आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
तुम्ही आमची “सुरत” लुटली, आम्ही तुमचा “महाराष्ट्र” लूटू!
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
मंगळवार दि. 3 सप्टेंबर 2024.
मो.नं. 8888182324.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी "सुरत" लुटली असा इतिहास शिकविला जातो. पण, ती लुट नसून "छापा" होता. त्याकाळी राज्य चालविण्यासाठी "छापा टाकणे" हि रित होती. महाराज काही लुटारु नव्हते. महाराजांनी सुरतेवर छापा का टाकला? कारण, मुघलांना भरभरून संपत्ती देणारे आर्थिक केंद्र हे "सुरत" च होते. त्याच संपत्तीच्या बळावर मुघलांनी स्वराज्यात हाहा:कार माजविला होता. आक्रमण करणाऱ्यांना थोपवायचे असेल तर त्यांची "रसद" तोडली पाहिजे ही महाराजांची रणणिती होती. त्याकाळी प्रांत रचना नसल्यामुळे "सुरत" हि गुजरातचीच असे काही नव्हते. राज्य चालविण्यासाठी छापा टाकणे महाराजांचा तो एक रणणितीचा भाग होता. परंतु, काही लोकं सुरत म्हणजे आपल्या बापजाद्यांचीच प्रॉपर्टी लुटल्यासारखे छाती पिटत आहेत. साडेतीनशे वर्षापूर्वीची "सल" अजूनही त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री गुजराती असलेले मोरारजी देसाई यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 105 हुतात्म्यांनी आपले बलिदान देऊन मुंबई वाचविली. हा इतिहास सर्वांना माहितच आहे.
देशाचे आर्थिक केंद्र असलेली मुंबई गुजरातला जोडली न गेल्याने गुजरातच्या प्रत्येक राजकारण्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस कायम आहे. काहीही करुन महाराष्ट्राला लुटून सुरत लुटल्याचा बदला घ्यायचाच या संधीची वाट गुजरातचे राजकारणी पाहत होते. आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांना हि संधी प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अणाजी पंत, दत्तोजी, सुर्याची पिसाळ आणि भास्कर कुलकर्णी सारख्या काही मोजके फितुर, गद्दार होते, तशा गद्दारांचा शोध लागल्यानंतर गुजरातचे रहिवासी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फितुरांच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करुन सर्वात पहिले आपला नैसर्गिक मित्र असेलेला आणि मराठी, हिंदू यांच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या "शिवसेना" पक्षाचा घात केला. ज्या पक्षाचे बोट धरुन महाराष्ट्रात हातपाय पसरलेल्या भाजपने हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या हिंदुत्ववादी शिवसेना पक्षाला संपविल्याशिवाय श्रीमंत मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रावर कब्जा करता येणार नाही हे त्यांनी जाणले.
फितुरांच्या मदतीने शिवसेनेला खिळखिळी केल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातकडे वळवून इथल्या स्थानिक तरुणांना बेरोजगार केले. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हिरे बाजार सारखे सर्व मुख्य केंद्रे गुजरातला स्थापित केले. महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यवसाय संपवून टाकले. शासकीय कंपन्या गुजराती व्यापारी मित्र यांना विकल्या. जास्त गोंगाट होऊ नये म्हणून 370 कलम, राम मंदिर सारखे मुद्दे समोर आणले. अधूनमधून हिंदुत्वाचा पुरस्कार करुन लोकांना धार्मिक नशेत ठेवले. धर्माची नशा लोकांवर इतकी खोलवर रुजली आहे की, महाराजांचा अवमान होत आहे तरी भाजपमध्ये असलेले हिंदू मूग गिळून गप्प आहेत. हि खेदाची बाब होय. असे असतांनाही हळूहळू महाराष्ट्राची लूट सुरुच ठेवली आहे.
राजकीय फायद्यासाठी छत्रपतींचे नाव घ्यायचे मात्र महाराजांबद्दल मनात आकस कायम ठेवायचा. म्हणूनच कोश्यारी सारखा संघाचा बोथट राज्यपाल आणि छिंदम सारखे फालतु लोकं अधूनमधून महाराजांचा सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अवमान करत असतात. भाजपला खरोखरच महाराजांबद्दल आत्मीयता असती तर अशा लोकांवर तात्काळ कारवाई झाली असती. पण, तसे काही झाले नाही. जगात, देशात आणि महाराष्ट्रात छत्रपतीं शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे उभारले आहेत. वर्षानुवर्षे ते पुतळे ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करुन मोठ्या डौलाने उभे आहेत. मग सिंधुदुर्ग येथे आठ महिन्यापुर्वी उभा केलेला महाराजांचा पुतळा कसा आणि का जमिनदोस्त झाला? पुतळा उभारण्यात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांना प्रथम अटक करायचे सोडून यात विरोधकांनी राजकारण करु नये आणि महाराजांनी "सुरत" लुटली नव्हती तर आक्रमण केले होते असे वक्तव्य करणारे भाजपचे टॉपचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत की गुजरातचे? अशी शंका महाराष्ट्रातील जनता घेऊ लागली आहे. तुम्ही आमची "सुरत" लुटली आम्ही तुमच्यातीलच फितुरांच्या सहाय्याने तुमचा महाराष्ट्र लुटू हे खरचं होताना दिसत आहे. ✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत