नळदुर्गच्या घाटातील खड्ड्यांमुळेच पोलीसाला जीव गमवावा लागला
संबंधीत विभागावर मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करण्यात यावा संतप्त नागरीकांची मागणी
—————————————- हायवे बायपासचे काम तात्काळ करा अन्यथा अंदोलनाला सामोरे जा लहुजी शक्तीसेनीची डरकाळी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील घाटात राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातामध्ये दि. 19 ऑक्टोबर रोजी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला आहे तर
एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.या अपघात प्रकरणी संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली आहे.
दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.40 वा.सोलापुर –हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर नळदुर्ग जवळील घाटात मस्जिद जवळ कंटेनर आणि मोटार सायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भिषण अपघातामध्ये मोटारसायकल क्र. एम. एच. 25 ए टी 1712 वरील पोलिस कर्मचारी उमरगा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हिराचंद दिनकर मुळे वय 30 वर्षे हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर त्यांचे सहकारी गहिनीनाथ विठ्ठल बिराजदार वय 32 हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही पोलिस कर्मचारी उमरगा येथील पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आपली सेवा संपल्यानंतर ते मोटार सायकल वरून धाराशिव कडे जात असतांना नळदुर्ग जवळ राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 9.40 वाजता पाठीमागुन आलेल्या कंटेनरने क्र.एन. एल. 01बी. एल. 7972 मोटार सायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्यामुळे भिषण अपघात झाला आहे. हा अपघात महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळेच झाला आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात हा भिषण अपघात झाला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याची वारंवार मागणी केल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभाग व महामार्गावरील टोलनाका चालक कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ थातुरमातुर खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे . खड्डे बुजविण्याचे काम झाल्यानंतर पुन्हा दोन, चार दिवसातच त्याच ठिकाणी खड्डा पडतो. ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्याठिकाणी महामार्गावर खड्डा पडलेला आहे. यापुर्विही याच ठिकाणी अपघात होऊन एका युवकाचा मृत्यु झाला होता तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग व टोल नाका चालविणारी कंपनी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी ही टोलनाका चालविणाऱ्या कंपनीची आहे मात्र ही कंपनी फक्त वाहन चालकां कडुन टोल वसुल करण्यातच मशगुल आहे. आज नळदुर्ग बसस्थानकासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात भले मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे महा मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांसाठी तसेच नागरीकां साठी जीवघेणे ठरत आहेत. महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत याबाबत नळदुर्ग येथील महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्य्क पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह इतर संबंधित विभागाना आठ ते दहा वेळेस पत्रव्यवहार केला आहे तरीही अद्याप हे खड्डे बुजविले गेले नाहीत. या खड्ड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे त्यामुळे या अपघातास कारणीभुत असलेल्या संबंधित विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. या अपघात प्रकरणी कंटेनर चालकावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी तात्काळ नळदुर्ग येथील हायवे पोलीस शहर पालीस घटनास्थळी भेट देऊन तेथील ट्राफीक संत गतीने सुरू करण्यात आली यावेळी हायवे पोलीस रत्नदिप कदम , बालाजी बेंबडे , राजू चव्हाण , नितीन मुळे , जमशेद काझी , पंडीत शिंदे , ज्ञानेश्वर कोव्हाळे , बिट अमलदार गायकवाड सह जिवीशाचे धनंजय वाघमारे ही घटना स्थळी गेले होते .
चौकट
सदरील राष्ट्रीय हायवे वरील खड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे यांच्या मार्गदर्शना खाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी भरले आहेत
टोल वसुल करणारी कंपनी मात्र गाड झोपी गेली आहे
चौकट
महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे हा अपघात झाला असुन हे खड्डे बुजवीण्याकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभुत ठरलेल्या टोल चालक कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच बायपास हायवेचे काम तात्काळ पुर्ण करावे अन्यथा यासंदर्भात तीव्र आंदोलन करण्याची डरकाळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी फोडली आहे. याबातची तक्रार त्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत