. तर तुमचाही आण्णा हजारेझाल्याशिवाय राहणार नाही!
“…प्रा. श्रावण देवरे,.… “
हाके+वाघमारे+ससाणे यांना प्रा. श्रावण देवरे यांचा इशारा
ओबीसी-मराठा संघर्षाचे नववे राजकीय पर्वः शेवटचा लेख-P14 ओबीसीनामा-35. (प्रकरण-2)
कामचुकार बनाल तर कचर्याच्या डब्ब्यात जाल!
विश्वात सर्वकाही प्रवाही आहे. नदीच्या उगमापासून निघालेला पाण्याचा प्रवाह समुद्राकडे धाव घेतो व समुद्रात विलीन होऊन विशाल रूप धारण करतो. जेथे प्रवाह थांबतो तेथे डबके निर्माण होते व कालांतराने डबक्यातून डास-मच्छर निर्माण होऊन रोगराई पसरते. सामाजिक जागृतीचेही असेच आहे. विचारांच्या प्रवाहासोबत जागृतीसुद्धा समांतरपणे पुढे गेली पाहिजे. ती जर थांबली तर त्यातून डबके व डबक्यातून रोगराई निर्माण होते. कारण डबक्यावर डास-मच्छरांच्या झुंडी कब्जा करीत असतात
मी आधीच्या लेखांमध्ये ओबीसींसमोर दोन पर्याय असल्याचे लिहीत होतो. आजच्या लेखात मी एकच पर्याय का सांगतो आहे? भुजबळांचा मध्यममार्गी राजकीय पक्षाचा पर्याय मी का काढून टाकला? त्याचे कारण असे की, हाके+वाघमारे+ससाणे यांच्या उपोषण काळात मी उपोषणाच्या ठिकाणी सुरूवातीपासुनचे पाच दिवस उपस्थित होतो. उपोषणाला पाठींबा देण्यासाठी येणार्या हजारो उपस्थित कार्यकर्त्यांना मी रोज वेगवेगळ्या मुद्यांवर प्रबोधन करीत होतो. शेवटच्या दिवशी मी एक महत्वाचा मुद्दा मांडला की, उपोषणाच्या निमित्ताने झालेल्या या सामाजिक जागृतीचे राजकीय पक्षात रूपांतर झाले पाहिजे. महाराष्ट्रात आज घडीला एकच असा नेते आहे की, ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ओबीसी जनता एकत्रित होऊ शकते. एकमेव भुजबळसाहेब!
भुजबळसाहेबांनी जर प्रस्थापित सत्तेमधून बाहेर पडून ओबीसीचा राजकीय पक्ष स्थापन केला तर महाराष्ट्रातील सर्व छोटे-मोठे पक्ष संघटना विसर्जित होतील व भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतील. परंतू त्यासाठी ओबीसींना एक छोटेसे काम करावे लागेल. भुजबळसाहेबांचा दगडाखाली अडकलेला हात बाहेर काढावा लागेल व त्यासाठी ‘‘पत्र आंदोलन’’ करावे लागेल. किमान दहा लाख पत्रांचा पाऊस जर मुंबईतील भुजबळांच्या बंगल्यावर पडला तर ब्राह्मण-मराठा सत्ताधारी हा पाऊस पाहून हादरतील व भुजबळसाहेबांच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत ते करू शकणार नाहीत. या ‘‘पत्र-आंदोलनाचा’’ मी खूप प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रभर सभा-बैठका घेतल्या मात्र हे पत्र आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. खुद्द समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही हे आंदोलन नको आहे. (या पत्र आंदोलनाचे यु-ट्युबवरील माझे छोटेसे 7 मिनिटे 11 सेकंदांचे व्याख्यान पुढील लिंकवर पाहू व ऐकू शकता- https://youtu.be/D1s1LwsDws8?si=Vhu5IX_ZJdKXLT3Z)
अजूनही वेळ गेलेली नाही. परंतू असे झाले नाही तर काय होईल? ओबीसींमधील सामाजिक जागृती अजून राजकिय चळवळीत प्रवाहित झाली नाही, तर तीचे डबके बनले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या साठी मी 2018 चा अनुभव पुन्हा एकदा सांगतो-
2018 साली ओबीसींचा पक्ष स्थापन करुन ही जागृती राजकीय पर्वात रूपांतरीत करता आली असती तर आज जरांगे नावाचा ‘कु-पुरूष’ जन्माला येण्याची हिम्मतच करू शकला नसता. परंतू 2018 साली ओबीसींच्या सामाजिक जागृतीचा प्रवाह आहे तेथेच थांबला व डबके बनला. या डबक्यातून नेते निर्माण होण्याऐवजी डास-मच्छर निर्माण झालेत व या डास-मच्छरांना शिवसेनेने विधानपरिषदेच्या आमदारकीचे आश्वासन देऊन विकत घेतले व कचर्याच्या डबड्यात फेकून दिलेत.
-ओबीसी राजकारणाचा क्रांतिकारक इतिहास-
आज पुन्हा एकदा 2018 सारखीच परिस्थिती आता 2024 साली निर्माण झालेली आहे. ओबीसींची सामाजिक जागृती किमान निवडणूकीत उभे राहण्याइतपत निर्माण झालेली आहे. सामाजिक जागृती प्रवाहीत करून राजकीय बनवली पाहीजे. इतिहासातून बोध घेऊन पुढे गेलो तरच भविष्य उज्ज्वल घडविता येते. काय सांगतो आपला ओबीसींचा राजकीय इतिहास? भारतीय इतिहासात आरक्षणाची क्रांतिकारक संकल्पना मांडली ती एका ओबीसी जातीत जन्मलेल्या महापुरूषाने! तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले! भारताच्या इतिहासात पहिले आरक्षण आंदोलन उभारले ते एका ओबीसी महापुरूषाने! सामी पेरियार यांनी. पेरियार यांनी केवळ ओबीसी जातींसाठी आरक्षण नाही मागितले. ब्राह्मण वगळता सर्व जाती-धर्माच्या शोषित जनतेसाठी आरक्षण मागीतले व आंदोलन करून 1927 साली ते मिळवूनही दाखविले. देशाच्या ईतिहासातील हे पहिले ‘आरक्षण आंदोलन’ होते. हे ऐतिहासिक आंदोलन ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली झाले व यशस्वीपणे आरक्षण मिळवूनही दाखविले. हा आहे ओबीसींचा गौरवशाली इतिहास! याच काळात या ओबीसी आंदोलनांमधून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे काम नुकतेच सुरू केले होते. ओबीसींच्या या आरक्षण आंदोलनातून जी सामाजिक जागृती झाली ती दहा वर्षांच्या आत राजकीय पक्षात रूपांतरित झाली. 1948 साली सामी पेरियार यांनी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ‘‘द्रविड मुन्नेत्र कडघम’’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला व 20 वर्षांच्या आत म्हणजे 1967 सालीच तामीळ प्रांताची सत्ता काबीज केली.
सत्यशोधक ओबीसी चळवळीमुळे भारताच्या इतिहासातील पहिले नॉन-ब्राह्मीण मुख्यमंत्री 1937 साली (बॉम्बे प्रिसिडेन्सीचे पहिले प्रधानमंत्री) बनण्याचा मान धनजी शॉ कुपर यांना मिळाला. दुसरा मान ओबीसी नेते आण्णा दुराई यांना मिळाला. या सन्मानासोबत आणा दुराई यांनी आणखी एक क्रांतिकारक काम केले. भारताच्या इतिहासात जात्यंतक अब्राह्मणी राजकारणाची भक्कम पायाभरणी आण्णा दुराई यांनी केली. सत्तेचा सदुपयोग करून त्यांनी ब्राह्मणी प्रतिके, भाकडकथा असलेले रामायणासारखे ब्राह्मणी ग्रंथ, ब्राह्मणी रूढी-परंपरा यावर हल्ला चढविला. ब्राह्मणांच्या कुकर्मांचा शेवटचा अड्डा म्हणजे मंदिर होय! ओबीसी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी कायदा करून तो अड्डाही ब्राह्मणांकडून काढून घेतला. आता तेथे शासनाने नेमून दिलेले सरकारी कर्मचारी प्रशिक्षीत पुजारी म्हणून काम करतात व ते सर्व दलित+आदिवासी+ओबीसी कॅटेगिरितून कायद्यानुसार भरती केले जातात. त्यामुळे तेथील मंदिरे आता कर्मकांडाच्या कुकर्मातून मुक्त होत आहेत.
डॉ. राममनोहर लोहिया हे ओबीसी नव्हते पण ते ब्राह्मणही नव्हते. त्यामुळे त्यांनी तत्कालीन महान ओबीसी नेते त्यागमूर्ती चंदापूरी यांच्याशी युती करताच ‘‘पिछडा पावे सौ मे साठ’’ अशी घोषणा दिली व त्यातून जे समाजिक जागृतिचे आंदोलन उभे राहीले त्याची परिणीती राजकिय पक्ष व राजकीय सत्तेत झाली. या प्रवाही ओबीसी चळवळीतून जननायक कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव, लालू-मुलायम, शरद यादव यांच्यासारखे दिग्गज राष्ट्रीय नेते निर्माण झालेत व त्यांच्या राजकीय आंदोलनामुळेच व्हि.पी सिंगांना मंडल आयोग लागू करावा लागला. हा आहे आपला ओबीसींचा गौरवशाली इतिहास!
हा आपल्या ओबीसींचा गौरवशाली सामाजिक-राजकीय इतिहास पाहता महाराष्ट्रातील जागृत ओबीसींनी सामी पेरियार, करूणानिधी, स्टॅलिन, त्यागमूर्ती चंदापूरी, कर्पूरी ठाकूर, लालु-मुलायम आदि राजकीय नेत्यांचा सामाजिक-राजकीय आदर्श घेतला पाहिजे. आज महाराष्ट्रात अशाप्रकारच्या अब्राह्मणी राजकारणाची जबाबदारी हाके+वाघमारे+ससाणे या तीन तरूणांवर येऊन पडलेली आहे. आज समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतो आहे, परंतू तुम्ही राजकीय जबाबादारी पार पाडली नाही तर हाच समाज तुमचा ‘‘आण्णा हजारे’’ केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अक्षरशः उचलून कचर्याच्या डब्ब्यात फेकून देतील!
या तीन तरूणांना ओबीसी जनतेने नेता का मानावे, याची कारणे पुढीलप्रमाणे-
1) हे तिन्ही तरूण आजच्या घडीला निष्कलंक आहेत.
2) त्यांच्यावर कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा डाग नाही.
3) तिन्ही तरूण अभ्यासू व वैचारिक पातळीवरचे आहेत.
4) त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे.
5) आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ते कोणत्याही मराठा-ब्राह्मणांच्या पक्षाला विकले जाणारे नाहीत, तसेच प्रस्थापितांच्या ‘बहुजन’ नावाच्या बी-टिम, सी-टिमकडे गहाण पडणारे नाहीत, याची खात्री आहे.
क्रांतिकारक विचारांची प्रामाणिक जोड असेल तरच राजकारण यशस्वीपणे करता येते. अन्यथा या तीघांचीही अवस्था मायावती, पास्वान, जानकर, आठवलेंसारखी लाचारीची होईल. अशी लाचारी व असे हसे होऊ द्यायचे नसेल तर हाके+वाघमारे+ससाणे या तीन तरूणांनी आता तात्पुरत्या स्वरूपात ‘‘ओबीसी आरक्षण बचाव आघाडी’’ स्थापन करून विधानसभा निवडणूका लढविल्या पाहिजेत. जास्तीत-जास्त उमेदवार उभे केले पाहिजेत. राखीव मतदारसंघात दलित+आदिवासी उमेदवार व काही मतदारसंघात ओबीसी-मुस्लीम उमेदवार उभे करून शोषित जातींचे सर्वसमावेशक राजकारणाची सुरूवात केली पाहिजे. सर्वप्रथम प्रत्येक मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत. स्थानिक समित्या स्थापन करुन उमेदवार निवडले पाहिजे. ही सुरूवात आता 2024 साली केली तर तुम्हाला 2029 साली निश्चितच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
या तीन तरूणांनी पक्ष स्थापनेची घोषणा करताच इतर सर्व ओबीसी नेत्यांवर आपापले पक्ष व संघटना गुंडाळून ठेवण्याचा दबाव ओबीसी जनतेकडून निर्माण होईल. आम्ही आमच्या ‘‘ओबीसी राजकीय आघाडीच्या बरखास्तीची’’ घोषणा मागच्या लेखात केलेली आहेच!
राजकीय पक्ष स्थापनेचे पाऊल या तीन तरूणांनी उचलले नाही तर ओबीसींच्या सामाजिक जागृतीचा फायदा ओबीसींचे शत्रू असलेल्या राजकीय पक्षांनाच होईल. हा फायदा कसा करून घ्यायचा, कोणा-कोणाला कसे व कोणत्या दरात विकत घ्यायचे हे सर्व प्रस्थापित नेत्यांनी ठरवलेले आहे. या तिघा तरूणांना कोणते-कोणते आश्वासन देऊन विकत घ्यायचे, याचे सर्व प्लॅनिंग प्रस्थापित राजकीय पक्षांनी आधीच करून ठेवलेले आहे. त्यासाठी बी-टीम व सी-टिमलाही कामाल जुंपलेले आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांचे रेट-बोर्ड (दरपत्रक) तयार आहे. एकाला आमदारकीचे तिकीट, दुसर्याला विधानपरीषदेच्या आमदारकीचे आश्वासन व तिसर्याला ओबीसी महामंडळ अथवा महाजोती देऊन विकत घ्यायचे ठरलेले आहे. फक्त आश्वासन देतील, प्रत्यक्षात काहीच देणार नाहीत! कारण ओबीसी हा आश्वासनावर जगणारा प्राणी आहे!
अशा पद्धतीने या तीन तरूणांचा गैरवापर करुन ओबीसींचे शत्रू असलेले पक्षच सत्तेत आल्यावर ओबीसींचे अधःपतन अधिक गतीमान करतील. नव्याने येऊ घातलेल्या अखिल भारतिय पेशवाईत तोंडाला गाडगे-मडके बांधण्याची पाळी आता आबीसींवर येणार आहे. आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुला-नातवांना तोंडाशी गाडगे-मडके बांधावे लागले तर ते ब्राह्मण-मराठ्यांना शिव्या देणार नाहीत, ते शिव्या देतील आजच्या काम-चूकार ओबीसी नेत्यांना! आणी या सर्व पापाचे खापर फुटेल हाके+वाघमारे+ससाणे या तीन तरूणांवर!
अशा प्रकारे ओबीसी-मराठा संघर्षाचा इतिहास व भविष्य दर्शन येथे थांबवतो! जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270
ईमेलः obcparty@gmail.com
महत्वाची सूचनाः 1) ओबीसी-मराठा संघर्षाचे हे नववे राजकीय पर्व, प्रकरण-2 अंतिम लेखांक-14, साप्ताहिक वैभव, वृत्तएकसत्ता, व शीवक्रांती च्या व्हेब साईटवर 31 आगस्ट व 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित झाला आहे.
लिंक-1 https://deenbandhunews.com/?p=4219
लिंक-2 https://vrutteksattanews.blogspot.com/2024/08/blog-post_33.html
लिंक-3 https://aklujvaibhav.in/?p=6609
लिंक-4 https://www.facebook.com/share/p/uUW9QQi4m2RC5LBH/?mibextid=qi2Omg
2) लेखांक-14 (P14), या लेखाची pdf file ची लिंक पुढीलप्रमाणे-
https://drive.google.com/file/d/1HhcMYvllfEa77r23Hd3v-wS77y5BVbju/view?usp=drivesdk
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत