दाभोळकर हत्या प्रकरणी दोघांना सश्रम जन्मठेप; तिघे निर्दोष मुक्त.

पुणे : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे भ्याड हत्याकांड 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पहाटेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली होती. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी बरेच वर्ष कसलाही पुरावा, धागा दोरा सापडत नव्हता. परंतु पुणे शहर पोलिस, दहशतवाद विरोधी पथक व CBI यांच्या अथक परिश्रमातून प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न झाला व कांहीं संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
काल तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे.
पुणे सत्र न्यायलयाकडून याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवला होता. यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश आहे. यात दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झालं आहे. त्या दोघांनाही सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तर विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यासोबतच पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्याने त्यांना न्यायलयाने निर्दोष ठरवलं आहे. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी या प्रकरणाचा संपूर्ण निकाल जाहीर केला आहे.
दरम्यान मुक्ता दाभोलकर यांनी निकालावर आंशिक समाधान व्यक्त केले आहे परंतु निर्दोष मुक्त झालेल्या विरूध्द हाय कोर्टात न्याय मागणार असल्याचे सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत