” मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही “-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रा. गंगाधर नाखले
“मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही”अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत केली होती.
आपला मृत्यू त्यांना समोर उभा आहे असे दिसत असताना सुद्धा 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी नागपुरात लाखो अनुयायांच्या साक्षीने बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्या प्रतिज्ञाची पूर्तता केली.
15 ऑक्टोबरला दीक्षा मंडपात केलेल्या भाषणात 21 वर्षांपूर्वी केलेल्या प्रतिज्ञाची त्यांनी श्रोत्यांना आठवण करून दिली आणि म्हटले,”मला इतका आनंद झाला आहे. हर्ष वायुच झालेला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटत आहे”
(चां. भ. खैरमोडे, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, चरित्र खंड बारावा 1992 पृष्ठ क्रमांक 42)
13 ऑक्टोबरला वार्ताहारांना मुलाखत देताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले,”मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की कमीत कमी हानिकारक मार्ग मी स्वीकारीन. तदनुसार आता बौद्ध धर्म स्वीकारून मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृत्यच करीत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचेच अंग आहे.”(कित्ता, पुस्तक क्रमांक 32)
हिंदू धर्माविषयी डॉक्टर आंबेडकरांच्या मनात तिटकारा निर्माण झाला असला तरी हिंदू धर्म म्हणजे भारतीय संस्कृती असे समीकरण ते मांडत नसत. संस्कृती ही संज्ञा ते व्यापक अर्थाने वापरत असत.
जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी किंवा मुसलमानी केलेल्या स्तुतीला बळी पडले असते तर आपल्या म्हणजेच हिंदूंच्या समस्या फार तीव्र बनल्या असत्या.
5 डिसेंबर 1956 च्या रात्री म्हणजेच मृत्यूपूर्वी काही तास आधी डॉक्टर आंबेडकरांनी द बुद्ध अँड हिज धम्म या इंग्रजी ग्रंथामध्ये त्यांनी काही किरकोळ दुरुस्त्या करून मसुद्यास अंतिम रूप दिले.(सविता आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात, 1990, पृ. 279 ते 283)
इंग्रजी चौथी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या वर डॉक्टर आंबेडकरांच्या जाती बांधवांनी केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरून भिवा रामजी आंबेडकर यांचे कौतुक केले. केळुसकर मास्तरांनी मराठी बुद्ध चरित्र लिहिले होते . त्याची एक प्रत त्यांनी भिवाला भेट म्हणून दिली होती. ती वाचल्यानंतर आपण बुद्धाकडे वळलो असे डॉक्टर आंबेडकर यांनी उपोदघातात नमूद केले आहे.
बुद्धाचा धर्म हा सर्वोत्कृष्ट असल्याची 35 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर आपली खात्री पटली असेही त्यांनी उपोद घातामध्ये लिहिले आहे. पाली भाषेतील मूळ धर्मग्रंथांचे अध्ययन करण्यापूर्वी इंग्रजी विद्या घेतलेल्या अनेक भारतीयांना बुद्ध धर्माची ओळख करून देण्याचे श्रेय एडविन अर्नोल्ड च्या पुस्तकाला द्यावे लागते. 1890 पर्यंत भारतात बौद्ध धर्म ग्रंथाचा अभ्यास केलेला एकही विद्वान नव्हता.
1934 साली त्यांनी दादरला बांधलेल्या घराला राजगृह असे दिलेले नाव, 1946 व 1951साली स्थापन झालेल्या महाविद्यालयांना दिलेली सिद्धार्थ व मिलिंद ही नावे डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धर्माकडे असलेला कल दर्शवितात.
1907 साली पी. लक्ष्मी नरसु या मद्रासच्या प्राध्यापकाने ‘ द इसेन्स ऑफ बुद्धिझम ‘ हे पुस्तक प्रसिद्ध करून भारतात बौद्ध धर्माचे पुनर्जीवीन होईल असे भाकीत वर्तविले. (यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ सोळा वर्षाची होते.)
या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1948 साली प्रकाशित झाली ती डॉक्टर आंबेडकरांमुळे. त्यांनी या दुसऱ्या आवृत्तीला प्रस्तावनाही दिलेली होती. त्याच वर्षी अस्पृश्य कोण होते आणि ते अस्पृश्य का बनले या प्रश्नाचे उत्तरे देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले.
डॉ.भदंत आनंद कौशल्यायन हे कोलंबो येथील विश्व बौद्ध संमेलनात(जून 1950) सहभागी झाले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झालेल्या संभाषणाची आठवण सांगताना त्यांनी लिहिले आहे,”1956 च्या ही आधी संभवत: 1950 मध्ये बाबासाहेबांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. 1950 मध्ये ते जेव्हा श्रीलंकेत भरलेल्या विश्व बौद्ध संमेलनात भाग घेण्यासाठी कोलंबो येथे पोहोचले तेव्हा त्यांचे एक वक्तव्य मला वाचण्यास मिळाले.
“मी बौद्ध धर्माचे अध्ययन करण्यासाठी येथे आलो आहे. श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणून कॅंडी शहर ओळखले जाते. तिथे बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था केली होती. मी तेथे त्यांना भेटण्यासाठी गेलो. त्यांना मी प्रश्न विचारला,”बाबासाहेब, अध्ययन तर आपण सर्वजण करीतच असतो. बौद्ध होण्यापूर्वी आपण अध्ययन करीत आहात की बौद्ध झाल्यानंतरचे हे आपले अध्ययन सुरू आहे.” ते म्हणाले,”अरे, मी नुसता बौद्ध नाही. त्यापेक्षा मी अधिक आहे. मी बौद्ध धर्म प्रचारक आहे.”
(भदंत आनंद कौशल्यायन, बोधी-द्रुमके कुछ पत्र 1986, पृ. 45)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपलब्ध साहित्य वाचल्यानंतर, उपलब्ध पुराव्याची छाननी केली असता 1 मे 1950 रोजी दिल्लीतच डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पत्नी समवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असावी असे अनुमान केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
डॉ.सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे, रंगून येथे भरलेल्या बौद्ध धर्म परिषदेसाठी 1 डिसेंबर 1954 रोजी दिल्लीहून प्रयाण करण्यापूर्वी,”कितीतरी अगोदर साहेबांनी व मी वैयक्तिक रित्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. मला नक्की तारीख आठवत नाही एके दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही मोटारीने दिल्लीतील बिर्ला मंदिरात बौद्ध विहारात हजर झालो. त्या ठिकाणी त्रिसरण व पंचशील ग्रहण करून म्हणते आर्यवंश यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहिती आहे महास्थवीर भदंत आनंद कौशल्ययन यांनी काही वर्षांपूर्वी या घटनेचा आकाशवाणी वरील एका मुलाखतीत उल्लेख केल्याचे मला आठवते (डॉ. सविता आंबेडकर, डॉ.आंबेडकरांच्या सहवासात 1990, पृष्ठ क्रमांक 230)
याचा अर्थ असा आहे की वैयक्तिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविता आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा 1950 मध्येच दिल्ली येथील बुद्ध विहारांमध्ये घेतली होती. याचा प्रचार सार्वजनिक व्हावा यासाठी आणि आपल्या अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायासह बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन जाहीर रित्या धर्मांतर केले.
प्रा. गंगाधर नाखले
14 ऑक्टोबर 2024, म्हणजेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त हा लेख लिहिलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत