अन्यायकर्ते संस्थाचालकांना संविधानाच्या जोरावर लगाम; माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे
सोलापूर, दि. 29 – ३ मुलांची जबाबदारी घेणार्या शिक्षकांपेक्षा वर्गातील ४० मुलांची जबाबदारी घेणारा शिक्षक खऱ्या अर्थाने अभिनंदन पात्र असून अशा शिक्षकवर्गावर अन्याय करणार्या संस्थाचालकांना आपण संविधानाच्या जोरावर लगाम घातला पाहिजे, असे आवाहन माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, निवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, आरपीआयचे जितेंद्र बनसोडे, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे, राज्य संघटक अशोक पाचकुडवे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, दाऊद आतार आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले. तदनंतर सिद्राम मूली यांचे सुमधुर आवाजात अभंग गायन झाले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे इतकेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून बहुजन शिक्षक महासंघ हे कार्य करते. अन्याय करणारा संस्थाचालक छोटा असो व मोठा तो जर शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असेल तर त्याला धडा शिकवला जाईल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख बोलताना म्हणाले, ” परमेश्वरापेक्षा गुरुंचे स्थान उच्च आहे. शिक्षक म्हणून जो आनंद मी घेतला तो आनंद शिक्षणाधिकारी म्हणून मिळत नाही. ही कमाई शिक्षकानांच मिळते. महासंघाने सावित्रीबाई या शब्दा ऐवजी सावित्रीमाई पुरस्कार दिल्याबद्दल महासंघाचे कौतूक केले.
याप्रसंगी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव तसेच सत्कारमूर्तींच्या वतीने सुधीर मागाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सचिव रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन व यादी वाचन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. राजदत्त रासोलगीकर, प्रकाश साळवे, प्रफुल जानराव, दत्तात्रय शिंदे, शिवाजी जगताप, प्रा. अभिजीत भंडारे, नितिन गायकवाड, राम गायकवाड, शरद सावंत, विठ्ठल एकमल्ली, नितीन गायकवाड, मेहबूब तांबोळी,सुशीलचंद्र भालशंकर, विष्णू लादे आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत