सेक्युलर पुरोगामी, आंबेडकरी,मतदार राजा….!!
भास्कर भोजने
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा मोसम सुरू झाला आहे. भाजपा मधील डावलले गेलेले, तिकीट न मिळालेले,डच्चू दिलेले आमदार,माजी आमदार, माजी मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडे, कॉंग्रेस पक्षाकडे तिकीट मागायला येतील. कॉंग्रेस पक्षाकडील सेक्युलर आणि शरद पवार यांच्या कडील पुरोगामी आमदार,माजी आमदार,माजी मंत्री भाजप कडे जातील तशा हालचाली सुरू झाल्या आहेत त्यापैकी ब-याच जणांना तिकिटे सुद्धा दिली जातील….!!
पक्ष बदलल्या बरोबर ते मनाने, विचाराने आणि तत्वाने सुद्धा शुद्ध होतील. सेक्युलर असलेले कॉंग्रेशी भाजप मध्ये गेल्या बरोबर हिंदुत्ववादी बनतील अर्थातच त्यांचा कायापालट होईल ते सच्चे देशभक्त होतील.आणि शरद पवार किंवा कॉंग्रेस मध्ये आलेले भाजपाई ते धर्मांध राहणार नाहीत. ते हिंदुत्ववादी राहणार नाहीत. तर विचाराने पुरोगामी होतील.सेक्युलर बनतील. त्यांचा नवा जन्म झालेला असेल. त्यांच्या मेंदूतून जुने जीर्ण झालेले विचार गळून पडतील. ते अंतर्बाह्य सेक्युलर पुरोगामी विचारांचे होतील…!असा हा खेळ गेली ५० वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे. विखे पाटलांचं घराणं सेक्युलर, जन्मजात कॉंग्रेशी मात्र आता ते सत्तेसाठी भाजप मध्ये जाऊन हिंदुत्ववादी झाले आहेत….!!
शंकरराव चव्हाण यांच्ं घराणं सेक्युलर, जन्मजात कॉंग्रेशी परंतु आता अशोक चव्हाण भाजप मध्ये जाऊन सच्चे हिंदुत्ववादी बनले आहेत…!!
नांदेडच्या खतगांवकर पाटलांचं घराणं हिंदुत्ववादी पण ते कालच सेक्युलर झाले…!!
एकनाथ खडसे यांचं ऊभं आयुष्य भाजपमध्ये गेलं परंतु जादुगार शरद पवार साहेबांनी जादूची कांडी फिरवली आणि त्यांना पुरोगामी बनविले.ते अंतर्बाह्य शुद्ध झाले आहेत…!!
निलंगेकर पाटलांचं घराणं सेक्युलर जन्मजात कॉंग्रेशी परंतु आता ते हिंदुत्ववादी म्हणून भाजपा सोबतं आहेत…!!
नारायण राणे, छगन भुजबळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे अशी अनेक प्रत्येक जिल्ह्यात उदाहरणे आहेत….!!
घराणेशाही वाला निजामी मराठा, प्रस्थापित घराणेशाही वाला त्याला विचारांशी ,तत्वांशी काही घेणदेणं नाही. तो कट्टर हिंदुत्ववादी आहेच आणि सत्तेसाठी तो सेक्युलर आणि पुरोगामी सुद्धा आहे…!!
महाराष्ट्रातील मविआ चे उद्धव ठाकरे सरकार हे कट्टर हिंदुत्ववादी तथा सेक्युलर पुरोगामी विचारांची खिचडी होती तसे आताचं विद्यमान सरकार कट्टर हिंदुत्ववादी तथा सेक्युलर पुरोगामी यांच्या मिश्रणाचं सरकार आहे….!!
सत्तेसाठी विचारधारा खुंटीला टांगून इकडून तिकडे ऊड्या मारणारे लबाड लांडगे संवैधानिक तरतुदीचे धिंडवडे काढतं आहेत अर्थात संविधान संपवितं आहेत, लोकशाहीचा गळा आवळून घराणेशाही मजबूत करीत आहेत आणि तरीही संविधान वाचविण्याची भाषा बोलतात हा दांभिकपणा आणखी किती काळ सहन करावा…?
संविधान वाचविण्यासाठी घराणेशाही संपविणे अनिवार्य झाले आहे. महाराष्ट्रात घराणेशाही संपविण्याचा अजेंडा असलेल्या राजकीय पक्षाला सत्तेत बसविण्याची वेळ आली आहे….!!
महाराष्ट्रात १६९ निजामी घराणे सत्तेवर मांड मारुन बसले आहेत. त्यांना सत्तेबाहेर हाकलून वंचित समुहाला प्रतिनिधित्व देऊन लोकशाहीचे सामाजिकीकरण करणारा, वंचितांना सत्तेत सहभागी करणारा नेता आणि राजकीय पक्ष हाच आपला चॉईस असला पाहिजे…!!
मतदार राजा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या बेगडी बनावट,हिंदुत्ववादी,देशभक्त,देशद्रोही,सेक्युलर,पुरोगामी या बुरखाधारी लोकांच्या लबाडीला बळी पडला आणि संविधान संपविले तर दुसऱ्या कुणाला दोष देऊ नको.कारण तुझ्या हातात शस्त्र असतांना तु लढाई लढला नाही असा त्याचा अर्थ होईल.
: भास्कर भोजने
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत