”संविधान सन्मार्ग” हा खरा मार्ग !
मुंबई (तारीख १३ ॲागस) : भारताचे संविधान हे देशातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही, ही खरी समस्या आहे. यांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची खूप गरज आहे. त्या गरजेची किंचित परिपूर्ती या अंकातून दिसते. म्हणून “संविधान सन्मार्ग” हा खरा मार्ग असल्याचे विख्यात साहित्यिक व पॅंथर चळवळीतील एक अग्रणी ज वि पवार यांनी केले. ‘संविधान सन्मार्ग’ मासिकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा आशालता कांबळे होत्या.या प्रसंगी ज वि पवार यांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
चळवळीत मागील पन्नासहून अधिक वर्षांचा अनुभव असलेले ज वि पवार यांनी आंबेडकरवादी वृत्तपत्रांचा धावता आढावा घेतला व समाजाने “संविधान सन्मार्ग” मासिकाला उचलून धरावे , असे आवाहन केले. आपल्या वृत्तपत्रांना जाहिरातदार भेटत नसल्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते , यांकडे त्यांनी विशेषत्त्वाने लक्ष वेधले. या अंकाचे संपादन चोखंदळपणे केल्याबद्दल त्यांनी संपादिका आशा कांबळे , संपादन मंडळाचे सदस्य प्रा डॉ श्यामल गरुड , डॉ सुनीता सावरकर व प्रकाश तुपे यांचे कौतुक केले.
प्रमुख वक्त्या सुप्रसिद्ध लेखिका प्रा सिसिलिया कार्व्हालो यांनी सुगावा , अस्मितादर्श अशा मासिकांतून आपणांस प्रेरणा मिळाली , असे सांगून राजा ढाले यांच्यासमोर त्यांचीच कविता सादर केल्याची आठवण सांगितली. “संविधान सन्मार्ग” हे नाव खूप अर्थपूर्ण असून या मासिकाने त्या उंचीवर जावे , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठी नियतकालिकांवर डॉक्टरेट मिळवलेल्या प्रा सिसिलिया यांनी थेट “ज्ञानोदय” पासून “सुगावा” पर्यंतच्या नियतकालिकांत समाजाचे प्रतिबिंब कसे पडले आहे , हे सोदाहरण सांगितले. त्यांचे भाषण म्हणजे एक बौद्धिक मेजवानी होती.
बहुजन चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेल्या कुलदीप रामटेके यांनी प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना बौद्ध अर्थशास्त्र व आपापसांतील सुसंवाद यांवर भर दिला. कार्यक्रमास आलेल्या विविध क्षेत्रातील नामवंतांचा उल्लेख करून त्यांनी या पद्धतीने सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल “संविधान सन्मार्ग” परिवाराचे अभिनंदन केले.
मागील कित्येक दशके साहित्य क्षेत्रात स्वयंतेजाने तळपत असलेल्या समीक्षक - लेखिका व मासिकाच्या संपादिका प्रा आशालता कांबळे यांनी “आंबेडकरी आई” या प्रकल्पामुळे संपादनाची जबाबदारी स्वीकारणे अवघड वाटत होते , असे सांगून येथे निर्णयप्रक्रियेत आम्हां स्त्रियांची बूज राखली जाते असा सुखद अनुभव आल्याचे आवर्जून सांगितले. आमच्या भावंडांनी आमचा हा अवकाश आम्हाला द्यावा , असे आवाहन करून त्यांनी राजा ढाले यांचे “लिटील मॅग्झीन” व “संविधान सन्मार्ग” यांतील साम्यस्थळे सांगितली. भविष्यात “संविधान सन्मार्ग” असेच दिशादर्शक कार्य करेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या प्रा डॉ श्यामल गरुड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. पॅंथरच्या मंतरलेल्या काळाने आम्हाला लिहिते केले असे सांगून सध्याच्या वातावरणात चळवळींला पोषक अशी नियतकालिके जन्माला येणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन त्यांनी केले. राजकीय चौकटीपेक्षा वैचारिक चौकट महत्त्वाची आहे , यांवर त्यांनी भर दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांतर्फे तथागत गौतम बुद्ध , महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांसह भारतीय संविधानास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच शिवा इंगोले , कुंदा निळे , शालिनी वज्रचित्त व संतोष जाधव यांनी ग्रंथ भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार रक्षित सोनावणे, साहित्यिक शिवा इंगोले , अनुभवी वैद्यकिय व्यावसायिक डॉ सचिन खरात, सुप्रसिद्ध कार्यकर्ते माणिक भोंगाडे, संतोष पगारे, नंदा कांबळे , वैभवी अडसूळ , छाया बनसोडे, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी महेंद्र वारभुवन, प्रभाकर थोरात , मुकणे साहेब , यशवंत बैसाणे , पत्रकार सुनील खोब्रागडे असे विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित होते. सोशल एज्युकेशन मुव्हमेंट , मुंबई व आंबेडकरी स्त्री संघटन या संघटनांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सुत्रसंचालन शुद्धोदन आहेर तर आभार प्रदर्शन सुरेखा पैठणे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत