तरडे म्हणे मातंगाच्या वज्रमुठीत हिंदूत्व (?)
तरडे सारखे लोक कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आहेत हे मातंग बांधवांनी समजून घेणे आवश्यक आहे. धर्मवीर २ नावाच्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये मातंगांच्या वज्रमूठीत हिंदूत्व आहे असा संवाद आहे. मातंग बांधवांनो विचार करा, खरंच तुमच्या वज्रमूठीत हिंदूत्व आहे का ओ? हिंदू म्हणून तुम्हाला हिंदू धर्मात काय स्थान आहे? मंदिरात तुम्ही प्रवेश केला तर फक्त हाकलूनच देत नाहीत तर चोप देऊन हाकलतात. अनेक घटना अशा आहेत ज्यामध्ये मातंग बांधवांना जिवाला मुकावे लागले आहे. अनेक मातंग समाजातील बांधवांनी मरेपर्यंत मार खाल्ला आहे. तरडे सारखा हाफ चड्डीधारी माणूस मातंग समाजाच्या हिंदूत्वाच्या भावना टोकदार बनवत आहे. तो असे जाणिवपूर्वक करतो आहे कारण त्यामागे खूप मोठ्या राजकारण आणि समाजकारणाचे सुप्त गणित आहे.
वस्ताद लहूजी साळवे यांच्या नातीने म्हणजेच मुक्ता साळवे यांनी लिहिलेल्या निबंधात काय लिहिले आहे ते जाणून घेण्याची गरज आजच्या मातंग समाजाला आहे. मुक्ता साळवे निबंधात लिहीतात की जर एखाद्या महार किंवा मांगाने सभ्य कापड वापरले तर ते (भूदेव) म्हणायचे की या माणसाने ते चोरले आहे. अशी वस्त्रे ब्राह्मणांनीच वापरायची. महार मांगांनी त्याचा वापर केला तर ते धर्म भ्रष्ट करत असतील; असे म्हणत ते आम्हाला बांधायचे आणि मारहाण करायचे. मांग किंवा महार यांनी गुन्हा केला तर ते त्यांचा शिरच्छेद करायची प्रथा होती. फुकट सक्तीची बिनपगारी मजुरी करुन घेतली जायची अशी पण प्रथा होती. काही ठिकाणी ‘मला स्पर्श करू नका’ ही प्रथाही बंद झाली आहे. आता आम्ही गुल टेकडीच्या बाजारात फिरायला मोकळे आहोत.” [धनजय कीर : महात्मा जोतिराव फुले, ४७/४८]
मुक्ता साळवे आपल्या निबंधात पुढे लिहितात की, “ब्राह्मण म्हणतात की वेद ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे. फक्त आपण त्यांना पाहावे. यावरून आमच्याकडे धर्माचे पुस्तक नाही हे स्पष्ट होते. वेद जर ब्राह्मणांसाठी असतील तर वेदानुसार वागणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. जर आम्हाला धर्माचे पुस्तक पाहण्याचा अधिकार नसेल तर आम्ही धर्मविरहित लोक आहोत. हे अगदी स्पष्ट आहे. नाही का? तर हे देवा, तुझ्याकडून येणारा धर्म कोणता आहे ते सांग. जेणेकरून आम्हा सर्वांना त्यानुसार अनुभव मिळेल.”
लहूजी साळवे वस्ताद यांनी क्रांतीबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचे संरक्षण केले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचे विरोधक कोण होते? त्यांच्या जीवावर कोण उठले होते? क्रांतीबा फुले यांनी महार, मांग आदी अस्पृश्य लोकांसाठी आपली विहीर खुली केली होती तेव्हा पाण्यासाठी विरोध कोणी केला होता? लहूजी साळवे वस्ताद यांनी महात्मा फुले यांना संरक्षण दिले, अनेक प्रसंगी त्यावेळी हाणामारी झाली. तेव्हा लहूजी वस्ताद यांनी कोणासोबत हातघाई केली? या सगळ्या गोष्टींचा विचार करुन पहा.
अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्याही कादंबरीचा नायक अथवा नायिका यांचे उदाहरण घ्या. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये नायक आणि नायिका प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड करताना दिसतात. प्रस्थापित व्यवस्था ही जातीय असो राजकीय असो किंवा सामाजिक त्या विरोधात अण्णांच्या साहित्यात तुम्हाला उलगुलान दिसेल, बंड दिसेल. अण्णाभाऊ साठे यांनी कोण्या एका धर्माचा, जातीचा उदोउदो केलाय का? तुमच्या वाचनात आले आहे का की अण्णांच्या साहित्यिक, सामाजिक कार्यात जात-धर्माचा दुराभिमान बाळगला आहे असे काही? नाही ना? अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण आयुष्य कम्युनिस्ट म्हणून व्यथित केले. जीवनभर कम्युनिस्ट विचारसरणीचा पुरस्कार केला. शेवटी काय झालं तर अण्णाभाऊ साठे यांचा भ्रमनिरास झाला. भारतीय कम्युनिस्ट चळवळ ही पहिल्यापासून ते आतापर्यंत भूदेवांची मक्तेदारी राहिलेली आहे. तिथे इतर समाजातील लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला. तीच गत सध्या तरडेची आहे. जोवर तरडे हिंदूत्व हिंदूत्व करत आहे तोवर तो भूदेवांना प्रिय आहे. भूदेवांच्या विरोधात तरडे एखादे स्टेटमेंट देऊ दे मग बघा, तरडे कचऱ्याच्या डब्यात सापडेल. वापरा आणि फेकून द्या ही रणनीती भूदेवांना चांगली जमते. एखादा मातंग हिंदूत्व हिंदूत्व करत आहे तोवर तो भूदेवांना प्रिय आहे. जेव्हा तोच मातंग अण्णाभाऊ साठे यांच्या विद्रोहाची भाषा बोलायला सुरुवात करेल तेव्हा तो अडगळीत फेकला जाईल.
मातंग बांधवानो तुम्ही कट्टर हिंदू असल्याचा फायदा इथल्या मराठ्यांना नाही, ओबीसींना नाही किंवा वैश्य-वाणी या समाजाला सुद्धा नाही याचा फायदा फक्त भूदेवांना आहे. तुमच्या मुठीत हिंदुत्व आहे ही केवळ भूलथाप आहे. आणि याची प्रेरणा हाफ चड्डीतून आलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. या लोकांना फक्त फुटसोल्जर हवे असतात. वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार सोडून तुम्हाला जर फुटसोल्जर व्हायचे असेल तर खुशाल तुम्ही हिंदुत्व वज्रमुठीत घ्या. या लेखामध्ये मी चुकूनही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडलेला नाही. बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते त्याच सोबत अनेक मातंग बांधवांनी सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत धर्मांतर केले होते त्यांना माझा सलामच आहे. आजचे मातंग बांधव अभिमानाने सांगतात की आम्ही धर्मांतर केले नाही त्यांची मला कीव करावीशी वाटते. तुम्ही धर्मांतर करा अथवा नका करू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण लहुजी साळवे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या वरती तरी ठाम राहावे ही विनंती. जे मातंग बांधव बाबासाहेबांच्या विचारांच्यावर, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावरती ठाम आहेत त्या मातंग लोकांना माझा सलाम आहे.
Bharatwasi Satish kolhapur
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत