रिपब्लिकन पक्ष स्थापना दिन : ३ ऑक्टोबर
रिपब्लिकन पार्टीचे जन्मदाते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जय भीम मित्रांनो,
आपल्या सार्वजनिक जीवनाचे जे तीन अविभाज्य घटक आहेत ते प्रामुख्याने सामाजिक, धार्मिक आणि राजकीय या स्वरूपात मांडल्या गेले आहेत. इतरही उपघटक लक्षात घेण्याजोगे आहेत जसे शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी. पण ते वरील तीन मुख्य घटकांचाच उपभाग गणल्या जाऊ शकतात. तेव्हा आपण वरील तीन नमूद केलेल्या घटकांपैकी राजकीय घटक लक्षात घेतले असता आपल्या चळवळीची राजकीय भूमिका इतिहासात कशी होती हे समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. बाबासाहेबांनी जन्मास घातलेल्या स्वतंत्र मजूर पक्ष (ILP) ते श्येड्युल्ड कास्ट फेडरेशन (SCF) आणि नंतर शेवटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) हा प्रवास आपल्या स्वाभिमानी राजकीय चळवळीचा भाग राहिलेला आहे. परंतु रिपब्लिकन पार्टी च्या जन्माला घेऊन, तिच्या स्थापनेविषयी समाजात बराच संभ्रम पसरलेला दिसतो. हा संभ्रम काही ब्राह्मण्यग्रस्त हिंदू बहुजनांनी हेतूपरस्पर पसरविला कि काय असे वाटले तर त्यात आपणांस वावगे वाटू नये. कारण या पक्षाची स्थापना कशी झाली याचे अंतरंग या ब्राह्मण्यग्रस्त हिंदू बहुजनांनी समजून घेतलेले नाहीये. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातील काही महत्वाच्या बाबींचे सूक्ष्म अवलोकन करणे गरजेचे ठरते. मित्रांनो, कोणत्याही संघटनेची स्थापना होण्याची एक निश्चित अशी रीत आहे, जनमानसात प्रचलित पद्धत आहे. ती कशी हे आपण आधी समजून घेऊ या.
बाबासाहेबांनी सर्वप्रथम स्थापित केलेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेच्या स्थापनेचा इतिहास बघू या. खालील वृत्तांताचे आपण काळजीपूर्वक अवलोकन केल्यास काही महत्वाच्या बाबी आपल्या लक्षात येतील. स्थापनेचा वृत्तांत खालीलप्रमाणे आहे..
तारीख ९ मार्च १९२४ ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये संध्याकाळी ४ वाजता समाजसेवकांची बैठक झाली. संस्थेला ‘बहिष्कृत हितकरिणी सभा’ हे नाव द्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविले व ते मंजूर करण्यात आले. Educate, Agitate and Organise (शिकवा, चेतवा, संघटित करा) लोकांना सुशिक्षित करा, त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा, असे सभेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरविले. त्यांनंतर ही संस्था दिनांक २० जुलै १९२४ ला स्थापन झाली असे जाहीर झाले. (संदर्भ- खंड १८ भाग १, पान क्रमांक ११)
वरील उताऱ्यातून आपल्या हे लक्षात येते की कोणत्याही संस्थेची स्थापना खालीलप्रमाणे होत असते.
१) समाजसेवकांद्वारे संस्था स्थापनेचा ठराव पारित करणे
२) संस्था स्थापनेच्या झालेल्या ठरावाची जनतेसमक्ष जाहीर घोषणा करणे
आता आपण SCF (श्येड्युल्ड कास्ट्स फेडरेशन) या आपल्या तेव्हाच्या राजकीय पक्षाची स्थापना कशी झाली हे थोडक्यात समजून घेऊ या. म्हणजे पक्षाची स्थापना कशी केल्या जाते ह्याबाबत अधिक स्पष्टता येईल.
अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद ( The All India Depressed Classes Conference ) दिनांक १८, १९, २० जुलै १९४२ रोजी मोहन पार्क (सध्याचे कस्तुरचंद पार्क मैदान) नागपूर येथे भरविण्यात आली होती. त्यातील १८ जुलै १९४२ चा मजकूर खालीलप्रमाणे लिहिलेला आहे. ‘The Subjects Committee of the Third All-India Depressed Classes Conference, consisting of all the delegates, met at 9 p.m. in the hall of the Mohan Park Hotel, with the President, Rao Bahadur N. Shivraj in the Chair and discussed the draft resolutions. After a session lasting for four hours, the Subjects Committee unanimously agreed upon the resolutions to be placed before the open session of the conference.’ याचा अर्थ समाज सेवकांच्या/पुढाकार घेणाऱ्यांच्या बैठक सभेत (विषय समिती) आधी काही महत्वाचे ठराव एकमताने पारित केल्या गेलेत. त्याला Subjects Committee’s Sittings असे संबोधल्या गेले..ती बैठक रात्री ९ वाजता सुरु झाली आणि ४ तास चालली..म्हणजे मध्यरात्री १ वाजेपर्यंत…आणि त्यातून काही निश्चित असे ठराव पारित करण्यात आले. हे अगदीच स्पष्ट होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जुलै १९४२ ला सकाळी १० वाजता राव बहादूर एन शिवराज यांच्या चेअरमनपदी (In the Chair) परिषदेची सुरुवात झाली. त्यांनी घोषणा केली कि, Subjects Committee ने एकूण पाच ठराव पारित केलेले आहेत..जे परिषदेतील जनतेपुढे मांडण्यात आले आणि त्यातील ५ व्या क्रमांकाचा ठराव हा खालीलप्रमाणे आहे…Resolution V : Establishment of All-India Scheduled Castes Federation. (उर्वरित ठरावातील मजकूर खंड १७, भाग ३ मध्ये वाचून घ्यावा.)
याला ‘पक्षाच्या/संस्थेच्या स्थापनेबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची जनतेसमक्ष घोषणा करणे’ असे संबोधल्या जाते…यानंतर ‘पक्षाच्या घटनेनुसार तिची अंमलबजावणी करण्याचे निश्चित’ करण्यात येते. हे आपणा सर्वांना सुपरिचितच आहे. असे असले तरीही SCF ची स्थापना दि. १९ जुलै १९४२ या दिवशी झाली असेच म्हणण्याचा जनमानसात प्रघात आहे. अगदी तसेच ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ विषयी सुद्धा त्याच परीने झालेले आहे.
दि.३० सप्टेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६, अलीपुर रोड, दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी, आपल्या तेव्हाच्या SCF च्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठक बोलावून सर्वांसमक्ष ‘SCF ला बरखास्त करण्याचा ठराव एकमताने पारित करून’ धर्मांतरानंतर आपण श्येड्युल्ड कास्ट्स चा घटक राहणार नसल्यामुळे RPI ला (ठराव क्रमांक/Resolution No.2 नुसार) जन्म दिला व धर्मांतराच्या आदल्या दिवशी दि.१३ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत तसे स्पष्टीकरणही दिले की, “धर्मांतरानंतर मी श्येड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा सदस्य राहणार नाही तसेच माझा नवा पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार असून मी पक्षाची घटनाही लिहिलेली आहे.” आणि म्हणूनच रिपब्लिकन पक्षाच्या घटनेचे अवलोकन केल्यास, त्याचा अभ्यास केल्यास बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच रिपब्लिकन पार्टीसाठी ‘मानव मुक्तीची तत्वे, धोरण व कार्यक्रम’ आखून दिलेले आपल्या निदर्शनास येते हे विशेष ! यानंतर दि.१४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतर केल्यावर अवघ्या काही दिवसांतच त्यांचे महापरिनिर्वाण झाले व बाबासाहेबांच्या तालमीत वाढलेल्या आपल्या तेव्हाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पुढाऱ्यांनी अगदीच तोंडावर येऊन पडलेल्या फेब्रुवारी-मार्च १९५७ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या पक्षाची (RPI) घोषणा करण्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आपल्या नव्या राजकीय पक्षाची जनतेसमक्ष घोषणा दि. ३ ऑक्टोबर १९५७ साली लाखो अनुयायांच्या समक्ष दीक्षाभूमी नागपूर येथे केली व पुढे रिपब्लिकन पार्टी चा गौरवशाली सुवर्ण इतिहास या देशास दिलेला आहे. तेव्हा ती फक्त संकल्पना होती असे म्हणणे बालीशपणाचेच होईल असे आम्हांस वाटते.
वरील सर्व विवेचनातून कुठल्याही पक्षाच्या वा संस्थेच्या स्थापनेची एक निश्चित पद्धत असते हे स्पष्ट होते. ज्यात खालील बाबींचा समावेश होतो.
1) सर्वप्रथम समाज सेवकांकरवी संस्थेच्या स्थापनेचा ठराव एकमताने पारित होतो. (आरपीआय बाबत दि.३० सप्टेंबर १९५६/ स्थापनारंभ दिन)
2) नंतर संस्थेच्या स्थापनेबाबत पारित झालेल्या ठरावाची रीतसर जनतेसमक्ष जाहीरपणे घोषणा केल्या जाते. (आरपीआय बाबत दि. ३ ऑक्टोबर १९५७ ला दीक्षाभूमी नागपूर येथे पक्षाचे लोकार्पण/ स्थापनापूर्ती दिन)
नंतर संघटनेच्या घटनेची रितसर अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात येते. (आरपीआय बाबत दि. १० मार्च १९५९)
आता वरील विवेचनाद्वारे हे स्पष्ट होते कि, ज्या दिवशी जनसभेपुढे पक्षाची घोषणा केल्या जाते त्या दिवसाला ‘पक्ष स्थापना दिवस’ म्हणण्याचा प्रघात आहे. तेव्हा दि. ३ ऑक्टोंबर १९५७ हा लोकमान्यतेनुसार त्यास रिपब्लिकन पक्ष स्थापना दिवस म्हटल्या जातो. हे सुज्ञ व अभ्यासू जनतेने लक्षात घ्यावे. आपले दुःख असे की, त्या दिवशी बाबासाहेब हयात नव्हते. परंतु त्यांच्याद्वारे लिखित रिपब्लिकन पार्टी च्या सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानाच्या रूपाने ते आमच्यात सदैव वास करीत आहेत आणि सदोदित राहतील.
मित्रांनो एक गोष्ट नेहमीच बोचते ती अशी कि, ‘बाबासाहेबांची RPI हि एक नुसती संकल्पना होती’ असे म्हणणे म्हणजे बाबासाहेबांनी त्यांचे कार्य अपूर्ण ठेवले आहे असे समाजास भासविणे होय. सम्यक संकल्प (Resolution) व संकल्पना (Concept) यातील भेदरेषा लक्षात न घेता पुढे ‘बाबा तेरा मिशन अधुरा…म्हणून काही ब्राह्मण्यग्रस्त बहुजनांनी जोमाने प्रचार-प्रचार केला. वस्तुतः बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात संकल्पित (Resolution) केलेले सर्वच कार्य त्यांच्या महापरिनिर्वाणापूर्वी/मृत्यूपूर्वी त्यांनी पार पाडलेले आहेत.
१) विविध जात-धर्म-वंश-भाषा यात विभागलेल्या देशाला एकसूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता व मैत्रीच्या मार्गाने प्रवासरत राहण्यास कायदाबद्ध करणाऱ्या भारतीय संविधानाची (Constitution of India) निर्मिती बघा,
२) मग ती त्यांची ” हिंदू म्हणून जन्मास आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी प्रतिज्ञा करत धर्मांतराच्या घोषणेची केलेली परिपूर्ती बघा,
३) किंवा मग धर्मांतरित बौद्धांसाठी विज्ञाननिष्ठ परिशुद्ध, बुद्धीच्या कसोटीवर तपासलेला, बुद्धाच्या खऱ्या शिकवणुकीनेयुक्त असा पवित्र धर्मग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ लिहून पूर्ण केल्याचे बघा,
४) सारा ‘भारत बौद्धमय’ करण्यासाठी दिलेली ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संघटना तिच्या संविधानासह (Constitution of BSI) दिल्याचे बघा,
५) किंवा मग या देशाला ‘प्रबुद्ध भारत’ करण्यासाठी दिलेला राजकीय पक्ष ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ आणि आपल्या ‘पक्षाचे सहकारी दल’ ज्यास बाबासाहेबांनी म्हटले ते ‘समता सैनिक दल’ या संघटनाही त्यांच्या-त्यांच्या संविधानासह (Constitution of RPI & Constitution of SSD) दिल्याचे बघा..
हे सगळं बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या हयातीतच पूर्ण करून आपल्या अनुयायांसाठी पुढील वाटचालीची दिशा (Constitution of RPI-SSD & BSI यांत) आखून देऊन आपल्या समाजाचा मार्ग प्रशस्त करून ठेवला आहे. आपणांस फक्त त्या मार्गावर इमाने इतबारे मार्गक्रमण तेवढे करावयाचे आहे. बाबासाहेबांचे अनुयायी ह्या बाबतीत कंबर कसून पुढाकार घेऊन मरणाच्या तयारीनेच समरांगणात उतरतील व लोकशाही मार्गाने पक्षसंघटनेच्या घटनेनुसार समाज संघटित करून पक्षबांधणी करून या देशास ‘प्रबुद्ध भारत’ करतील ह्या अपेक्षेसह सर्व भारतीयांना रिपब्लिकन पक्ष स्थापनापूर्ती दिनाच्या हार्दिक मंगल कामना !
जय भीम जय आरपीआय ❤️🇪🇺
~ प्रशिक आनंद ~
दीक्षाभूमी, नागपूर.
www.republicantimes.in
(टीप: वर्ष २०१६ च्या सुरुवातीला लिहिलेल्या लेखाचे पुनर्लेखन दि. २७ मार्च २०१८ करून भारतीय बांधवांसाठी सादर)
ऑक्टोबरक्रांती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत