मराठा आरक्षणाबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य तो निर्णय घेईल, आंदोनलकर्ते मनोज जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा असं गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे.
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, ते मिळेपर्यंत या समाजाला सोयी सुविधा देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापुरात दिली. मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी, युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलू नये असं कळकळीच आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक उद्या मुंबईत आयोजित केली असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अन्न-पाण्याविना खालावली आहे. आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी चर्चेसाठी यावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.
जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी विविध प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे, तर नांदेड मधे काल कँडल मार्च काढण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात कारंबा इथं आज युवकांनी मुंडन आंदोलन केलं. काही ठिकाणी आरक्षण समर्थनाचे फलक घेऊन मोर्चे निघत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत