते. परंतु त्या सर्वांमध्ये महार नागांचा गण हा प्रमुख होता. महार हा गण अनेक कुलांचा बनलेला होता. महार गणाच्या लोकांनी जो भूभाग व्यापलेला होता आणि ज्या भूभागाचे स्वामित्व त्यांच्याकडे होते त्या प्रदेशाला ‘महाराष्ट्र’ अशी संज्ञा प्राप्त झाली.

कॉम्रेड शरद पाटील म्हणतात – पैठणच्या पंचायतीत मायिता हरीने केलेला चक्रधारस्वामींचा बचाव वाया जाऊन त्यांना नाककानछेदाची शिक्षा झाल्यानंतर तो महाराष्ट्र त्यागाची घोषणा करताना म्हणाला, ” तुझेया महाराचा महाराष्ट्र् होऊनि मीचि जातु असे.” यातून महाराष्ट्र्र मुळात महार गणाचे अभिजन असल्याचे सूचित होते. (P. 100, जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व – कॉ. शरद पाटील)

ओपर्ट यांनी ‘भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या शीर्षकार्थाच्या ग्रंथात महाराष्ट्रालाच मल्लराष्ट्र (मल्ल लोकांचे राष्ट्र) असे म्हटले आहे. मल्ल म्हणजेच मार आणि मार लोकांनाच म्हार म्हणतात. मार या शब्दाचे हळूहळू म्हार-महार असे रूप बनले असावे. मराठीत ही दोन्ही रूपे आढळतात. तेव्हा मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे एकाच अर्थाचे दोन शब्द प्रचारात होते. वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या मळवली, मालेगाव, मल्याण, मळसर, मळगाव, मलांजन, मळखेडे, मळवाण, मलोणी या मल्लराष्ट्र जातिसंबद्ध गावांचा याला आधार मिळतो.

सोमवंशी बी. सी. हेच संदर्भ पुढे ठेवून म्हणतात

“पैलवान लोक हातात आणि गळ्यात काळा दोरा बांधतात. तसेच महार लोकही हातात व गळ्यात काळा दोरा बांधत. मल्लविद्या हि अत्यंत जुनी विद्या असून तिचा उगम भारतातच अनार्यात झाला. महार हे येथील सर्वात जुने रहिवासी आहेत. व ते अनार्य होत. यावरून मल्लांचे म्हारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र हि महाराष्ट्राची उत्पत्ती स्पष्ट होते.”

गुर्जर लोकांचे राष्ट्र जसे गुजराथ म्हणून ओळखले जाते तसे महार लोकांचे राष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते (महाराष्ट्राचा महार)

मरहट्ट’ हा शब्द कानडी असून ‘झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील ‘हट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता. असे शं. भा जोशी यांचे मत आहे

हि सर्व मान्यवरांची मते लक्षात घेतल्यावर असे निष्कर्ष निघतात कि महाराष्ट्र हे नाव इ.स.पु ८०० ते ६०० पासून आढळून येते. दुसरे म्हणजे महाराष्ट्र हे नाव मोठे राज्य किंवा महारांवरून पडलेले नाव किंवा रठठावरून पडलेले नाव किंवा हट्टगार धनगर या लोकांवरून पडलेले अश्या तीन व्युत्पत्ती आपणासमोर येतात. आणि मल्ल आणि महार एकच असे ओपर्ट आणि सोमवंशी बी.सी. यांच्या मतावरून समजते.

श्री. व्यं. केतकर थोडं वेगळं मत मांडताना दिसतात.

ते म्हणतात -” महाराष्ट्र…. भाषेच्या नावास कारण झालेले जे महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीकरण ते ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्रकात झाले असावे असे दिसते. अश्मक राजा कुरु युद्धात पडला आणि कुरु युद्धापासून अश्मकाचे सातत्य आहे, तर महार आणि रठ्ठ यांचे एकराष्ट्रीयकरण आणि अश्मक राज्याचे सातत्य याची संगती लावण्याचा प्रयत्न अवश्य होतो. दोन राष्ट्रे एकत्र व्हायची ती एकावर दुसर्याच्या विजयाने होतात. महार आणि रठ्ठ यांची देशभर मारामारी होऊन एकराष्ट्र होण्याची क्रिया अश्मक राज्य चालू असता घडणे शक्य नाही, तर अश्मक राज्य सुरु होण्यापूर्वीच महारांच्या देशात रठठाचा प्रसार होऊन महाराष्ट्र बनले असावे आणि त्यांच्या संयुक्त जनतेत अश्मक राजकुलोत्पन्न झाले असावे असाच इतिहास असावा असे दिसते. म्हणजे महाराष्ट्रच्या वैशिष्टयास म्हणजे महार आणि रठ्ठ यांच्या एकत्रीकरणास आरंभ कुरुयुद्धापूर्वीच झाला असला पाहिजे.” असे सांगून केतकर पुढे म्हणतात ‘महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र होय.’

केतकरांच्या मते महार गण व रठ्ठ गणात संघर्ष व समेट होऊन महाराष्ट्राची निर्मिती झाली.

महाराष्ट्रातील लोकांना रिस्ले यांनी सिथो-द्रविडियन म्हटलेलं आहे.

तर एन.के.दत्त यांनी त्यांना इराणी-द्रविडियन म्हटलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अशोकाच्या शिलालेखातील ‘राठीक’ यांच्याशी समांतर इराणी भाषेतील शब्द ‘रथस्थ’ म्हणजे लढवय्या या अर्थाने मिळतो. असा दाखला दिलेला आहे.

रिस्ले, एन. के. दत्त, केतकर या तीनही मान्यवरांच्या मते महाराष्ट्रात दोन वंशाचे लोक राहतात हे स्पष्ट आहे. त्यातल्या त्यात केतकर व एन.के.दत्त रठ्ठ लोकांचा देखील एक वंश म्हणून उल्लेख करतात. तर दुसरा एन.के. दत्त यांनी दुसरा वंश द्राविडी सांगितला आहे आणि केतकरांनी तो महार गण पकडलेला आहे.

रठ्ठ या शब्दाचे दोन अर्थ होतात एक राष्ट्र व दुसरा लढवय्या. तर रठ्ठ या शब्दाचे प्राकृत भाषेत रूप हट्ट होते व त्याचा अर्थ सुद्धा प्रदेश किंवा योद्धा असाच आहे.

या महार (मल्ल) गण व रठ्ठ (हट्ट) गणाच्या संघर्ष आणि समेटातून दोन समाजाची निर्मिती झाली.

एक महार-हट्ट (मऱ्हाट) समाज व दुसरा अंत्यज महार (ब्रोकन मॅन)

अंत्यज महार हा मूळ महार गणांचा भाग होता तरी संघर्षामुळे ते मूळ गणापासून बाहेर फेकला गेला. व अंत्यज ठरले.

मराठा समाज हा महार (मल्ल) गण व रठ्ठ गणाच्या संघर्षा नंतरच्या समन्वयातून निर्माण झाला

म्हणजेच महार+रठ्ठ = महारठ्ठ

महारठी म्हणजेच मराठे असे भांडारकर म्हणतात.

महार (मल्ल) गण नागवंशीय तर रठ्ठ गण यदुवंशीय आहेत. राष्ट्रकूट स्वताला यदुवंशी म्हणवून घेतात त्याच बरोबर रठ्ठ नावाच्या राजापासून त्यांचा वंश निर्माण झाला असेही म्हणतात.

महाराष्ट्र कुळवंशावली मध्ये मराठा समाज दोन वंशांचा मिळून बनलेला आहे असे म्हटलेलं आहे ते दोन वंश म्हणजे नागवंश व यदुवंश. (क्षत्रियांचा इतिहास – काशिनाथ देशमुख)

या दोन वंशाच्या संघर्ष समेटाचा प्रभाव महाराष्ट्रावर तर पडलाच पण या दोन समाजावर देखील पडला.

महार त्यांची अंत्यज स्थितीला कृष्ण ला जबाबदार धरतात. त्याचे कारण रठ्ठ (यदु) लोकांच आराध्य कृष्ण आहेत

कृष्णाला जबाबदार धरताना चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतो.

मी यातीहीन महार | पूर्वी निळाचा अवतार
कृष्ण निंदा घडली होती | म्हणून महार जन्मप्राप्ती

कृष्णाने नागांच खांडववन जाळल्याची कथा तर प्रसिद्ध आहेच. पण यदूंचा महाराष्ट्रात प्रवेश खरंतर महार अंत्यज ठरण्याला कारणीभूत झाले.

म्लेंछ (नाग) मर्दन करतो म्हणून केशवाला कलंकित ठरवणारे अंत्यज महार (नाग) पुढे बौद्ध बनले. व त्यांना अस्पृश्यता लागली.

मराठा समाजावर काय परिणाम झाला हे १९२७ साली कोर्टाने दिलेल्या निकालातून समजते ते म्हणजे कोर्टाने ९६ कुळी व ५ कुळी मराठ्याना क्षत्रिय तर कुणबीना शुद्र ठरवले.

महाराष्ट्रावर देखील याचा मोठा परिणाम घडून आला. महाराष्ट्रातील बहुतांश स्थानांच कृष्णकरण किंवा शैविकरण झाले.

याच एक उदाहरण म्हणजे खंडोबा. खंडोबाचे प्राचीन नाव मल्लिकार्जुन.

पण खंडोबाचे मल्हारीमाहात्म्य सांगण्यात येते त्याची कथा सांगताना मल्ल दैत्याचा वध करताना खंडोबाला दाखवले जाते.

खरंतर खंडोबाला दक्षिणेत मल्लणा, मल्लय किंवा जैन लोक खंडोबाला मल्लिनाथ ह्या नावाने ओळखतात. मल्लूखान हे नावही काही ठिकाणी घेतले जाते.

मल्लण व मल्लय हि दोन नावे या देवाच्या नावाचा मूळ अंश ‘मल्ल’ असा कल्पून त्यापुढे अण्ण व अय्य हे प्रतिष्ठासूचक प्रत्येय लागून बनलेली आहेत. (दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा – रा. ची ढेरे)

धनगरांच्या ब्रमल-बरमल-विरमल्ल या मूळ नावाने खंडोबा ओळखला जातो.

या विरमल्ल देवाचे जे उल्लेख धनगर लोकसाहित्यात येतात त्यात विरमल्ल हा नागाच्या स्वरूपात आपणाला दिसतो

कर्हे पठारावर वारूळस्थ नागाच्या स्वरूपात आदिमैलार म्हणून खंडोबा पूजला जातो.

वर आपण पाहिलंच कि महाराष्ट्राच दुसर नाव मल्ल राष्ट्र होत हे. जो महाराष्ट्रात पूजला जातो. तो मल्लाचा अरि (शत्रू) कसा असू शकेल ?

मल्हारी हे विशेषण कृष्णाच आहे. रठ्ठ च्या आगमनाने खंडोबाचे कृष्णकरण आणि शैवीकरन घडून आले त्याच्या मूळ नागरूपाचा लोप घडून आला.

ज्या शैवांकडून खंडोबा धिक्कारला गेला होता. त्याच खंडोबाच शैविकरण घडून येते. हेच मोठं आश्चर्य आहे. पण हे सत्य आहे.

बुद्ध काळात प्रत्येक व्यक्ती गण नावाने ओळखला जायाचा. जात व्यवस्थेमुळे नंतरच्या काळात सर्वानी गणाच्या नावाला तिलांजली दिली व ते वर्ग जातीच्या (व्यवसाय)नावाने ओळखले जाऊ लागले.

मल्ल (किंवा कोणत्याही) गणातील प्रत्येक जाती वर्गाला त्यांच्या स्वताच्या व्यवसायानुसार जातींनाम प्राप्त झाले पण महारांचा असा कोणताही विशिष्ट व्यवसाय न ठरल्यामुळे ( ते बावन्न प्रकारची कामे करतात) त्यांच्या वर्गाला मूळ गणाचेच नाव चिकटून राहिले असावे.

किंवा

महारकी हा शब्द महारांशी संबंधित आहे. तो महाररक्ख या सातवाहन कालीन शब्दाशी संबंधित आहे. महाररक्ख म्हणजे महार-रक्षक. तर महारहट्ट चे पुढे मऱ्हाटा झाले असावे. मराठा व महारकी या शब्दातील महार हा शब्द मल्ल- माल- महाल- महार असा आल्यामुळे मल्ल या गणाचेच पुढचे महार हे रूप आहे. महाराष्ट्राचे नाव मल्ल राष्ट्र म्हणतात ते योग्य आहे. त्याचेवरूनच विस्तार होऊन महाराष्ट्र हे नाव आपल्या प्रांताला मिळालं आहे.

मराठयांमध्ये महारांप्रमाणेच पूर्वी नावामागे नाक लावण्याची प्रथा होती (मराठयांचा इतिहास – ह. वा. करकरे)
महारात तर नावामागे नाक लावण्याची प्रथा घराघरात होती. नाक हा नाग शब्दांचा अपभ्रंश आहे. महारांचा मूळ पुरुष नाग होता अशी मान्यता आहे. मल्ल हा वंश नाग वंश आहे. सातवाहन शिलालेखात अनेक नाक प्रत्यय असलेली नावे आढळतात. मगधाचा राजा नागवंशी शिशुनाग याला शिशुनाक या नावानेही संबोधण्यात आले आहे.

तसेच महारात असलेला जोहार हा अभिवादानाचा प्रकार मराठ्यात सुद्धा होता (studies in marathaa history vol 1)

रोहिडखोर्यातील ज्या रोहिडेश्वरापुढे छत्रपती शिवाजी माहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तो मूळचा रोहिडमल्ल होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी मानववंशशास्त्राच्या अभ्यासातून असे निदर्शनास आणले की मराठा व महार ज्ञातीची कुळे सारखीच आहेत. वस्तुतः या दोन ज्ञातीतील कुळामध्ये इतके मोठे साम्य आहे की मराठा ज्ञातीतील असे एकही कुल असे नाही की जे महारात नाही. देवके कुल व गोत्र यांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन असे म्हणता येते की ज्यांची देवके कुळे सारखीच आहेत ते परस्परांचे सगोत्र भाऊबंद असले पाहिजेत आणि ते जर भाऊबंद आहेत तर ते एकाच वंशाचे असले पाहिजे हे सिद्ध होते.

कधी काळी महार मराठे एकत्र होते. त्या दोहोंमधील असणाऱ्या मल्ल गणावरून या राज्याला महाराष्ट्र हे नाव प्राप्त झाले.

आदिम समाज टोळ्यांनी बनलेला होता. त्या टोळ्यांचे पुढे गण तयार झाले. सातव्या पिढीत गण विभागले जात होते. म्हणून गणांची संख्या वाढली. बुद्ध काळापर्यंत बरेच गण आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जातीव्यवस्था निर्माण झाल्यावर गणाच्या नावाचं महत्व लोप पावले व जातीला महत्व आले. व्यवसायावरून जाती पडल्या तर काही जातींना त्यांच्या गणाचीच नावे चिकटून राहिली. महाराष्ट्र्र हा दोन तीन गणांचा मिळून बनलेला आहे. त्यात मल्ल, रठ्ठ, व कोलीय गण प्रमुख आहेत. मल्ल व कोलीय एकाच गणाचे दोन भाग झाले असण्याची शक्यता आहे. या तीन किंवा अधिक गणाच्या संघर्ष समन्वयातून आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.

संदर्भ-
१ अस्पृश्य मूळचे कोण ? – डॉ. आंबेडकर
२ प्राचीन भारतातील नाग – एच. एल. कोसारे
३ लज्जागौरी – रा. ची. ढेरे
४ श्रीविठ्ठल : एक महासमन्वय – रा. ची. ढेरे
५ शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास – डॉ. अनिल कठोरे
६ वि. का. राजवाडे लेखसंग्रह
७ वि.रा. शिंदे लेखसंग्रह
८ दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा – रा. ची. ढेरे
९ जातीव्यवस्थाक सामंती सेवकत्व – कॉ. शरद पाटील
१० महार कोण होते ? – संजय सोनवणी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!