दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

गेल ऑमव्हेट : विचारांचं समृद्ध शिवार

धनाजी धोंडीराम घोरपडे

गेल बाई, तू येताना एकटी आली नाहीस घेऊन आलीस सातासमुद्रापलीकडचं विचारांचं समृद्ध शिवार

तुला कसलाच झाला नाही तिळमात्र मोह, ओंजळभर अपेक्षांचंही ओझं
ठेवलं नाहीस माथ्यावर..

मला विचारायचा होता एक प्रश्न मैलोन्मैलो दूरच्या
इथल्या मातीतल्या शाहू-फुले-आंबेडकरांशी तुझं नेमकं काय होतं नातं? माणूसपण सोडलं तर
तू बसत नाहीस कुठल्याच गणगोतात तू तर गोऱ्या चामडीची घाऱ्या डोळ्यांची

तू पाहिलीस अस्पृश्यतेच्या घाण्यातून पिळवटून निघालेली इथली माणसं
ज्यांनी स्वत:चा चेहरा गमवून आत्माही गमवलाय तू थकली नाहीस इथलं वैचारिक दारिद्रय खुरपताना इथल्या पदराला जातीचा गुंता सोडवायला तू सरसावलीस
भिजत राहिलीस पावसात चालत राहिलीस काट्याकुट्यातून झेलत राहिलीस ऊन-वारा वाडीवस्त्यात पेरून ठेवलास स्त्री मुक्तीचा आणि फुले-आंबेडकरांचा विधायक विचार

घरदार आणि जन्मभूमीवर ठेवलंस तुळशीपत्र कुठून कुठे आलीस जोतिबाचं अंतरंग शोधायला क्रांतीचं स्वप्न उराशी घेऊन झोकून दिलंस चळवळीला उभी राहिली नाहीस सत्तेच्या वळचणीला

गेल,
नकळत्या वयातही घेतली होतीस व्हिएतनामच्या चळवळीत उडी सिव्हिल राईट मुव्हमेंटचाही झेंडा घेतलास हातात लोकशाही हक्काच्या चळवळीला आफ्रिकी-अमेरिकी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी झटलीस जिवापाड थर्ड वर्ल्ड स्टडीजची केलीस मागणी खूप जवळून पाहिलीस कृष्णवर्णियांच्या मुक्तीची चळवळ

तू निव्वळ हाडाची कार्यकर्ती नसून एक महान विदुषी भारतात येऊन बंड करून अडकून घेतलंस विवाह बंधनात हात पिवळं करायला तू निवडलास इथलाच झंझावती भारत परंपरा मोडणाऱ्या परंपरेचा झालीस भाग गुण्यागोविंदानं नांदलीस शेणामातीनं सारवलेल्या घरट्यात

गेल, धर्म संसदेला लाथाडलीस पण आजही उमगत नाही तुझ्या सैद्धांतिक मांडणीचा अर्थ इथल्या विवेक हरवलेल्या
जाती-धर्माचं लोणचं चाटत बसणाऱ्या
भाडखाऊ पांढरपेशाला

तुझ्या सैद्धांतिक मांडणीचा गृहपाठ व्हायला इथं एका शतकाचं तरी निघून जाईल वारं आंड म्हटलं की हुंबार म्हणणारी व्यवस्था बुद्धीच्या पातळीवर कशी उघडी मानसिक पातळीवर कशी नागडी झाली आहे मंदिर बांधून मत मागणाऱ्यांच्या चिमटीत अडकून पडला आहे काळ

तुझी नोंद घ्यायला त्यांच्या वांझोट्या शाईतून गळत नाही एकही शब्द जातिअंतासाठी तुझी निखराची लढाई भुईचक्रासारखी राहिलीस फिरत थकली नाहीस मागं हटली नाहीस

धरणग्रस्तांच्या हक्कांसाठी उभी राहिलीस व्यवस्थेच्या दारात मिळवून दिलीस हक्काची चतकोर आणि पाय ठेवायला भूमीचा तुकडा कच्च्याबच्च्या प्राचीला छातीला कवटाळून खानदेशातल्या जनजागृतीसाठी वणवण भटकलीस शोषणमुक्त समाज आणि मानवमुक्तीच्या ध्यासापायी

शोषकांच्या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या भुरीबाई, ठगीबाई, इंदुबाई, हिरकणा मुलूखमैदानी तोफा तुझ्या चळवळीला देऊन गेल्या उभारी

गेल,
तू झालीस भारतमय फुले-आंबेडकरांची तू बौद्धिक शाहीर करुणेची तू खोल खोल विहीर विषयाला आणि आशयाला पालीसारखी चिकटणारी तू चिवट
ऐतिहासिकदृष्ट्या परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या दलित आणि बहुजन स्त्रीयांना झालीस आधार

धरणग्रस्तांचं पुनर्वसन असो की दलित पॅंथरचा मोर्चा सरळ सरळ मांडायचीस भूमिका भिडायचीस व्यवस्थेला लिहिण्या आणि जगण्यामधल्या दरम्यानची जागा
ठेवली नाहीस कधीच रिकामी
व्यवस्थेला जाब विचारायचं धाडस बाळगून होतीस उराशी

ऑगस्ट ऑमव्हेट ते इंदुताई व बाबूजी पाटणकरपर्यंतच्या समृद्ध वारशाची झालीस पाईक फुल्यांचं आणि चळवळीचं बोट धरून आली होतीस भारतभूमीवर वुई वुईल स्मॅश धिस प्रिजन ते सिकिंग बेगमपुरापर्यंत पोहचलीस

गेल, इथल्या आखूड हाताच्या इतिहासकारांनी तुझ्या त्यागाची, संघर्षाची चार अक्षरं लिहायला रिकामं ठेवावं एकतरी इतिहासाचं पान नाहीतर ही माती कधीच करणार नाही त्यांना माफ

धनाजी धोंडीराम घोरपडे बहादुरवाडी, सांगली
मो.९४२१३०३७०२

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!