तुमच्या अहंकाराच्या बाॅम्ब वर्षावात
तुमच्या अहंकाराच्या बाॅम्ब वर्षावात
जगणे उद्ध्वस्त झालेली ही लहानगी
कुठे निघाली आहे?
हे कसले कागद आहेत तिच्या हातात?
काय कोरले आहे या कागदांवर?
आणि ती लिपी नेमकी कोणती आहे?
या कागदांवर कुठे सापडेल का करुणेचा डाग?
आता कुठे असतील हे कागद बनवणारे हात?
जीवनमरणाच्या संघर्षातही
नेमके काय सांभाळू पाहाते आहे ही मुलगी जिवापाड?
ऐकू येतो का तुम्हाला तिचा आकांत?
आजूबाजूला सडलेल्या प्रेतांचे खच,
आणि कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश आवाज
त्यातून वाट शोधत कुठे निघाली आहे ती?
ती नव्हे माझ्या वंशाची, मुलखाची आणि धर्माचीही
तरीही प्रेमाची एकसमान भाषा आहे तिच्यामाझ्यात
या कोलाहलातही
या इतक्या दूरवर मला ऐकू येतोय तिचा आकांत
सुरु होण्याआधीच जगणे हरवलेला तिचा प्रवास
आणि तरीही तिच्यासाठी काहीही करु शकत नाही मी
केवळ कविते शिवाय…
इस्त्रायलगाझा संघर्ष
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत