धम्मचक्र प्रवर्तन धर्मांतर आणि अशोक विजयादशमी”
समाज माध्यमातून सभार
मित्रांनो, आपण प्रगतिशील विचारांचे वारसदार आहोत, त्याचे वाहक आहोत आणि म्हणून काही अनावधानाने झालेल्या चुकीच्या गोष्टींचे आपण पुनर्विचार केला पाहिजे. कृपया हा लेख नीट वाचा (नुसता लाईक करू नका), चिंतन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा.
भ. बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर, सारनाथ येथे सर्वात प्रथम त्यांनी पांच भिक्खूंना धम्माची व्याख्या सांगितली. धम्माची तत्वे सांगताना त्यात चार अरिय सत्य, अरिय अष्टांगिक मार्ग, प्रतित्यसमुत्पाद, कार्यकारणभाव, अनित्यता आणि अनात्मा ही तत्वे सांगितले. एका धम्माची तत्वे सर्वात पहिल्यांदा सांगितली गेल्यामुळे, म्हणजेच धम्माचे चक्र पहिल्यांदाच फिरवल्यामुळे या दिवसाला “धम्मचक्रप्रवर्तन दिन” असे म्हणतात. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असल्याने आणि भ.बुद्धांसारख्या गुरूने आपल्या शिष्यांना प्रथमच संपूर्ण ज्ञान दिल्याने या पौर्णिमेला “गुरु पौर्णिमा” असे म्हणायला सुरुवात झाली. बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील हीच आषाढ पौर्णिमा धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून साजरी करण्यात येते. बुद्धोत्तर काळात देखील ही पौर्णिमा बौद्ध संस्कृतीचा अविभाज्य अंग बनली. म्हणजेच बुद्धांसारखा महापुरुष जेव्हा पहिल्यांदाच धम्माचे विचार मांडतात तेव्हा ते “धम्मचक्रप्रवर्तन” असते! या पांच भिक्खुंच्या नंतर अनेकजण बुद्धांच्या धम्माकडे आकर्षित झाले तेव्हा त्यांना बुद्धांनी “धम्मदीक्षा” दिली. या नवदीक्षित भिक्खूंना जेव्हा बुद्धांनी देशना दिली तेव्हा ते “धम्मचक्रप्रवर्तन” नव्हते, तर ती “धम्मदेशना’ होती! भ. बुद्धांच्या पंचेचाळीस वर्षांच्या धम्मप्रचार व प्रसार काळात, त्यांनी हजारों लोकांना धम्माची दीक्षा दिली आणि भिक्खू-भिक्खुणी संघ वाढत गेला. आज देखील ही परंपरा सुरु आहे आणि जगभरात लोकं बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. याचाच अर्थ भ.बुद्धांनी धम्माबद्दल पहिल्यांदा सांगितले तेव्हा ते “धम्मचक्रप्रवर्तन” होते. बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्यांनी “धम्मदीक्षा घेतली” असे म्हटले जाऊ लागले.
इ.स.पूर्व तिसरे शतक हा सम्राट अशोक यांचा उदयकाळ! एका साम्राज्याचा वारसा लाभलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी राजा अशोक यांनी अनेक राज्ये काबीज केली आणि आपले अफाट साम्राज्य स्थापित केले. बुद्धांच्या विचाराने प्रेरित होऊन हा सम्राट बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. सतत दहा दिवस चाललेल्या या विजयोत्सवाला “अशोक विजयादशमी” म्हणून प्राचीन भारतात ओळखले जात होते. बौद्ध धम्माने आपल्या मानवतावादी विचाराने एक तलवारीवर मिळवलेला हा विजय होता! सम्राट अशोकाच्या काळात आणि त्यानंतरही बृहद्रथ या शेवटच्या मौर्य राजा पर्यंत हा दिवस “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जात असे. बुद्धविचाराचा सर्व दिशांना प्रसार व्हावा म्हणून सम्राट अशोकांनी धम्मप्रचारकांना वेगवेगळ्या दिशेला पाठवले. चारही दिशांकडे, पाठीला पाठ लावून बसलेले सिंह हे स्तंभशीर्ष शिल्प सम्राट अशोकांच्या धम्मप्रसाराचा लोगो होता. ते त्यांचे राजचिन्ह होते ते याच कारणासाठी! नंतरच्या काळात बृहद्रथ मौर्य याची हत्या त्याचा सेनापती, पुष्यमित्र शुंग याने कपटाने केली आणि बौद्ध धम्माच्या विचाराने चालणारे राज्य संपुष्टात येऊन वैदिक परंपरेचा कट्टर समर्थक असलेल्या शुंगाचे राज्य आले. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध धम्माचे विचार नष्ट करण्यासाठी, त्याचे प्रचारक असणारे बौद्ध भिक्खू यांना मारून टाकण्यासाठी प्रत्येक भिक्खूच्या हत्येसाठी शंभर सोन्याचे कार्षापण (नाणे) बक्षीस जाहीर केले. राज्यात असलेल्या #साठ (६०)#हजारभिक्खूंचीकत्तलहीसोन्याच्या कार्षापणाची जणू काही लूट होती! मात्र तरीही बौद्ध धम्म संपूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. इ.स.पूर्व सहाव्या शतक ते इ.स. दहावा शतकापर्यंत त्याचा प्रसार भारताच्या इतर राज्यात आणि विदेशात होत राहिला. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून बौद्ध धम्माचा ऱ्हास होऊ लागला. वैदिक परंपरेतून सुरु झालेल्या हिंदू धर्माने बुद्धविचार संपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये महत्त्वाचे असलेले दिवस, सण, सोहाळे यांचे नामकरण सुरु होऊन त्यांना नवीन अर्थ देण्यात आला. सम्राट अशोकांनी सुरु केलेला “अशोक विजयादशमी” याचे नामकरण विजयादशमी किंवा दशहरा किंवा दसरा असे झाले. याच सणाला दहा तोंड असलेल्या रावणाला मारण्याची प्रथा सुरु झाली. मुळात हे प्रतीक आहे. सम्राट अशोक यांच्यासह बृहद्रथ पर्यंत दहा मौर्य राजे होऊन गेले आणि ते सर्व बौद्ध धम्माचे पालन करणारे होते. त्यांचा नाश केल्याने बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला म्हणून हे प्रतीक वापरण्यात आले. किंवा त्याचा दुसरा अर्थ असाही होतो कि बुद्धविचार (दशबल युक्त) नष्ट करून आनंदोत्सव साजरा करणे याचेही ते प्रतीक असू शकते.
१९५६ साली जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्या आधी लोकांना जाहीर आवाहन करताना, प्रबुद्ध भारताच्या दि. २३ सप्टेंबर १९५६च्या अंकात बाबासाहेब लिहितात, “बौद्धधर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्यास ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म-दीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल”. यावेळेस जे आवाहन पत्रक काढण्यात आले त्यात भारतीय बौद्धजन समिती, नागपूर शाखेचे चिटणीस, वामन गोडबोले “सामुदायिक धर्मांतर” या मथळ्याखाली लिहितात, “भारतीय बौद्धजन समितीचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धधर्मग्रहणविधी ब्रह्मदेशीय पूज्य भिक्षु चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते नागपूर येथे रविवार ता.१४ ऑक्टोबर १९५६ विजया दशमीचे दिवशी सकाळी ८ वाजता साजरा होईल”. याचा अर्थ बाबासाहेब स्वतः या घटनेला “धर्मांतर” असे म्हणतात किंवा गोडबोले या घटनेला “बौद्धधर्मग्रहणविधी” असे म्हणतात. येथे हे लक्षात घेतले पाहिचे कि दोघेही जण या घटनेला “धम्मचक्रप्रवर्तन” म्हणत नाही कारण तो या ऐतिहासिक घटनेसाठी योग्य शब्द नव्हे!
मग धम्मचक्रप्रवर्तन हा शब्द १९५६ साली आला कोठून? प्रबुद्ध भारतच्या २९ सप्टेंबर १९५६ च्या अंकात पहिल्याच पानावर छापले होते, “धर्मचक्राच्या नवप्रवर्तनासाठी चलो नागपूर! डॉ.बाबासाहेब यांचा बौद्ध दीक्षा समारंभ, विजयादशमी, १४ ऑक्टोबर सुप्रभाती”. परंतु याच प्रबुद्ध भारतच्या ४ ऑगस्ट १९५६ च्या अंकात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ती म्हणजे, “भारतीय बौद्धजन समिती नागपूर शाखेच्या विद्यमाने आषाढी पौर्णिमेस ता.२२.७.५६ या दिवशी धम्मचक्कपवत्तन दिनानिमित्त प्राध्यापक किल्लेदार यांचे उत्कृष्ट प्रवचन झाले….संपादक” याचा अर्थ प्रबुद्ध भारताच्या संपादकांना धम्मचक्रप्रवर्तन दिन कधी असतो हे माहित होते!
बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर हा दिवस निवडला कारण १९५६ सालच्या ऑक्टोबर महिन्यातील याच तारखेला अशोक विजयादशमी म्हणजे दसरा होता. लोकांना पुन्हा या दिवसाच्या मूळ नावाकडे आणि उद्देशाकडे बाबासाहेबांना घेऊन जायचे होते. सम्राट अशोकांनी जसे संपूर्ण राज्यात आणि जगात बुद्धविचार पेरण्याचे काम केले होते तसेच काम बाबासाहेबांना करायचे होते. त्यांनी सम्राट अशोकांची राजमुद्रा ही भारताची राजमुद्रा म्हणून निवडली, भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोकचक्र विराजमान आहे, राष्ट्रपतींच्या शपथेसाठी केवळ बुद्धरुप साक्षीदार मानले गेले आहे आणि त्यांच्या आसनाच्या भिंतीमागे धम्मचक्रप्रवर्तनाय हे ब्रीदवाक्य लिहिले आहे. बाबासाहेबांच्या या मूळ उद्देशाकडे आणि त्यांच्या कृतीतून आम्हीं शिकले पाहिजे.
म्हणूनच अशोक विजयादशमी, मग ती कोणतीही तारीख का असेना, (यावर्षी 12 ऑक्टोबर आहे) हाच दिवस आम्हीं धर्मचक्रप्रवर्तन दिन न म्हणता, “धर्मांतर दिन” अथवा “धम्मदीक्षा दिन” अथवा “धम्म स्वीकार दिन” म्हणून साजरा केला पाहिजे. म्हणजेच आपल्या सर्व संवादात “अशोक विजयादशमी आणि धम्मदीक्षा (धर्मांतर) दिनाच्या शुभेच्छा” असे वाक्य आले पाहिजे! कारण हाच दिवस बाबासाहेबांना बौद्धधम्म गतिमान करण्यासाठी अभिप्रेत होता.
हा दिवस सम्राट अशोकांच्या कार्याचा केवळ आदरच दर्शवित नाही, तर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे ते एक प्रतीक आहे आणि आपल्याला सतत आपल्या उद्दिष्टांची जाणीव करून देणारा दिवस आहे.
☸️👉🏻म्हणून या आधुनिक भारतीय बुद्धिस्ट लोकांनी (विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956चा अशोक विजयदशमी चा धम्मदिक्षा 👉🏻धर्मातर दिनाच्या दिवसाला “धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्रअनुप्रवर्तन शब्द बोलू नये “आणी आपलेच स्वतःचे मानसिक अविद्या अज्ञान दाखवून देऊ नये हिच मंगल मैत्री बौद्ध विचारवन्त यांना (नमोबुध्दाय 👉🏻नमोधम्माय 👉🏻नमोसंघाय )☸️👌🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत