कौटुंबिक विधानसभा !
प्रेमकुमार बोके
येणाऱ्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहे.या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे.महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे दोन- दोन पक्ष झाल्यामुळे आणि आयाराम गयारामची संख्या प्रचंड वाढल्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी आणि उमेदवारी देण्यासाठी उमेदवार आणि पक्षश्रेष्ठी यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.प्रत्येक पक्षामध्ये काम करणारे सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा आपल्याला तिकीट मिळावी या आशेने मुंबईत तर काही लोक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी उमेदवार निश्चित झालेले नाही.त्यामुळे यंदाची निवडणूक ही फार चुरशीची होणार असून नक्की कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे मोठमोठ्या विश्लेषकांनाही कठीण जात आहे.
त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षातील तिकिटांचा बारकाईने अभ्यास केला तर प्रत्येक पक्षात घराणेशाही फोफावली आहे.सर्व राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटे मिळाली आहे. त्यामुळे कोणीच आता एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करू शकत नाही.कोणताच पक्ष आता घराणेशाही पासून मुक्त राहिलेला नाही.नवरा, बायको,बहिण,भाऊ,दीर,पुतण्या, भाचा,काका,मुलगी,मुलगा,चुलत भाऊ,मावसभाऊ अशा नातेवाईकांना प्रत्येक पक्षामध्ये तिकिटे मिळाली आहेत.त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकाच पक्षात तिकीट मिळत नसेल तर दुसऱ्या पक्षात जाऊन तिकिटे घेण्यात आली आहे.म्हणजे एकाच घरातील लोक एकाच वेळी वेगवेगळ्या पक्षांची तिकिटे घेऊन निवडणूक लढवत आहे.इकडे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर एकमेकांसोबत वादविवाद करत आहे,भांडत आहे आणि तिकडे राजकीय पुढारी मात्र मागचा पुढचा विचार न करता तिकिटासाठी कोणत्याही पक्षात प्रवेश करीत आहे. त्यामुळे सामान्य माणूस चक्रावून गेला असून आजपर्यंत इतकी भीषण आणि विचित्र परिस्थिती आपल्या देशात कधीच निर्माण झाली नव्हती.महाराष्ट्रात सगळीकडे या कौटुंबिक तिकिटांबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.यावर्षीची विधानसभा ही नातेवाईकांनीच भरलेली दिसणार आहे आणि वेगवेगळ्या कुटुंबातील नातेवाईकांची गठीत झालेली नवी महाराष्ट्र विधानसभा *याची देही ! याची डोळा !!* आम्हाला बघायला मिळणार आहे.
यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांचे मात्र मरण होत आहे.कित्येक वर्ष पक्षासाठी,नेत्यांसाठी निष्ठावंत म्हणून अहोरात्र काम करणारे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते मरेपर्यंत कार्यकर्तेच राहणार की काय असे आता वाटायला लागले आहे.सामान्य कार्यकर्त्यांनी यापुढे आमदार,खासदार होण्याची स्वप्ने पाहू नये असे लोक बोलायला लागले आहेत.कारण राजकीय नातेसंबंध आणि प्रचंड पैसा या दोनच गोष्टीवर प्रत्येक पक्षात तिकिटे फायनल होत आहे.इकडे तिकडे एखाद दुसरा अपवाद असू शकतो परंतु बहुतांश ठिकाणी मात्र हेच चित्र महाराष्ट्रात दिसत असल्यामुळे सर्व पक्षातील तळागाळाचे निष्ठावंत कार्यकर्ते चिंतेत आहे.या निवडणुकीत सर्व पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते उमेदवारासाठी काम करताना फार विचार करतील असे वाटते.कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी अनेक उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आलेले असतील व त्यांच्यासोबत जुळवून घेताना प्रत्येक पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना फार जड जाईल.
सामान्य कार्यकर्ते आपल्या पक्षाशी शेवटपर्यंत निष्ठा बाळगून असतात.आपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी दुसऱ्या पक्षाच्या लोकांसोबत भांडणे करतात.चांगले संबंध खराब करतात आणि आपल्या पक्षाला मोठे करण्यासाठी कोणतेही काम करण्यास तयार असतात. पक्षनिष्ठा हा त्यांच्यासाठी फार जिव्हाळ्याचा आणि भावनेचा विषय असतो.परंतु नेते मात्र सध्याच्या काळात पक्षनिष्ठा बाळगताना फारसे दिसत नाही.पूर्वी पक्षनिष्ठा आणि विचारधारा यांना राजकारणात फार महत्त्व होते.परंतु आता केवळ निवडून येणे या एकाच गोष्टीला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे निष्ठा,विचार, बांधिलकी,समर्पण,त्याग या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. परंतु सामान्य कार्यकर्ता अजूनही आपल्या पक्षासाठी काहीही करायला तयार असतो ही मात्र फार आश्चर्याची गोष्ट आहे.प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी आपल्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून ही गोष्ट खरोखर शिकण्यासारखी आहे.कोणतेही राजकीय,आर्थिक लाभ न मिळता प्रत्येक पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी वेळ,श्रम,बुद्धी, कौशल्य,पैसा या सगळ्या गोष्टी खर्च करतात.तरीसुद्धा त्यांच्या पदरात फार काही पडत नाही.यावर्षीचे महाराष्ट्रा विधानसभेचे तिकीट वाटपाचे चित्र पाहता यापुढे आमदार,खासदार होण्याची कोणतीही संधी सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार नाही हे नक्की आहे.कारण यावर्षीची महाराष्ट्राची विधानसभा ही वेगवेगळ्या पक्षाच्या नातेवाईकांनी मिळून तयार होणार आहे.म्हणूनच याला *कौटुंबिक विधानसभा* म्हटले तरी काही वावगे होणार नाही.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत