अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने क्रांतीभूमी महाड येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन !
मुंबई (प्रतिनिधी): आपल्या निहित ध्येय उद्दिष्टांनुसार कार्यक्रम राबवून अल्पावधीतच साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय झालेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने १८ ऑगस्ट २०२४ रोजी क्रांतीभूमी महाड येथे एका सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अपरान्तशी संबंधित साहित्यिक कलावंतांच्या या सत्कार समारंभास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
क्रांतीभूमी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या समारंभाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजय हिराजी खैरे हे आहेत. ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. श्रीधर पवार, मारुती सकपाळ, स्नेहा विठ्ठल कदम, अशोक चाफे, निलेश पवार, इंजि. अनिल जाधव, प्रा.सिद्धार्थ गोपाळ तांबे, प्रफुल्ल पुरळकर, सरिता पवार, चंद्रकांत घाटगे, दीपक पाटील, सुदत्ता गोठेकर आदी मानवंतांचा या कार्यक्रमात सन्मान होणार आहे.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने जानेवारी २०२५ मध्ये महाड येथील नियोजित तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीची रुपरेषा ठरविण्यासाठी सत्कार सोहळ्यानंतर तिथेच अपरान्तच्या रायगड जिल्हा शाखेसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या सर्व जिल्हा शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस सुनील हेतकर आणि संदेश पवार यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत