मुख्य पान

वामनाच्या तीन पावलांचा अर्थ’

(गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो )

  • डॉ. आ. ह. साळुंखे

वास्तविकरीत्या ‘ऐतरेय ब्राह्मण’ नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथानं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ही तीन पावलं, म्हणजे काय तीन पावलं आहेत? मायथॉलॉजीचा ( पौराणिक कथांचा ) विचार का करावा लागतो? कारण मायथॉलॉजीमध्ये समाजशास्त्राचा इतिहास लपलेला असतो. त्यातला चमत्काराचा जो भाग आहे, काल्पनिक जो भाग आहे तो बाजूला करून घेतला आणि समाजरचनेचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला दिसतं, की त्यामध्ये ह्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये काय काय घडलेलं आहे.

या तीन पावलांचा अर्थ तिथं स्पष्ट करण्यात आलेला आहे. या तीन पावलांनी त्यानं काय मागितलं? तर पहिल्या पावलानं भूमी मागितली. पण, ती भूमी किती मागितली? तर यज्ञ करण्यापुरती भूमी मागितली. एक यज्ञ करण्यापुरती भूमी मागितली. बळीनं दिली. म्हणजे काय झालं असेल, ते सगळं आता मी मांडत नाही. काय याचा अर्थ आहे? ह्या पावलानं काय झालं? एक यज्ञ करण्यापुरती भूमी मागितली आणि त्या पावलानं त्यानं सगळी जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली असं सांगितलं जातंय. याचा अर्थ आपण ध्यानात घ्या, की ज्याच्या राज्यामध्ये यज्ञासारख्या कर्मकांडाला प्रवेश नव्हता, त्या कर्मकांडाला एकदा प्रवेश मिळाल्याबरोबर ‘भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी’ म्हणतात. तेच नेमकं घडलं, की मग त्या यज्ञयागाच्या कर्मकांडामध्ये त्या सगळ्या समाजाला बांधून टाकलं. आणि ते एकदा बांधून टाकल्यानंतर ध्यानात घ्या, की मग पुन्हा त्या लोकांना यज्ञयाग करा असं सांगण्यासाठी स्वतः जाण्याचीदेखील गरज उरली नाही. मी आज आपल्याला विचारतो, “जे लोक सत्यनारायण घालतात. त्या सत्यनारायण घालणाऱ्या लोकांच्या दारामध्ये कधी भटजी तुम्ही सत्यनारायण घाला आणि मला बोलवा, असं सांगायला आलेला आहे काय? असं मला उद्या तुम्ही सांगायला या.” म्हशीच्या गळ्यात लोढणं अडकवलं, की मग तिला दावं बांधावं लागत नाही. ते लोढणं तिला पळू देत नाही, तिथल्या तिथंच फिरायला लावतं, ध्यानात घ्या. गुलामांना एकदा त्यांचा मेंदू स्वतःच्या ताब्यात घेतला, की मग रोज उठून तुम्ही आमचं काम करा, तुम्ही आमच्यासाठी राबा, तुम्ही आमच्यासाठी कष्ट करा, आमच्या सुखसोयी आम्हाला द्या, असं सांगावं लागत नाही. त्यांचं तेच देत राहतात, त्यांचं तेच देत राहतात असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून ह्या यज्ञाच्या पावलानं काय केलं, ह्या कर्मकांडानं काय केलं? ह्या कर्मकांडानं ह्या संपूर्ण बहुजन समाजाचं मन पछाडून टाकलं, झपाटून टाकलं. हे पहिलं पाऊल.

दुसऱ्या पावलानं काय केलं? दुसऱ्या पावलानं वेद मागून घेतले, असं सांगितलंय. वेद मागून घेतले याचाही अर्थ आपण.. वेद म्हणजे चार ग्रंथ मागून घेतले, किंवा दोन पुस्तकं मागून घेतली, असा अर्थ नाही आहे. वेदांच्या आधारे ह्या समाजामध्ये शिक्षण, ज्ञान, संपत्ती, सत्ता, निर्णय घेण्याचे अधिकार, प्रतिष्ठा, साधनसामग्री या सगळ्यांचं दार म्हणजे वेदांचा अधिकार होता, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं वेदांचा अधिकार मागून घेतला, इतरांचा तो काढून घेतला. याचा अर्थ केवळ चार पुस्तकं वाचण्याचा अधिकार काढून घेतला अशी अजिबात स्थिती नाही.

आणि मग तिसरं पाऊल काय होतं? पहिल्यानं यज्ञापुरती भूमी, दुसऱ्यानं वेद आणि तिसऱ्या पावलानं वाणी मागून घेतली. वाणी मागून घेतली याचा अर्थ चळवळीतल्या लोकांनी नीट, फार काळजीपूर्वक ध्यानात घेतलं पाहिजे, असं माझं आग्रहाचं सांगणं आहे. वाणी मागून घेतली याचा अर्थ तुमचा बोलण्याचा अधिकार मागून घेतला, तुमचे विचार मांडण्याचा अधिकार मागून घेतला. याचा अर्थ तुम्ही स्वतःची सुखदुःखं मांडणार नाही, स्वतःचं जीवन मांडणार नाही, तुम्ही लिहिणार नाही, बोलणार नाही. तुमच्या वतीनं आम्ही लिहू, आम्ही बोलू, आम्ही वाणी वापरू, आम्ही भाषा वापरू. आणि म्हणून तर इतिहास घडवणारांनादेखील इतिहास लिहिता आला नाही. आणि त्यामुळं अत्यंत खोटा आणि विकृत अशा प्रकारचा इतिहास या देशामध्ये लिहिला गेला. झालेले असंख्य संघर्ष लपले. क्रांतीनंतर या देशात प्रतिक्रांती प्रत्येक वेळेला का आली? सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृती येते, ध्यानात घ्या. गौतम बुद्धांच्यानंतर मनुस्मृती येते. कबिरांसारखे संत होऊन गेल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेल्यानंतर पेशवाई येते, हे ध्यानात घ्या. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना झाल्यानंतर पन्नास वर्ष होत आहेत का नाही, तोपर्यंत तिची चिकित्सा करण्याची तयारी का होईना, तो ग्रंथ निदान वादग्रस्त अगोदर काही वर्ष बनवून ठेवायचा आणि मग हळूहळू लोकांच्या मनामध्ये तो बाजूला फेकला पाहिजे अशा प्रकारचं वातावरण.. केवळ पन्नास वर्षांमध्ये पुन्हा.. हे कशाच्या जोरावर, हे ध्यानात घ्या. वाणीच्या, भाषेच्या, प्रचाराची जी माध्यमं असतात, साधनं असतात त्यांच्या जोरावर हे केलं जातं. राईचा पर्वत केला जातो, पर्वताची राई केली जाते. अत्यंत सामान्य माणसांना नायक बनवलं जातं, महानायक बनवलं जातं. आणि अत्यंत महान अशा माणसांना सामान्य बनवलं जातं. हे वाणीच्या जोरावर बनवलं जातं आणि म्हणून बहुजन समाजानं हे पाऊल ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भाषा वापरली पाहिजे, प्रतिक्रिया दिली पाहिजे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!