मताचे ‘दान’ नको मताचा ‘अधिकार’ बजावा,संविधान आणि लोकशाही बळकट करा !!
प्रोफेसर डॉ.आनंद इंजेगावकर,
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.आता कावळे-डोमकावळे येतील,साधुच्या वेषात बगळेही येतील.पुंगीवाले,लुंगीवाले येतील.हिंस्त्र श्वापदे कमरेतून वाकून तुमच्या मताचे दान मागतील.पायावर लोटांगण घेतील,तेव्हा भावनिक न होता त्यांना हाकलून लावा.मतदार जागॄत असणे हा लोकशाहीच्या भवितव्याचा पहिला निकष आहे.रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे.तेव्हा जागॄतीचा अग्नी अखंड तेवत ठेऊन आपण संविधान आणि लोकशाहीचे सुरक्षा कवच बनुयात.त्यासाठी भारतीय संविधानातील आदर्श मतप्रणाली समजून घेऊयात.
भारतीय संविधानाचा भाग पंधरा हा निवडणुकांशी संबंधित असून त्यात अनुच्छेद 324 ते 329 पर्यंत ही निवडणूक कार्यपद्धती सविस्तरपणे विशद झाली आहे.त्यातील अनुक्रमे 325 आणि 326 प्रावधानांमध्ये संविधान निर्मात्याने निवडणुकांमधील मत प्रणालीसाठी जाणीवपूर्वक मतदार,मताधिकार,प्रौढ मताधिकार असे अर्थपूर्ण शब्द योजीले आहेत.जे शब्द मतदारांना त्यांच्या मौलिक अशा मताच्या अधिकाराची जाणीव करून देत लोकशाही शासनप्रणाली बळकट आणि गतिमान करतात.आपल्याकडे असलेल्या मताच्या शस्त्राने आपणास हवी ती व्यवस्था निर्माण करु हा गर्वभाव मतदारांमध्ये निर्माण करतात.इतरांना निवडुण देताना आपणही निवडूण येऊ शकतो आणि या देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो हा विश्वास प्रत्येक मतदारामध्ये यामुळे निर्माण होतो.मताधिकार हा शब्द मतदाराला अधिकारी बनवितो.राजा बनवितो.शासनकर्ती जमात बनवितो.परंतु दुःख याचे आहे की,भारतामध्ये आजही 90 टक्के लोक मताधिकाराला ‘मतदान’ म्हणतात.मतदान,मतदाता असे शब्द भारतीय संविधानात कदापिही आलेले नाहीत.चुकूनही अशा शब्दांचा उल्लेख संविधानाच्या कोणत्याच पानावर नाही.मताधिकाराला प्रभावहिन करण्यासाठी संविधान विरोधी लोकांनी अत्यंत धूर्तपणे असे शब्द प्रचलित केले.प्रचार-प्रसार माध्यमांची सत्ता ताब्यात असल्यामुळे त्यांनी ते लोकांमध्ये रुजवले.चलाख लोकांच्या या चलाखीने भोळ्या-भाबड्या मतदारांना मताधिकारापासून तोडत मत’दाना’शी जोडले.दान हा शब्दप्रयोग पवित्र भावनेने काहीतरी देऊन पुण्य पदरी पाडून घेणे या अर्थाचा सूचक असल्यामुळे अज्ञानी लोक धार्मिक भावनेने जसे अन्नदान,पाणीदान,कपडेदान करतात याप्रमाणेच ते मतदानाकडे पाहतात.तो आपला अधिकार आहे हे त्यांच्या चुकूनही लक्षात येत नाही.मत ही दान देण्याची वस्तू नाही ती अधिकाराने बजावणाची बाब आहे.दातॄत्वभावे कोणाच्या चरणी अर्पिण्याची बाब नाही तर सद्सद्विवेकबुद्धिने वापरण्याची बाब आहे.आपल्या एका मतामुळे देशाची शासनव्यवस्था उलथू शकते ही मताधिकाराची ताकद आहे.यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर 24 जानेवारी 1936 रोजी सोलापूर येथे म्हणाले होते, ‘ तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका,तुमच्या प्राणाइतकीच किंबहुना जास्तच तुमच्या मताची किंमत आहे,हे विसरु नका.’ भारतीय नागरिकांनी एवढा महान मताधिकार मतदानात तोलणे हा लोकशाहीसाठी धोका आहे,असे बाबासाहेबांना सुचवायचे होते.मताच्या संदर्भात लोकांमध्ये भविष्यात बेफिकीर वॄत्ती बोकाळेल आणि त्याचा फायदा धनदांडगे लोक घेतील ही भीती बाबासाहेबांना होती.आज तसेच घडत आहे.लोकशाहीमध्ये शब्द हे शस्त्राचे काम करतात परंतु तेच शब्द आकलना अभावी लोकशाहीची हत्या करतात.म्हणून लोकशाहीविरोधी लोकांनी प्रतिष्ठीत केलेला ‘मतदान’ हा शब्द मतदारांनी झिडकारुन द्यावा.स्वत:ला मताधिकाराच्या धारदार शस्त्राने परजून घ्यावे.तरच संविधान आणि लोकशाही आपल्या देशात जीवंत राहील.मताच्या अधिकाराला कमजोर बनवून संविधानाला समाप्त करण्याचे हे षडयंत्र भारतीय मतदार नक्कीच समजून घेतील…धन्यवाद.जय संविधान,जयभीम,जय भारत !!
प्रोफेसर डॉ.आनंद इंजेगावकर,परभणी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत