कायदे विषयकदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सुधारणावाद आणि पैगंबर मोहम्मद स० – पैगंबर शेख

अल्लाहच्या नावाने, जो खूप कृपावंत आणि दयावान आहे.

इतिहासातील कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या जीवनाविषयी स्तुतीपर सुमने उधळली, त्यांचा आदर्श घेतला, आज त्याच महान व्यक्तीचा जन्मदिवस. मोहम्मद पैगंबर स. यांच्याविषयी लिहिताना ‘पुरोगामीत्वाची धगधगती मशाल’ असाही उल्लेख मी याआधी केला आहे. त्या मशालीच्या वैचारिक प्रकाशाने कित्येक संत महात्मे त्यानंतर प्रकाशित झाले. हे ही आवर्जून सांगावे वाटते.

पैगंबर मोहम्मद स० यांच्याविषयी सांगताना ते ईश्वराचे प्रेषित, त्यांची सुन्नत (त्यांनी जीवनात केलेल्या गोष्टी) ईबादत यापलीकडे बहुतांश मुस्लिमांच्या बयानाची (मशिदीतील प्रवचन) आणि लिखाणाची मजल गेलेली दिसत नाही. मी ईश्वराचा प्रेषित जरी असलो तरीही मी एक सामान्य माणूस आहे असे म्हणणाऱ्या पैगंबर साहेबांचे तत्कालीन सुधारणावादी विश्वात अनमोल असे योगदान राहिले ज्या योगदानाचा प्रभाव पुढील हजारो वर्षे जगावर पडत राहिला आणि त्यातील काही गोष्टींचा प्रभाव अजूनही पडतच आहे.

इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद साहेब या दोन महत्वाच्या गोष्टी जाणून घेताना. इस्लामचा किंवा पैगंबर मोहम्मद साहेबांचा नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींवर प्रभाव पडला हे ज्यांना ज्यांना जाणून घ्यायचे आहे त्यांनी इस्लाम येण्यापूर्वी अरब मध्ये असलेली परिस्थिती, रूढी, परंपरा यांचा अभ्यास करणे जास्त गरजेचे असते. भारतातल्या रूढी आणि परंपरा डोळ्यासमोर ठेऊन पैगंबर साहेबांचा अरब मधील सुधारणावादी विचार, त्यांनी केलेली तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक क्रांती कधीही लक्षात येणार नाही.

अरब मध्ये मुलगी जन्मताच तिला गाडून मारले जाई. घरात मुलगी जन्मली तर ते सांगायला देखील लोकांना लाज वाटत असे. कोणीही व्यक्ती, कुठल्याही महिलेशी हवे तेंव्हा लग्न करत असे, वापरत असे आणि सोडून देत असे. लग्न किती करावे यावर कुठलेही बंधन न्हवते. सर्वात महत्वाचे म्हणजे घटस्फोटित महिलेशी अरब मध्ये कोणीही लग्न करत नसे. हे सर्व मागासलेले विचार आणि अनिष्ट रूढी परंपरा पैगंबर साहेबांनी मोडून काढल्या. चारच्या वर लग्न करू शकत नाही ही प्रथा रूढ केली. घटस्फोटाची आदर्श पद्धत निर्माण केली. जी खरेतर जगाने फॉलो करायला हवी. यावर मी युट्युबवर व्हिडीओ बनवला आहे तो ही जमल्यास पाहून घ्यावा. मात्र मुल्ला मौलवींच्या विकृत बुद्धीमुळे ट्रिपल तलाक सारखी इस्लाम बाह्य परंपरा मुसलमानांमध्ये वाढली, पोसली आणि समाजातील महिलांचे इस्लाम बाह्य असलेल्या ट्रिपल तलाक आणि हलाला या प्रथांमुळे अतोनात नुकसान झाले. या पापाचे भागीदार व्हायला आणि त्याची जबाबदारी घ्यायला सध्या तरी कोणीच तैयार नाही. मागच्या पिढीला याबद्दल आमची पिढी नक्कीच शिव्या शाप देईल.असो…

पुरोहितवादातून, धर्माची सुटका करून, एक ईश्वरवाद सर्वांना सांगत, त्या ईश्वराशी अनुयायांचा थेट संपर्क साधण्याची, दलालमुक्त धर्म पैगंबर मोहम्मद स० यांनी सांगितला. सोबतच कुठल्याही पद्धतीच्या कर्मकांडाला देखील त्यांनी नाकारले. इस्लाम नुसार साधी अगरबत्ती सुद्धा ईश्वरासाठी लावण्याची गरज इस्लामने ठेवलेली नाही. शुद्र सुद्धा आलीम (ज्ञान असलेला) बनू शकतो, मौलाना होऊ शकतो. आलीम किंवा मौलाना बनण्यासाठी त्यांच्या पोटी, त्यांच्या घरात जन्म घ्यावा लागतो, असा मागासलेला पुरोहितवादी विचार नकारत, ईश्वरासमोर सर्व समान आहेत हा पुरोगामी आणि सुधारणावादी विचार त्यांनी मांडला. आणि तो स्वतः आचरणात देखील आणला. हजरत बिलाल या गुलाम असलेल्या एका व्यक्तीला मशिदीत जगातील पहिली अजाण द्यायला लावून, पुरोहितांच्या जात व्यवस्थेला खीळ बसवली. ज्ञानाच्या जोरावर कोणीही काहीही बनू शकते. कोणीही कुठलाही व्यवसाय करू शकतो. जर ज्ञान असेल, क्षमता असेल, तर कोणीही राजा बनू शकतो. कोणीही प्रधान बनू शकतो. राजा होण्यासाठी राणीच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो, हा विचार त्यांनी कायमचा मिटवला.

ज्ञानी माणसाला मोहम्मद पैगंबर स. यांनी खूपच मोठे स्थान दिले आहे. एक विद्वान एका शाहिदापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हा विचार त्यांचाच. शाहिदापेक्षाही मोठे स्थान विद्वानाला दिले आहे. विद्वान म्हणजे सर्वच प्रकारचे ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजे विद्वान. फक्त धार्मिक ज्ञान, कुराण आणि हादिसचे ज्ञान हे विद्वत्तेच प्रतीक हे इस्लाम मानत नाही. कोणी अर्थशास्त्रामध्ये, कोणी रसायनशास्त्रामध्ये, कोणी वैद्यकीय क्षेत्रात, कोणी क्रीडा क्षेत्रात, कोणी भौतिकशास्त्रात आणि इतर अनेक किंवा आप आपल्या आवडीच्या क्षेत्राचं ज्ञान असलेला व्यक्ती म्हणजे विद्वान. आणि हे ज्ञान घेण्याची बंद कवाडे पैगंबर साहेबांनी सर्वच मानवजातीसाठी कायमची उघडली. त्यावेळी चीन हे आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाबाबत प्रगत होते. त्यासाठी ज्ञान घेण्यासाठी चीन पर्यंतही जावे लागले तरीही जा. असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला. या दुरदृष्टिकोनाबद्दल त्यांचा नेहमीच अभिमान आणि आदर वाटतो.

स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे हे सांगणारी व्यक्ती, सोबतच पुरुषांप्रमाणे स्त्रियांना मालमत्तेमध्ये वाटा देणारा जगातील पहिला विद्रोही आणि क्रांतिकारी विचार पैगंबर मोहम्मद साहेबांनी मांडला. विधवा पुनर्विवाह ही संकल्पनाही त्यांनी मांडली. स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार दिला. एक भरगोस पीक असलेली विचारांची शेती आणि त्याच विचारांना कृतीत उतरवणार आयुष्य त्यांनी जगाला स्वतःच्या माध्यमातून दिलं.

त्याच मोहम्मद पैंगबर स० यांच्या जीवनावर प्रथम कृती आणि मग विचार मांडणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाडा लिहिला. जो बराच प्रसिद्ध झाला. तो म्हणजे…

महंमद झाला जहामर्द खरा ॥
त्यागीले संसारा ॥ सत्यासाठीं ॥धृ.॥
खोटा धर्म सोडा, सांगे जगताला ॥
जन्म घालविला ॥ ईशापायीं ॥१॥
जगहितासाठी लिहिलें कुराण ॥
हिमतीचा राणा ॥ जगीं वीर ॥२॥
जगाचा पालक निर्मीक अनादि ॥
सर्व काळ वंदी ॥ निकें सत्य ॥३॥,
मन केलें धीट, धरीली उमेद ॥
नाहीं भेदाभेद ॥ ठावा ज्याला ॥४॥,
जनहितासाठीं खोटा अभिमान ॥
दिला झुगारुन ॥ अग्नीमध्यें ॥५॥,
मर्द महंमद ढोंग्यांत पांगळा ॥
शोभला पुतळा ॥ सज्जनांत ॥६॥,
नव्हता कोणी त्या तेव्हां साह्यकरी ॥
एकटाच सारी ॥ सत्य पुढे ॥७॥,
एक त्याला फक्त सत्याचा आधार ॥
हिय्या समशेर ॥ मनामध्ये ॥८॥,
य येई अजा । निर्मीकाच्या ध्वजा ॥
उभारील्या ॥९॥,
कोणी नाहीं श्रेष्ठ कोणी नाहीं दास ॥
जात-प्रमादास ॥ खोडी बुडी ॥१०॥,
मोडीला अधर्म आणि मतभेद ॥
सर्वांत अभेद ॥ ठाम केला ॥११॥,
केल्या कमाईचा न धरी अभिलाषा ॥
खैरात दिनास ॥ देई सर्व ॥१२॥,
मानवी मनाचा घेई अंतीं ठाव ॥
कल्याणाची हाव ॥ पोटीं माया॥ १३॥

पण दुर्दैव ज्या पैगंबर साहेबांच्या विचारांना जगाने अभ्यासले, आपल्या आयुष्यात अवलंबिले त्याच पैगंबर साहेबांच्या अनुयायांनी त्यांचे विस्तृत विचार आचरणाने संकुचित केले. इस्लाम ला नमाज, दाढी, टोपी, पोषाखपर्यंत आणि महिलांसाठी बुरख्यासारख्या काळ्या कोठडी पर्यंत सीमित ठेवले. (ज्याला काहीजण अभिमानाने आयडेंटिटी म्हणतात) बऱ्याच क्षेत्रातील ज्ञानाची कवाडे धर्मसत्तेवर असलेल्या “काही” मौलाना आणि अलिमांनी हराम आणि हलाल च्या खोट्या जाळ्यात अडकवून ती बंद केली. आणि बहुतांश समाजानेही मौलाना आणि अलिमांचा हा पुरोहितवाद स्वीकारला. स्वतः ज्ञानी होण्याचा विचार केला नाही. ज्या संकुचीतपणाच्या, मागासलेपणाच्या, बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात पैगंबर मोहम्मद साहेबांनी उदारमतवादी, पुरोगामी विचार मांडले आज त्याच संकुचित, मागास आणि बुरसट विचारांच्या मागे त्यांचा अनुयायी धावू लागला ही शोकांतिका आहे.

पैगंबर साहेबांनी त्या काळात तत्कालीन सुधारणावादी विचार मांडले पण त्यातील बऱ्याच किंवा काही गोष्टी या काळात मागास झालेल्या आहेत. त्यावर सुधारणावादी विचार मांडू नये का ? आणि जर मांडला जात नसेल तर आपण खरेच पैगंबर मोहम्मद साहेबांचे अनुयायी आहोत का ? हा विचार करणे गरजेचे आहे. साधं २० वर्ष मागे गेले तरीही तुम्हाला जनरेशन गॅप लक्षात येतो. मागील पिढीचे आणि आपले विचार जुळणे कठीण जाते. त्याला आपण जुने, जुनाट विचार म्हणतो आणि आपण आधुनिकतेची कास धरतो. धरतो की नाही धरत ? मात्र १४०० वर्षे जुने असलेले सगळेच विचार आपल्याला अजूनही आधुनिक वाटतात. हे आपल्या मागासलेल्या बुद्धीचे लक्षण आहे. असा समाज कधीही पैगंबर मोहम्मद साहेबांचा अनुयायी असूच शकत नाही. आय रिपीट, असा समाज कधीही पैगंबर मोहम्मद साहेबांचा अनुयायी असूच शकत नाही.

पण ही परिस्थिती बदलू शकते. या परिस्थितीबाबत मनात खदखद असलेला एक वर्ग प्रत्येक ‘फिरक्यात’ (पंथात) शिल्लक आहे. ज्याला ही परिस्थिती पाहून वाईट वाटते. तो पुरोहितवादावर आणि इतर चुकीच्या गोष्टींवर सडाडून टिका करतो. आणि मुस्लिमांना ‘आत्मपरीक्षण’ करण्याची गरज आहे असं त्याला म्हणतो. मी त्याच पंथाचा आहे. त्याला मी ‘सुधारणावादी मुस्लीम’ म्हणतो. ज्याचं मोहम्मद पैगंबरांवर अपार प्रेम आहे, अल्लाह वर पूर्ण निष्ठा आहे. आणि सध्याच्या काळाला अनुरूप काय करावे याची त्याला जाण आहे. हा पंथ सर्वांनी मिळून वाढवला पहिजेल. म्हणजेच खरा पैगंबर साहेबांचा सुधारणावादी विचारांचा विजय होईल…

पैगंबर मोहम्मद साहेब (ईश्वराची त्यांच्यावर कृपादृष्टी राहो) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी त्यांना विनम्र अभिवादन. त्यांनी निर्माण केलेली सुधारणावादी परंपरा आम्ही कायमच टिकवून ठेवण्याचा प्रयत्न इंशा अल्लाह करू. १४०० वर्षांपूर्वीचे जे जे मागास आणि कालबाह्य आहे ते ते सोडू. आणि जे जे नाविन्यपूर्ण, आधुनिक, कालसुसंगत आणि मानवतेच्या कल्याणाचे आहे ते ते स्वीकारू. इंशा अल्लाह…

लव यु पैगंबर मोहम्मद साहेब, लव यु लॉट ❤️

  • पैगंबर शेख
    (सुधारणावादी मुस्लिम)
    संपर्क – ९९७००७०७०५

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!