मुस्लिमांचा संयत रोष !
🌻रणजित मेश्राम
मुस्लिम बांधवांनी आपला रोष कट्टरपंथी धार्मिकतेकडे न नेता ‘कायदा व सुव्यवस्थेकडे’ नेल्याने भाजपचे गडबडले ! बेताल वक्तव्यावर सामूहिक बेताल प्रतिक्रिया उमटेल हा होरा फसला !
उलट, वर्तमान सरकारविरुद्ध मुस्लिम बांधव ताकदीने एकवटल्याने भाजपची गोची झाली आहे.
एकजूट मुस्लिमांच्या हजारोच्या कार रॅलीने हा तगडा संदेश दिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत ही कार रॅली आली. हाती तिरंगा व संविधानाचे फलक लक्षवेधी ठरले. जोश असतांना कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देण्याचे मोर्चेकरींनी टाळले. वेशीवर थांबविल्याने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.
निवडणुकीच्या तोंडावर हे घडल्याने महत्त्वाचे झाले आहे.
पहिल्यांदाच असे घडले. मोर्चेकरी स्वयंस्फूर्त होते. स्वखर्चाने होते. जोशात असून होशात होते. मुद्दा एकच होता. 'हे राज्य कायद्याचे राज्य आहे की नाही ते सांगा'
‘कोणीही, कसेही बोलेल ते चालते का’ ‘आमच्याविरुध्द, पैगंबरांविरुध्द जे आक्षेपार्ह बोलले जाते ते भडकावू नव्हे काय’ ‘मौलाना सलमान अजहरी यांनी एक शेर म्हटला तर एक वर्षापासून तुरुंगात आहेत’ ‘कायदे दोन आहेत काय’ अशी प्रश्नांची सरबत्ती होती.
याप्रकरणी सरकारची भूमिका संदिग्धसम दिसते. गृहमंत्रालय म्हणते, आम्ही त्या आमदाराची समजूत काढली. असे बोलू नये. असे बोलता येत नाही. आमदाराच्या वडिलांनीही चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या.
अलीकडे आरोपीला निबंध लिहायला सांगितले जाते. आता कदाचित समजूत काढणे सुरू व्हायचे !
हजारोंची कार रॅली ही पक्षीय नव्हती. ती एम आय एम या पक्षाचीही नव्हती. ती ‘असंतोषाच्या व्यक्तते’ची होती. असंतोष संघटित करण्याचे तेव्हढे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ते यशस्वी झाले.
यातून इम्तियाज जलील हे नेतृत्व पूढे येऊ शकेल.
विशेष म्हणजे या रॅलीला काही हिंदूनीही सहकार्य केले. लोकनिष्ठेचा हा नवा अध्याय उघडत आहे. मुसलमानांच्या विरुद्ध बोलले की हिंदू व्होट बँक पक्की होतेय हेही कच्चे ठरत आहे. पैगंबराविरुध्द आक्षेपार्ह बोलणारे महाराजही आता पश्चात्ताप मन:स्थितीत आहेत.
यातून ज्यांचा तोटा व्हायचा तो होईलच. कदाचित मुसलमान बांधव ताकदीने एकतर्फी जातील. त्यांची जी काही टक्केवारी आहे ती लक्षवेधी आहेच. असे केल्याने हिंदू हे हिंदू मतपेढीत गेले असेही नाही. उठसूठ चाणक्य म्हणण्याचे महिमामंडन महागात पडणार आहे.
एक लक्षात आलेय, मुसलमानांच्या बाबतीत अलीकडे अती झालेय. सर्वसामान्य भारतीयांना पण ते पटेनासे आहे. प्रचारकी बाजू लक्षात येतेय. त्यामुळे राजकीय गणित कुणाचे बिघडेल हे सांगायची गरज नाही.
राजकारणाचे डावपेच दोन अधिक दोन .. चार असे कधीच नसतात. ते अनुभवावर असतात. राजकीयकरणावर असतात. परिस्थितीजन्य असतात.
मुंबईच्या जबरदस्त कार रॅलीने हा नवा संदेश दिलाय !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत