मराठी आणि पालि भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या केंद्र सरकारचे निःसंकोचपणे आभार!
– प्रा आनंद देवडेकर
मुंबई दि. ( प्रतिनिधी ): धम्म स्वीकाराच्या ऐतिहासिक घटनेनंतर बौद्ध धम्म, पालि भाषा, धम्मलिपी, बौद्ध स्थापत्य व पुरातत्त्व इत्यादी क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं धम्म मिशन गतिमान करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या कष्टाचं फळ म्हणजेच सुमारे अडीच हजार वर्षांची समृद्ध साहित्यिक परंपरा असलेल्या पालि भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा होय. पालि आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या केंद्र सरकारचे म्हणूनच आम्ही निःसंकोचपणे आभार मानायला हवेत. असे सुस्पष्ट प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांनी येथे केले.
मराठी व पालि भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने फोर्ट मुंबई येथील सिद्धार्थ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अभिजात भाषा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी होते.
पालि भाषेच्या विकासाशी आणि पालि त्रिपिटक साहित्याशी संबंधित माहितीची मुद्देसूद मांडणी करून प्रा. देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पालि सोबतच मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं आपला प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झाला आहे. मराठी भाषेत आजही वापरात असलेल्या काही पालि शब्दांची उदाहरणे देऊन प्रा. देवडेकर म्हणाले की, या दृष्टीने काही संशोधन झाल्यास या अभिजात भाषा भगिनींच्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश पडून मराठी भाषेच्या उत्पत्तीचा नवा सिद्धांत समोर येईल.
सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत असतानाच्या आपल्या आठवणींना उजाळा देत प्रा. देवडेकर म्हणाले की, कॉमर्सचे ॲडमिशन कॅन्सल करून आर्ट्सला प्रवेश घेताना उशीर झाल्याने पालि विषय घेतला तरच ॲडमिशन मिळेल अशी मला अट घातली गेली होती. त्यावेळी पालि विषय शिकविणारे श्रीलंकन भिक्षू प्रा. के आनंद आणि प्रा. मिनेजिस यांनी शिकविलेल्या पालि भाषेची शिदोरी आजन्म माझ्या सोबत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी पालि विभाग प्रमुख प्रा. विनोद भेले, मराठी विभाग प्रमुख डॉ. पद्माकर तामगाडगे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड इत्यादींचीही या कार्यक्रमात प्रसंगोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय मोहिते यांनी केले. तर पालि भाषेचे विद्यार्थी आणि पालि भाषेचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रतिष्ठित ज्येष्ठांच्या भरगच्च उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. नरेश लाडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
Good coverage of the Pali Bhasha Gaurav Din celebrated in Siddharth Collage.
thank u