देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

फुले-शाहू-आंबेडकरी अभ्यासक, विद्वान, विचारवंत व साहित्यिक यांना खुले पत्र

प्रिय, फुले-शाहू-आंबेडकरी अभ्यासक, विद्वान, विचारवंत व साहित्यिक
स.ज.वि.वि.

१) ही बाब तर लक्षात घेतलीच पाहिजे की, भारतातील लोकशाही आता केवळ ‘सत्ताप्राप्तीचा संघर्ष’ झाली आहे. लोकशाहीच्या उत्क्रांतीत हा ‘सत्ताप्राप्तीच्या संघर्षाचा’ टप्पा येणे ही बाब अपरिहार्य समजली पाहिजे. या सत्ताप्राप्तीच्या संघर्षात सर्वच पक्षांपकडून सत्ता प्राप्त व्हावी यासाठी सत्ताप्राप्तीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. यात स्वत:चा जनाधार वाढवणे, इतरांचा जनाधार कमी करणे, इतरांचा जनाधार स्वत:कडे वळवणे या त्या क्लुप्त्या असतात. हा खेळ सर्वच पक्ष कायम खेळत राहतात. यात मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवण्याचे, त्यांचा जनाधार बळकवण्याचे प्रयत्न करीत असतात. सत्तासंघर्षात ही बाबही संयुक्तिक ठरते. कोणताही पक्ष स्वत: निवडून येण्यासाठी इतरांचा जनाधार कमी करणे, पळवणे यासाठी प्रयत्न करीतच असतो. कोणताही पक्ष असेच वागणार.

२) सत्ताप्राप्तीसाठी इतर पक्षांचा जनाधार कमी करून स्वत:चा वाढवणे या पद्धतीनेच २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेसने व विशेषत: राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीचा जनाधार स्वत:कडे वळवण्यासाठी एक खेळी खेळली.
अ) धर्मनिरपेक्ष मतदान एकगठ्ठा झाले तर भाजप या धर्मांध पक्षाला हरवता येते. आ) मात्र वंचित बहुजन आघाडी पक्षामुळे धर्मनिरपेक्ष जनाधार हा एकगठ्ठा होण्यात अडचण होते. पर्यायाने धर्मनिरपेक्ष मतदान विभागले जाते. इ) पर्यायाने धर्मांध भाजप सत्तेत येतो. ई) धर्मांध भाजपाला या प्रकारे अप्रत्यक्ष मदत होते. उ) भाजपला या प्रकारे अप्रत्यक्ष मदत होत असल्याने वंचित बहुजन आघाडी ही भाजपला निवडून येण्यासाठी मदत करणारी ‘बी’ टीम ठरते असा प्रचार काँग्रेस व राष्ट्रवादीने सुरू केला. अर्थात ‘वंचित बहुजन आघाडी’ बद्दलचा हा प्रचार राष्ट्रवादीने मागील २०१४ पासूनच सुरू केला होता.

३) राष्ट्रवादी व काँग्रेसने असा प्रचार सुरू करण्यामागे काही कारणे आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण सुरू होण्यापूर्वी म्हणजे भारिप-बहुजन महासंघ स्थापन होण्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरी राजकारणाचा जनाधार हा एकजातीय होता. फुले-शाहू-आंबेडकरी राजकारणाचा जनाधार एकजातीय असल्याने तो सत्ताप्राप्तीच्या स्पर्धेत नव्हता. तो केवळ एक दबावगट होता. दबावगट असल्याने कोणत्याही पक्षाला तो सहजपणे वापरता येत होता. या एकजातीय जनाधाराच्या राजकारणाने इतर कोणत्याही पक्षाचे नुकसान होत नव्हते. त्यामुळे या राजकारणाची कोणतीही दखल घेण्याची गरज वाटत नव्हती. सर्वसाधारणत: १९५७ पासून म्हणजेच रिपब्लिकन पक्षाच्या वाताहतीपासून तर १९९४ पर्यंत फुले-शाहू-आंबेडकरी राजकारणाचे जवळपास हेच रूप होते. मध्यंतरी १९७२ ते १९७४ मध्ये या राजकारणात ‘दलित पँथर’ची निर्मिती झाली. राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले. ‘दलित पँथर’च्या निमित्ताने जागृत झालेला हा नवजागृत जनाधार डाव्या पक्षांना वापरायची इच्छा होती. मात्र त्यांना तो न वापरता आल्याने व त्यांना तो वापरता येऊ नये या हेतूनेही १९७४ ला दलित पँथर बरखास्त करण्यात आली आणि पुन्हा फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार आपल्या मूळच्याच रूपात म्हणजे ‘एकजातीय दबावगट’ या रूपात वावरू लागला.

४) याच दरम्यान १९९१ ला काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची हत्या झाली. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेतेपद आपल्याकडे येईल अशी आशा अनेक नेत्यांमध्ये पल्लवीत झाल्या. राजीव गांधींची हत्या होवूनही व काँग्रेसचे नेतेपद रिक्त होऊनही हे नेतेपद आपल्याला मिळत नाही व काँग्रेसी नेते पूर्वानुभवाने आपल्याला नेते ठरवत नाही हे लक्षात आल्याने सोनिया गांधीवर ‘विदेशी नेतृत्वाचा’ आरोप करीत मा. शरद पवारांनी काँग्रेस फोडून त्यांचा ‘राष्ट्रवादी’ पक्ष स्थापन केला. ‘विदेशी नेतृत्व’ च्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ असे ते समीकरण होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेने महाराष्ट्रातील काँग्रेसचा जनाधार खिळखिळा होऊ लागला. या काळापर्यंत दलित, मुस्लिम, ओबीसी हा काँग्रेसचा मुख्य जनाधार होता. १९५७ च्या फुले-शाहू-आंबेडकरी राजकारणाच्या वाताहतीनंतर हा जनाधार बर्‍यापैकी काँग्रेसमध्ये विलिन झाला होता. मात्र राजीव गांधींच्या हत्येपूर्वीपासून म्हणजे १९९० च्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून काँग्रेसचे दलित, मुस्लिम, ओबीसी हे सगळेच जनाधार हलायला लागले होते. मंडल आयोगाच्या अंमलबाजावणी नंतर ओबीसी जनाधार हा फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीकडे सरकू नये म्हणून भाजपने रथयात्रा काढली व ओबीसीचे लक्ष हिंदुत्वाकडे वळवले. मात्र मंडल आयोगाच्या चळवळीमुळे ओबसींना फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीबद्दल भान आलेलेच होते. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी ‘ओबीसी’ बांधवांच्या या जनजागृतीला विचारात घेऊन भारिप बहुजन महासंघाची १९९४ मध्ये स्थापना केली.

५) अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या ओबीसी केंद्रीत पक्ष स्थापन करण्याने फुले-शाहू-आंबेडकरी राजकारणाला काही वैशिष्ट्ये प्राप्त झालीत. त्यातले पहिले असे की, या राजकारणावर पडलेला ‘एकजातीयतेचा’ शिक्का पुसायला मदत होवू लागली. दुसरी बाब अशी की, या राजकारणाला ‘दबावगटाच्या’ रूपामधून बाहेर काढून सत्ताप्राप्तीच्या राजकारणाचे स्वरूप प्राप्त होवू लागले. भारिप-बहुजन महासंघाच्या स्थापनेने या राजकारणाच्य्ाा जनाधाराचा पाया विस्तारायला लागला. त्यामुळे या राजकारणाला सत्तेत थोडेबहुत यशही प्राप्त होवू लागले. राजकीय दबावगट या कोंडीत अडकलेले हे राजकारण सत्तेचे समीकरण घडवू लागले. ज्या अर्थी भारिप-बहुजन महासंघाचा जनाधार विस्तारायला लागला त्या अर्थी निश्चिचत तो कुठून तरी स्थलांतरीत व्हायला लागला होता. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांच्या या राजकारणााने १९५७ ते १९७४ पर्यंत काँग्रेसमध्ये विलिन झालेला फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार हा हळूहळू भारिप-बहुजन महासंघाकडे गोळा व्हायला लागला. भारिप बहुजन महासंघाने जसा काँग्रेसमध्ये विलीन झालेला फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार काँग्रेसमधून काढून घेतला अगदी तसाच काँग्रेसमध्ये विलिन झालेला ओबीसी जनाधार हा शिवसेनेकडे गोळा व्हायला लागला आणि मुस्लीम जनाधार मुस्लीम राजकारणाकडे गोळा व्हायला लागला. पर्यायाने काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा जनाधार हळूहळू कमी कमी होवू लागला. काँग्रेसचा हा जनाधार कमी कमी होत जाण्याच्या आणि हा जनाधार प्रादेशिक पक्षांकडे स्थलांतरीत होण्याच्या या काळातच भारतात प्रादेशिक पक्षांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. किंबहुना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर भारतभर प्रादेशिक पक्ष स्थापन होवू लागल्यानेच काँग्रेसचा जनाधार कमी होवू लागला व भारतात युतीच्या राजकारणाची संस्कृती निर्माण झाली. एकीकडे काँग्रेसचा जनाधार स्थलांतरीत होत होता. प्रादेशिक पक्ष उदयाला येऊ लागले. याच काळात स्थीर सरकाराचा पर्याय म्हणून भारतीयांनी ‘भाजप’चा स्वीकार केला.

६) भाजप हा धर्मांध किंवा धार्मिक राजकारण करणारा पक्ष तर आहेच त्यांनी राजकारणाचे, सत्ताकारणाचे एक साधन म्हणून धर्माचा वापर केल्याने धर्माला एक अवनत रूपही प्राप्त झाले. मात्र भारतीयांनी ‘स्थीर सरकारची हमी’ म्हणूनच भाजपला स्वीकारले आहे. भाजप अस्थिर झाला तर भाजपचा जनाधार कधीही इतर पक्षांकडे वळू शकतो. काँग्रेसचा जनाधार प्रादेशिक पक्षांकडे सरकला. प्रादेशिक पक्ष सबळ होवू लागले. काँग्रेसचा जनाधार घटू लागला. मात्र प्रादेशिक पक्ष विघटित असल्याने, तिसर्‍या आघाडीचा पर्याय यशस्वी होत नसल्याने, हे प्रादेशिक पक्ष त्यांचा जनाधार घेऊन विखुरलेल्या अवस्थेत उभे रहात असल्याने, हे प्रादेशिक पक्ष शक्तीहीन ठरले. या पार्श्वभूमीवर ‘स्थीर सरकारचा पर्याय’ म्हणून भाजपला महत्व मिळाले. काँग्रेसचा जनाधार प्रादेशिक पक्षांनी काढून घेतल्याने ‘काँग्रेस’ पक्ष कमजोर झाला. प्रादेशिक पक्षांना तिसरी आघाडी म्हणून समर्थ पर्याय देता आला नाही म्हणून तेही आपापल्या पातळीवर विघटित रूपात उभे राहू लागले या सगळ्या परिस्थितीने भाजपचे फावले. हे मान्य की, प्रादेशिक पक्षांनी त्यांचा त्यांचा जनाधार संघटीत केल्याने व हा जनाधार काँग्रेसकडून स्थलांतरीत झाल्याने काँग्रेस पक्ष कमजोर झाला व भाजप या धर्मांध पक्षाचे फावले. असे असल्याने या भारतावर धर्मांध भाजपाची सत्ता स्थापन होण्यासाठी हे प्रादेशिक पक्ष जबाबदार कसे? प्रादेशिक पक्ष भाजपची ‘बी’ टीम कसे? याच प्रादेशिक पक्षाचा भाग असणारा ‘वंचित बहुजन आघाडी’ भाजपची बी टीम कशी? या प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेमागे त्या त्या प्रदेशातील शोषित जातींची व शोषित प्रदेशांची अस्मिता आहे. पिढ्यानपिढ्या भारताच्या सत्ता-संपत्ती व सन्मानामध्ये हक्क व अधिकाराचा वाटा न मिळाल्याची भावना आहे. भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचे भान आहे. आज हे पक्ष विखुरलेले असले तरी भारतातील अठरापगड शोषित जातींचा तो सामुहिक उद्गार आहे. वंचित बहुजन आघाडी हाही त्यापैकीच एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे या पक्षांनी त्यांचा जनाधार गोळा करणे व संघटीत करणे हे चुकीचे कसे काय ठरू शकते? याच अठरापगड शोषित जातींच्या जनाधारावर ज्यांनी पिढ्यानपिढ्या सत्ता भोगली. त्या अठरापगड जातींनी त्यांचा जनाधार गोळा करून स्वत:चे पक्ष उभे केले, तर त्यात या अठरापगड जातींच्या आधाराने उभ्या राहिलेल्या पक्षांचा दोष काय? आमच्या विटा वापरून कुणी जर त्यांचे महाल उभे केले असतील तर, आज आम्ही जेव्हा आमच्या विटा परत घेऊन स्वत:चे घर उभारत असू आणि त्यामुळे त्यांचे महाल खिळखिळे होत असतील, त्यांच्या महालांची उंची कमी होत असेल आणि इतर कुणाचा तरी महाल त्यांच्यापेक्षा उंच ठरत असला तर त्याला आम्ही जबाबदार कसे? काँग्रेसचा महाल खिळखिळा झाला. त्याची उंची कमी झाली, काँग्रेसच्या महालापेक्षा भाजपचा महाल उंच दिसायला लागला म्हणून काय आम्ही आमचे घर बांधूच नये? असा प्रश्न प्रादेशिक पक्ष विचारायला लागले. सर्व प्रादेशिक पक्ष त्यांचा त्यांचा जनाधार वापरून त्यांचे त्यांचे पक्ष उभारत आहेत. त्यांच्या पक्ष उभारल्याने कुणाचे पक्ष छोटे झाले. कुणाचे पक्ष मोठे झाले. याची चिंता प्रादेशिक पक्षाने का करावी? त्यांनी याची चिंता करावी की स्वत:चे पक्ष उभारावे? कुणीतरी ‘लांडगा आला, लांडगा आला’ म्हणून हाकारा द्यावा. आम्ही त्यांच्या मदतीसाठी धावावे आणि त्यांनी आमच्यावरच फिदीफिदी हसावे, हा खेळ पुन्हा किती दिवस खेळायचा? भाजपनेही याच प्रकारे ‘लांडगा आला लांडगा आला’ म्हणून भारतीयांना फसवले. त्याच प्रकारे काँग्रेसही ‘लांडगा आला, लांडगा आला’ करीत मूलनिवासी, मूळ भारतीयांना फसवत आहेत व आम्ही आपले पक्ष उभारण्याचे काम सोडून त्यांच्याकडे पळत आहोत आणि ते आमच्या मुर्खपणावर हसत आहेत. यात विशेष बाब म्हणजे फसणार्‍यात सर्वसामान्य जनता नाही तर स्वत:ला अभ्यासक, विद्वान, विचारवंत, साहित्यिक म्हणवून घेणारे सुजान आहेत. एक बाब तर लक्षात घेतली पाहिजे ती ही की, भारतातील सत्तासंघर्ष हा जनाधाराच्या पळवापळवीचा संघर्ष आहे. इतर पक्षाचा जनाधार कमी करून किंवा पळवून स्वत:चा जनाधार वाढवणे हा या सत्तासंघर्षातील डावपेचाचा भाग आहे आणि हा जनाधार कमी करण्यासाठी नेत्याला, कार्यकर्त्यांना बदनाम करणे ही भारतात सर्रास घडणारी बाब आहे.

८) वंचित बहुजन आघाडीला, त्यांचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांना व त्यांचे कार्यकर्ते यांना बदनाम करणे हाही याच षडयंत्राचा भाग आहे. कारण अ) वंचित बहुजन आघाडीने इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणेच काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांमध्ये विलिन झालेला फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार स्वत:कडे घेतला. आ) हा जनाधार वंचित बहुजन आघाडीने स्वत:कडे घेतल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीला वारंवार पराभवाला सामोरे जावे लागले. इ) साठ-सत्तर वर्षात काँग्रस-राष्ट्रवादी पक्षांनी जे साम्राज्य उभे केले होते ते अडचणीत आले. ई) वारंवार पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचा निवडणूकीचा खर्च अवाढव्य वाढला. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांना कुठल्याही प्रकारे सत्ता मिळवायची आहे. यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार त्यांच्याकडे घ्यायचा आहे. उ) हा जनाधार वंचित बहुजन आघाडीकडे संघटित झाल्याने त्यांना तो त्यांच्याडे घेणे अवघड चालले आहे. हा जनाधार वापस घेण्यासाठीच ते वंचित बहुजन आघाडीचा ‘बी’ टीम म्हणून प्रचार करीत आहेत.

९) याच ठिकाणी आणखी एक बाब विचारात घेतली पाहिजे की, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे राजकारण उभे राहू दिले जात नाही त्या मागे जशी ही आजची काही कारणे आहेत तशीच काही ऐतिहासिक कारणेही आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण स्वतंत्रपणे उभे राहू नये यासाठी तत्कालीन काँग्रसेने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी साऊथबरो कमिशनच्या निवेदनापासून भारतातील शोषित-पीडितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. म्हणजेच पर्यायाने स्वत:च्या स्वतंत्र राजकारणाच्या उभारणीचा प्रयत्न केला होता. गोलमेज परिषदेतही याच मागणीसाठी त्यांचा महात्मा गांधींसोबत संघर्ष झाला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी मान्य करणे म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडणे असे महात्मा गांधींना वाटत होते. शिख, मुस्लीम हे स्वतंत्र धर्म आहेत म्हणून त्यांचे स्वतंत्र मतदार संघ महात्मा गांधींनी मान्य केले होते. मात्र ‘अस्पृश्य’ हे िंहदू धर्माचाच भाग आहे म्हणून त्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करता येणार नाही आणि मी जीवंत असेपर्यंत ही मागणी मान्य होऊ देणार नाही. मी याला मरेपर्यंत विरोध करेन, यात माझे प्राण गेले तरी चालेल, अशी भूमिका महात्मा गांधींनी घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण स्वतंत्रपणे उभे राहू देत नाहीत. आजही या राजकारणाला का विरोध करतात, आजही हे राजकारण स्वतंत्रपणे उभे राहू नये म्हणून का षडयंत्र करतात त्याच्या पाठीमागे हे पारंपरिक कारण आहे. या बाबतीत महात्मा गांधींची मते पुढील प्रकारे आहेत. अ) डॉ. आंबेडकर जेव्हा संपूर्ण हिंदूस्थानातील अस्पृश्यांच्या वतीने हे मागणी पत्र सादर केल्याचा दावा करतात तेव्हा हे मागणीपत्र हिंदू धर्माची फाळणी करेल असे मला वाटते. म्हणून या मोबदल्यात काहीही झाले तरी मी हिंदू धर्माची फाळणी होवू देणार नाही. डॉ. आंबेडकरांची तशी इच्छाच असेल तर अस्पृश्यांनी मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तरी मला काहीही वाटणार नाही. मी ते सहन करीन मात्र ग्रामपातळीपर्यंत हिंदू धर्म दोन तुकड्यात विभागला जावा हे मी कदापीही सहन करणार नाही. संपूर्ण शक्तीसह प्रसंगी जीवाचे मोल देवूनही मी याचा विरोध करीन (काँग्रेस आणि गांधीजी यांनी अस्पृश्यांप्रती काय केले? डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक – प्रा. देविदास घोडेस्वार, क्षितिज प्रकाशन, नागपूर, पृ ८२) आ) त्यांना विभक्त मतदार संघ देवून अस्पृश्य व सनातनी हिंदू यांच्यात भांडणे रूजवायाचा हा प्रकार आहे. (पृ.८३) इ) विभक्त मतदार संघाचे प्रावधान त्याच्यासाठी आणि हिंदू धर्मासाठीही हानिकारक आहे. (पृ. ९०) हिंदू धर्मासंबंधात विभक्त मतदार संघ (म्हणजेच स्वतंत्र राजकारण) हे धर्माचे तुकडे करण्यास आणि धर्माची वाताहत करण्यास कारणीभूत ठरणार आहे. (पृ.९०) मी धर्मप्रवण माणूस आहे आणि मी धर्मप्रवण आहे यावर माझा विश्वासही आहे. (९५) काँग्रेस – राष्ट्रवादी आणि अगदी भाजपही या सर्वच पक्षांना आजचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे व कालचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण स्वतंत्रपणे का उभे राहू द्यायचे नाही याचे कारण महात्मा गांधींच्या, काँग्रेसच्या या भूमिकेत स्पष्टपणे नमूद आहे. महात्मा गांधी व काँगे्रसची ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील शब्दात मांडलेली आहे. ‘‘गोलमेज परिषदेनंतर हिंदूच्या असे लक्षात आले की अस्पृश्य आपल्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा वाटा मागत आहेत आणि हा वाटा पूर्वी ज्यावर हिंदूंचा हक्क होता त्यातून मागितला जात आहे. हा वाटा किती असावा याचे मोजमाप त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. अस्पृश्यांचे स्वतंत्र अस्तित्व स्वीकारणे आपल्या हिताविरोधी आहे याची जाणीव हिंदूंना आली म्हणून त्यांनी सत्याचा आणि माणूसकीचा बळी देण्यासही संकोच केला नाही आणि अत्यंत सुरक्षित असा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तो मार्ग म्हणजे हिंदू समाजात कुणी अस्पृश्यच नाही असे सांगणे होय. अशा प्रकारे अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मुळावरच घाव घालण्याचा डाव त्यांनी टाकला (पृ. ८९) महात्मा गांधी व काँग्रेस यांनी अस्पृश्य समाजाचे अस्तित्वच नाकारणे, त्यांच्या राजकीय हक्कांवर घाव घालणे, त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला व राजकीय हक्काला प्राणपणाने विरोध करणे त्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चन होण्याचा मार्ग दाखवणे ही भूमिका घेतल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तहहयात अस्पृश्य समाजाचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, हिंदूंचा अस्पृश्यांशी व्यवहार, हिंदू असूनही हिंदूंच्या देवळात प्रवेश निषिद्ध, पाणवठ्यावर पाणी निषिद्ध, मनुस्मृतीने व वर्णव्यवस्थेने विविध रितीरिवाज, प्रथा-परंपरा व विधीनिषेधातून नाकारलेले माणूसपण, गोलमेज परिषदेत नाकारलेले राजकीय अस्तित्व व हक्क या विरोधात संघर्ष द्यावा लागला. या देशातील अस्पृश्य, शूद्रातिशूद्र हे या देशाचे मूळपुरूष आहेत. त्याला क्रांती-प्रतिक्रांतीच्या सत्तासंघर्षात अस्पृश्य ठरवण्यात आले असून त्याचा संबंध या देशातील गणराज्याशी आहे हे सिद्ध करण्यात व भारतीय राज्यघटनेच्या निमित्ताने भारताला त्याचा मूळ वारसा मिळवून देण्यात आयुष्य खर्ची घालावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण स्वतंत्रणपणे का उभे राहू दिले जात नाही याची ही कारणे आहेत.

१०) हे आपण समजून घेतले पाहिजे की, या देशातील फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ ही या देशाला त्याचा मूळचा समताधिष्ठित मूल्यांचा व समाज व्यवस्थेचा वारसा प्राप्त करून देणारी व टिकवून ठेवणारी खर्‍या अर्थाने राष्ट्रीय चळवळ आहे. या देशाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही या देशाची मूलभूत मूल्ये असून त्यावर होणारी धर्मांध आक्रमणे व सुधारणावादाच्या बुरख्यात लपून बसलेल्या आणि अंतिमत: धर्मांधतेला जन्म देणार्‍या खोट्या समाजवादाच्या आक्रमणापासून या देशाची समताधिष्ठित मूल्यपरंपरा अबाधित ठेवणे हे या चळवळीचे ध्येय आहे. हा या चळवळीसाठी क्रांती-प्रतिक्रांतीचा संघर्ष आहे. आज चहुबाजूने प्रतिक्रांतीचा आगडोंब पेटलेला असताना आपली जबाबदारी न ओळखता या चळवळीचा घात करणारी कृती करणे हे या चळवळीसोबत, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसोबत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत कृतघ्नता करणे ठरेल.

११) आज फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीवर जबाबदारी कोणती आहे आणि आपण काय करीत आहोत याचे भान या चळवळीला नसेल तर ही आश्चर्यकारक बाब आहे. विशेष म्हणजे ज्या चळवळीत हयात घालवली, ज्या चळवळीने अंगाखांद्यावर घेऊन मिरवले, ज्या चळवळीने मान-सन्मान दिले त्या चळवळीबद्दल व चळवळीच्या धेय्याबद्दल भान नसावे ही बाब विलक्षण व्यथित करणारी आहे. चळवळीपेक्षा व चळवळीबद्दलच्या बांधिलकीपेक्षा व्यवहारवाद, संधीसाधूपणा, खोटी आश्वासने, खोटी प्रलोभणे, मान-सन्मानाची स्वार्थी हाव महत्वाची ठरावी यापेक्षा चळवळीबददलचा कृतघ्नपणा कोणता? कालपर्यंत ज्या चळवळीने अंगाखांद्यावर मिरवले त्याच चळवळीने उद्या पायदळी तुडवले तर गार्‍हाणी कशी मांडणार? कारण अशाच परिस्थितीतून ‘दलित पँथर’ निर्माण झाली होती हे वास्तव आपल्यापुढे आहे. ज्या नेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी जनाधार काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला होता त्या नेत्यांबद्दलच्या असंतोषातूनच ‘दलित पँथर’ जन्माला आली होती. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे विरोधक विरोधाचे काम करीतच राहणार आहे. मात्र आम्ही आमच्या चळवळीबद्दल चळवळीच्या ध्येयाबद्दल किती सजग व जागृत आहोत हा महत्वचा मुद्दा आहे. हा देश भाजप म्हणतो तसा धर्मांध नाही, तो मूलत: समताधिष्ठीत आहे. हा देश सहिष्णू आहे. हा देश विचार व आचाराचे स्वातंत्र्य स्वीकारून मानवाच्या नैसर्गिक सामर्थ्याचा विकास घडवणारा आहे. हा देश मानवाची उत्क्रांती निकोप करीत जाणार्‍या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांना माणणारा आहे. भारताचा हा मूळ वारसा व भारताचे हे नैसर्गिक रूप सांभाळण्याची व त्यासाठी झटण्याची जबाबदारी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीवर आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून स्वत:ला हाडाचा साहित्यिक व अभ्यासक समजणारा एखादा वेतनभोगी (वेतनभोगी हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे.) चळवळीतल्या चारदोन विद्वान, विचारवंताचे उत्तरदायित्व स्वीकारतो. त्यांच्या मानसन्मान पतप्रतिष्ठा व मानधनाची व्यवस्था करतो. त्याचे उत्तरदायितत्व स्वीकारून धन्याने सांगितलेली फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या, राजकारणाच्या विरूद्ध कृती करायला लावतो व आमचे प्रथितयश, अभ्यासक, विद्वान, विचारवंत त्यावर माना डोलवत सह्या करतात ही बाब अत्यंत खेदजनक आहे. या चळवळीला, राजकारणाला उभे राहू देण्यात आपले नुकसान आहे असे समजणारे विरोधक विरोध करीतच राहणार आहे. त्यासाठी ते डावपेचही निर्माण करीतच राहणार आहेत. मात्र या चळवळीच्या अभ्यासक, विद्वान, विचारवंतानी डोके व डोळे बांधून त्यात सहभागी व्हावे ही बाब चळवळीसाठी चिंताजनक आहे. या घनघोर निद्रेतून जेव्हा आपल्याला जाग येईल तो दिवस फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसाठी सुवर्णक्षण ठरेल.

– प्राचार्य डॉ. संजय मून
छ. संभाजीनगर
मो. ९४२३७०५७६७

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!