गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक फेक नॅरेटिव्ह!तुषार गायकवाड
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक शहीद पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही नव्हता. शिवाय नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात शिवरायांचा अपमान केला. असे अर्धवट सत्य सांगत आणखी एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रकार राज्याच्या गृहमंत्री पदावरुन केला आहे.
वास्तविक आजरोजी देशात उभा असलेल्या छत्रपतींच्या अनेक पुतळ्यापैकी कैक पुतळे नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळात उभा राहीलेले आहेत. इंदिरा गांधी यांनी नेहमीच आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला अभिवादन करुन केली. राहुल गांधींनीही भारत जोडो १.० यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नंदूरबार मधून केली.
दुसरा मुद्दा नेहरुंच्या पुस्तकाचा! तर वाजपेयी सरकारचे केंद्रीय मंत्री भाजपाचे नेते, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनीच देवेंद्र फडणवीस यांचा अर्धवटपणा २०१८ साली खोडून काढला आहे. तेव्हा राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रकाराच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात राम नाईक अध्यक्ष होते.
या कार्यक्रमात बोलताना राम नाईक यांनी सांगितले की, ‘माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकात चुकून छत्रपतींना दिशाभूल करणारा देशभक्त म्हटले होते. यावर संपूर्ण महाराष्ट्राने तीव्र आक्षेप घेतला. नेहरुंनी मोठ्या मनाने आपली चूक कबूल केली. नम्रपणे संपूर्ण देशाची माफी मागितली. सर्व पुस्तके परत मागवण्यात आली आणि ही चुकीची ओळ पुस्तकातून हटवली.
त्यामुळे हा विषय तेव्हाच संपला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर, हिंदू महासभेचे विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत अतिशय गलिच्छ लिखाण केले. त्याबद्दल गोळवलकर, सावरकर, वाजपेयी, नरेंद्र मोदी, फडणवीस यांनी कधीही माफी मागितली नाही. उलट सावरकरांचा उदो उदो केला. आजही ते नीच लिखाण उपलब्ध आहे. याबद्दल लबाड फडणवीस काही बोलायचे धाडस दाखवतील का?
यासोबतच गुजरातचे कुपुत्र, सुरत लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य व मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेले जनता दलाचे नेते, देशाचे चौथे पंतप्रधान गुजराथी मोरारजी देसाई यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्याची माफी कोणीही मागितली नाही.
प्रतापगडावर दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेहरुंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला. तेव्हाचे नेहरुंचे भाषण फडणवीसांनी ऐकलेले नाही की त्यांच्या कानांना भसाड्या आवाजाची सवय असल्याने मृदू भाषणाचा आवाज ऐकू वाटला नाही? हे फडणवीसांनीच स्पष्ट करावे.
नेहरुंच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटनास संयुक्त महाराष्ट्र समितीने विरोध केला होता. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आमचे साहेब यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्टपणे बजावले की, ‘नेहरुंनी आपली चूक देशासमोर कबूल करुन पुस्तकातील ओळ काढून आपल्या चूकीची दुरुस्ती केली आहे. मोरारजी भाईंच्या चुकीची शिक्षा नेहरुंना देता येणार नाही.’
फडणवीस यशवंतराव चव्हाण, राम नाईक यांच्या पेक्षा स्वतःला शहाणे समजत असावेत. नेहमी लबाड बोलणारा हा मनुष्य राज्याच्या गृहमंत्री पदाची अप्रतिष्ठा करुन फेक नॅरेटिव्ह पसरवत महाराष्ट्रद्रोह करत आहे.
देवेंद्रजी तुमच्यात गुंजभर मर्दानगी आणि मराठी अस्मिता शिल्लक असेल तर माधव गोळवलकर, विनायक सावरकर, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, संघाचा स्वयंसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या नीच वक्तव्याची व लिखाणाबद्दल माफी मागा! त्यांचा निषेध करा!
- तुषार गायकवाड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत